नेहा परत झोपेत किंचाळली. तिच्या किंचाळण्याने विक्रांत घाबरून उठला. नेहा अस्पष्ट आणि असंबद्ध बडबड करत होती. विक्रांत नेहाला झोपेतून उठवत होता. नेहा परत तापेने फणफणली होती. विक्रांत खूप घाबरला. त्याने मयंकला फोन लावला.
"मयंक, नेहाला परत तसाच त्रास होतोय रे…" विक्रांतच्या आवाजाला कंप सुटला होता.
"विक्रांत, घाबरू नको. सकाळी मी एक गोळी सांगितली होती ती दिली का तू?" मयंक
" नाही रे, मी विसरलो… दिवसभर ती अगदी व्यवस्थित होती." विक्रांत खजील झाला होता. मयंकने त्याला समजावून सांगितले आणि विक्रांत थोडा शांत झाला. नेहाचा ताप उतरल्यावर नेहा शांत झोपली.
सकाळी उठल्यावर विक्रांतने नेहाला तिच्या स्वप्नाबद्दल विचारलं. नेहाला रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. नेहा मात्र शांत-शांत होती, अगदी मोजकंच बोलत होती. दोन दिवस आपल्या बडबडीने विक्रांतच्या मागे-पुढे राहणारी नेहा अशी अचानक शांत झाल्याने विक्रांतची काळजी अजूनच वाढली. विक्रांत तिला घेऊन बाहेर गेला. दोघे पायी चालत होते. विक्रांत नेहासोबत बोलत होता. नेहा फक्त हो, नाही एवढंच उत्तर देत होती. दोघे चालत चालत बरेच दूर गेले.
" नेहा, मॅगी खातेस? ह्या अशा थंडीत गरमागरम मॅगी एकदम मस्त लागेल ना…" विक्रांतने नेहाचा मूड बदलायचा परत प्रयत्न केला. नेहाने थंडपणे होकार भरला आणि नेहाला एका ठिकाणी बसवून विक्रांत मॅगी आणायला गेला. मॅगी घेऊन परत आल्यावर त्याला नेहा त्या जागी दिसली नाही. विक्रांत नेहाला आवाज देत, तिला शोधत इकडे तिकडे फिरत होता; पण नेहा कुठेच दिसत नव्हती. विक्रांत मात्र रडकुंडीला आला. त्याच्या हातातली मॅगी कधीचीच पडली होती. नेहाचा मोबाईलमधला फोटो तो समोर येईल त्या व्यक्तीला दाखवत होता. नेहाला तिथे कुणीच पाहिलं नव्हतं. विक्रांत मात्र पुरता घाबरून गेला होता. तेवढ्यात त्याचं लक्ष समोरच्या टेकडीवर गेलं. कोणीतरी एक स्त्री त्या टेकडीवर चढताना त्याला दिसली. तो धावतच तिकडे गेला. त्याला धाप लागली होती.
"नेहा…" विक्रांतने त्या स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवला.
"विक्रांत…" नेहा एकदम दचकली. आजूबाजूला बघायला लागली.
"मी इथं कसं काय आले…? विक्रांत… मला सोडून तू कुठे गेला होता?" नेहा रडायला लागली आणि अचानक विक्रांतचा तोल गेला. नेहाने सर्व शक्तीनीशी विक्रांतचा हात पकडला आणि त्याला स्वतःकडे ओढलं. दोघेही बर्फावर कोसळले. विक्रांत उठला आणि त्याच्या आधाराने नेहा उठून उभी राहिली.
"विक्रांत, तू म्हणत होता मला काहीतरी स्वप्न पडलं आणि मी ओरडले… आणि आता… आता मला माहीतच नाही मी इथे कशी आले ते… विक्रांत… आपण घरी जाऊया का परत? मला फार भीती वाटतेय." नेहा विक्रांतच्या कुशीत शिरून रडत होती. दोघेजण परत हॉटेलवर आले. विक्रांतने विमानाच्या तिकीटाची चौकशी केली. रात्री दिल्लीवरून मुंबईला जाणाऱ्या विमानाचं तिकीट त्याला मिळालं. दोघे टॅक्सी करून शिमल्याहून दिल्लीला गेले. तिथून मुंबई गाठलं आणि मुंबईहून टॅक्सी करून ते कोल्हापूरला पोहोचले.
सरदेशमुख विला मध्ये टॅक्सीने प्रवेश केला आणि विक्रांतला हायस वाटलं. विक्रांत आणि नेहा लवकर परत आले म्हणून घरातल्या लोकांना थोडं आश्चर्य वाटलं; पण याविषयी कोणी त्या दोघांना काहीच बोललं नाही. रात्रीच्या जेवणासाठी सगळे सोबत बसले होते.
"विक्रांत, अरे आठ दिवसांचा टूर होता ना तुमचा, लवकर कसे परत आलात? सांगितलंही नाहीस काही, तुम्हाला घ्यायला गाडी पाठवली असती ना?" सुलक्षणाबाईंनी न राहवून विचारलंच.
"आई, नेहाची तब्येत बरी नव्हती म्हणून मग निघून आलो." विक्रांत
"का गं? काय झालं? दगदग खूप झाली ना, तू आराम कर बरं." सुलक्षणाबाई नेहाला म्हणाल्या. नेहाने मान डोलावली.
"विक्रांत, उद्या तिला दवाखान्यात घेऊन जा." सुलक्षणाबाई
"अगं आई, मयंक सोबत बोलून झालंय. त्याने सांगितलेलंच औषध देतोय." विक्रांत म्हणाला. सर्वांची जेवणं आटोपली. नेहा आणि विक्रांत त्यांच्या खोलीत झोपायला गेले. नेहाला पडल्या पडल्या झोप लागली.
"नेहाला आधी कोणता मानसिक आजार तर नसेल ना? आणि तसं असेल तर मग? उद्या मयंककडे जाऊनच येतो." विक्रांतच्या डोक्यात विचारांचा गोंधळ उडालेला होता. मध्यरात्र टळून गेली होती. नेहा शांतपणे झोपून होती. पहाटे पहाटे विक्रांतचा डोळा लागला. विक्रांत जरा उशीराच उठला. उठल्यावर त्याने पाहिलं, नेहा त्याच्या रूममध्ये नव्हती.
क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर
© डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा