Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

ती पहिल्यांदा मोकळेपणाने छान हसली..

Read Later
ती पहिल्यांदा मोकळेपणाने छान हसली..


        नीता एक सुशिक्षित ,सुंदर तरुणी.तशी तिच्या लग्नासाठी स्थळे येत होती,पण योग्य असा वर तिच्या घरच्यांना मिळत नव्हता. नीता इंजिनियर होती,त्यामुळे तिला इंजिनियर किंवा डॉक्टर नवरा पाहिजे असे सर्वांचे मत होते. नीता मात्र थोडी अल्लड होती.तिने तिच्या लग्नाचा निर्णय घरच्यांवर सोडला होता.तसे पाहिले तर हल्लीच्या मुली स्वतः आपल्या लग्नाबद्दल निर्णय घेतात.पण नीता जरा साधीच होती,ती नेहमीच दुसऱ्यांचा विचार करायची. कॉलेजला जाताना तसेच घरी आल्यावरही ती आईला कामात मदत करायची,त्यामुळे ती घरकामात ही तरबेज होती.त्यामुळे कुटूंबीय सुद्धा निश्चिंत होते.

       असेच मग तिला एका इंजिनियर मुलाचे स्थळ आले.तिने त्याच्याजवळ आपली पुढील शिक्षणाची इच्छा व्यक्त केली.त्याने तिला तिची आवड जोपासण्यासाठी म्हणजे पुढील शिक्षणासाठी परवानगी दिली. नीताने लग्न झाल्यावर खूप कष्टाने पुढील शिक्षण पूर्ण केले.नवे घर,नवे कुटुंब,त्यांच्या आवडीनिवडी, यासोबतच स्वतःचा अभ्यास हे सारं करताना तिची खूप दमछाक व्हायची.पण पुढील शिक्षणाचा निश्चय प्रबळ असल्याने तिने चांगल्या गुणांनी मास्टर्स इन् इंजिनिअरिंग ही पदवी मिळवली.मग नोकरीची शोधाशोध सुरू असतानाच तिला दिवस गेले.घरात नवागताची चाहूल लागली,आणि सारे वातावरण हलके फुलके झाले.आठवा महिना पूर्ण झाला आणि अचानक तिला रात्री ब्लिडिंग चालू झाले.मग सर्वांची खूप धावपळ झाली कारण ऐन दिवाळीच्या काळात बरेच डॉक्टर्स सुटीवर होते.तिला आदल्या रात्री हॉस्पिटल मध्येच थांबवण्यात आलं.मग दुसऱ्या दिवशी बाळाचे ठोके कमी पडत असल्याने त्वरित सिझर करायचं ठरलं.

           सुंदर बाळकृष्ण देवाने जन्माला घातला,पण हा तान्हूला रडलाच नाही आणि बाळाला काचेच्या पेटीत ठेवावे लागले.

        डॉक्टरांनी नीता आणि तिच्या मिस्टरांना बोलावून घेतले.

डॉक्टर म्हणाले, "  तुमचे बाळ जन्मल्यानंतर रडले नाही म्हणून तुमच्या बाळाला सेरेब्रल पाल्सी हा मेंदुविकार झाला आहे."

नीता म्हणाली , " काय? पण तो तर १४ दिवस काचेच्या पेटीत होता ना,मग बरा कसा नाही झाला अजून? तो आता मोठ्या आवाजात रडतो देखील."

डॉक्टर म्हणाले, " हे बघा मी तुम्हाला समजून सांगतो.  जन्मल्यानंतर त्वरित बाळाने रडणे खूप महत्त्वाचे असते. बाळ जेव्हा पोटात असते तेव्हा आईची नाळ बाळाला अन्न ,ऑक्सिजन तसेच इतर पोषक घटक सतत पुरवत असते. जन्माच्या वेळी ही  नाळ कापली जाते.जेव्हा बाळाची श्वसन संस्था पूर्णपणे विकसित होते तेव्हा ती बाहेरील वातावरणात आल्यावर ऑक्सिजन घेण्यास सक्षम असते. पण तुमचे बाळ जन्मल्यानंतर रडले नाही म्हणजेच त्याची श्वसन संस्था पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने त्याच्या मेंदूला ऑक्सिजन मिळाला नाही, म्हणून त्याला हा विकार जडला."

नीता म्हणाली," मग यावर आता उपचार काय?"

डॉक्टर म्हणाले," यावर इलाज फक्त एकच आहे. तो म्हणजे रेग्युलर फिजिओथेरपी. या आजारामुळे बाळाचे  माईल स्टोन्स म्हणजे पालथे पडणे, मान धरणे, बसणे, उभे राहणे हे सर्व उशिरा होते किंबहुना कधी होईल हे सांगता येणे शक्य नसते."

नीता आणि तिचा नवरा दोघेही निराश झाले.त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघेही घरी पोहोचले.

नीताचा नवरा तिला म्हणाला,

"हे बघ नीता, तू जरी जिद्दीने तुझे मास्टर्स पूर्ण केले असले तरीही बाळाला सध्या तुझी जास्त गरज आहे त्यामुळे सध्या तू करिअर वर फोकस न करता बाळावर लक्ष केंद्रित कर . आपल्यापैकी एकाला तरी आपल्या बाळासाठी करिअर सॅक्रिफाइस कराव लागणार आहे."

नीता म्हणाली," बर. ठीक आहे."

    साधी भोळी मुलगी असल्याने घरात सासू-सासरे असून सुद्धा तिने आपले करिअर पणाला लावत मागचा पुढचा विचार न करता आपल्या स्पेशल मुलाची जबाबदारी स्वीकारली. ज्या करिअरसाठी तिने एवढी मेहनत आजवर घेतलेली होती त्या करिअरवर तिने आता पाणी सोडले होते.

          जवळपास पाच वर्षे बाळाची रेग्यूलर थेरपी चालू होती. त्यात घरातले काम ,आले गेले पाहुणे, सासू-सासरे या साऱ्यांना सांभाळत ती बाळाचे खाणे पिणे तसेच त्याची फिजीओथेरपी देखील अगदी मन लावून करत होती. आराम तर तिला माहीतच नव्हता. बाळाला दर एक एक तासाला पाणी पाजणे, दर एक तासाला शू शी ला धरणे, दिवसभर त्याला बसवून ठेवणे,त्याच्या ॲक्टिव्हीटीस घेणे यातच ती खुश होती.पण एवढा वेळ देऊनही तिचे बाळ मात्र आहे तिथेच होते. म्हणजे त्याच्यात काहीच सुधारणा नव्हती. ती खूप निराश झाली. तिची चिडचिड खूप वाढली. नैराश्याच्या गर्तेत प्रचंड अडकत जाऊन ती भरकटली.अशात तिचा नवराही तिला आधार द्यायला तयार नव्हता. कारण आजवर ती अखंडपणे सर्व जबाबदाऱ्या एकटीच पेलत आली होती. तिने बाळाची कुठलीही जबाबदारी नवऱ्याला कधीच घेऊ दिली नव्हती हीच तिची मोठी चूक होती. पण तिचे बाळावरचे प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. तिच्या पोटचा गोळाच होता तो शेवटी!

     थोडे दिवस फिजिओथेरपीला ब्रेक घेऊन तिने पुन्हा बाळावर मेहनत घेण्यास सुरुवात केली. तिने खूप मोटिवेशनल व्हिडिओज पहिले.त्यातील एक ओळ तिला खूप भावली ती म्हणजे,

"You are the creator of your own destiny. If nothing is changing then bring the change and for that first change yourself.. "

      मग तिने आपला छंद आणि आपले स्पेशल मूल यांना आपली शक्ती बनवली. ही शक्तीच आपल्याला एनर्जी देऊ शकते हे तिला पक्क ठाऊक होतं. तिने लिहिणे सुरू केले. विविध ब्लॉगिंग ॲप्सवर ती लिहू लागली. पण प्रगल्भ भाषा तसेच लेख लिहिण्यासाठी चांगले वाचन करायला हवे हे तिने ओळखले. मग लेखनासोबत तिने वाचनही सुरू केले. बाळाची फिजीओथेरपीही चालूच होती.

      टीव्ही बघण्यासाठी तिला वेळच नसायचा. पण कोण होईल करोडपती हा कार्यक्रम ती आवर्जून बघायची. एके दिवशी तिला वाटलं मी जर या कार्यक्रमात सहभागी झाले तर? तिने ठरवले या कार्यक्रमात आपण नक्की सहभागी व्हायचे. याबद्दल तिने नवऱ्याला विचारले, पण तो म्हणाला,

   "कसं शक्य आहे ? तुला ते जमणारच नाही आणि बाळाला कोण सांभाळेल ? तुझ्याशिवाय याला कोणीच सांभाळलेलं नाही. "

     पण तिचा आत्मविश्वास प्रबळ होता. याआधी कधीही बाळाच्या जन्मानंतर बाहेर न पडलेली ती बाळाला घेऊन मुंबईत ऑडिशनसाठी पोहोचली. सोबत तिने तिच्या आईला बोलवून घेतले. कारण तिच्या आई शिवाय तिला कोणाचाच आधार नव्हता.

      तिचे ऑडिशन मध्ये सिलेक्शन झाले. तिची पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये निवड देखील झाली. पण फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ही फेरी तिची चौथ्यांदा क्लिअर झाली. तेव्हा तिने सुटकेचा निः श्वास सोडला.ती थोडेसे घाबरतच हॉट सीटवर आली. निवेदक प्रश्न विचारत गेले आणि ती उत्तरे देत गेली. प्रगल्भ वाचन आणि लेखनाच्या जोरावर तिने ५० लाख रुपये ही रोख रक्कम जिंकली.तिने दोन्ही हात वर केले आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

निवेदक म्हणाले, "अहो तुम्ही या सीजन मधल्या एवढी रक्कम जिंकणाऱ्या पहिल्या स्पर्धक आहात. तुम्ही आनंदी राहून आता हसले पाहिजे."

    त्यावेळी ती पहिल्यांदा मोकळेपणाने छान हसली. एवढ्या दिवसात एवढ मोकळं तिला पहिल्यांदाच वाटत होतं. जणू काही  मनावरच्या दुःखाचं ओझं हलकं झाल्यासारखं तिला वाटत होतं. उभ्या महाराष्ट्राला ती दिसत होती. तिच्या शहरात ती परत आली. एका स्पेशल मुलाच्या आईने हा सन्मान पटकावला म्हणून तिचे जिल्ह्यात देखील जंगी स्वागत झाले. तिचा एवढा झालेला आदर सन्मान म्हणजे जणू काही देवाने   तिच्या आजवरच्या मेहनतीची तिला दिलेली पोचपावतीच होती.

समाप्त

      वाचकहो,कुटुंबावर आलेले संकट फक्त एकट्या स्त्रीची जबाबदारी नसते तर ती कुटुंबातील सर्व सदस्यांची जबाबदारी असते, कारण ती सुद्धा आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्या कुटुंबासाठी सतत उभी असते. त्यामुळे ती कुटुंबातील सदस्यांच्या प्रेमाची आणि आदराची हकदार असते, ही मानसिकता सर्वांनी समजून घेतली तर प्रत्येक कुटुंबातील स्त्री नेहमी आनंदी राहील व प्रगतीपथावर स्वतःचे अस्तित्व नक्कीच सिद्ध करू शकेल यात काही शंका नाही.होय ना?

फोटो: साभार गूगल 

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
कॅटेगिरी :लघुकथा
सब कॅटेगिरी: आणि ती हसली
जिल्हा नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

सौ प्रियंका कुणाल शिंदे बोरुडे

Freelance Teacher, Content Writer

I am Mrs Priyanka Kunal Shinde Borude,an Engineering Postgraduate Homemaker.I have a teaching experience of 3 years to Engg students.My Cerebral Palsy Child Explored me by all means.He gave me Vision towards life. Thank U my Little munchkin.

//