अनपेक्षित (भाग-१)

कधी कधी सगळंच अनपेक्षित घडतं



अनपेक्षित (भाग-१)

"वाचवा ssss… सोडा मला sssss…" नेहाने जोरदार किंचाळी फोडली.


"नेहा, काय झालं? नेहा…" विक्रांत नेहाला झोपेतून उठवत होता. नेहा घामाने चिंब भिजली होती. विक्रांतने तिच्या कपाळावर हात ठेवला. त्याला चांगलाच चटका बसला. तिचं अंग तापेने फणफणत होतं. विक्रांतने ताबडतोब तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. नेहा झोपेतच बडबड करत होती. थोड्यावेळाने नेहाचा ताप उतरला आणि नेहा शांत झोपली. विक्रांतने भिंतीवर लावलेल्या घड्याळात पाहिलं, रात्रीचे साडेतीन वाजले होते. विक्रांत नेहाच्या बाजूलाच तिचा हात हातात घेऊन बसला होता. बसल्या बसल्या त्याचाही डोळा लागला.


विक्रांत प्रसिद्ध उद्योगपती आणि आमदार जयंतराव सरदेशमुख याचा धाकटा मुलगा… विक्रांतच एम्. बी. ए. झालं होतं आणि त्याने त्याच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये हातभार लावणं सुरू केलं होतं. विक्रांतचा मोठा भाऊ विवेक, तोसुद्धा याच बिझनेसमध्ये होता. विक्रांतची आई सुलक्षणाबई आणि विवेकची बायको मनीषा दोघी गृहिणी होत्या. नेहा आणि तिची मोठी बहीण पल्लवी दोघींचा सांभाळ नेहाच्या मामा-मामींनी केला होता. नेहाच्या आईवडिलांचा ती लहान असतानाच एका अपघातात मृत्यू झाला होता. मामा-मामींना अपत्य नसल्यामुळे पल्लवी आणि नेहा दोघी अतिशय लाडाकोडात वाढलेल्या होत्या.



सकाळ झाली. विक्रांतला जाग आली. त्याने उठून पाहिलं नेहा अजूनही गाढ झोपून होती. तिच्या चेहर्‍यावर केसांची एक बट जणू उगीचच रेंगाळत होती. विक्रांतने हळूच ती बट सरकवली आणि तो तिथून उठून बेडरुमच्या गॅलरीत गेला. त्याने मोबाईलमध्ये एक नंबर डायल केला.


"हॅलो, मयंक… कसा आहेस मित्रा?" विक्रांत

"अरे मजेत… तू बोल, सकाळी सकाळी फोन केलास ते… तू तर हनिमूनला जाणार होता? आम्हाला वाटलं, आता लग्न झालं तर आमचा मित्र आम्हाला विसरला की काय! काय म्हणतंय हनिमून… काय मग… " मयंक विक्रांतला चिडवत होता.

"जरा श्वास तर घे. इकडे शिमल्याला आलोय रे. काल रात्री नेहाला काहीतरी स्वप्न पडलं बहुतेक… झोपेतच किंचाळली ती… आणि नंतर तापही होता. इथे कुणाला दाखवावं ते कळलं नाही म्हणून तुला फोन केला. तू डॉक्टर असण्याचा काहीतर फायदा झाला पाहिजे ना." विक्रांत मयंकसोबत बोलत होता. मयंकने त्याला काही प्रश्न विचारले. विक्रांत त्याप्रमाणे उत्तर देत होता.


"हे बघ विक्रांत, लग्न, वेगवेगळ्या विधी, रात्रीची जागरणं, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष आणि जसं तू म्हणतोस काल इकडे येताना घाटातून येताना झालेल्या भीतीदायक गप्पा… यामुळे असं स्वप्न पडू शकतं… आपण वाचलेलं, ऐकलेलं कुठतरी आपल्या डोक्यात असतं आणि मग सहसा असे स्वप्न पडतात. घाबरण्यासारखं काही नाहीये. तापेसाठी मी एका गोळीचं नाव मेसेज करतोय, ती देऊन दे…" मयंकने विक्रांतला योग्य त्या सूचना दिल्या आणि फोन ठेवला. तेवढ्यात नेहा तिथे आली. तिने हळूच विक्रांतच्या खांद्यावर हात ठेवला. विक्रांत दचकला.


"काय झालं विक्रांत? कुणाचा फोन होता?" नेहा

"माझा मित्र आहे ना, डॉ.मयंक… त्याचा." विक्रांत

"हनिमूनला आल्यावरही तुला मित्र आठवतात का?" नेहा लटके रागवत बोलली.


"अगं, मयंक माझा बालमित्र आहे. आम्ही दहावीपर्यंत एकाच वर्गात होतो… पुढे आमच्या वाटा वेगळ्या झाल्या…तो डॉक्टर झाला आणि मी एम्.बी.ए. पण मैत्री अजून कायम आहे." विक्रांत मयंकविषयी भरभरून बोलत होता.


"मग त्याच्याशीच लग्न करायचं असतं ना." नेहा चांगलीच चिडली. विक्रांतने तिच्या गळ्याभोवती आपले हात गुंफले. तिला जवळ ओढलं.

"कालच्या रात्री बद्दल सांग ना काही." विक्रांत

"इश्श…" नेहाने लाजून आपला चेहरा लपवला.

"स्वप्नाबद्दल बोलतोय मी." विक्रांत


"सगळं स्वप्नवतच तर झालंय… प्रसिद्ध उद्योगपती, आमदार जयंतराव सरदेशमुखांच्या धाकट्या मुलाचं स्थळ माझ्यासारख्या अनाथ, मामा-मामींकडे राहणाऱ्या मुलीसाठी येणं.. आणि… लगेच लग्नाची तारीख निघणं… राजेशाही थाटातला लग्न सोहळा... आणि आज तर मी तुझ्या मिठीत…" नेहाने बोलताना डोळे बंद करून घेतले.

"हे तर आहेच गं… पण मी काल रात्री तुला पडलेल्या स्वप्नाबद्दल बोलतोय." विक्रांत

"स्वप्न…? कोणतं स्वप्न?" नेहा

"अगं, काल रात्री झोपेत किती मोठ्याने किंचाळलीस तू! आणि नंतर तुला चांगलाच तापही आला होता." विक्रांतने नेहाला रात्रीची सर्व घटना सांगितली. पण नेहाला त्यातलं काहीच आठवत नव्हतं.

"विक्रांत, अरे मला काहीच आठवत नाहीये…" नेहाचा चेहरा रडवेला झाला होता.

"इट्स् ओके नेहा… अशी स्वप्न पडू शकतात. तू त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस… बरं आज फिरायला जायचं की तू म्हणत असशील तर…" विक्रांतने नेहाला अजून जवळ ओढलं.

"चला… मि. विक्रांत जयंतराव सरदेशमुख… थोडं फिरुन येऊ बाहेर…" विक्रांतच्या मिठीतून स्वतःला सोडवत नेहा फ्रेश होण्यासाठी गेली. विक्रांतही फ्रेश होऊन तयार झाला. दोघेजण फिरायला गेले. पण विक्रांतच्या मनात राहून राहून नेहाचं किंचाळणं येत होतं.

क्रमशः
©® डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all