Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अनपेक्षित (भाग - ७)

Read Later
अनपेक्षित (भाग - ७)
अनपेक्षित (भाग-७ )


दुसऱ्यादिवशी रात्री ठरलेल्या वेळी निरंजनबाबा सरदेशमुख विल्यामध्ये हजर झाले. त्यांच्या सोबत त्यांच्यासारखीच वेशभूषा असलेले अजून दोघेजण होते. घराच्या हॉलमध्ये त्यांनी सर्व होम हवनाची सामग्री मांडली आणि ते सर्व घर न्याहाळत फिरत होते. सुलक्षणाबाई विक्रांतला घेऊन बाहेर आल्या. नेहाही त्यांच्या मागेच आली.


"आई, काय आहे हा प्रकार? हे बघ बाबा सगळ्यांना सांगून गेलेत ना. आपण विक्रांतला अजून चांगल्या डॉक्टरांना दाखवू." विवेक


"सासूबाई, सासरेबुवांना हे कळलं ना तर ते खूप रागावतील बरं." नेहा म्हणाली.


"तू एक शब्दही बोलू नकोस. माझ्या मुलाच्या तब्येतीसाठी करतेय हे सगळं. लग्नाला महिनासुद्धा झाला नाही तुमच्या… माझ्या मुलाचं सुखच ओरबाडून बसलीस… गप्प बस… तूच काहीतरी काळी जादू केली असणार…" सुलक्षणाबाई रागाने म्हणाल्या.


निरंजन बाबाने होम हवनाची तयारी केली. एक मंडळ आखलं. त्यात विक्रांतला बसवलं. विक्रांत एकदम शांत बसला होता. बाबा वेगवेगळे मंत्र ओरडून ओरडून म्हणत होते. होमात वेगवेगळ्या भुकट्या टाकत होते. थोड्यावेळातच सगळ्या घरात धूरच धूर पसरला. घरातले दिवे आपोआप बंद सुरु होत होते.


"वाईट शक्ती… वाईट शक्तीने तुमच्या मुलावर ताबा मिळवलांय." निरंजनबाबाने हवनात अजून भुकटी सोडली. विक्रांत खूप घाबरून गेला होता. बाबासोबत असलेल्या लोकांनी त्याला धरून त्या मंडळात बसवलं होतं.


" मला सोडा… मला सोड… " विक्रांत किंचाळत होता. सुलक्षणाबाईंना त्याची अवस्था बघवत नव्हती.


निरंजन बाबा त्याच्या तोंडावर मंत्र म्हणत पाणी मारत होते. विक्रांत मोठ्याने ओरडत होता. स्वतःला सोडवून घेण्यासाठी त्याची धडपड सुरु होती. निरंजनबाबाचे दोन्ही सहकारी त्याला घट्ट पकडून होते. सुलक्षणाबाई आणि घरातली इतर मंडळी एका बाजूला उभी होती. सगळ्यांचीच पाचावर धारण बसली होती. नेहा सगळ्यांपेक्षा थोडी दूर, विक्रांत समोर दिसेल अशी उभी होती.


"बोल… कोण आहेस तू? कोणाचा आत्मा आहेस? विक्रांतच्या शरीरावर का ताबा मिळवला आहे? काय हवंय तुला?" निरंजनबाबा अभिमंत्रीत पाणी शिंपडत ओरडून बोलत होते."सोडा मला, मला काहीच झालं नाहीये… ही नेहा… ही मुद्दाम करतेय सगळं…" विक्रांत ओरडत ओरडत नेहाला शोधत होता आणि एकदम त्याची नजर नेहावर गेली.


"पल्लवी… तू? तू इथे कशी?" नेहा दिसली तसा विक्रांत किंचाळला.


"कोण पल्लवी?" सुलक्षणाबाई


"ही काय…आई, तुझ्यासमोर पल्लवी उभी आहे." विक्रांत मोठ्याने ओरडत होता.


"पल्लवी नाहीये ती. नेहा आहे, तुझी बायको." सुलक्षणाबाई ."पल्लवीच आहेस ती…. पण ती जीवंत कशी? तिला तर मी संपवलंय…" विक्रांतच्या तोंडून त्याच्याच नकळत निघून गेलं.


"हॅण्डस् अप! मि. विक्रांत… शेवटी तू तुझा गुन्हा कबुल केलासच… इनस्पेक्टर मोरे, हातकड्या लावा त्याला. खबरदार मि. विक्रांत, पळून जायचा प्रयत्न करू नका. बाहेर आमची फौज उभीच आहे आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून माझं नाव तुम्ही ऐकलंच असेल…" होम हवन करणारे निरंजनबाबा एकदम उठून, बंदुक रोखून म्हणाले. त्यांच्या साथीदारांनी विक्रांतवरची पकड अजूनच घट्ट केली.


"हे काय सुरू आहे? कोण आहात तुम्ही?" सुलक्षणाबाई म्हणाल्या.


"मी इनस्पेक्टर नीरज जाधव. हे सब इनस्पेक्टर मोरे आणि हे डॉ. मयंक." इतक्यावेळ निरंजनबाबा म्हणवून घेणारा इसम इन्सपेक्टर होता.


"हे बघा इनस्पेक्टर साहेब, माझ्या भावाने काहीच केलं नाहीये. तुम्ही त्याला अटक करू शकत नाही." विवेक म्हणाला.


"विक्रांत, तुझ्या पापाचा घडा भरलाय. तू स्वतः सांगतोस की आम्ही आमच्या पद्धतीने तुझ्याकडून वदवून घेऊ?" इन्स्पेक्टर नीरज


"तो काय सांगणार इन्स्पेक्टर, मीच सांगते त्याने काय काय केलंय ते." नेहा त्याच्याकडे त्वेषाने बघत बोलली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.


क्रमश:

© डॉ. किमया मुळावकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Dr Kimaya Mulawkar

Doctor

माझ्यातली "मी" शोधण्याचा प्रयत्न

//