आणि गौराई हसली!

A rebelling story of gauri pooja.


गोष्ट छोटी डोंगराएवढी !

विषय -  गौराई माझी लाडाची

कथा शीर्षक - आणि गौराई हसली!


लेखिका  -स्वाती  बालूरकर, सखी


क्षितिजा चा जन्म कोकणातला असला तरी बालपण सगळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेलं होतं.


लहानपणापासून तिला गौरी गणपतीच्या सणाची खूप आवड होती.
तिच्या घरी आई खडयाच्या गौरी बसवायची पद्धत होती त्यामुळे सजावट किंवा रोषणाई असं काही नव्हतं . बाकी आई सगळे पक्वान्न करायची, साग्रसंगीत नैवेद्यही असायचा पण मैत्रिणीच्या घरी बसवलेल्या उभ्या गौरी पाहून तिला खूप आनंद वाटायचा. आपणही असं करावं वाटायचं.

एकदा १०-१२ वर्षांची असताना ती आईला नेहमी विचारायची "आपणही करूयात ना गं उभ्या गौरी ?"


"नाही गं बाळा! आपल्यात तशी पद्धत नाही."

"पण का?"

"अगं हा सण प्रत्येकाच्या प्रदेशाप्रमाणे किंवा घरातल्या पद्धती प्रमाणे केला जातो बाळा ,असं मनाने नाही करत कुणी?" आईने समजावलं.

"हा सण पोरखेळ नाही हो, चूक झाली की देवी कोपते." आजी मधेच म्हणाली.

"पण गौरी म्हण की महालक्ष्मी म्हण . . . आहे तर देवीच ना ती? लक्ष्मी आहे ना ! मग आपण तिला सजवलं, सुंदर सजावट करून बसवलं तर तिला वाईट का वाटेल? तिची पूजा केली तर तिला राग का येईल? उलट आनंद व्हायला हवा ना !""

"वितभराची नाही पण किती वाद घालते गं ही? आम्हाला माहित आहे सगळं . क्षिती तू जा बाहेर आईला खूप कामं पडलीयत." आजीने तिचा विषयच ऐकून किंवा समजून घेतला नाही.

ती नाराज होऊन बसली.

मग आई हळूच जवळ आली व म्हणाली "क्षिती बाळा जा, तू हवं तर तुझ्या मैत्रिणीकडे गौरीकडे जाऊन मदत कर जा. त्यांच्याकडे उभ्या गौरी असतात किनई?"

बागेतली फुलं आणणं, बाप्पा साठी दुर्वा तोडून आणणं, अघाडा शोधून आणणं , फुलांच्या माळा करणं , अशी मदत ती गौरीच्या बरोबरीने करायची. गौरी क्षिती ची मैत्रिण . तिची आई स्वतः तीन दिवस नऊवार साडी नेसायची ,नथ घालायची आणि अंबाडा बांधलेला. किती सुंदर कळा असायची चेहर्‍यांवर. खूप दैवी दिसायच्या शारदाबाई.


"काकू तुम्ही पण तीन दिवस महालक्ष्मी सारख्याच दिसता!" एकदा ती गौरीच्या आईला म्हणाली होती. त्यांना खुप आनंद झाला होता.

" अगं बाई हो का? आणि क्षिती तू पण सासरी गेल्यावर अशाच उभ्या गौरी कर बरं का ? तुला आवडतं ना असं सजवायला?"

त्या म्हणाल्या होत्या. त्या नकळत्या वयातही ती सासर शब्दाने लाजली होती.

मनात वाटलं , म्हणजे आईकडे नसलं तरीही सासरी उभ्या लक्ष्म्या असू शकतात. मला करायला मिळेल.

तिने मनोभावे देवीला नमस्कार केला, त्या देवीच्या गोड पिल्लावळांना कितीवेळ पहात बसली.

"देवी मला पण अशा उभ्या गौरी करायला मिळू दे. साड्या नेसवायला मिळू देत. " मनात मागितलं.

अशा वातावरणात क्षिती व गौरी लहानाच्या मोठ्या झाल्या. मैत्री आणि सगळं काही तसंच .

कॉलेज संपत आलं होतं.

यावर्षी तर तिने शारदाकाकूंकडे मंडपाला पडदे लावण्यापासून तर देवीच्या साड्या नेसवेपर्यंत मदत केली. शारदा काकूंना म्हणजे गौरीच्या आईला सगळी मदत मिळाल्यसने तचया खूपच कौतुक करत होत्या.

दोघीं मैत्रिणींनी मिळून मोठी सुंदर रांगोळी काढली अंगणात.

शेवटच्या दिवशी त्या काकू हळदी कुंकु ठेवायच्या.
गौरी आणि क्षिती दोघीही साड्या नेसून कंबरपट्टा लावून वगरे खूप सुंदर तयार होऊन थांबल्या होत्या.

येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकांना यापोरींचं खूप कौतुक वाटत होतं.

क्षितिजाची आई पण जेव्हा हळदीकुंकवाला आली तेव्हा मात्र न राहवून शारअ काकू म्हणाल्या, तुम्ही आता क्षितीजेसाठी स्थळ बघाल तर ज्यांच्या घरी उभ्या महालक्ष्मी आहेत तिथेच द्या , कारण तिकडेपण तुमच्यासारखी पध्दत असली तर हे सगळं कसं करेल .पोरीला खूप आवड आहे लक्ष्म्यांची. खूप श्रद्धेने करते सगळं!"

आईपण म्हणाली, "होना शारदाबाई, बरोबर आहे तुमचं. तिला खरंच तुमच्या घरच्या गौरी खूप आवडतात आणि तुम्हीपण !" सगळेच हसले.

योगायोगाने योग्य स्थळ आलं व सहा महिन्यांनंतर क्षितिजाचं लग्न ठरलं.

तिने बघायला आल्यानंतर पहिला प्रश्न सासुबाईंना हाच विचारला होता की तुमच्या घरी उभ्या गौरी असतील का ?
हो असं कळाल्यावरच मग तिने बाकीच्या गोष्टींसाठी होकार दिला होता.
ती खूप आनंदात होती. नवरा व सासू सासरे खूप हौशी वाटले शिवाय तिला लग्नानंतर उभ्या गौरी करायला मिळतील म्हणून.

तिचे सासूबाईंनाही खूप आवड होती.

त्यांनाही छान वाटलं आजकालच्या मुली कामाचा आणि पूजेचा कंटाळा करतात पण क्षितीला मुळातच आवड होती.

लग्नानंतरही ती खूप पटकन त्या घरी रुळली.

सगळे सणवार श्रद्धेने करू लागली.

लग्नानंतर पाच - सात वर्ष तरी नोकरी करायची नाही. मुलं मोठी झाल्यावर बाहेर पडायचं असं अगोदरच ठरलं होतं त्यामुळे तिने घरातल्या सगळ्या रीतीभाती पध्दती यामध्ये स्वतः ला झोकून दिलं.
घरात खूप संपन्नता , कष्टाळू नवरा आणि सासूबाईपण खूप हौशी होत्या. पहिल्या वर्षी हवी ती खरेदी, मंडप, पडदे, लाइटिंग ,सुंदर साड्या सगळं आणलं. थाटात गौराई बसवली. सासूबाई निर्धास्त झाल्या. माझी सून परंपरा चालवणार. चुलत मावस जावा , ननंदा, शेजारणी, पाहुणे कुणी जेवायला तर कुणी हळदीकुंकवासाठी. घरात किती लगबग व कार्य असलेला भाव होता.

तिचं लग्न झाल्यानंतर एका वर्षी ती तिच्या माहेरी आली तेव्हा शारदा काकूंना म्हणाली, "काकू माझ्या घरच्या गौरी खूप सुंदर असतात. तुम्हाला फोनमध्ये फोटो दाखवते परंतु प्रत्यक्ष कधी बघणार? त्या म्हणाल्या बेटा मी माझ्या माहेरच्या गौरीच पाहिल्या नाहीत इतक्या वर्षांत. नाही गं बायकांना दुसरीकडे जाता येत नाही आपल्या घरी सण असला की! तू फोटो पाठवत जा, मी नक्की पाहिन . आणि एका गावात असतं तर किमान हळदीकुंकवाला तरी आले असते पण नाही ना बेटा, दुसर्‍या गावी माझा सण सोडून मला नाही येता येणार. "

" ठीक आहे काकू हरकत नाही. मी तुम्हाला फोटो पाठवेन पण मला तुमची खूप आठवण येते गौरीच्या सणाला. तुमचा स्वयंपाकही कसा महाप्रसाद वाटतो."

गोष्ट तिथेच राहून गेली.


वर्ष दीड वर्षांनंतर क्षितीला दिवस राहिले तिला एक मुलगा झाला.

संसार , सणवार सगळे गुण्यागोविंदाने चालले होते.

क्षिती दरवर्षी गौरी गणपतीच्या काळात खुप आनंदी असायची आणि तिला प्रत्येकवेळी शारदा काकूंचा तो तेजस्वी चेहरा आठवायचा.
ती ही तीन दिवस नऊवारी नेसायची, चंद्रकोर लावायची, अंबाडा घालायची, नथ घालायची.
सगळेजण क्षितीलाही म्हणायचे की तू अगदी लक्ष्मीसारखी दिसतेस !

लग्नाला चारपाच वर्षं झाली , मग एक मुलगी झाली. गौर घरी आली आणि हा महालक्ष्म्यांचं पसारा वाढतच गेला .
अाधी तर सासूबाई खूप हौसेने दहा वीस लोकांना बोलवायच्या .
नंतर -नंतर तिच्या मैत्रिणी , पाहुणेरावळे, येणार जाणार, या सगळ्यात चाळीस पन्नास माणसं तिच्या घरी जेवायला असायची.
आणि खूप हौसेने क्षिती हे सगळं करायची.

तिला खूप भरून पावल्यासारखं वाटायचं. लक्ष्मीच्या स्वयंपाकाला मुळी खूप बरकत असते.

"अन्नपूर्णेचा हात आहे हो तुझ्यावर ,किती लोक अाले तरीही रात्रीपर्यंत अन्न कमी पडत नाही!" असं सासूबाई कौतुकानं म्हणायच्या.

क्षितिजा लग्नानंतर साडेतीन चार वर्षांनंतर अचानक गणपती येणाच्या महिनाभर अगोदर तिला कळालं की गौरीचे बाबा गेले , अचानकच पांढर्‍या काविळीने.
काकांचा स्वभाव खुप शांत होता पण त्यांना मुलींचा विशेष लळा होता .
त्यामुळेच क्षितीला दोन दिवस करमलंच नाही. सारखं डोळ्यात पाणी यायला लागलं . ती एक दिवस गौरी आणि काकूंना भेटून आली होती.

आणि प्रत्येक जण तिथे तेच म्हणू लागलं की \"गौरीच्या आईने इतक्या श्रद्धेने करायच्या मग देवानं त्यांना न्याय का नाही केला ? त्यांचे इतकं पुण्य कुठे गेलं? वगैरे वगैरे \"

ही सगळी चर्चा ऐकूण क्षितिजाचं डोकं भणभणलं .
तिने काकूंना खूप आग्रह केला की "काकू नक्की माझ्याकडे रहायला या , बदल म्हणून. सासूबाई पण म्हणाल्यात तर माझ्याकडे राहायला या चार दिवस!"

सव्वा महिन्यानंतर एक दिवस गौरी कडे गेल्या महिनाभर तिथे राहिल्यावर क्षितीच्या आग्रहाखातर गौरी आणि काकू क्षितीच्या सासरी आल्या. गौरी परत गेली.

तिने शारदा काकूंना खूप राहण्याचा आग्रह केला म्हणून त्या दोन दिवस राहिल्या .

क्षितिजाच्या सासूबाई किती हौशी असल्या किंवा छान बोलल्या तरीही काही बाबतीत फारच सनातन होत्या.

बोलायला हौशी व पुढारित वाटल्या तरी काही रिती व परंपरांचा पगडा होताच.

त्यांच्या काही पध्दती क्षितीला रुचायच्या नाहीत पण सवय झाली होती. दोघींनाही.

गौरीच्या आई ना सासूबाईंनी किती सांत्वना दिली असली तरी, त्यांचं घरात वावरणं , मोकळं राहणं त्यांना खटकत होतं.

दोन दिवस राहिल्यानंतर त्या परत गेल्या जावई घेवून गेले.

संध्याकाळी क्षितीने सहज पाहिलं की सासूबाई किचनमध्ये बेसिनमध्ये काहीतरी धूत आहेत .

" काय करताय माई? भांडे तेव्हाच धुतले ना बाईने. मी काही मदत करू का ? " ती आत गेली व तिने पाहिलं की त्या पंचपाळ आणि दिवा धूत होत्या.

"अहो माई , सकाळी धुतलेलाच लावला ना तो दिवा, अन पंचपाळ परवाच धुवून भरलेलं होतं ."

" पण त्या बाईने हात लावला ना ! "

"कुणी ?"

"तुझ्या त्या मैत्रिणीच्या आईने! "

"मग असं काय झालं?"

"अगं नवरा जावून आता तर दोन -तीन महिने झालेत. त्या वाहिनीनी पंचपाळाला कशाला हात लावायचा? ते पण दुसर्‍यांच्या घरी? देवाला हळदी कुंकू वाहून, दिवा लावून , डोळ्यात पाणी काढून निघाली इथून !"

सासूबाईंचं हे बोलणं व तो सूर क्षितीला बिलकुल पटला नाही.

" माई काय बोलताय , वाईट तर त्यांना वाटणारच ना! देवभक्त आहेत काकू. हळदीकुंकु देवालाच वाहिलं ना! त्यात काय? राहिल्या हक्काने. मी परकं नाही मानत त्यांना !"

" नाय बाई ! मला नाही चालत अशा बायकांनी पंचपाळाला हात लावलेला."

आता मात्र क्षितिजाचा खूप संताप झाला.

" माई , असा बायका काय? ते कुणाच्या हातात आहे का ? काका आजाराने गेले , अचानक. काकूनी काय त्यांना मारलय का ? हे तर मला तुमचं पटलं नाही. आधीच बाई दुः खात असते त्यात हे असं ! "

"तुला पटो अथवा न पटो , क्षिती, मी आहे ती अशी आहे. या गोष्टीत माझ्याशी वाद घालू नको."

ती शांत बसली, पण ती घटना तिच्या मनात कुठेतरी खोल रुतून राहीली.


७-८ वर्षे अशीच आनंदात गेली. गुण्यागोविंदानं संसार चालू होता . आजी आजोबा , क्षिती सुमेध आणि दोन नातवंडं . मस्त षटकोणी कुटुंब !

क्षितीच्या सासर्‍यांच्या पासष्टाव्या वाढदिवसाला त्याच्या रिटायर्ड मित्रांनी बाहेर क्लबमधे पार्टी दिली होती.
त्या पार्टी मधले सगळे सुंदर क्षण व मिळालेले गिफ्ट वगैरे घेऊन सगळेजण परतत होते .

अचानक भरधाव येणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि मोठ्या गाडीच्या डाव्या बाजूला ट्रकने समोरुनच धक्का मारला.

ती लागलेली धडक इतकी जबरदस्त होती की ड्रायवरच्या बाजूला बसलेले क्षितिजाचे सासरे जागेवरच गतप्राण झाले. डोक्याला जबरदस्त मार लागला होता.

मागच्या सीटवर क्षितिजा आणि तिचा नवरा व मुले बसले होते, त्यांना किरकोळ मार लागला होता सासूबाई घाबरून बेशुद्ध च झाल्या होत्या. ड्रायव्हर बचावला होता.

सासरे जागेवरच गेले, हा धक्का कुटुंबाला सहन होण्यासारखा नव्हता.
सगळे विधि व क्रिया झाले. सव्वा महिना उलटला.

सासूबाईंनी जिवाला खूप लावून घेतलं होतं. स्वतःला अलिप्त करून घेतलं.

आता मात्र त्यांना प्रत्येकवेळी घरामध्ये आपल्याच घरात परकं व विरक्त वाटायला लागलं.
पांढऱ्या कपाळाने फिरणं, काठापदराच्या साड्यां न नेसणं. देवाला लांबूनच नमस्कार करणं हे सगळं भरल्या डोळ्यांनी पाळायला सुरुवात केली.

क्षितीने त्यांना खूप सांगितलं की," माई तुम्ही टिकली लावाल तरी चालेल, असा चेहरा दुखी तर आहेच पण आम्हालाच पाहायला बरं वाटत नाही."

" नाय गं बाई मी जुन्या पद्धतीची आहे. . . माझं दुर्दैव की देवाने सवाष्ण नेलं नाही. माझं पुण्य कामी नाही आलं ."

"माई मी पुन्हा सांगते, नाना गेले त्यात तुमचा काय दोष ? तुम्हाला तसं टिपटाप रहायला , चांगल्या साड्या नेसायला आवडतं ना ? मग का म्हणून त्या सगळ्याचा त्याग करायचा? जगाचा विचार नका करू. तुम्हाला जसं रहायचंय तसं मोकळं रहा!"

" नाय बाई, हिंमत होत नाही. तुझ्या इतकी पुढारलेल्या मतांची मी नाही . माझं हे आहे ते आहे."

पण त्यांना मनातून खूप छान वाटायचं.
क्षिती किमान त्यांना समजून घेते हे बरं वाटायचं .
दोन अडीच वर्षांत क्षितीने सांगून आणि बोलून त्यांच्यात खूप बदल करविला.
आता त्या टिकली लावायच्या, देवाची पूजा करायला लावायची .

पण पंचपाळाकडे हात गेला की त्यांना ती घटना आठवायची आणि डोळ्यात आपसूक पाणी यायचे.

कुणाच्या नशिबी काय लिहिलंय माहीत नसतं त्यामुळे वागताना विचार करावा असं सतत त्यांचं मन त्यांना खात होतं.

पण त्यांची सून आधुनिक विचाराची असल्याने त्यांना एवढा त्रास झाला नाही.

त्या आता पूर्वी सारखंच घरांमध्ये आपली सत्ता ठेवून वागत राहिल्या.

सगळं सुरळीत चालेल तर जीवन कसलं?
नशिबात काय लिहून ठेवलं असतं ते आपल्याला माहीत नसतं आपण अांधळ्या कोशिंबिरी चा हा प्रवास चालूच ठेवतो.
दैवगती न्यारीच!

क्षितिजाचं लग्न होऊन अठरा वर्षे झाली असावीत.
मुलगा दहावीला होता , मुलगी सातवीला.

ईश्वर कृपेने घरी खूप संपन्नता होती. पैसा, अडका, सोना- चांदी, कपडे, प्रॉपर्टी , कशाकशाला कमी नव्हती.

तिच्या सगळ्या हौसमौजा पूर्ण होत होत्या.

कशाचीच खंत नव्हती, त्यामुळे तिला सतत वाटायचं लहानपणापासून गौराई- लक्ष्मीवर तिची असलेली श्रद्धा फळास येते त्यामुळे देवीने तिला काही कमी केलं नाही.
नशिबाने भरभरून सुख दिलेलं आहे.


एक दिवस अचानक क्षितिजाचा नवरा सुमेध याला छातीत तीव्र कळ आली.
घाईघाईने दवाखान्यात नेण्यात आले तेव्हा कळालं की इतके दिवस काहीच लक्षणं दिसली नाहीत किंवा त्याने लपवले असतील पण हार्टमधे सिव्हियर ब्लॉकेजेस होते आणि अँजिओप्लास्टी नको म्हणाले.
बायपास सर्जरी चा निर्णय घेतला .

ऑपरेशन दरम्यानच किडणीच्या फंक्शनचा खूप प्रॉब्लेम झाला.
पण पाण्यासारखा पैसा खर्च करून मोठे डॉक्टर दवाखाने करून त्याचे प्राण वाचले .

त्याला घरी आणलं पण तब्येत पूर्वीसारखी राहिलीच नाही. इतक्या ताण तणावात पण क्षिती व तिच्या मुलीने व सासूबाईंनी मिळून गौराई बसवली व नेहमीप्रमाणेच सगळं साग्रसंगीत केलं.
सुमेधला त्यामुळे खूप छान वाटलं.

कसंबसं त्याने एक वर्ष काढलं आणि साधारण वर्षानंतर त्याच दरम्यान होळीच्या सणादिवशी कार्डियाक अरेस्टने व दोन्ही किडनी फेल झाल्याने क्षितीच्या नवऱ्याचा मृत्यू झाला .

हा धक्का पचवणे शक्यच नव्हतं.

आयुष्य संपलंच असं वाटलं .

पण ती कोलमडली आणि पुन्हा काळजाचा दगड केला कारण सासूबाईंचं दुखं अतोनात होतं.
मुलं व माई तिच्यावर आधारित होत्या, त्यामुळे तिला उभं राहणं भागच होतं.

घराचा सगळा भार तिच्यावर पडला.

क्षितिजा तिच्या पध्दतीने सावरली किंवा तिने आपली नियती म्हणून हिंमत दाखवली त्या गोष्टींसाठी सगळेजण तिचं कौतुक करत होते .

तिने सासूला पुत्रवियोगाचं दु़्ःख दूर करण्यासाठी खूप मदत केली.

मुलापेक्षाही जास्त माया तिने त्यांना लावली, त्यामुळे सासूबाईंनी तो धक्का पचवला.

ही घटना केव्हातरी संक्रांतीच्या नंतर झालेली व सहा महिन्यांनी गौरी गणपती येणार अशी कुणकुण लागली आणि सासूबाईंनी अंथरूण धरलं.

इतकी वर्ष मी हौसेनं केलं , पुढे अठरा वर्ष सुनेने हौसेनं केलं आता नातवाचं लग्न होईपर्यंत आपल्या घरी आता गौरी बसणार नाही ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती .


क्षितीजा मात्र मन दगडाचं केलं होतं तरीही तिने ठरवलं होतं की जे जसं चालत होतं ते तसंच चालणार, त्यात काहीही बदल होणार नाही.

कुणी काहीही म्हणो.

तिने फोन वरच नेहमीप्रमाणेच भरपूर किराणा मागवला .

सासूबाई म्हणाल्या, "कशाला हे? विसरलीस काय ? गौरीगणपती नाही यावर्षी . सुमेध जावून वर्षही झालं नाही , वर्ष श्राद्ध झालं नाही. एवढं सगळं सामान कशासाठी?"

" माई, गौरी गणपती येतात. त्यांना काय माहित नाही आपली परिस्थिती ?"

"अगं कळतात तुझ्या भावना पण कोण करणार?"

" का ? आपण आहोत की ? गेलेला माणूस गेला. मग काय सणवार सोडून द्यायचे का? "

" अगं पण माणसं नाहीत तर सणवार कसे ? आपण काय करणार आहोत?"

"मग दहा दिवस जुन्या आठवणीत रडत रडत बसणार आहोत का आपण दोघी? हे जे केले ते देवानेच केलय मग आपण देवालाच शिक्षा द्यावी का ?"

" तसं नाही पण बरं दिसतं का ? बरं दिसायला काय पण दुख आहेच . देवाने माझं पांढरं कपाळ केलं नसतं तर केलं असतं, बरं तू करत होतीस छान पण तुझ्या नशीबी पुन्हा तेच. तू जशी राहायचीस तशीच राहतेस हिो हिंमतच आहे क्षिती पण गौरी कशा?"

" एकटेपणाचं दुःख दिलं त्याने पण माई देवाने मला काही कमी केलं नाही. मी असा विचार करतीय की त्यांचं आयुष्य तितकंच होतं. मी हे मान्य केलय. आपण जे करू शकत होतो ते केलं. त्यामुळे कुठल्याच माणसाचं चालत नाही. आपण जिवंत आहोत तर जगुयात ना !

" बरं बाई बघ तुझा मूलगा मोठा अाहे, तुझे मर्जी गणपती तर बसव पण गौरीचा सण तर . . . आपल्या घरातला बुडालाच. आता तुला सुन येइल तेव्हाच गौरी . . . !"

"नाही माई मी गौरी पण करणार!"
"क्षिती वेडी झालीस काय ? सुमेध नाही मग पूजा व नैवेद्य ?"

"मीच करेन! इतके दिवस गौरीला माझा नैवेद्य चालला ,आता का चालणार नाही?"

या गोष्टींने मात्र दोन रात्री तिच्या सासूबाईंना झोप लागली नाही.
मग बेचैन होऊन त्यांनी त्यांच्या बहिणीला, जावेला, मैत्रिणींना, नातेवाइकांना ज्यांना-त्यांना फोनवर नाराजीने सांगायला सुरुवात केली .

गणपती येण्याच्या अगोदरच्या शनिवारी सगळेजण भेटण्यासाठी म्हणून आले.

अाणि सर्वांनी क्षितीला समजावण्याचा प्रयत्न केला, की बाई हा सवाष्णींचा सण असतो. असा काही अनर्थ करू नकोस.

क्षितीने सर्वांना सांगितलं,\" तुम्हाला पटत नसेल तर नसू दे. मला यात काहीच गैर वाटत नाहीय. लहानपणापासून मी हा सण करत आले आणि मी तो मरेपर्यंत हो मी मरेपर्यंत किंवा मला जोपर्यंत होईल तोपर्यंत त्या देवीला करून घ्यायचं असेल तर ती करून घेईल . माझ्या दृष्टीने देवीने दृष्टांत द्यावा किंवा स्वप्नात येऊन सांगावं की तिला चालणार नाही तर मी हे करणार नाही."

"अगं पण?"

" लग्नाआधी पण मी तीच होते, लग्न झाल्यावर मी तीच आहे ,आताही मी तीच आहे . फक्त फरक एवढा आहे कि ते नाहीत . त्यांनाही वरून खूप आनंद वाटतो की मी त्यांच्या माघारी कुठलीच पध्दत सोडली नाही ."

सगळ्यांची कुजबूज सुरू झाली.

"ही काय पध्दत आहे?"

तिचं वागणं बोलणं कुणालाच पटत नव्हतं. त्यातल्या फक्त पोक्त काकू होत्या त्या म्हणाल्या,"बाई तुझी श्रद्धा आहे ना, मग कर."

"हो काकू , मी श्रद्धेने करणार, फरक एवढाच आहे की मी हळदीकुंकवाला बोलावलं तर किंवा जेवायला बोलावल्यावर पूर्वी सगळे जण यायचे आता कुणी येणार नाही. नाही आले तरीही आम्हाला फरक पडणार नाही. ते प्रसादाला मुकतील. माझ्या गौरी जेवतील. अजूनही सांगते तिसर्या दिवशी नवमीच्या दिवशी माझ्या घरी सगळ्यांनी प्रसादाला या आणि हळदीकुंकु आहे ज्यांना चालत असत त्यांनी या, ज्यांना चालत नाहीत त्यांनी येऊ नका. कुणी केंव्हा जन्म घ्यायचा आणि केंव्हा मरायचं हे आपल्या हातात नाही पण आपण असेपर्यंत देवासाठी काय करतो ते मला महत्त्वाचं आहे ."

क्षितीनं महालक्ष्मी करणं, गौरी बोलावणं या गोष्टीची सोसायटीत, नातेवाइकांत कुटूंबात खूप खूप चर्चा झाली.

पहिल्या वर्षी तिची मावस नणंद आणि चुलत जाऊ दोघी झाल्या होत्या. त्यांना पुर्वीसारखं सगळं केलेलं पाहून मनात छान वाटलं.

हे चालू राहिलं , तिचा निर्धार पाहून दुसर्‍या वर्षी हळूच दहा बारा माणसं आली . सासुबाईंना आनंद वाटला.

आणि तिसर्‍या वर्षीपासून तिच्या घरच्या गौरीला पूर्वीसारखे सगळीच माणसं आली. मुलीने ,जावेने , नणंदेने मदत केली, हळदीकुंकु केलं.
क्षिती तशीच नववारी नेसून, नथ घालून,चंद्रकोर अन अंबाडा, सासूला काठापदराची साडी , त्यांच्या हाताने देवीची पूजा अगदी केवड्यसच्या फुलासकट!
परंपरा व पद्धती बदलणं आवश्यकच आहे.

तिने स्वतः स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवला होता. गौरीही तृप्त दिसत होत्या.

चार ते पाच वर्षांत पुन्हा तिचं घर पूर्वीसारखं भरलं आणि तिची गौराई, लाडाची गौराई हसमुख झाली.
क्षितीच्या निर्धारापुढे, भक्तीपुढे आणि श्रद्धे पुढे बसवलेली गौराई देखील आनंदाने डोलली आणि गौराई हसली .

समाप्त.

लेखिका ©® स्वाती बालूरकर, सखी

दिनांक  ११. ०९ .२०२२