आनंदीकेशव.. भाग ९

कथा कोण्या एका आनंदीची आणि केशवाची
आनंदीकेशव.. भाग ९


मागील भागात आपण पाहिले की दामोदरच्या लग्नासाठी आलेल्या, बदललेल्या आनंदीला बघायला अख्खं गाव उत्सुक आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" आनंदी, आता राहशील ना इथेच?" मांडीवर डोकं ठेवून झोपलेल्या आनंदीला सावित्रीबाईंनी विचारले.

" आई, आजच तर तुझी सून आली आहे घरी. तरी लगेच माघारी आलेल्या लेकीला ठेवून घेण्याचा उत्साह आहे तुझ्याकडे?" आनंदीने आईला हसत विचारले.

" कर माझी थट्टा. पण जीव तुटतो ग तुझ्यासाठी. तिथे एकटी मुलगी तू. कशी रहात असशील, काय करत असशील? तुला तिथे कोणी त्रास देत असेल का? सतत डोक्याला भुंगा लागलेला असायचा." सावित्रीबाई काळजीने बोलत होत्या.

"आई, नको काळजी करूस माझी." आनंदी उठून बसली. तिने आईचा हात हातात घेतला.
" तुला खरं सांगू? मी खूप सुखी आहे तिथे. नवनवीन गोष्टी शिकते आहे. त्यात त्या लहान मुलींना शिकवायला तर फारच मौज येते."

" आनंदी, तुझ्या अंगावर पण मग ते शेणगोळे वगैरे टाकले होते?" सावित्रीबाईंनी डोळे मोठे करत, तोंडावर हात ठेवत विचारले.

" नाही ग आई. त्या माऊलीने आम्हा मुलींना शिक्षण मिळावे म्हणून खूप भोगले. मला आता तेवढा त्रास नाही होत. सगळ्यांनाच नाही पण थोड्या लोकांना तरी समजते आहे मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व. जीव तुटतो ग त्या चिमुरड्या विधवा झालेल्या मुलींना बघून. त्यांच्यामध्ये कुठेतरी मी स्वतःलाच बघत असते. काहीच समजत नसतं. बाहुलीचं लग्न लावायच्या वयात झालेली लग्न. त्यात कोणत्यातरी कारणाने आलेलं ते भयाण वैधव्य. आई त्या मुलींना त्याचा अर्थ तरी समजतो का ग?" आनंदी बोलत होती. तिच्या डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या होत्या. ते बघून सावित्रीबाईही रडत होत्या.

" आई, तुला सांगते. चौदा एक वर्षांची पोर होती ग ती. तिचा नवरा म्हातारा. इतका की तिच्या सावत्र मुलाची मुलगी तिच्या वयाची. तो गेला पण हिच्या कपाळी वैधव्य लिहून गेला. तो गेला आणि कोणीतरी बदकर्म केले हिच्यासोबत. सासर आणि माहेर दोघांनी हात झटकले. बिचारी आसरा शोधत आमच्या संस्थेत आली. मुलाला जन्म दिला आणि आता तिथेच राहून विणकाम शिकून स्वतःचे आणि मुलाचे पोट भरते आहे. एक ना दोन अनेकजणींच्या अनेक कथा आणि व्यथा. असं वाटतं आपण स्त्री म्हणून जन्माला आलो म्हणून का ग सटवाईने आपल्या कपाळावर हे सगळं लिहून ठेवलं आहे? मी नशीबवान म्हणून भावोजींच्या ताब्यातून केशव आणि दामोदरमुळे सुटले. पण सगळ्याच नशीबवान नसतात ग इतक्या."

" नको ग रडूस. तू सुखी आहेस ना तिथे. मग आम्ही भरून पावलो." सावित्रीबाई तिचे डोळे पुसत म्हणाल्या.

" पण आई माझ्यामुळे तुम्हाला इथे वाळीत टाकले ना?"

" तू त्याचा नको विचार करूस. लोक म्हणजे ओक, हाती धरिता धरवेना. त्यांना कधी कोणाचं चांगलं झालेलं बघवतं?" सावित्रीबाई सात्विक रागाने बोलत होत्या.

" तरिही आई मी चार दिवसांनी परत जाईन. माझ्यामुळे तुम्हाला अजून त्रास नको." आनंदी म्हणाली.

" काही त्रास होत नाही. त्या कोण कुठल्या बाई लोकांसाठी एवढं सहन करतात. आणि आम्ही आमच्या लेकीसाठी एवढंही नाही का सहन करू शकत?" सावित्रीबाई म्हणाल्या.


"केशवा, तू अचानक कसा आलास?" अपरात्री आलेल्या केशवाला बघून राधाबाई घाबरल्या.

" तुम्हा सगळ्यांना भेटावेसे वाटले म्हणून." डोळे चोरत केशव म्हणाला. राधाबाईंना त्याचे वागणे थोडे विचित्र वाटले. त्या पुढे काही बोलणार तोच चिंतामणराव म्हणाले,

" अहो, चिरंजीव प्रवास करून आले आहेत. त्यांना हातपाय धुवू देत. जरा क्षणभर बसू देत. मग होऊ देत तुमच्या प्रश्नांचा मारा." ते ऐकून राधाबाई वरमल्या.

" मी पिठलंभात टाकते. तू ये आवरून." राधाबाई पदर सावरत आत गेल्या. केशव हातपाय धुवून स्वयंपाकघरात बसला. राधाबाईंनी चूल पेटवून त्यावर भाताचे पातेले चढवले होते. पण नजर कुठेतरी हरवली होती. त्यांच्या मनात उमटलेले भाव चेहर्‍यावर दिसत होते.

" आई, बरी आहेस ना?" केशवने आईला विचारले.

" हो.. हो. वाढते हो पटकन. भात होईलच बघ आता." राधाबाई घाई करत म्हणाल्या. तोपर्यंत चिंतामणरावही येऊन बसले.

" आता सांगा. काय झाले अचानक यायला? तुम्ही कारण नाही सांगितले तर तुमच्या मातुश्रींचा रात्रभर डोळ्याला डोळा लागणार नाही."

" आई, बाबा.. मी लग्न करायचे ठरवले आहे." केशव आवंढा गिळत म्हणाला.

"कोणाशी? कोणी गोरी मड्डम नाही ना?" राधाबाईंनी पटकन विचारले.

" आई, काहिही काय बोलतेस? आपल्यातलीच आहे ती."

" आपल्यातलीच आहे म्हणजे तिच्या आईवडिलांनी तुझ्याकडे येऊन लग्नाची बोलणी केली की काय? काय बाई रीत तरी?" राधाबाई बोलू लागल्या. केशव काहीच बोलेना हे बघून राधाबाई परत बोलल्या.

" अरे बोल की घडाघड सगळं. उगाच जीवाला घोर लावायचा तो."

" आई, मी आनंदीशी लग्न करायचे ठरवले आहे." केशव शांतपणे बोलला.

" काय?? आनंदीशी? हेच जर तुझ्या मनात असेल तर मी आधी जीभ हासडून जीव देते. मग उधळ जे रंग उधळायचे आहेत ते." रागाने राधाबाई बोलल्या.


मिळेल का आनंदी आणि केशवच्या लग्नाला मान्यता? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all