अनपेक्षित (भाग- ६)

काही घटना ह्या अनपेक्षित घडत असतातअनपेक्षित (भाग-६)


जयंतराव सभेसाठी निघाले तेव्हाच मयंक घरी आला.


"बघा तुमच्या मित्राला काय झालं ते? आणि जे काही करायचं ते घरीच करा. बाहेर ह्याची वाच्यता नको, कळलं?" जयंतराव जाता जाता मयंकसोबत बोलून गेले. मयंकने बराचवेळ विक्रांतसोबत एकांतात गप्पा केल्या. त्याच्यासोबत बोलून त्याला औषधी सुरु केले. थोड्यावेळाने विक्रांत गाढ झोपी गेला.


"काकू, काही औषधी सुरू केली आहेत. बघू किती फरक पडतो. विक्रांतच्या मनात कशाबद्दल भीती बसली आहे का, हे जाणून घ्यावं लागेल. काही अडचण असेल तर मला कळवा, येतो मी." जाता जाता मयंक नेहाकडे बघून गेला. नेहा पटकन आतल्या रूममध्ये निघून गेली. सुलक्षणाबाईंच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.


चारपाच दिवस झाले. विक्रांतचं विचित्र वागणं वाढतच चाललं होतं. नेहा आणि विक्रांत सोबत असले की काहीतरी विचित्र घटना घडतच होत्या. सुलक्षणाबाई सतत विक्रांतच्या सोबतच राहत होत्या. जयंतराव रोज फोनवर विक्रांतची चौकशी करतच होते.


एक दिवस विक्रांत खूप घाबरला. सुलक्षणाबाई त्याच्यासाठी पाणी आणायला जात होत्या. नेहाने त्यांना थांबवलं आणि स्वतः पाणी आणायला जाऊ लागली.


"नेहा, तू थांब. मी आणते पाणी. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये." सुलक्षणाबाई म्हणाल्या.


"मनीषाताईंना सोबत नेते हवं तर. पुन्हा मी इथे थांबले आणि विक्रांतला काही त्रास झाला तर तुम्ही म्हणाल की माझ्यामुळेच झाला. खरं तर घरात रोजच माझ्यावर विचित्र आरोप होत राहतात. इथे क्षणभरही राहायची माझी इच्छा नाहीये; पण त्यादिवशी सासरेबुवा म्हणाले म्हणून मी थांबलेय." नेहा चिडून बोलून गेली. मनीषा तिच्या मागेच गेली. नेहाने फिल्टरच्या पाण्याने ग्लास भरला.


"माझ्या भावनांना कुठेच किंमत नाहीये, हो ना ?" नेहाच्या डोळ्यात पाणी होतं.


"नेहा, काळजी करू नको. सगळं नीट होईल. तू आराम कर थोडावेळ." मनीषा पाण्याचा ग्लास घेऊन गेली. विक्रांतने पाणी प्यायला ग्लास तोंडाजवळ नेला आणि जोरात ओरडून ग्लास फेकून दिला. पाणी लाल रंगाचं झालं होतं. एकेक घटना अशाच घडत होत्या. मयंकच्या औषधाने फारसा काही फरक पडत नव्हता.


एक दिवस सकाळीच सुलक्षणाबाईंची जीवलग मैत्रीण शेवंताबाई त्यांना भेटायला आल्या. विक्रांतची अवस्था पाहून त्यादेखील गलबलून गेल्या. त्यांनी सुलक्षणाबाईंना त्यांच्या रुममध्ये नेलं आणि एक उपाय सुचवला. सुलक्षणाबाईंनी त्यासाठी नकार दिला. पण विक्रांत आणि त्याची तब्येत पाहता त्या तयार झाल्या. दुपारी शेवंताबाई परत गेल्या. संध्याकाळच्या वेळी दारावरची बेल वाजली. मनीषा दार उघडायला गेली.


"आपण कोण?" दारावर काळे कपडे घातलेला, लांब केस, मोठी दाढी, गळ्यात वेगवेगळ्या रंगांच्या मोत्यांच्या माळा, हाताच्या बोटात खूपसाऱ्या अंगठ्या घातलेला एक इसम उभा होता. त्या व्यक्तीला बघून मनीषा म्हणाली.


"मी निरंजन महाराज." तो इसम थोडा रागातच म्हणाला. मनीषाने त्याचा रागीट चेहरा बघून घाबरतच दरवाजा उघडला.


"हेच का ते निरंजनबाबा? शेवंता म्हणाली होती की निरंजनबाबा उद्या येणार आहेत. तिने मलाच त्यांच्याकडे जायला लावलं होतं; हे बाबा इकडे कसे आले? शेवंता म्हणाली तसं खरंच ह्यांना न सांगता सगळंच माहीत असतं का?" निरंजन महाराजांचे नाव ऐकून सुलक्षणाबाई विचारातच बाहेर आल्या.


"मी इथे कसा काय आलो, हाच विचार करतेय ना? वाईट आत्म्याचा प्रभाव आहे तुझ्या मुलावर… सगळ्या घरात त्या वाईट शक्तीचा वावर आहे." निरंजनबाबा घरात फिरत म्हणत होते. फिरता फिरता त्यांनी हातातल्या कमंडलूतून पाण्याचा एक शिपका मारला. तिथून चांगलाच धूर निघाला. ते पाहून सर्वजण घाबरले.


"महाराज, आता काय करावं लागेल? यावर काय उपाय आहे? ही कपाळकरंटी इथं आल्यापासूनच हे सगळं होतंय. माझा मुलगा आधी खूप चांगला होता." सुलक्षणाबाईंनी नेहाकडे बघत विचारलं.


"उद्या अमावस्या आहे. उद्या रात्री एक होम करू. मी मंत्राच्या सहाय्याने त्या आत्म्याला पकडतो आणि त्याला नष्ट करतो. तुमच्या मुलाला थोडा त्रास होईल; पण नंतर तो यातून मुक्त होईल." निरंजन बाबा घर न्याहाळत बोलत होते.


"माझ्या मुलाचा त्रास दूर होणार असेल तर मी हे करायला तयार आहे. काही सामानसुमान हवं असेल तर मी आणून ठेवते." सुलक्षणाबाई म्हणाल्या.


"त्याची चिंता करू नका. ते मी बघून घेईल. तुम्ही फक्त एक काम करा. या गोष्टीची कुठेच वाच्यता करू नका. मी येऊन गेलो हे कुणालाच कळू देऊ नका. उद्याही घरात फक्त घरातलीच माणसं असतील याची खबरदारी घ्या. विक्रांतलाही याबाबत काहीच सांगू नका." निरंजनबाबा बोलून निघून गेले.


क्रमश:


© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all