आणि तो परत आला...! ( भाग पाचवा )

Episode fifth

रुपाली रूममध्ये आली. संदेश सोफ्यावर बसला होता. संदेशने रुपेशला सुद्धा आंघोळ घातली असावी.  दोघेही मस्त फ्रेश वाटत होते. पण बॅग घरी विसरल्यामुळे कपडे तेच...रुपालीला पाहताच संदेश बोलला, 

" अगं..! कुठे गेली होतीस..? आपण इथे फिरायला आलो आहोत. चल लवकर... तयार हो...!"

" हो... हो... मी लगेच आंघोळ करून घेते आणि लगेच निघू.."

रुपाली आंघोळीला गेली आणि काही वेळाने आंघोळ करून आली. निघायची तयारी करत असताना तिला आलेल्या त्या कॉलची आठवण झाली. काय करावं? संदेशला सांगावं का..? खरचं मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं असेल ? पण का.? की कुणी मस्करी करत असेल...? विचारमग्न असताना संदेश तिच्या समोर आला. 

" छान दिसतेयस.."

" हं..."

" छान दिसतेयस बोललो..!"

तशी रुपाली भानावर आली. " चल.. निघुया का..?"

" हो..! रुपेश आणि मी तुझीच वाट बघतोय..."

तिघेही हॉटेलमधून बाहेर पडले. सकाळची वेळ. जेमतेम ९.३० वाजले होते. रुपालीचा हात पकडून रुपेश उड्या मारत चालला होता. रुपाली आणि संदेशच्या गप्पा चालू होत्या. चालत चालत तिघेही सनराईज पॉईंटपर्यंत पोहोचले. महाबळेश्वर मार्केट पासून सनराईज पॉईंट म्हणजे जवळ जवळ ३ किलोमीटरच्या आसपास अंतर. पण गप्पा मारत मारत ते कधी तिथवर पोहोचले त्यांना कळलंच नाही. सूर्योदय होऊन बराच वेळ झाला होता, पण महाबळेश्वरच्या थंड आणि धुकं असलेल्या वातावरणात सूर्योदय खूपच मनमोहक वाटत होता. तिघेही तिथेच बराच वेळ एका कठड्यावर गप्पा मारत बसले.

दुपारची वेळ झाली होती. रुपालीने हॉटेलमध्ये जेवायला जायचं ठरवलं. संदेश मात्र बाहेरच काही खाऊन फिरायचा प्लॅन केला होता. पण पोटपूजा पहिली केली पाहिजे म्हणून की काय तो शांत बसला. तिघेजण त्यांच्या हॉटेलमध्ये आले. स्वागत कक्षात दोन पोलीस कर्मचारी आणि एक महिला पोलीस कर्मचारी बसले होते. काऊंटरवर कुणीही न्हवतं. तिघेजण त्यांच्या रूममध्ये आले. रुपाली संदेशला बोलली ,

" मी जेवायला काही मागवते..! तू फ्रेश हो..!"

संदेश बेडरूमकडे गेला. रुपालीने रुममधील लँडलाईन फोनचा रिसिव्हर उचलून कॉल केला. 

" हॅलो.. मी रूम नंबर ३०९ मधून बोलतेय.."

" हां मॅडम... तुम्ही आलात का..?"

" हो.. तुम्ही जेवणाची ऑर्डर घेता का..?" 

आणि ती ऑर्डर सांगणार तोच तीच बोलणं मध्ये थांबून समोरचा व्यक्ती बोलला.

" मॅडम. मी ऑर्डर घ्यायला तुमच्या रूमवर येतो.." एवढ बोलून त्याने कॉल कट केला. 

थोड्याच वेळात दाराची बेल वाजली.  रुपालीने दार उघडलं आणि पाहते तर काय... तीन पोलीस कर्मचारी आणि हॉटेलचा एक माणूस समोर उभे आहेत. 

त्यातील एक पोलीस म्हणाला, " रुपाली संदेश पवार तुम्हीच ना..?"

" हो... का? काय झालं...?"

"साहेबांनी तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलं आहे...चला..!"

" पण का..? मी काय केलंय..?"

" तुम्ही चला... पोलीस स्टेशनला सगळं समजेल..."

" अस कसं मी पोलीस स्टेशनला येऊ...."

महिला कर्मचारी आता आवाज चढवून बोलली, " चला लवकर...! तिकडे मुंबईला तुमचे नातेवाईक वाट बघत बसलेत आणि तुम्ही इथे मज्जा मारताय... "

" मुंबईचे नातेवाईक..? कोणी पोलीस कॅम्पलेंट केली..? "

" तुमचे आई वडील आणि तुमचे सासु सासरे.."

आपण एक कॉल केला नाही म्हणून ह्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. अरे बापरे..! घोळच झाला की.. असं रुपालीला वाटलं...

रुपाली स्वतःशीच बोलली , " त्यांना मी काल कॉल केला नाही म्हणून लगेच पोलीस कॅम्पलेंट केली...? " 

महिला पोलीस बोलली, " चला लवकर..! "

तसं रुपालीने संदेशला हाक मारली. आता पोलीस कर्मचारी आणि हॉटल कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले. छोटा रुपेश रुपालीला येऊन बिलगला...

पोलीस कर्मचारी बोलला, " ह्याचपण नाव संदेश का..?"

" नाही.. ह्याच नाव रुपेश.. माझा मुलगा. संदेश माझे मिस्टर.."

" कुठे आहेत ते...? "

" बाथरूमला गेलेत.. येतीलच इतक्यात..."

" तुम्ही बाथरूमचा दरवाजा वाजवा..."

रुपाली आता थोडी रागावलीच.. " अहो..! येतील ते..."

आता पोलीस कर्मचारीच बाथरूमकडे गेला. बाथरूमचा दरवाजा बंद होता. त्याने दरवाजावर थाप मारल्याबरोबर दरवाजा आत उघडला. आता कुणीच न्हवतं. 

" आत कुणीच नाही...!"

"बेडरूम मध्ये असतील.." रुपाली बोलली.

पोलीस कर्मचारी बेडरूममध्ये गेला. तिथे ही कुणी न्हवतं .

🎭 Series Post

View all