अनाथ मुलाचे आईस पत्र

Essay For an orphan Kid On My Mother.
आपल्याला आई असते आणि आईवर निबंध लिहायचा म्हणलं की आपण भरभरून लिहितो पण ज्यांना दुर्दैवाने आई नसते त्यांनी काय करावं? म्हणून हा छोटासा प्रयत्न त्यांच्यासाठी.

आई शब्द उच्चारला तरी त्यातून किती प्रेम ओसंडून वाहत असतं. एक आईच असते जी आपल्यावर जीवापाड प्रेम करत असते. आपण कसेही वागलो तरीही तिच्या प्रेमाचा झरा कधीच आटत नाही. एक आईच असते जी आपल्या चुकांचं देखील कौतुक करते. आपल्या कोणत्याही नवीन प्रयत्नावर, यशावर सगळ्यात जास्त सुखी असते ती फक्त आणि फक्त आपली आई.
आई! आई म्हणजे एक अजब रसायन असतं. आईला न सांगताच सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात आणि त्यामुळे तिच्या पासून काही लपवून ठेवणं शक्यच नाही आणि माझ्या आईपासून कधीच काहीच लपून राहत नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर माझी आई इतर आयांपेक्षा जरा वेगळी आहे आणि हो मला एकच आई नाहीये बरं का.
माझी आई देवी, निसर्ग आणि भूमाता या रुपात मला लाभली आहे. मी लहान असताना माझी जन्मदाती आई मला कायमची सोडून गेली आणि या इतर आयांनी मिळून माझा सांभाळ केला. सगळेच म्हणायचे तुझी आई देवाघरी गेली आहे, आईविना पोर राहतेय पण मी हे मनावर घेतलं नाही. रोज माझं आई सोबत बोलणं व्हायचं. फक्त फरक एवढाच होता ती काहीच न बोलता फक्त ऐकून घ्यायची. आईशी बोलण्याचा माझा नेम कधीच चुकला नाही आणि आजही चुकत नाही.
रिझल्ट लागला की धावत देवी आईच्या देवळात जायचं हा नेम ठरलेला असायचा. तो रिझल्ट मग काहीही असो आई मला मी केलेल्या प्रयत्नांसाठी शाबासकी द्यायचीच. कधी ही शाबासकी पुजारी काकांच्या हातून माझे आवडते खास पेढे किंवा लाडू मिळण्यातून असायची तर कधी कोणी नवसाच्या नैवेद्याचे ताट देऊन शाबासकी देऊन जायचं.
माझ्या या आईच्या तऱ्हाच काही निराळ्या होत्या. जर माझी जन्मदात्री आई असती तर तिनेही असेच माझ्या आवडीचे पदार्थ करून मला शाबासकी दिली असती ना? ती कसर ही देवी आई भरून काढत होती.
कधी कधी अचानक खूपच भीती वाटायला लागली तरीही ही देवी आई महिषासुरर्दिनी रुपात माझं रक्षण करायची. देवळातच आईच्या समोर बसून राहिल्यावर "ती" स्वतः तिथे आहे आणि माझं रक्षण करतेय याची मला आपोआप खात्री पटत जायची आणि माझी भीती कुठच्या कुठे पळून जायची.
इतर कोणाचीच आई शाळेत मुलांबरोबर बसू शकत नव्हती पण माझी सरस्वती आई नेहमी माझ्या सोबत माझ्या वर्गात बसायची. मला तिचं अस्तित्व तिथे जाणवायचं आणि या बाबतीत आपण भाग्यवान आहोत असं वाटून जायचं.
असेच दिवस सरत असताना अचानक एक दिवशी माझा वाढदिवस यायचा आणि मला मात्र माझ्या आईच्या कुशीत शिरावं असं वाटायचं. मी आईच्या कुशीत शिरावं, आईनेही माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवून माझ्या कपाळाचे चुंबन घ्यावे अशी माझी इच्छा व्हायची आणि तीही इच्छा माझी निसर्ग माऊली पूर्ण करायची.
माझ्या मनी ही इच्छा येताच अचानक आभाळात मेघ दाटून यायचे. थोडा गडगडाट झाला की मेघ बरसायला सुरुवात व्हायची. त्या ध्वनी लहरीतून जणू आई बोलत असायची; "असं वाढदिवसाच्या दिवशी कोणी रडतं का?" आणि तिच्या त्या पाऊस रुपी प्रेमाचा वर्षाव माझ्यावर व्हायचा.
त्या पावसात भिजताना जणू आईने आपल्याला कवेत घेतलं आहे असंच वाटायचं. चेहऱ्यावर पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबाने जणू मायेने आपलं चुंबन घेतलं आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत असंच वाटायचं.
माझं मनसोक्त पावसात भिजून झालं की त्या निसर्ग माऊलीला जणू कळायचं. मग जाताजाता पुन्हा एक छान सरप्राइज देण्यासाठी अचानक पाऊस थांबायचा आणि दूरवर कुठेतरी एक लहानसा इंद्रधनुष्य दिसायचा. दरवर्षी या आईकडून मला त्या डोळे दिपवून टाकणारे क्षण भेट म्हणून मिळायचे.
कधी शाळेतून घरी जायला उशीर झाला आणि खूप भूक लागली तर माझी भूमाता माझी भूक क्षमवायची. रस्त्यात कुठे ना कुठे असणारी फळांची झाडं मला अगदी पौष्टिक नाश्ता द्यायची.
शाळेत स्पर्धा, स्नेहसंमेलन असे कार्यक्रम असले की भूमाता तर माझ्याच सोबत असायची आणि मी देवळात जाऊन देवी आईला सुद्धा तिथे येण्याचं निमंत्रण दिलेलं असायचं. मला खात्री आहे तेव्हा तीही माझ्या सोबत यायचीच.
जी संपूर्ण जगाची आई आहे ती माझी आई असल्याचा मला खूप अभिमान आहे. माझ्या इतर मित्र - मैत्रिणींच्या आई जश्या त्यांना चुकीच्या गोष्टींपासून लांब ठेवतात तशीच ही माझी आई देखील माझी या बाबतीत काळजी घेते. काय चूक, काय बरोबर हे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ती मला दाखवून देते.
असं म्हणतात "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" आधी मलाही मी खूपच दूर्भागी आणि भिकारी आहे असं वाटायचं पण हळूहळू या मला माझ्या या आया लाभल्या आणि आता मी सगळ्यात श्रीमंत असल्याचं मला वाटतं.
एक आई जी जन्म देते, आपल्याला घडवते, खाऊ - पिऊ घालते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली काळजी घेते तिच्या या सगळ्या वृत्तींना आपण सलाम केलाच पाहिजे. मला माहित आहे आई तुला माझी काळजी होती आणि आहे म्हणूनच तू एवढ्या आया मला दिल्यास.

आई तू मला सोडून गेलीस
तरी माझ्या काळजीपोटी तळमळलीस

माझ्यासाठी सृष्टीचे नियम मोडलेस
निसर्ग, देवी, भूमाता रुपी आईला पाठवलेस

खरंच आई तुझे आभार मानू तेवढे कमी आहेत. या तिन्ही आई असताना सुद्धा मला तुझी आठवण येतेच गं! शेवटी मनाला कितीही समजावले तरी तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत.