कथेचे नाव : आनंदोत्सव त्या लेकीचा.
विषय : .... ... ती हसली.
फेरी : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
राजश्री शाळेतून एकटीच घरी चालली होती. तोंडावर नैराश्य होते तिच्या. कोणीतरी तिला आजही हिणवले होते. पायात तुटक्या चपला, शाळेचा ड्रेस सतरा ठिकाणी फाटलेला, जिथे तिथे ठिगळं लावून ते फाटकेपण लपवण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न, अशी ती हातातली खूप जुनी पुस्तकांची बॅग सांभाळत शेतातून चालली होती.
घरी पोहोचताच तिने ती बॅग जोरात खाली आपटली तशी ती बॅग फाटलीच! जणू कोणीतरी तिला आपटायचीच वाट पाहत असावे. फाटलेल्या बॅगेतून पुस्तके इतरत्र पडली. कसला आवाज आला म्हणून राजश्रीचे वडिल पळतच बाहेर आले तर राजश्री पुस्तके गोळा करत होती व बॅग फाटलेली होती. ती बॅग पाहून त्यांनी डोक्यावरच हात मारला. कुठुन आणणार होते ते नवीन बॅग? त्यांनी एकदा बॅगेकडे तर एकदा राजश्रीकडे पाहिले, ती रडकं तोंड करुन पुस्तके उचलत आत गेली. आपल्या लेकीला असे पाहून राजश्रीच्या वडिलांना वाईट वाटले पण तेही परिस्थितीपुढे हतबल झाले होते.
राजश्री, एका खेडेगावातील एक साधी सरळ मुलगी. ९ वी च्या वर्गात शिकत होती. शिकून, अभ्यास करुन तिच्या आईला कामात हातभार लावत होती. राजश्रीचे वडिल दिनेश व आई जानकी यांना दोन अपत्य. मोठी मुलगी सायलीचे लग्न झाले होते जे त्यांनी पैसे नसतानाही थाटामाटात लावले होते तर दुसरी ही राजश्री. पहिल्या मुलीच्या लग्नाचे कर्ज दिनेश फेडत होते त्यामुळे घरात येणारा पैसा हा कर्जाची रक्कम देऊन शिल्लक उरलेला यायचा. खाणारी तोंडे तीन ,त्यात अधूनमधून सायलीचे येणे यात जेमतेम महिन्याचा खर्च भागायचा त्यामुळेच राजश्रीला नेहमी अॅडजस्टमेंट करायला लागायची. कळायला लागल्यापासून राजश्री नेहमी अलिप्तच राहायची. कधी हसणे नाही की चेहऱ्यावर आनंद नाही. नेहमी विचारात, नाहीतर हरवलेली असायची. दिनेशने ना कधी तिला हसताना पाहिले आणि ना कधी खेळताना. त्यांना तिची काळजी वाटत होती की ही मुलगी कशी पुढे जाईल म्हणून पण सध्या वेळ देण्याशिवाय ते काहीही करु शकत नव्हते. राजश्री बाहेर येईना म्हणून दिनेश आत खोलीत गेले तर राजश्री रडताना त्यांना दिसली. ते पटकन तिच्याजवळ गेले,
" ये बाय, का रडती हाय तू? ".... दिनेश.
" बाबा, आपण गरीब हाय ही आपली चूक हाय का? मी शाळेत गेले व्हते तवा समदी मला चिडवित व्हती. रोजच चिडवत्यात मला. ह्यो डरेस फाटला हाय, ती बॅग बी फाटली त्यावरना चिडवत्यात. मला न्हाय जायच शाळेत. "..... राजश्री रडत रडत सांगत होती.
" अगं पोरी, तुझ्यापासनं काय लपलं हाय? मी हा असा, जे येतय ते घरातच खपतयं. तुला कधी आणि कुठनं देऊ गं? माझी अडचण हाय वाईच. थोडं दिस थांब मंग काय बी वांदा नसल बघ! "...... दिनेश राजश्रीला समजावत म्हणाला.
" बाबा, पर मला शाळेत नाय जायचं! ".... राजश्री नाराज होत म्हणाली.
" अगं पोरी, शाळत गेली न्हाईस तर मोठी कशी व्हशील? माझ ऐक जरा शाळत जा. "..... दिनेश तीची समजूत काढत म्हणाला.
राजश्रीने दिनेशकडे पाहिले. दिनेश खजील झालेल्या बापासारखा हताश नजरेने तिला पाहत होता. त्याची तरी काय चूक म्हणा? जे पदरी पडले आहे ते तो इमानदारीने निभावत होता. आपल्या बापाचा तो चेहरा पाहून राजश्री जणू खंबीर झाली आणि तिने शाळेत जाण्यासाठी होकार सांगितला. दिनेशने खुष होऊन तिच्या डोक्यावर थोपटले व तो बाहेर पडला तर बाहेर भिंतीच्या आडोशाला ऊभी राहून जानकी सर्व ऐकत होती. दिनेशने तिच्याकडे पाहून तिच्या खांद्यावर थोपटले व तो त्याच्या कामाला निघुन गेला.
दुसऱ्या दिवशी राजश्री तयार होऊन शाळेत निघाली. काल बॅग आपटल्यामुळे आता तिच्याकडे बॅग नव्हती म्हणून तिने हातात पुस्तके व वह्या घेतल्या आणि ती शाळेकडे निघाली. राजश्री तशी खुप हुशार होती. शाळेत नेहमी अभ्यासात व इतर गोष्टींमध्ये पुढे असायची. शाळेतले शिक्षकही तिला त्यामुळे पुढे करायचे कारण ती होतीच तशी ! नेहेमी सगळ्यांना मदत करायची अभ्यासात, काही कार्यक्रम असला शाळेत की शिक्षकांना मदत कर, रांगोळी काढून दे, बाकी गोष्टींमध्ये मदत करणे हे सर्व ती आनंदाने करायची. त्यामुळे शाळेतले शिक्षकही तिच्याबाबत जरा पझेसिव्ह होते. जेव्हा मुले तिला चिडवायची तेव्हा शिक्षक त्या मुलांना समजवायचे पण शिक्षक गेले की पुन्हा ती मुले राजश्रीला चिडवायचे.
शिक्षकांनी बऱ्याच वेळा तिला मदत देऊ केली पण तिने काही घेतली नाही. दोन वर्षे झाली ती त्या फाटलेल्या गणवेशात आणि फाटलेली बॅग घेऊन शाळेत येत होती पण तिला तसे पाहून त्यांनाच वाईट वाटत होतं म्हणून त्यांनी एक क्लुप्ती केली. शिक्षकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती "लेखनाची व वक्तृत्वाची" . त्या स्पर्धांमध्ये जो जिंकेल त्याला नवीन स्कुल बॅग व नवीन युनिफॉर्म मिळणार होता. राजश्रीच नाही तर बरेच जण असे होते जे असेच फाटके कपडे घालून शाळेत यायचे. शाळेकडून प्रशासनाकडे तसे लेटर दिले गेले होते परंतु त्याचे काही उत्तर अजुन आले नव्हते त्यामुळे आता शिक्षकांनीच येणाऱ्या पगारातून थोडी थोडी रक्कम गोळा केली होती व त्याच रकमेतून काही मुलांना ते गणवेश व स्कुल बॅग देणार होते पण ही स्पर्धा त्यांनी अचानक घेतली होती कारण त्यावरून वाद होण्याची शक्यता होती त्यामुळे कोणालाही न सांगता त्यांनी ही स्पर्धा घेण्याचे ठरवले होते.
शिक्षकांनी बऱ्याच वेळा तिला मदत देऊ केली पण तिने काही घेतली नाही. दोन वर्षे झाली ती त्या फाटलेल्या गणवेशात आणि फाटलेली बॅग घेऊन शाळेत येत होती पण तिला तसे पाहून त्यांनाच वाईट वाटत होतं म्हणून त्यांनी एक क्लुप्ती केली. शिक्षकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती "लेखनाची व वक्तृत्वाची" . त्या स्पर्धांमध्ये जो जिंकेल त्याला नवीन स्कुल बॅग व नवीन युनिफॉर्म मिळणार होता. राजश्रीच नाही तर बरेच जण असे होते जे असेच फाटके कपडे घालून शाळेत यायचे. शाळेकडून प्रशासनाकडे तसे लेटर दिले गेले होते परंतु त्याचे काही उत्तर अजुन आले नव्हते त्यामुळे आता शिक्षकांनीच येणाऱ्या पगारातून थोडी थोडी रक्कम गोळा केली होती व त्याच रकमेतून काही मुलांना ते गणवेश व स्कुल बॅग देणार होते पण ही स्पर्धा त्यांनी अचानक घेतली होती कारण त्यावरून वाद होण्याची शक्यता होती त्यामुळे कोणालाही न सांगता त्यांनी ही स्पर्धा घेण्याचे ठरवले होते.
राजश्री शाळेत आली तेव्हा अचानक सरांनी स्पर्धा आयोजित केल्याचे तिला समजले. तिही गोंधळून गेली होती पण जे असेल त्यात भाग घ्यायला काय हरकत आहे असा विचार करुन ती जे होईल ते पहायला लागली. राजश्री नववीला असल्याने त्यांनी नववी व दहावी यांची पहिली स्पर्धा घेण्याची ठरवले. सरांनी नववी व दहावीचे सर्व वर्ग एक एक करुन बसवले आणि त्यांना लिहिण्यासाठी पेपर दिले व विषय सांगितले. सगळ्यांनी पुढे होत मनाने त्या विषयांवर निबंध लिहायला सुरुवात केली कारण पहिली स्पर्धा निबंधाची घेतली गेली. तासाभरात निबंधाची स्पर्धा आटोपली व निबंध पेपर चेक करण्यासाठी शिक्षकांकडे गेले. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा चालू झाली. सांगितल्या जाणाऱ्या विषयावर सगळे उत्स्फुर्त भाषण करत होते आणि तशी त्यांना दादही मिळत होती. स्पर्धा झाल्या तसे सर्व वर्ग सोडण्यात आले कारण शिक्षकांना इतर गोष्टी करायच्या होत्या. राजश्री आज छान काहीतरी केले म्हणून आनंदी होती पण हसणे मात्र विसरली होती. आज शनिवार व उद्या रविवार असल्याने तिने अभ्यास करुन आईला थोडी मदत केली व घरातच पुन्हा काहीतरी उद्योग करत बसली.
सोमवारी जेव्हा शाळा सुटणार होती तेव्हाच सर्व मुलांना मैदानात गोळा व्हायला सांगितले. सर्व मुले जमा झाली तसे मुख्याध्यापक व इतर शिक्षकांनी परवा ज्या दोन स्पर्धा घेतल्या होत्या त्या स्पर्धचे विजेते घोषित केले गेले व त्या सर्वांना सांगितल्याप्रमाणे बक्षीस वाटप करु लागले. या स्पर्धेत राजश्रीही जिंकली होती, तिचे जेव्हा नाव पुकारले तेव्हा गोंधळलेल्या अवस्थेत ती स्टेजवर पोहोचली. मुख्याध्यापक सरांनी तिच्या हातात गणवेश व बॅग टेकवली तेव्हा नकळतपणे......." ती हसली !". आनंदाने हसली, येणारे अश्रू सावरत हसली आणि तिला तसे हसताना पाहून जो शिक्षकांनी घाट घातला होता तो सफल झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आले.
मिळालेले बक्षीस सर्व मुलांना दाखवत मोठ्या खुशीतच राजश्री घरी पोहोचली. दिनेश व जानकी यांना मिळालेली बक्षीसे दाखवुन ती घरभर नाचली. सर्व पुस्तके तिने त्या नवीन बॅगेत भरली आणि ती त्या बॅगेला कुरवाळू लागली. मिळालेला नवीन शाळेचा गणवेश तिने मोठ्या आनंदात घातला व आरशासमोर ऊभा राहिली. आरशातली स्वतःचे प्रतिबिंब पाहुन ती पुन्हा खळखळून हसली, अगदी मनसोक्त हसली आणि तिचे आईबाबा लेकीचा तो आनंदोत्सव भरल्या डोळ्यांनी पाहत बसले. आता निदान दोन वर्षे तरी तिला कोणी फाटका गणवेश व फाटकी बॅग पाहुन चिडवणार नव्हते.
समाप्त.
विशाखा शिगवण.
पुणे जिल्हा