आनंदीकेशव.. भाग ७

कथा कोण्या एका आनंदीची आणि केशवाची

आनंदीकेशव.. भाग ७


मागील भागात आपण पाहिले की माघारी आलेल्या आनंदीला सेवासदनला पाठवण्यासाठी केशव सुचवतो. आता बघू पुढे काय होते ते.




"अरे पण एकट्या मुलीला तिथे पाठवायचे? आणि ती बाई? ती तर स्वतः बाटलेली. तिने हिला ही धर्मभ्रष्ट केले तर?" विनायकराव बोलत होते.


" काका.. एकतर रमाबाई असं काहिही करत नाहीत. आणि मुलगी कामाने मेलेली चालते, आडात पडून मेलेली चालते. तेव्हा आपला धर्म बुडत नाही. पण ती मुलगी जर घराबाहेर पडली तर मात्र अस्मानी कोसळते का? जाऊ देत ना आनंदीला तिथे." केशव समजावत होता.


"अरे लोक शेण घालतील तोंडात." विनायकराव पुटपुटले.


" बाबा, ताईला जर तिथे काही झालं असतं तर एकजण तरी तिथे काही बोलायला गेला असता का? मला पटते आहे केशवदादाचे. जाऊ दे तिला सेवासदनमध्ये." दामोदर मध्ये बोलला.


" पण तिथे फक्त पुण्या मुंबईच्या बायका जातात. आपल्यासारखी सामान्य माणसे?"


" काका, पुणेमुंबई नाही. ज्या गरजू स्त्रिया आहेत त्या जातात. आणि काका, असामान्य कामे करणारी माणसे सामान्यच असतात. सध्या लोकांचा विचार न करता फक्त आनंदीचा विचार करा." केशवने बोलणे संपवले. विनायकरावही मग विचारात पडले. शेवटी त्यांनी आनंदीला सेवासदनमध्ये जाण्याची परवानगी दिली. केशवसोबत आनंदीला सोडायला जाण्याचे सगळ्यांनी मिळून ठरवले.


" केशवा, आनंदीचे आयुष्य सुरळित करून झाले असेल तर तुझ्या आयुष्याचाही विचार करूयात का?" राधाबाईंनी जरा रागातच विचारले.


" म्हणजे?"


" म्हणजे.. आता तुझे लग्न लागल्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही."


"आई.. इतके वर्ष थांबलीस. आता अजून काही वर्ष. आत्ताशी मॅट्रिक झालो आहे. मला पदवी मिळवायची आहे. चांगली नोकरी मिळवायची आहे."


" हो पण वाढत्या वयाचे काय? अठरावं वरीस सरेल तुला आता. मग काय म्हातारपणी लग्न करणार? ते मला काही माहित नाही. मामाने काही स्थळं सुचवली आहेत. जिथे तुझी पत्रिका जुळेल तिथे बोलणी करून घेऊ. आणि शिक्षणाचे तू मला सांगू नकोस. तुमचे सगळे पुढारी लग्न झाल्यावरच शिकले ना?" राधाबाई बोलत होत्या.


" बरीच माहिती आहे आई तुला समाजसुधारकांची." केशव आईला लाडीगोडी लावत म्हणाला.


" येताजाता तुझ्या वडिलांच्या तोंडात तेच तर असते. याने हे केले. त्याने ते केलं. पण सगळ्यांनी लग्नानंतरच केले ना? तू ही लग्न कर आणि जेवढं शिकायचं तेवढं शिक. एक अवाक्षरही मी बोलणार नाही." राधाबाई निर्वाणीचे बोलल्या.


"आई, मी लग्न करणार पण काहीतरी झाल्यावरच. सध्या तरी नाही." केशवही हट्टाला पेटला होता.


"अहो, नका त्याला जास्त आग्रह करू. चिरंजीव आता मोठे झाले आहेत." चिंतामणराव म्हणाले.


" हे असं दुटप्पी वागणं असतं तुमचे. बाहेर मारे बायकांच्या हक्कांबाबत बोलायचे आणि घरी मला एक शब्दही बोलू द्यायचे नाही." तणतणत राधाबाई आतमध्ये गेल्या.


" केशव, मी तुझ्या आईची समजूत काढू शकतो. तुझे शिक्षण होईपर्यंत थांबायची माझी तयारी आहे पण मला तोंडघशी पाडू नकोस म्हणजे झाले." चिंतामणराव बोलले.





" तुम्ही आमच्या सूनबाईंना बाहेरगावी शिकायला पाठवले म्हणे." आनंदीचे दीर विनायकरावांशी रागाने बोलत होते.


" हो.. तिची इच्छा होती." विनायकरावांनी मान खाली घातली होती.


" आमच्या घराण्यातल्या बायका अशा घराबाहेर पडत नाहीत. कोणाला विचारून हा निर्णय घेतलात?" त्यांचा आवाज चढला होता.


" तिने किती दिवस स्वतःला घरात डांबून घ्यायचे. काळ बदलत चालला आहे. काळाप्रमाणे बदलायलाच हवे ना?" विनायकराव हळू आवाजात बोलत होते.


" त्या समाजसुधारकांच्या सहवासात राहून तुम्ही जास्तच पुढारले आहात. बघतोच कशी शिकते ती?" आनंदीचे दिर रागाने वेडेपिसे झाले होते. यामागे आनंदीचे शिकणे होते की ती हातातून निसटल्याचे दुःख? त्यांनाच माहीत. त्यांनी आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न केला पण सेवासदन मध्ये त्यांना किंवा इतर कोणालाच जाता आले नाही. शेवटी आनंदीचा आमच्याशी काहीच संबंध नाही असे सांगून तिच्या सासरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले. एवढ्यावरच निभावलं म्हणून विनायकरावांनी सुटकेचा श्वास सोडला.


        केशवचे शिक्षण पूर्ण झाले. त्याला सरकारी नोकरी सुद्धा मिळाली. तिथे आनंदीनेही स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. या मधल्या काळात गावातली लोकं येताजाता सावित्रीबाईंना आणि विनायकरावांना वाटेल ते बोलायची. त्यांना जवळजवळ वाळीतच टाकण्यात आले होते. आनंदी शिकू लागली म्हणून दामोदरचेही लग्न ठरत नव्हते. त्याचीही विनायकरावांना वेगळीच चिंता होती. सरते शेवटी दामोदरचे लग्न ठरले. तिच्या घरातले पुढारलेले होते म्हणून नाही तर घरची हलाखीची परिस्थिती होती म्हणून. घरचे एक खायचे तोंड कमी झाले म्हणून त्यांनी सोयरीक जुळवण्यास होकार दिला होता. सावित्रीबाई खुश झाल्या. त्या लग्नाच्या तयारीला लागल्या. गावभर आमंत्रणे गेली.

अख्ख्या गावाला दामोदरच्या लग्नाचे वेध लागले होते. त्यांना उत्सुकता होती ते आनंदीला बघण्याची. कारण एकदा इथून गेल्यावर ती परत गावी आलीच नव्हती. या निमित्ताने तरी ती दिसेल म्हणून सगळेच उत्सुक होते.





आनंदी येईल का दामोदरच्या लग्नासाठी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.



खरंतर भाग नेहमी वेळेत द्यायला मला आवडतात. पण काही कारणास्तव बाहेरगावी आल्यामुळे हा भाग लिहायला उशीर झाला. त्यामुळे क्षमस्व. अजूनही मी बाहेरगावीच आहे. जमेल तेवढ्या लवकर पुढचा भाग पोस्ट करेनच. समजून घ्याल अशी अपेक्षा करते.


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all