आनंदीकेशव.. भाग ६

कथा कोण्या एका आनंदीची आणि केशवाची

आनंदीकेशव.. भाग ६


मागील भागात आपण पाहिले की केशव आनंदीला आणायला तिच्या सासरी जातो. आता बघू पुढे काय होते ते.



" आनंदी, आईला भेटून लवकर ये हो. करमणार नाही तुझ्याविना." आतून आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने केशवने बघितले. त्याला ओळखूच आले नाही. हातापायाच्या झालेल्या काड्या, सुकलेला चेहरा, अंगभर नेसलेले आलवण. ही आनंदी? दामोदर आणि केशवला गलबलले. क्षणभर त्याला वाटले पुढे जाऊन तिला धीर द्यावा पण त्या दोघांकडेही आनंदीच्या सासरच्या लोकांचे बारीक लक्ष होते. त्याने स्वतःला आवरलं. आनंदीने घरातल्यांना नमस्कार केला आणि ते सगळे बाहेर पडले.


      घर नजरेआड होताच इतका वेळ थोपवून ठेवलेला आनंदीचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडायला लागली. 


" कसे रे देवासारखे धावून आलात तुम्ही. आज जर तुम्ही आला नसता तर आडच जवळ करावा लागला असता मला." आनंदी रडत होती.


" काय झाले आनंदी, सांगशील का?" केशवने विचारले. पण तिचं रडणं थांबतच नव्हते. केशवने दामोदरला पाणी आणायला सांगितले. 


" काय झाले नक्की?" केशवने परत विचारले.


" भावोजी.." आनंदीच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडला. तिने परत रडायला सुरुवात केली.


" त्यांनी तुला काही केले का?" केशवने घाबरून विचारले.


" नाही.." आनंदीने बोलायला सुरुवात केली. "काल रात्री कोणीतरी माझ्या खोलीत आलेलं जाणवलं. ती व्यक्ती माझ्या अगदी जवळ आली. बाहेर कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. घराला जाग आली म्हणून ती व्यक्ती पटकन बाहेर निघून गेली. पण मला खात्री आहे की ते भाऊजीच होते. त्यांच्याशिवाय दुसरं कोणी अशी हिंमत करणार नाही. आज जर काही झाले असते तर माझ्याकडे दुसरा उपायच नव्हता."


" आनंदी.." केशव कसाबसा बोलला.


" मी बाकी सगळा त्रास सहन केला रे.. पण शील नाही. तेवढंच तर आहे आता माझ्याकडे. ते ही गमावले तर?"


" नको काळजी करूस. काही नसते झाले. तुझ्या जाऊबाई तशाही होत्याच ना?" केशव आनंदीची समजूत काढत म्हणाला.


" जाऊबाई.. ती तर गरीबाघरची गाय. त्यांना बहुतेक भाऊजींचा मनसुबा समजला असावा म्हणून त्यांनी मला पाठवायला सांगितले. त्यासाठी त्यांचे काय हाल होतील आता ते त्यांनाच ठाऊक." आनंदीचे रडू थांबले होते. अधूनमधून ती हुंदके देत होती. 


" नको रडूस. आता पडली आहेस ना तिथून बाहेर."


" तिथून बाहेर पडले. पण पुढे काय? धिंडवडे निघाले रे माझ्या आयुष्याचे केशव.. आधी हे गेले आणि आता हे सगळे. कोणासाठी आणि का जगायचं?" आनंदी बोलत होती.


"आनंदी, दामोदर यायच्या आधी मला बोलून घेऊ देत. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू तयार असशील तरच पुढचं बोलतो." केशव घाई करत होता.


" अरे पण.." आनंदीने बोलायचा प्रयत्न केला.


" हो की नाही?"


" मी अशी विधवा.." आनंदीच्या डोळ्यात पाणी होते.


" आनंदी, दामोदर पाणी घेऊन येतो आहे. हो की नाही?"


" मला थोडा वेळ तर दे.."


" घे हवा तेवढा वेळ घे. तोपर्यंत माझी आई माझे लग्न लावून देईल. मग विचारच विचार करत बसू." केशव वैतागून बोलला.


" असं रे काय बोलतोस?" आनंदीच्या डोळ्यात पाणी आले.


" ऐक. माझे शिक्षण अजून पूर्ण व्हायचे आहे. मला असे वाटते तू ही तोवर रमाबाईंच्या सेवासदनमध्ये दाखल व्हावेस." केशव ठामपणे बोलला. ते ऐकून आनंदी घाबरली.


" जीव वाचवण्यासाठी मी धर्म बदलू?" 


" धर्म का बदलायचा?त्या काही तिथे राहणाऱ्या बायकांना धर्म बदलायला सांगत नाहीत. तिथे राहून फक्त शिक्षण पूर्ण करून घे. मी तसं बोलतो काकांशी." तेवढ्यात दामोदर आलाच.


" काय रे एवढा वेळ लागला यायला?" केशवने विचारले. 


" विहीर दूर होती. काहीजणी तिथे पाणी भरत होत्या म्हणून. इथे सगळे ठीक आहे ना?" आनंदीच्या सुजलेल्या डोळ्यांकडे बघून त्याने विचारले. 


" हो.. आपण पटकन शिदोरी खाऊ आणि पुढच्या रस्त्याला लागू." केशव बोलला.


" मला माफ करा.. मी तिथे तुम्हाला फराळाचे काहीच विचारू शकले नाही." अपराधीपणे आनंदी बोलली.


" आम्ही तिथे फराळ करायला नाही तर तुला घ्यायला आलो होतो. त्यामुळे ही अपराधी भावना मनातून काढून टाक." दामोदर बोलला. "तू आमच्यासोबत आहेस. आम्हाला सगळं मिळालं.."

दामोदरचे हे शब्द ऐकून नाही म्हटलं तरी आनंदीला धीर आला. तिघे घरी पोहोचले.

आनंदीची अवस्था बघून सावित्रीबाईंच्या डोळ्यातलं पाणी खळेना.


 " काय ग.. काय ही तुझी दशा?" सावित्रीबाई आनंदीच्या गळ्यात पडून रडू लागल्या.


" नशीबचं फुटकं बघ माझं." आनंदीलाही रडू आवरत नव्हतं. 


" आपल्या माणसांत आली आहेस ना. आता नको असं काही बोलूस." तिच्या तोंडावरून हात फिरवत सावित्रीबाई बोलल्या. आनंदी स्वतःच्या घरी येऊन रूळली होती. केशवलाही परत जायची घाई होती. पण जाण्याआधी त्याला आनंदीला सेवासदनमध्ये दाखल करायचे होते. हे होणार कसे? हाच प्रश्न होता. त्याला तशी संधी मिळालीच. 


" तुम्हाला समजले ना काय झाले ते?" राधाबाई दुपारचे निवडटिपण करताना म्हणाल्या. 


"सिंधूचे ना?"


" हो ना. किती गोड पोर होती. कसं पाऊल घसरलं तिचं." राधाबाई हळहळत होत्या.


" पाऊल कसलं घसरतंय? कुंपणानेच शेत खाल्लं. अवघ्या गावाला माहित आहे ते."


"बघा ना. करून सवरून तो नामानिराळा. आणि ही मात्र बाईपणामुळे अडकली. बिचारी पोर ती.. करणार तरी काय? शेवटी आडच जवळचा वाटला तिला."

राधाबाईंचे शब्द ऐकून सावित्रीबाई शहारल्या. त्यांची नजर आनंदीवर पडली. आल्यापासून सगळ्यांच्या नजरेआड रहाण्याचा प्रयत्न करत होती नुसती.


" अशी वेळ कोणावरही न येवो." सावित्रीबाई बोलल्या.


" वेळ येणारच ना. मुलींनी घरात स्वतःला कोंडून घ्यायचे. बाहेर नाही जायचे. कोणी ना कोणी तिचा फायदा घेणारच ना? मग आहेच आड.." त्यांचं बोलणं ऐकून केशव म्हणाला. दोघी ते ऐकून गप्प झाल्या.


"आनंदी या सगळ्याला बळी पडू नये असं वाटत असेल तर तिला पाठवा सेवासदनमध्ये. कमीतकमी स्वावलंबी तरी होईल ती." केशवने स्वतःचे म्हणणे पुढे रेटले.



मिळेल का आनंदीला सेवासदनमध्ये जाण्याची संधी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

🎭 Series Post

View all