Login

अनपेक्षित (भाग -८)

काही घटना ह्या अनपेक्षित घडत असतात


अनपेक्षित (भाग- ८ )


नेहा बोलली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.


"नेहा, काय प्रकार आहे हा?" सुलक्षणाबाई चिडल्या होत्या.


"पल्लवी माझी मोठी बहीण. विक्रांत आणि पल्लवी दोघे एकाच कॉलेजमध्ये होते. तुमच्या मुलाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, तिचा हवा तसा वापर करून घेतला आणि…" नेहा ढसाढसा रडायला लागली.


"खोटं बोलतेय ही, पल्लवीनेच मला फसवलं." विक्रांत


नेहा त्याच्यासमोर गेली आणि तिने त्याच्या कानशिलात एक जोरदार झापड मारली.


"पल्लवीने तुला फसवलं का? तुझ्या बाळाची आई होणार होती ती… तिने तुला फसवलं?" नेहा


"काय! विक्रांत… ही नेहा काय बोलतेय?" सुलक्षणाबाई


"खोटं बोलतेय ही…" विक्रांत


"अच्छा, नेहा खोटं बोलतेय? मग पल्लवीला तू का मारलंस? आता तू कबुल केलं होतं…" इनस्पेक्टर नीरज


"हो, मीच मारलं… साली… थोडं गोड काय बोललं तर लगे प्रेम समजून बसली… या विक्रांत सरदेशमुखच्या विरुध्द पोलिसात तक्रार द्यायला निघाली होती… मला धडा शिकवणार होती… मीच तिला धडा शिकवला आणि मस्त माझं आयुष्य जगत होतो… ह्या आईमुळे मी लग्न केलं आणि काय नशीब माझं… पल्लूची बहीणच निघाली नेहा तर… जास्तच फडफड करायला लागली ना तर तिचेही पंख छाटून टाकेन मी…" विक्रांत छद्मी हसत होता. सुलक्षणाबाई मटकन खालीच बसल्या. नेहा त्यांच्याजवळ गेली.


"पल्लवी माझी मोठी बहीण. माझ्यापेक्षा वर्षभरानेच मोठी होती. पल्लवी एम्. बी. ए. करायला विक्रांतच्याच कॉलेजमध्ये होती. विक्रांतवर तिचं खूप प्रेम होतं. विक्रांतनेही तिच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. तिच्यासोबत लग्न करायंच वचन दिलं आणि प्रेमाच्या सगळ्या मर्यादा पार केल्या. विक्रांतला हवं ते मिळाल्यावर त्याने मात्र पल्लवीला टाळणं सुरु केलं. पल्लवीला दिवस गेले होते. तिने विक्रांतला लग्न कर म्हणून गळ घातली. पण ह्याने तिला एका सुनसान ठिकाणी नेऊन दरीत ढकलून दिलं. आमदार साहेबांनी आपल्या सत्तेचा वापर करून केस वर येऊच दिली नाही… माझी बहिण मात्र…" नेहा रडत होती.


"मयंक, तुला तर मी सोडणारच नाही. हीच मैत्री निभावलीस का तू? आणि तू या नेहाच्या गोष्टीत कसा काय आला?" विक्रांत मयंकच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होता.


"तू आणि मित्र! तुझ्यासारखा स्वार्थी व्यक्ती या दुनियेत शोधून सापडणार नाही. आणि नेहाला एकही शब्द बोलायचा नाही. कळलं? बायको आहे ती माझी. डॉक्टर मिसेस नेहा मयंक मोहिते…" मयंक


"काय चालवलं आहे हे? मला समजेल असं बोला." सुलक्षणाबाई गांगरून गेल्या होत्या.


"काकू, दोन वर्षांपूर्वी नेहाची बहीण पल्लवी, सकाळी कॉलेजला गेली ते रात्री हॉस्टेलवर परत आलीच नव्हती. तिच्या वार्डनचा नेहाला फोन आला होता. नेहा आणि मी आम्ही तेव्हा पी.जी. पहिल्या वर्षाला होतो. नेहा आणि पल्लवी बहिणी कमी आणि मैत्रीणीच जास्त होत्या. त्या संध्याकाळी नेहा आणि पल्लवीचं शेवटचं फोनवर बोलणं झालं होतं. पल्लवी विक्रांतला भेटायला जाणार होती हे नेहाला माहीत होतं. आम्ही सतत तिला फोन करत होतो. पण तिचा फोन लागत नव्हता. माझा हा मित्र नीरज, ह्याच्या मदतीने आम्ही पल्लवीचा फोन ट्रेस केला आणि मध्यरात्री तिला शोधायला गेलो. ह्या विक्रांतने तिला दरीत लोटलं होतं. तिच्या हातात ह्याचं सोन्याचं लॉकेट होतं. त्यावर \"व्ही\" अक्षर कोरलेलं होतं. मला आठवतं ना शाळेत असल्यापासून विक्रांतच्या गळ्यात हे लॉकेट होतं. माझी शंका खरी ठरली, पल्लवीला फसवणारा विक्रांतच होता. विक्रांतचा लफुटपणा मला माहीत होताच. म्हणूनच पोलीस केस झाली तेव्हा नेहाला मी जाणीवपूर्वक पुढे येऊ दिलं नाही. घरात पल्लवीची एक डायरी सापडली होती. ज्यात तिने विक्रांतने दिलेले सर्व ग्रिटींग कार्ड, पत्र जपून ठेवले होते. त्याच आधारावर नेहाच्या मामांनी पोलिस केस केली. पण विक्रांतच्या वडिलांनी त्यातून त्याला सहज सोडवलं…" मयंकने एक दीर्घ श्वास घेतला. सुलक्षणाबाई अगदी स्तब्ध होऊन ऐकत होत्या.


"आणि म्हणून तू विक्रांतला असं फसवलंस का?" विवेकही खूप चिडला होता.