Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अनपेक्षित (भाग-९ अंतिम)

Read Later
अनपेक्षित (भाग-९ अंतिम)
अनपेक्षित (भाग -९ अंतिम)


"तसं समजा हवं तर… खरं तर विक्रांतला कसं फसवायचं याचाच विचार मी गेली दोन वर्ष करत होते. योगायोगाने तुझं स्थळ माझ्या मामीच्या मैत्रिणीने सुचवलं. सगळं जुळून आलं. तुझा सूड घ्यायची संधी चालून आली. कारण बाहेर राहून हे काम होणं शक्यच नव्हतं. म्हणून तुझ्यासोबत लग्नाचा घाट घालावा लागला. हनिमूनला गेल्यावर तिकडे शिमल्यालाच दरीत लोटून द्यायचा प्लॅन होता आमचा; पण त्यादिवशी घाटात आमची गाडी बंद पडली आणि तिथे भूतांच्या गप्पा सुरू झाल्या. दुसऱ्यांचं जगणं हराम करणाऱ्याला भूतांची भीती वाटते हे ऐकून नवलंच वाटलं. मग आम्ही आमचा प्लॅन बदलला. मी मनोरुग्ण आहे, असा भास निर्माण केला. हॉटेलमध्ये ते ग्रीटिंग कार्ड, जेवणाची ओर्डर, शिमल्यात घडलेल्या एक एक घटना मीच घडवून आणल्या होत्या. विक्रांत मला मनोरुग्ण समजत होता आणि घरचे लोकं विक्रांतला… त्याचे होणारे भास वाढत जातील असे औषधं आम्ही सुरू केले. आणि झालंही सगळं तसंच…त्यादिवशी त्या शेवंताकाकू कोणत्यातरी निरंजनबाबांविषयी विक्रांतच्या आईला सांगत होत्या. मी त्यांच्या सर्व गोष्टी ऐकल्या होत्या. खरं तर या प्रकारे आम्ही विक्रांतच्या तोंडून सत्य वदवणार नव्हतो; पण संधी स्वतः चालून आली होती आणि आम्ही तिचा फायदा करून घेतला." नेहा


"पण तू विसरलीस नेहा… विक्रांतला मनोरुग्ण दाखवलंस तर त्याच्यावर गुन्हा कसा दाखल करशील? तुझेच फासे पलटले." विवेकने आपल्या भावाची बाजू सावरली.


"तुला काय वाटतं विवेक, आम्ही एवढा मोठा प्लॅन तयार केला आणि अशा फालतू कारणासाठी तो वाया जाऊ देऊ. विक्रांतची फाईल कुठेही दाखवा त्यात फक्त रक्त वाढविणाऱ्या गोळ्या लिहून दिल्या आहेत. आणि त्याला जी औषधी मी दिली ना त्याचा अंश विक्रांतच्या रक्तातही सापडणार नाही. आणि अजून एक मयंक सायकायट्रिस्ट नाहीये. हाडाचा डॉक्टर आहे. त्याच्याजवळ विक्रांतची ट्रीटमेंट होऊच शकत नाही." नेहाने आपले फासे परत फिरवले.


"एवढं करून तुझी मेलेली बहीण परत येणार आहे का? ती तर गेली…" विक्रांत परत छद्मी हसला.


"कोण म्हणे ती मेलीये? चल दाखवतेच तुला." नेहाच्या प्रश्नाने सगळेच आश्चर्यचकीत झाले. नेहाने त्याचा हात ओढत, त्याला फरफटत बाहेर आणलं. इन्स्पेक्टर नीरजने विक्रांतला गाडीत बसवले. घरातल्या बाकीच्या लोकांना पोलीसांनी आपल्या ताब्यात घेतले. मयंक, नेहा, इनस्पेक्टर नीरज, सब इनस्पेक्टर मोरे एका गाडीतून एका मोठ्या दवाखान्यात गेले. हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर,आय.सी.यु. मध्ये व्हेंटीलेटरवर होती.


"त्यादिवशी पल्लवीला शोधत जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा पल्लवीचा श्वास सुरु होता. तू तिला लोटून दिलं विक्रांत; पण ती खाली दरीत कोसळली नाही. ती मध्ये एका झाडाला अडली होती. तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. तिचं बाळ तर गेलंच होतं पण सोबत तिची शुद्धही… दोन वर्षांपासून पल्लवी कोमामध्ये आहे. जशी होती तशीच. तिच्या तब्येतीत कोणताच चढ-उतार झाला नाही." मयंक पल्लवीच्या समोर उभा राहून बोलत होता.


"पल्लवी, बघ तुझ्या गुन्हेगाराला आम्ही पकडलंय आणि त्याला योग्य ती शिक्षा देखील होईल. पल्लवी उठ… जागी हो." मयंक म्हणाला. पल्लवीला जोडलेल्या मॉनिटरमधून जोरात जोरात आवाज यायला लागला. डॉक्टर धावतच तिथे आले. त्यांनी पल्लवीला काही इंजेक्शन्स दिले आणि तेवढ्यात मॉनिटरवर आडवी लाईन आली.


"सॉरी, शी इज नो मोअर. आम्ही पहिल्यांदा अशी केस पाहिलीये… मघा पासून पाच सहा वेळा पल्लवीचं हार्ट बंद पडलं होतं… आम्ही औषधी दिली आणि परत सुरू झालं होतं… आता मात्र तसं झालं नाही…" डॉक्टर खिन्नपणे म्हणाले.


"काय… ! डॉक्टर तुम्ही नीट तपासा तिला…" नेहा धावतच आत आली होती. मयंकने तिच्याकडे वळून पाहिलं.


"मयंक अरे तू बघ ना… पल्लूला काय झालं? पल्लू... मी आलीये... माझ्याकडे बघ... पल्लू..." नेहाचा विलाप सुरू होता.


"तू तर इथेच होतीस ना? बाहेर कधी गेली?" मयंकने आश्चर्याने विचारलं.


"अरे मी घरातच होते. इन्स्पेक्टर नीरज त्या बाबाचं सोंग घेऊन आले तेव्हा मी बाहेर येणारच होते, इतक्यात बेडरूमचा दरवाजा लॉक झाला… मी किती आवाज दिला आणि दरवाजा वाजवला… कोणीच उघडला नाही… आणि आता दरवाजा आपोआप उघडला. मी धावतच बाहेर आले. हॉलमध्ये कोणीच नव्हतं. आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे सगळं झालं असेल असं समजून मी इकडे आले. आणि पल्लू…" नेहा रडत रडत सांगत होती.


"म्हणजे आमच्यासोबत कोण होतं? विक्रांतला पल्लवीचा चेहरा कसा काय दिसला?… कदाचित ती पल्लवी..." मयंकलासुद्धा काहीच कळत नव्हतं.


तेव्हढ्यात आय.सी.यु. ची खिडकी जोरात वाजली आणि कोणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज आला. सगळे धावत खिडकीपाशी गेले. विक्रांतने उडी मारून आत्महत्या केली होती. त्याचक्षणी इनस्पेक्टर नीरजचा फोन वाजला त्याने फोन कानाला लावला आणि त्याच्या चेहर्‍यावरचे भावच बदलले.


"काय झालं ?" मयंकने विचारलं.


"जयंतरावांचा कार अपघात झाला आहे. ते जागीच गेले. हाय-वे पोलिसांचाच फोन होता." इन्स्पेक्टर नीरज बोलले.


नेहाने मयंकच्या खांद्यावर अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि म्हणाली, "पल्लू नेहमी म्हणायची, आयुष्यात सगळंच अनपेक्षित घडत असतं... आपण काय विचार केला होता आणि काय झालं… पल्लू शुद्धीवर येईल असंच वाटत राहिलं... पण असं कसं घडलं रे...सगळंच कसं अनपेक्षित…!"

"पल्लवीने स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला स्वतःच घेतला..." मयंक मात्र मनाशीच पुटपुटला.


समाप्त.

© डॉ.किमया मुळावकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//