अनपेक्षित (भाग-५)

Some things are unexpected

अनपेक्षित (भाग-५)

"तुला याआधी असा काही त्रास होता का? विचित्र स्वप्न वगैरे पडायचे किंवा झोपेत चालायची सवय वगैरे?" एक दिवस सकाळी सकाळी विक्रांतने नेहाला प्रश्न विचारला.


"विक्रांत, आता मात्र अतिच होतंय. मी काही बोलत नाही याचा अर्थ मला तुझ्या सगळ्या गोष्टी पटतातच असं नाही ना. लग्न झाल्यापासून बघतेय, रोजच तू माझ्यावर असले काहीबाही आरोप करतच राहतोस. त्यादिवशीसुध्दा मित्राला भेटायला जाऊ म्हणून तू मला डॉक्टरकडे घेऊन गेला. त्या तुझ्या मित्राने मला जे काही विचारलं ना त्यावरून तो मी मानसिक रुग्ण आहे का हेच बघत होता, हे कळण्याइतकी दुधखुळी मी नक्कीच नाहीये. मी म्हटलं जाऊ द्या, तुझ्या मनाचं समाधान तरी होईल, पण तू तर अजूनच माझ्यावर शंका घ्यायला लागला, एवढी शंका की आता तू बेडरूममध्ये झोपणं बंद केलं… " नेहाला बोलता बोलता रडू आलं.


"हे बघ नेहा, असं काही नाहीये. मला थोडा वेळ दे. सध्यातरी मी एवढंच म्हणू शकतो." विक्रांत बोलला. नेहा डोळ्यात पाणी घेऊन तिथून निघून गेली. सुलक्षणाबाईंनी विक्रांत आणि नेहा मधला संवाद ऐकला. त्या विक्रांतजवळ आल्या.


"विक्रांत, एक बायको म्हणून नेहाच्याही तुझ्याकडून काही अपेक्षा असतील ना. तिला थोडं समजून घे. स्त्रियांना सगळंच बोलून दाखवता येत नसतं. तू रोज असा बाहेर हॉलमध्ये झोपतो, बरं दिसतं का ते? अरे नवीनच नातं आहे, थोडा वेळ दे तिला. दिवसभर ऑफिसात असतो आणि रात्री बाहेर सोफ्यावर… बघ तुला योग्य वाटतं का हे? आई म्हणून एवढं तरी नक्कीच सांगू शकते." सुलक्षणाबाईंनी विक्रांतला समजावून सांगितलं. विक्रांतने त्यावर फक्त मान डोलावली आणि तो ऑफिसमध्ये निघून गेला. 


संध्याकाळी तो घरी आला तेव्हा जयवंतराव घरी आलेले होते. जयवंतराव आमदार होते, त्यामुळे ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने दौऱ्यावर असत. वेळ मिळेल तसा घरी येऊन जात. जयंतराव घरी होते त्यामुळे सगळ्यांचे जेवण सोबतच झाले. त्यानंतर जयंतराव, विवेक आणि विक्रांत तिघे बराचवेळ गप्पा करत बसले होते.


"चला, झोपू आता. उद्या आपल्या शेजारच्या गावातच सभा आहे. ती आटोपून दिल्लीला जायचंय." जयवंतराव दोघांना उद्देशून म्हणाले. विवेक त्याच्या खोलीत गेला. विक्रांत मात्र हॉलमध्येच घुटमळला.


"आज बाबापण घरी आहेत. बेडरूमध्येच झोपावं लागेल. नाहीतर उद्या सकाळी बाबांचे प्रश्न तयारच असतील." स्वतःशीच बडबडत विक्रांत बेडरूममध्ये गेला. नेहा पुस्तक वाचता वाचता तशीच झोपली. विक्रांतने तिच्या हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि लाईट बंद करून छोटा लाईट सुरु ठेवला. विक्रांत नेहाच्या चेहर्‍याकडे एकटक बघत होता. त्याला झोप येत नव्हती. बऱ्याच वेळानंतर त्याला झोप लागली. मध्यरात्र उलटून गेली होती. अचानक विक्रांत ओरडत बेडरूमच्या बाहेर आला. त्याच्या आवाजाने सर्वजण आपापल्या खोलीतून बाहेर आले. विक्रांत खूप घाबरलेला होता. घामाने चिंब भिजलेला होता. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. जयंतरावांनी विक्रांतला सोफ्यावर बसवलं. सुलक्षणाबाई विक्रांतच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. मनीषा पाणी घेऊन आली. विक्रांतने गटागट पाणी पिलं.


"विक्रांत, काही स्वप्न पडलं का?" जयवंतराव

"आजकाल रोजच विक्रांतला असे भास होत आहेत." सुलक्षणाबाई

"विक्रांत, काय झालं? काय होतंय तुला, नीट सांग?" जयंतराव

"आई, बाबा… मी झोपलो होतो आणि नंतर मला असं वाटलं की कोणीतरी माझा गळा दाबतंय. मी डोळे उघडून पाहिलं तर समोर…" विक्रांत बोलता बोलता थांबला.

"तर समोर कोण होतं विक्रांत, सांग ना, कोण होतं?" नेहा विक्रांतकडे बघत बोलली.

"नेहा… तू गप्प बस. तू घरात आल्यापासूनच विक्रांतला असा त्रास होतोय… तूच काही जादूटोणा तर केला नाहीस ना? तू आणि तुझ्या घरचे लोकं साधेसुधे लोकं असतील म्हणून तुझ्यासोबत विक्रांतचं लग्न लावून दिलं आणि तू तर… कोणत्या जन्माचा बदला घ्यायला आलीयेस?" सुलक्षणाबाई नेहावर चिडल्या होत्या.

"सुलक्षणा, तू काय बोलतेय, तुला तरी कळतंय का? काय हे जादूटोणा वगैरे? उद्या सकाळी डॉक्टरांना बोलवा आणि विक्रांतची ट्रीटमेंट सुरू करा. आमदाराच्या घरातच जादूटोण्याच्या गोष्टी होत असतील तर जनतेची अंधश्रद्धा कशी दूर होईल. आणि हो, या प्रकाराची कुठेच वाच्यता नको व्हायला. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. जी काही ट्रीटमेंट वगैरे करावी लागेल ती घरीच करा. विक्रांतचा तो डॉक्टर मित्र, मयंक, त्यालाच घरी बोलवा म्हणजे उगी चर्चेला तोंड फुटणार नाही." जयंतराव कडक आवाजात बोलले.

विक्रांत सुलक्षणाबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडत होता. सगळ्यांच्याच चेहर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत होती.

खरंच,विक्रांतला भास होत होते की कोणता मानसिक आजार?

क्रमशः

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all