आणि मी निर्णय घेतला

"लोकं काय म्हणतील?" ह्या मानसिक द्वंद्वात अडकलेल्या प्रत्येक पार्थ ला एक माधव हवा असतो स्वतः शी असलेलं युद्ध जिंकण्यासाठी



कथेचे नाव:- आणि मी निर्णय घेतला
विषय - आणि ती हसली
फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
जिल्हा :- संभाजीनगर

फ्लॅट च दार धाडकन आपटून नंदिनी लिफ्ट कडे वळली..राग, अपमान आणि दुःख सगळं सोबत घेऊन ती निघाली..
बिल्डिंग खाली आधीच उभ्या असलेल्या ऑटो रिक्षा मध्ये बसण्या साठी नंदिनी पुढे झाली ..पण एकदा वळून पाचव्या मजल्यावर बाल्कनीत नजर टाकण्या साठी ती स्वतःला रोखू शकली नाही..
कोणीही नव्हतं तिथे!..हताश होऊन ती रिक्षा मध्ये बसली..
कुठे जावं ह्या विचारात असताना तिने रिक्षा जवळच असलेल्या समुद्र किनाऱ्या कडे आपसूकच घ्यायला सांगितली..
कदाचित तो समुद्रच तीच ऐकून घेऊ शकतो असं वाटतं असेल तिला..
समुद्र किनाराही रात्रीच्या वेळी शांत होता..नंदिनी थोडस पुढे जाऊन वाळूत बसली..डोळ्यातून मनातलं काहीतरी सलणार ओघळून जात होतं..
काय सलत होतं डोळ्यात?! तिचं एक स्वप्न! डोळ्याआड जपलेलं..पण आता मनातच दडपलेल.
"मॅडम रात्र झाली आहे, इथे जास्त वेळ थांबणं योग्य नाही!"
अगदी जवळून कोणीतरी बोलल्याचा आला.
भास की आवाज?!
डोळ्यातले अश्रू पुसून विचारातून बाहेर येत तिने मान वळवून पाहिलं.. खरचं कोणी तरी होत तिथे तिच्या पासून थोड्या अंतरावर.
"हन.. धोका फक्त मलाच? तुम्हाला नाही?" किंचित रागात विचारलं तिने.
तो हसला उत्तरा दाखल.
"स्त्री पुरुष समानता केवळ भाषणात, प्रत्यक्षात मात्र हे असं. निर्भय होऊन बसताही येत नाही काही वेळ." तिच्या मनातली चिडचिड बाहेर पडत होती.
"बाप रे..हे समानता बीमानता काय? मी फक्त तुम्ही एकट्या दिसल्या म्हणून काळजीने बोलायला आलो" तो अजूनही स्मित करत च बोलत होता.
" मी स्वतः ची काळजी घेण्यास समर्थ आहे, धन्यवाद." तुटकपणे बोलली नंदिनी.
"हो मान्य अगदी! ही माझी आवडती जागा आहे..रोज इथे बसून स्वतःशी च बोलतो आज तुम्ही आहात..खरतर बरच वाटलं मला.." बोलता बोलता तो थोड्या अंतरावर बसला देखील.
नंदिनीने एक कटाक्ष टाकला फक्त. नजरेतील धार पाहून लगेच त्याने प्रश्न केला "मी बसलो तर चालेल ना?!"
"तुम्ही बसलेलेच आहात"
नंदिनी चा रागीट स्वर, " सगळी कडेच तुमची मक्तेदारी, कुठे मनासारखं काही करू दिलं तर शपथ!" तोंडात पुटपुटण सुरूच होतं.
"ओळखीच्या लोकांपेक्षा अनोळखी लोकांजवळ मन मोकळं करावं, ते तुमच्या वागण्यावरून टोमणे मारणार नाहीत आणि महत्वाचं म्हणजे अनोळखी असल्याने पुढील आयुष्यात तसा त्यांच्या कडून धोका कमीच" त्याच्या बोलण्यावर नंदिनी ने एकवार त्याच्याकडे पाहिलं.
खरं तर व्यक्त होण्याची गरज तिलाही होतीच.
"बोलून तर पाहा, प्रश्न सुटतील कदाचित" तिच्या शांत असण्यावर तो व्यक्त झाला.
खरं तर त्याच्या कडे पाहून त्याला "तो" म्हणणं योग्य वाटतं नव्हतं.. कपड्यांवरून तरी सुस्थितीतील आणि दिसण्यावरून अनुभवी किंवा 45 ते 50 दरम्यान वय असावं असं वाटतं होतं. आवाज कमालीचा आश्वासक होता.
" तुम्ही म्हणता ते खरं असेलही कदाचित! पण मी माझा परिचय नाही देणार तुम्हाला, अनोळखी राहिलेलं आवडेल मला" नंदिनी "अगदीच! मलाही आवडेल अनोळखी असलेलं नातं" तो अगदी सहजपणे बोलला.
" मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे. टॉपर आहे माझ्या बॅच ची. मुंबईमध्ये एका चांगल्या कंपनीत नोकरी आहे." बोलु का नको ह्या विचारात नंदिनी थांबली थोडा वेळ. "तर हा प्रॉब्लेम आहे! तुम्ही इंजिनियर आहात आणि चांगला जॉब पण आहे" तो नाटकी आवाजात बोलला..नाही म्हणायला नंदिनी ला थोड हसायला आलंच.."नाही! खरा प्रॉब्लेम पुढेच आहे" आता बोलून मोकळं व्हायचं असं ठरवून नंदिनी ने पुढे बोलायला सुरुवात केली "कंपनीत काम करताना विहंगची भेट झाली पुढे चांगली ओळख झाली एका प्रोजेक्ट मध्ये, अधूनमधून बोलणं व्हायचं पण फार परिचय नव्हता. मी तशी खेड्यातून आलेली त्यामुळे कोणाशी फार जवळीक नव्हतीच, आणि अशातच एक दिवस अचानक घरून बोलावणं आलं, मुलगा येणार होता बघायला, नाही म्हणण्यात अर्थ नव्हता, गेले आणि समोर विहंग ला पाहून थबकले..
घरात आनंदीआनंद पसरला, इंजिनियर मुलगा, एकाच कंपनीत, एकच जात, एकाच शहरात, बापाची काळजीच मिटली.
किती आनंद होता त्यांच्या डोळ्यात शिवाय काळजीने जीव अर्धा व्हायचा तो आता होणार नव्हता.
सगळं बघून मला काय वाटतं ? माझी पसंत आहे का!? हा विचार सुद्धा कोणाच्या मनात आला नाही.
ठरलं सुद्धा सगळं बघता बघता.
मग एक दिवस विहंग ने त्याच्याच बिल्डिंग मध्ये माझ्या साठी समोरचा फ्लॅट भाड्याने घेतला , भाड अर्थात मीच देणार पण एकट्या मुलीची काळजी आणि येण्या जाण्याची सोबत ह्यावर सगळ्यांनी मला तिकडे राहायला जाण्यासाठी तयार केलं आणि माझ्या नकळत मी माझं स्वातंत्र्य त्याच्या हवाली केलं.
सकाळी उठण्या पासून झोपे पर्यंत सतत त्याची नजर माझ्यावर आहे असं मला तो जाणवून द्यायचा, त्याच्यासाठी मी एक कुक(स्वयंपाकी) होते बास!. बाकी कोणतीच अक्कल मला नाहीये .. डीपी हा का ठेवला? रात्री इतका वेळ कोणासोबत बोलत होती? रात्री ऑनलाईन का दिसते? स्टेटस असं का ठेवलं? हा ड्रेस नको घालु तोच घाल..रविवारी आपण घरीच आराम करूया तु मस्त मिसळ पाव कर..कशाला मैत्रिणी सोबत जाते?!
ऑफिस मध्ये तेच.. हा का बोलला? मी सांगतो त्याला समजावून तु कर तुझ काम..मी करून देतो तुझ प्रोजेक्ट..तुला जमणार नाही मी मदत करतो..
आह..मी कधी कटपुतली झाले त्याच्या हातातली मलाही कळलं नाही..
विरोध केला नाही ना कधीच!
आज माझी एका प्रोजेक्ट साठी निवड झाली ते प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झालं तर प्रमोशन आणि बदली होण्याची शक्यता आहे, तिथे विहंग ने बॉस ला परस्पर माझ्या कडून प्रोजेक्ट साठी नाही कळवल.
काही बोलले तर माझी किती काळजी आहे हेच सांगतो.
आज कळतय मला मी पुढे जावू नये त्याच्या म्हणून सतत त्याचे प्रयत्न होते, त्याला माहित आहे साखरपुडा झालेला असल्याने मी लग्न मोडू तर शकत नाही, आई बाबा चा विचार करून मी लग्न करेलच आणि आयुष्यभर ह्याच्या हाताखाली राहील.
पण मला नकोय ही घुसमट आता.. माझं शिक्षण माझे skill मी का वाया घालवायच? पण आई बाबा चा विचार करून काय करू काही सुचत नाहीये."
डोळ्यातील पाण्याची जागा आता रागाने घेतली होती पण नंदिनी हतबल झालेली दिसत होती.
मन मोकळं झाल्यावर तिलाही थोड हलक वाटतं होत. आता दोघात एक शांतता होती केवळ समुद्राचा आवाज येत होता.
तिचं सगळं शांतपणे ऐकून घेतलं त्याने
"तु बाबांसोबत बोलली का नाही इतके दिवस?
आई वडील हे ना ह्या समुद्रा सारखे असतात, तुम्ही तुमचे प्रॉब्लेम घेऊन जा त्यांच्या जवळ ते सगळं निर्माल्य सारखं वाहून नेतील..बघ नक्कीच ते मार्ग दाखवतील" त्याने जणू आश्वस्त केलं.
"खरचं होईल असं? नावं ठेवतील लोकं त्यांना!  नाही नकोच!" ती अजूनही तिच्याच विचारात होती.
"तु आता नाही बोलली तर विहंग बोलेल त्यांच्या सोबत आणि तु घरी नाहीस हे ऐकून त्यांना नक्कीच आनंद होणार नाही " तो
"खरचं हा विचार मी केलाच नाही" बोलत तिने मोबाईल काढला एक मिनिट विचार करून तिने बाबांना फोन लावला आणि डोळे बंद करून घेतले.
"बाबा" नंदिनीला हुंदका आवरला नाही
"इतक्या रात्री कुठे गेलीस बाळा, काळजी वाटते आम्हाला.विहंगचा फोन होता."
"बाबा मी ..मला नाही करायचं हे लग्न बाबा" कशीबशी बोलली नंदिनी
"शांत हो पोरी, तु विचारी आहेस आणि आमचा दुसऱ्या कोणाही पेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे..तु नक्किच विचार करून निर्णय घेतला असशील..मी बोलेल विहंगच्या वडिलांसोबत, पण आता तु घरी जा आणि काळजी करू नकोस सगळं ठीक होईल.. आपण ठिक करू सगळं..शहाणं बाळ जा आता घरी"
"बाबा " आणि पुढचे शब्द नंदिनीचा अश्रुत वाहून गेले.
"इतकं सोपं होतं हे?!" नंदिनी आता त्याच्या कडे वळून पाहत म्हणाली आणि अलगद त्याच्या खांद्यावर तीच डोकं ठेवून निवांत झाली जणू.
"बोलायला हवं ना नाही तर मार्ग असून दिसत नाहीत"" चल आता जा घरी" तो..
" हो घरीच जायचं आहे. आता सकाळ होईल काही वेळात तशीही दोन दिवस शनिवार रविवार ची सुट्टी आहेच तर आता गावी घरी जाऊन येते " नंदिनीच्या शब्दात आनंद होता.
दोघेही वाळूवर पायाचे ठसे उमटवत चालायला लागले. रस्त्यावर आल्यावर नंदिनी ने हात पुढे केला " मी नंदिनी"
त्याने हात हातात घेतला " मी असाच कोणी तरी" हसत बोलला तो.
"कोणी तरी नाही..तुम्ही नक्कीच माधव! आयुष्याच्या लढाईत माझ्या सारख्या पार्थ ला योग्य मार्ग दाखवणारे" नंदिनी कृतार्थ नजरेने पाहत बोलली.
"भेटूया पुन्हा अश्याच कोणत्या तरी वळणावर" इतकं बोलून तो चालायला ही लागला.
सोमवारी नंदिनी गावावरून सरळ ऑफिस मध्ये आली.
आधी बॉसच्या केबिन मध्ये जाऊन स्वतः चा निर्णय सांगितला.  ती प्रोजेक्ट साठी तयार असल्याचं ऐकून त्यांनाही आनंद झाला.
विहंग समोरून आला पण कोणतही दडपण न घेता अगदी इतर सहकारी प्रमाणेच नंदिनी ने त्याला ही "good morning" बोलली आणि जागेवर गेली.
आणि आज किती तरी दिवसा नंतर ती मनापासून हसली..
*समाप्त*

©®रश्मी बंगाळे
जिल्हा -  संभाजीनगर