आणि तो परत आला...! ( भाग तिसरा )

ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. ह्या कथेचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी, किंवा एखाद्या घटने

बस महाबळेश्वरच्या जवळपास आली होती. महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्रातील काश्मीरचं जणू. नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं सर्वत्र लोकप्रिय असं थंड हवेचं ठिकाण. त्यामुळे बसच्या खिडकीतून थंड हवेची एक झुळूक आली. अचानक अंगावर शहारे आले आणि रुपाली जागी झाली. संध्याकाळची वेळ होती. सूर्यास्त होत होता. सगळीकडे सूर्याची सोनेरी किरणे सडा घालीत होती. रुपालीने डोळ्यावरची झोप उडवून बाजूला पाहिलं. दुसऱ्या एका रिकामी सीटवर बसून संदेश रुपेशला बाहेरील दृश्य दाखवत माहिती देत होता. चिमुकला रुपेश त्याच्या भाबड्या प्रश्नांनी बोबड्या स्वरात संदेशच मनोरंजन करत होता. रुपाली हे पाहत होती. 

बस आता महाबळेश्वरला येऊन थांबली. रुपालीने रुपेशला हाक मारली, 

" चला..! आपण पोहोचलो. आता खाली उतरायचं की नाही."

रुपेशने गालात हसून मान डोलावली आणि संदेशच्या मांडीवरून खाली उतरला. रुपाली पुढे आणि तिच्या मागून ते दोघे बस मधून खाली उतरले. संध्याकाळची वेळ असल्याने फिरायला म्हणून घराबाहेर पडणाऱ्यांची बरीच रहदारी होती.  रुपालीने संदेशला प्रश्न केला,

" तू रूम बुक केला आहेस ना...?" 

" हो. इथून जवळच हॉटेल आहे." संदेश बोलला.

आता संदेश पुढे चालू लागला. मागून रुपेश रुपालीची करंगळी पकडून उड्या मारत येत होता. संदेश एका हॉटेल समोर येऊन थांबला. त्याने मागे वळून पाहिलं. रुपाली थोड्या अंतरावर होती . संदेश हॉटेलमध्ये गेला. मागून रुपाली ही आली. आत येताच एक तरुण हातात रूमची चावी घेऊन उभा होता. त्याचा चेहरा जरा गंभीर वाटत होता. त्याला कसलीतरी घाई होती. संध्याकाळची वेळ होती. त्यामुळे ग्राहकांच्या चहा पाण्याची किंवा इतर काही काम असतील त्याला. रुपालीला पाहताच त्याने त्याच्या उजव्या हाताने चावी पुढे धरली.

" तुमच्या रूमची चावी. रूम नंबर ३०९."

रुपालीने चावी घेतली. त्याला थॅंक्यु किंवा काही विचारायच्या आधीच त्याने पाठ फिरवली. रुपालीने हातातल्या चावीकडे पाहिलं आणि मान वर केली तर समोर संदेश होता. 

" चला मॅडम..."

रुपाली गालात हसली. बाजूला जिना होता. तिघे ही जिना चढू लागले. दुसऱ्या माळ्यावर रूम होती. एका माळ्यावर एकूण दहा रूम होत्या. ३०९ नंबरची रूम म्हणजे शेवटची रूम होती आणि समोर ३१०. रुपालीने चावी लावली आणि रूमचा दरवाजा उघडला. तिघे ही आत आले. दरवाज्याच्या जवळच लाईटची बटणं होती. रुपालीने जवळपास सगळी बटणं चालू केली. सगळ्या लाईट्स चालू झाल्या. खूप सुंदर रूम होती. रूम मध्ये गारवा होता. प्रवासातला त्राण होता. रुपाली आणि संदेश सोफ्यावर बसले. 

" थॅंक्यु संदेश."रुपाली बोलली.

" कशाबद्दल थॅंक्यु...?" संदेश बोलला.

" तू खूप मेहनत घेतोस. तू केलेल्या मेहेनतीच फळ म्हणून तुला प्रमोशन मिळालं. आता हळूहळू आपली स्वप्नं....."

रुपाली पुढे काही म्हणायच्या आत संदेशने रुपालीलाजवळ घेऊन तिच्या कपाळावर चुंबन घेतल. रुपालीने संदेशच्या छातीवर डोकं ठेवलं. कदाचित तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले असावेत. रुपेश ही धावत संदेशला बिलगला. थोड्या वेळाने संदेश फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला असावा आणि तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली. रुपालीने दरवाजा उघडला. हॉटेलचा एक माणूस जेवणाची ताटं घेऊन आला होता. रुपालीने त्याला जागा करून दिली आणि त्याने ताटं टेबलवर ठेवली. तो बाहेर जायला निघाला आणि काही आठवल्यासारखं मागे वळून बोलला,

" मॅडम. मॅनेजर साहेबांनी सांगितलं आहे की तुमचा एखादा आय.डी. प्रूफ असेल तर घेऊन ये...!"

"माझा आय.डी. प्रूफ..? " रुपाली आश्चर्याने बोलली. 

"हो."

रुपालीला आठवलं की संदेशने फोनवरून रूम बुक केली होती. त्यामुळे आता काही आय.डी. प्रूफ द्यावा लागेल. म्हणून तिने तिची पर्स उघडली. पर्स मधील तिच एक ओळखपत्र तिने त्या व्यक्तीला दिलं. तसा तो व्यक्ती निघून गेला. पर्समधील मोबाईल पाहिल्यावर रुपालीला आठवलं की आपण आईला कळवलं पाहिजे ,आम्ही महाबळेश्वरला आलो आहोत म्हणुन. तिने मोबाईल हातात घेतला. मोबाईलचं लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. पण....


 मोबाईल " स्विच ऑफ". झाला होता.

🎭 Series Post

View all