अनपेक्षित (भाग २)

काही घटना अनपेक्षित घडत असतात


अनपेक्षित (भाग-२)


नेहा आणि विक्रांत दोघे फिरायला गेले. दिवसभर फिरून, छानपैकी फोटोसेशन करून रात्री हॉटेलच्या रूमवर परत आले. परत येताना नेहाने घरातल्या सगळ्यांसाठी भरपूर खरेदी केली होती. नेहा पिशवीतून एक-एक सामान बाहेर काढत होती. तेवढ्यात तिला पलंगावर एक ग्रिटींग कार्ड दिसलं. गुलाबी रंगाचं ते कार्ड आणि त्यावर छानसं लाल रंगाचं हार्ट पाहून नेहा हरखून गेली.


"विक्रांत, थँक्यू सो मच…" बाथरूममधून बाहेर आलेल्या विक्रांतला बघून नेहा म्हणाली. तिच्या हातात ते ग्रिटींगकार्ड होतं.


"मला वाटलं तूच माझ्यासाठी हे कार्ड आणलंस. आपण बाहेरून आल्या आल्या मला हे कार्ड इथे पलंगावर दिसलं होतं. तू मला देशील असं वाटलं म्हणून मी ते उचललं नाही." विक्रांत


"नाही रे. मी हे कार्ड आणलं नाही." नेहा आश्चर्याने ते कार्ड बघत म्हणाली.


"आणि बघ ना, यावर फक्त टू माय डिअर लव्ह… खाली फ्रॉम… एवढंच लिहिलं आहे." नेहा कार्ड पलटवून बघत होती.


"या हॉटेलवाल्यांनी ठेवलं असेल… हनिमून पॅकेज आहे ना आपलं." विक्रांत


"विक्रांत अरे सकाळी आपण बाहेर जाण्याआधीच तो रूमसर्विसवाला येऊन गेला होता आणि आपण तर आपली चाबी सोबत घेऊन गेलो होतो. आणि एक सांग, ते लोकं असं निनावी कार्ड कशाला ठेवतील? त्यांना ठेवायचं असतं तर त्यांनी दुसरं काही ठेवलं असतं ना; फुलं, बुके असं काहीतरी… विक्रांत, खरं सांग कार्ड तूच ठेवलं ना?" नेहा


"मी ठेवलं नाही गं. आणि मला ठेवायचंच असतं तर नाव वगैरे लिहिलं असतं ना? तू हे कार्ड ठेवलं नाही, मी ठेवलं नाही मग कार्ड कोणी ठेवलं असेल?" विक्रांत कार्डचाच विचार करत होता.


"विक्रांत, आपण डिनर करून घ्यायचं का? चल, खाली जाऊन येऊ, मला खूप भूक लागलीये." नेहा बोलली आणि विक्रांतची विचारांची तंद्री तुटली. दोघेजण जेवण्यासाठी खाली गेले. एका टेबलवर दोघे बसणार तेवढ्यात हॉटेल मॅनेजर तिथे आला.


"सर… मॅम… आपका टेबल वहाँ बुक है।" त्या मॅनेजरने मोठ्या अदबीने दुसऱ्या टेबलकडे बोट दाखवलं. विक्रांत आणि नेहाने आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. विक्रांतने मानेनेच नकार दिला. तरी ते दोघे त्या टेबलावर जाऊन बसले. विक्रांतने जेवणाची ऑर्डर देण्यासाठी मेनूकार्ड मागितलं.


"आपका डिनर रेडी है।" मॅनेजर परत मोठ्या अदबीने बोलला आणि तेवढ्यात एक वेटर जेवण घेऊन तिथे आला.


"विक्रांत, अजून किती सरप्राईज देशील?" नेहा


"मी दिली नाहीये ऑर्डर… तूच दिली असशील…एक मिनिट थांब, आपण त्या मॅनेजरलाच विचारू." विक्रांतने त्या मॅनेजरला आवाज दिला. मॅनेजरने एक फोन आला होता एवढंच सांगितलं.


"नेहा, खरं सांग, तूच फोन केला होतास ना?" विक्रांत


"मी कसा फोन करेन, इथं आल्यापासून माझ्या मोबाईलला रेंज नाहीये, तुला माहीत आहे ना? आणि तसंही मी ऑर्डर केलं असतं तर सगळं नॉनव्हेज कशाला ऑर्डर केलं असतं? तुला माहितीये मी नॉनव्हेज खात नाही ते… श्शी… मुडच गेला माझा असं मेलेले प्राणी ताटात बघून…" नेहा चिडून तिथून उठून निघून रूममध्ये परत गेली. विक्रांतही तिच्या मागोमाग गेला.


"नेहा, ऐक तर… मी नाही केलं गं हे… मला आठवतं ना तू सांगितलं होतं मला तुझ्या नॉनव्हेज न खाण्याबद्दल… मग मी का करेल बरं असं? एक तर तो मॅनेजर काही सांगायला तयार नाहीये…" विक्रांत 


"तुझ्या मित्रांनी केलं असेल किंवा अजून कोणी असेल तुझं स्पेशल… जाऊ दे. मी खूप थकलीये आणि ते तसलं अन्न बघून मला मळमळायला लागलंय… मी झोपते." नेहा विक्रांतसोबत बोलली आणि झोपली. 


"काल इकडे येताना घाटात बस काय बंद पडली… हॉटेलमध्ये आलो तर बुकींग असूनही रूम मिळायला किती उशीर झाला. रात्री नेहाचं झोपेत किंचाळणं, तापेनं फणफणनं आणि सकाळी काहीच न आठवणं… आताही हे ग्रीटींग कार्ड, जेवण वगैरे…" विक्रांत मात्र शिमल्याला आल्यापासून घडलेल्या एकाएका गोष्टीचा विचार करत होता. विचारातच त्याचा डोळा लागला आणि जाग आली ती नेहाच्या किंचाळण्याने…


क्रमशः
© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all