नेहा रूममध्ये नाहीये हे बघून विक्रांत चांगलाच घाबरला. तो धावतच रूमच्या बाहेर आला. स्वयंपाक घरात सुलक्षणाबाई, मनीषा आणि नेहा अगदी हसून खेळून गप्पा करत काम करत होत्या.
"काय झालं विक्रांत भाऊजी, कोणाला शोधताय?" मनीषाने त्याला चिडवलं. विक्रांत ओशाळला. चहा, नाश्ता घेऊन, फ्रेश होऊन तो घराबाहेर पडला आणि सरळ मयंकच्या क्लिनिकमध्ये गेला. त्याने घडलेली सर्व हकीकत मयंकला सांगितली.
"मयंक, नेहाला काही मानसिक आजार तर नसेल ना?" विक्रांत
"तू सांगतोय, त्यावरून तसं तर काही वाटत नाहीये. मानसिक आजार असलेल्या लोकांना असा त्रास सतत होतंच राहतो. लग्न झाल्यावर तुम्ही शिमल्याला जाईपर्यंत नेहा ठीकच होती ना? आताही घरी आली तर व्यवस्थित आहे. मानसिक आजार वगैरे मला असं काही वाटत नाही. तिला परत त्रास झाला तर आपण मग बघू काय करायचं ते." मयंकसोबत बोलून विक्रांतचं डोकं थोडं शांत झालं.
दुपारी तो घरी आला. जयंतराव दौऱ्यावरून परत आले होते. विवेक त्यांच्यासोबतच होता. जयंतराव संध्याकाळी एका बिझनेस मीटिंगसाठी जाणार होते. विक्रांत आणि विवेक दोघेही त्यांच्यासोबत गेले. मीटिंग आटोपून यायला बराच वेळ झाला होता. विक्रांत त्याच्या रूममध्ये गेला. नेहा दरवाज्याकडे पाठ करून केस विंचरत बसली होती.
"नेहा…" विक्रांतने तिला आवाज दिला. नेहा काहीच बोलली नाही. विक्रांतने नेहाला परत आवाज दिला पण तिच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. विक्रांत तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि तिच्या खांद्यावर त्याने हात ठेवला.
नेहा मोठ्याने आणि विक्षिप्तपणे हसली. तिचे डोळे लालसर वाटत होते.
विक्रांत खूप घाबरला. तो घाबरून रूमच्या बाहेर पडला. मनीषा स्वयंपाक घरात होती. विक्रांत स्वयंपाक घरात गेला.
"अरे भाऊजी, कॉफी घेता का? मी विवेकसाठी बनवतच आहे." मनीषा बोलत होती.
"काय झालं? एवढा घाम का आलाय तुम्हाला? बसा इथे. पाणी प्या." मनीषाने त्याला तिथल्या खुर्चीवर बसवलं. पाणी प्यायला दिलं.
"वहिनी, आमच्या रूममध्ये… ते… नेहा… तुम्ही एकदा बघा ना…" विक्रांत पुढे बोलू शकला नाही.
"काय झालं? नेहा रूममध्ये नाहीये का? चला आपण बघू." मनीषा त्याच्यासोबत गेली. नेहा बेडवर शांतपणे झोपली होती. तिच्या डोक्यावर रूमाल बांधलेला होता.
"झोपलीये की शांत. तुम्ही का घाबरले एवढे." मनीषा विक्रांतकडे बघत बोलली.
"ते तिच्या चेहऱ्यावर… मी… आलो तर बसूनच होती इथे…" विक्रांतचा आवाज अजूनही कापरा होता.
"अर्धशिशी चा त्रास आहे म्हणत होती. आईंनी तिला जायफळ उगाळून लावून दिलंय आणि कपाळावर रूमाल बांधून दिला. मघापासून झोपूनच आहे… तुम्हाला काही भास झाला असेल… झोपा आता.. ठीक आहे." मनीषा त्याला बोलून बाहेर गेली. विक्रांत मात्र घाबरूनच होता. बेडरूममध्ये झोपायची त्याची हिम्मत होत नव्हती. तो बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपला.
सकाळी सुलक्षणाबाई उठल्या तर त्यांना विक्रांत हॉलमध्ये झोपलेला दिसला. मनीषाने त्यांना रात्रीची सर्व हकीकत सांगितली. सुलक्षणाबाईंच्या डोक्यात मात्र शंकेची वेगळीच पाल चुकचुकली.
दुपारी विक्रांत नेहाला घेऊन मयंककडे गेला. मयंकने नेहाला काही प्रश्न विचारले, तिला तपासलं आणि नेहाला तिथे बसवून तो विक्रांतसोबत बाहेर आला.
"विक्या, तू म्हणतोय तसं काही वाटत नाहीये. मला नाही वाटत तिला काही मानसिक आजार असेल. तरी काही औषधी सुरू केली आहे, बघू… मला वाटतं तूच तुझ्या तपासण्या करून घे एकदा… तुलाच कसला आजार जडला नाही ना…" बोलता बोलता मयंक थट्टेवर आला. विक्रांतने एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे टाकला. मयंकने दिलेली औषधी घेऊन दोघे घरी आले. नेहा घरातल्या सगळ्यांसोबत खूप चांगली बोलत होती. तिच्या स्वभावाने तिने सगळ्यांचे मनं जिंकले होते. दिवसभर चांगली असलेली नेहा रात्री विक्षिप्त वागायची. विक्रांतने हा प्रकार कोणाला दाखवायचा प्रयत्न केला तर तोच तोंडघाशी पडायचा. विक्रांतला आता नेमकं कळतच नव्हतं… त्रास नेहाला होतोय की त्याला स्वतःलाच…
क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर
क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा