आणि तो परत आला...! ( भाग चौथा )

भाग चौथा

रुपाली तिचा मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न करत होती. पण मोबाईल काही चालू होईना. मोबाईलची बॅटरी एवढ्यात काशी संपली याच तिला आश्चर्य वाटत होत. आता काय करावं.. आपण महत्वाची बॅग तर घरी विसरलो. 

बॅग...! रुपालीला बॅगची आठवण झाली आणि तिच्या डोक्यातील चक्र फिरायला लागली. संदेश असा कसा बॅग विसरला.? जाणूनबुजून तर विसरला नाही ना..? पण अस का करेल.... ?? काहीतरी विचार करून ती स्वतःच ओरडली ' नाही .. नाही .. असं काही नसणार.' एका क्षणासाठी तिच्या मनात भयंकर विचार येऊन गेला. छे..! किती मूर्खांसारखा आपण विचार करतोय. संदेश आपलं काही बरं वाईट का करेल..? 

पण तीच मन तिला सतावत होतं. ती परत त्याच विचारात गुंतली. परत तिला काही आठवलं. बॅग विसरला हे ठीक पण बस स्टँडला मलाच का तिकीट आणायला पाठवलं.? तो का नाही गेला..? आणि हे इथे आल्यावर. रूमची चावी घ्यायला ही पुढे आला नाही.

डॉक्युमेंटस्..! ते ही माझेच ...! का...? रुपाली विचार करून करून वैतागली. आताच संदेशकडे जावं आणि सगळं स्पष्टपणे विचारावं. हो.. ! असच केलं पाहिजे...! माझ्याकडून अशी काय चूक झाली की तो मला मारण्याचा विचार करत आहे....???? रुपाली उठली आणि बेडरूमकडे निघाली.तिने दोन पावलं टाकली असतील आणि तिची पावलं तिला जड झाल्यासारखी वाटली.

काय करायला चाललो आहोत आपण..? कोणाला जाब विचारणार आहोत..? संदेशला..? ज्याने इतके वर्ष आपल्यावर जीवापाड प्रेम केलं त्याला...? आणि कशाबद्दल जाब विचारणार आहोत..? जर आपण विचार करतोय त्यात काही तथ्य नसेल तर...? आपण सगळं गमावून बसू...! रुपेश..! रुपेशचं काय...? नाही .... संदेश रुपेशचा तरी विचार करेल...

 रुपेश..! रुपेशची आठवण झाली तशी रुपाली बेडरूमकडे निघाली. बेडरूमचा दरवाजा हलकाच उघडा होता. रुपलीने हळूच दार उघडलं. संदेश दरवाज्याकडे पाठ करून बेडवर शांत बसला होता. रुपालीने चारी बाजूस पाहिलं. रुपेश कुठेच दिसत न्हवता. रुपाली थरथरणारी पावलं हळूहळू टाकत संदेशकडे गेली. 

" संदेश...!!  संदेश . रुपेश कुठे आहे..? " 

संदेशने स्वतःच्या होटांवर एक बोट ठेऊन तिला शांत राहण्याचा इशारा केला. 

संदेश बेडवरून उठला आणि बेडरूमच्या दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागला. 

रुपाली ओरडली, " संदेश काय करतोयस...! रुपेश कुठे आहे...??"

संदेश मात्र पुढे चालत होता. दरवाजा बंद न करता तो बेडरूमच्या खिडकीच्याजवळ पोहोचला. त्याने हळूच पडदा बाजूला केला आणि...

" पकडला...! " संदेश हसत हसत बोलला.

चिमुकला रुपेश नाराज चेहऱ्याने पडद्यामागून बाहेर आला.

" बाबाच सालके जिंकतात..."

आणि तो हिरमुसला चेहरा घेऊन रुपालीकडे धावला. 

रुपाली निशब्द होती. ती काय विचार करत होती आणि काय घडतं होत. रुपालीला आता मनातून स्वतःचीच लाज वाटायला लागली. गैरसमजुतीतून आपण संदेशबद्दल काय- काय विचार करत होतो. ती रुपेशला जवळ घेऊन तिथेच बेडवर बसली. मागून संदेश ही त्यांच्याजवळ येऊन बसला. 
रुपालीला काय बोलावं हे सुचत न्हवतं. 

रात्र झाली होती. रुपेश आणि संदेश आता झोपी गेले होते. रुपालीला मात्र झोप येत न्हवती. तिच्या मनात खूप खलबते चालू होती. संदेशबद्दल नको ते विचार तिच्या मनात येऊन गेले होते. म्हणून रुपालीने संदेशकडे पाहून मनातल्या मनात " मला माफ कर" असं बोलून टाकल.... आणि ती ही झोपी गेली.

सकाळ झाली. रुपालीला जागी झाली तेंव्हा सकाळचे ८ वाजले होते. संदेश आणि रुपेश दोघे ही अजून झोपले होते. रुपाली फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. फ्रेश होऊन आल्यावर तिला आठवलं आपला मोबाईल चार्ज करायला हवा. म्हणून तिने मोबाईल हातात घेतला आणि हॉटेलच्या काउंटरजवळ पोहोचली. तिने काऊंटरवरच्या व्यक्तीला मोबाईल चार्ज करून देण्याची विनंती केली. त्याने मोबाईल चार्जिंगला ठेवला आणि परत रूममध्ये आली. संदेश जागा झाला होता. रुपेश अजून ही झोपलेला होता. संदेशने रुपालीला पाहिलं आणि म्हणाला,

" कुठे गेली होतीस..?"

" इथेच ..! काऊंटरला.. माझा मोबाईल ऑफ झाला होता. त्याची पूर्ण चार्जिंग संपली होती. म्हणून चार्जिंग करायला ठेवलाय."

" मग इथे चार्जर घेऊन यायचास ना...! कुणी मोबाईल चालू केला तर..? "

" अरे..! मोबाईलला पासवर्ड आहे." रुपाली समाधानपूर्वक बोलली. 

संदेश शांत झाला ,पण रुपलीनेच विषय वाढवला. " तुझा मोबाईल कुठे आहे..?" 

" माझा...! माझा मोबाईल थोडा खराब झालाय.मी रिपेअरला दिलाय. "

संदेशचा चेहरा पडला होता. रुपालीने ते हेरलं होत. पण सद्या दुर्लक्ष करून तिने रुपेशला उठवलं आणि काऊंटरला बेल मारून नाष्टा मागवला. नाष्टा करण्यात १५-२० मिनिटे गेली. नाष्टा झाल्यावर काही वेळाने रुपालीने जाणीवपूर्वक संदेशला पहिले आंघोळीला पाठवलं. संदेश आंघोळीला गेल्यावर लगेच रुपालीने रुपेशला टी. व्ही. लावून दिला आणि ती स्वतःचा मोबाईल आणायला गेली. काऊंटरवर जाऊन तीने तिचा मोबाईल घेतला. लगेच तो ऑन करण्यासाठी तिची घाई चालली होती. मोबाईल चालू झाला. बॅटरी बऱ्यापैकी चार्ज झाली होती. मोबाईल घेऊन ती रूमकडे जातच होती इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. रुपालीच्या मोबाईलवर एका लँडलाईन नंबर वरून कॉल आला होता.  रुपालीने तो कॉल उचलला.

समोरून एका महिलेच्या आवाजात, " हॅलो. "

" हॅलो..! कोण..?"

" रुपाली संदेश पवार बोलताय ना..?"

" हो. मीच बोलतेय. आपण कोण..?"

" आपण सद्या कुठे आहात.?" 

" मी माझ्या घरी आहे.. तुम्ही कोण..? आणि का असे प्रश्न विचारताय..."

" तुम्ही तुमच्या मुंबईच्या घरी आहात का..?"

" हो... पण का विचारताय..?"

" बघा मॅडम. खरं सांगा तुम्ही कुठे आहात.आम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमच्या घरी नाही आहात."

अरे देवा..! ह्यांना कसं समजलं मी घरी नाही आहे ते...? कोण बाई आहे ही...? मोबाईल मधून समोरचा आवाज येत होता..  ' हॅलो..! हॅलो...! ' आणि आता मोबाईल मधूनच एका पुरुषाचा आवाज आला, ' सर..! मोबाईल ट्रेस झालाय. महाबळेश्वर लोकेशन आहे..'. रुपालीने हे ऐकलं आणि परत बोलली... , 

" तुम्ही कोण माणसं आहात...?"

" आम्ही डी.जी.के. पोलीस स्थानकातून बोलत आहोत. तुम्ही ताबडतोब निघून डी.जी. के.पोलीस स्टेशनला या..! "

" पण का..? "

" तुम्ही या नाहीतर आम्हाला तिथे यावं लागेल." 

रुपाली ह्या अनपेक्षित प्रकाराने गोंधळून गेली. पोलिसांकडून काही तरी चूक झाली असेल. पण नाव तर बरोबर घेतलं त्यांनी. काय झालं असेल...?

🎭 Series Post

View all