Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

आनंदीकेशव.. भाग ५

Read Later
आनंदीकेशव.. भाग ५
आनंदीकेशव.. भाग ५

मागील भागात आपण पाहिले की आनंदी विधवा झाल्याचे केशवला समजते. आता बघू पुढे काय होते ते." नाच ग घुमा, कशी मी नाचू?
ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला. जोडवी न्हाई मला.. कशी मी नाचू?" 

     मुलींनी खाली अंगणात फेर धरला होता. केशव त्याच्या खोलीतून खाली बघत होता. सगळ्याजणी नटूनथटून नाचत होत्या. केशवच्या डोळ्यासमोर मात्र आलवण नेसलेली, भुंड्या हाताची, केशवपन केलेली आनंदी येत होती. त्याने खिडकीचे गज घट्ट पकडले होते. तरिही त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना तो नाही थोपवू शकला. मुलींची मंगळागौर खेळून झाली पण केशवचे विचारचक्र मात्र थांबले नाही.

    सकाळ होताच घरात कोणाशीही न बोलता स्वतःचे आवरून तो आनंदीच्या घरी गेला. तिचे वडील विनायकराव बाहेर जायच्या तयारीत होते. केशवला बघून ते थबकले. क्षणात त्यांनी स्वतःला सावरले आणि सावित्रीबाईंना आवाज दिला.

" बघितलेत का कोण आले आहे आपल्याकडे? केशव आला आहे. त्याच्यासाठी काही गोडधोड करा." उसने अवसान आणून ते बोलत होते. सावित्रीबाईही दरवाजात आल्या होत्या.

" किती दिवसांनी बघते आहे तुला? बरे वाटले हो तुला बघून." त्या जरी हसर्‍या चेहर्‍याने बोलत असल्या तरी आवाजातले दुःख लपत नव्हते. पण ही लपवाछपवी करत बसायला केशवकडे वेळ नव्हता.

" काका, आनंदी कशी आहे?" त्याने प्रश्न विचारला आणि सावित्रीबाईंनी हुंदका दिला.

" कशी असणार? बरी आहे." नजर चोरत विनायकराव बोलले.

" काका, तुमचा तरी तुमच्या शब्दांवर विश्वास बसतो आहे का? तिथे ती छळ सहन करते आहे आणि तुम्ही म्हणताय बरी आहे?" केशवचा आवाज चढला होता.

" मग काय करू म्हणतोस? लग्न झाले की मुलीचा आणि माहेरचा संबंध संपतो. आता तिच्या सासरच्यांनी तिला सोन्याने मढवू दे किंवा आडात ढकलून देऊ देत. आमचा काय संबंध?" डोळ्यातले पाणी मागे ढकलत विनायकराव बोलत होते.

" व्वा काका.. किती सुंदर विचार आहेत तुमचे. मुलीला जन्म द्यायचा. दहा वर्षे जपायचे आणि तिचे लग्न लावून दिले की जबाबदारी संपली म्हणायचे. मग जन्म तरी कशाला द्यायचा तिला?" 

" केशवा.." विनायकराव ओरडले.

" आणि आनंदीच्या सासरचे तिला सोन्याने मढवणार? अहो बोडकं केलं तिला.. जेवायला देत नाहीत, राबवून घेतात नुसते आणि तुम्हाला पोटच्या गोळ्याची दया येत नाही?" केशव बोलतच होता.

" नको रे नको असं बोलूस.." विनायकरावांच्या डोळ्यात पाणी होते. "कसं रे बघवेल तिला या वेशात मला? जावई गेल्यावरच तिला इथे आणणार होतो. पण तिच्या दिराने नाही पाठवले. तसेही उद्या दामोदरचे लग्न झाल्यावर इथे भावजयीचे आश्रीत म्हणून राहण्यापेक्षा तिथे हक्काने तरी राहिल. हा विचार करून गप्प राहिलो."

" काका, पण तिथे राहून ती मरून जाईल श्रमाने." केशव तळमळीने बोलत होता.

" इथे आणून तरी काय वेगळे होणार? शेवटी ती आणि तिचे नशीब. " विनायकराव हताश होऊन बोलत होते.

" काका, तिला आधी इथे येऊ देत. तिच्या नशीबाचे पुढे काय होईल ते नंतर बघू." केशव ठामपणे बोलला.

" बघतो.. आनंदीच्या काकाला किंवा मामाला बोलावून घेतो मग जातो त्यांच्याकडे."

" काका, तेवढा वेळ नाही माझ्याकडे. तुम्ही दामोदरला पाठवा माझ्यासोबत. मी घेऊन येतो तिला परत. चालेल का?"

" एवढी घाई?" विनायकरावांनी बोलायचा प्रयत्न केला.

" अहो.. सुमी येऊन गेल्यापासून डोळ्याला डोळाही लागला नाही माझा. सतत आपली पोर डोळ्यासमोर येते आहे. जाऊ दे ना त्यांना ते जात आहेत तर." सावित्रीबाई मध्ये बोलल्या. त्यांचे म्हणणे विनायकराव डावलू शकले नाहीत. लगोलग केशव दामोदरला घेऊन आनंदीच्या गावी निघाला. राधाबाईंना हे पटले नव्हते. पण आपण काही बोललो तर लगेचच बापलेक मिळून समाजसुधारणेचे धडे देतील हे माहित असल्यामुळे त्या मूग गिळून गप्प बसल्या.

" नमस्कार, मी दामोदर. आनंदीताईचा भाऊ." दामोदरने ओळख करून दिली.

" ओळखलं.. या बसा. सगुणे गूळपाणी आण पाहुण्यांना." समोरच्या आडदांड देहातून मस्तवाल आवाज आला. केशव आणि दामोदर बघतच राहिले. आडदांड देह, झुबकेदार मिश्या, केसांचा संजाब, त्यावर रूळणारी शेंडी. कानात भिकबाळी, गळ्यात मोत्यांचा कंठा, दहाही हातात अंगठ्या आणि हातातला कडा. आनंदीचे मोठे दीर सोप्यावरच्या झोपाळ्यावर बसून सुपारी कातरत होते.

" सहजच येणं केलं का? आणि हे कोण?" छद्मी हसत त्यांनी विचारले. दामोदर घाबरला हे बघून केशव पुढे झाला.

" मी केशव, यांचा शेजारी." 

" ते पुण्याला शिकायला असता तेच का?"
त्यांना असलेली माहिती ऐकून केशवची पण चलबिचल झाली. आता कच खाऊन फायदा नव्हता.

" हो.. तोच मी. काकूंनी आनंदीचा." केशवच्या तोंडून आनंदीचे नाव ऐकताच त्यांची नजर वर झाली.

" म्हणजे आनंदीताईंचा ध्यास घेतला आहे. अन्नपाणी सोडले आहे म्हणा ना. म्हणून तिला न्यायला आलो आहोत.. तुमची परवानगी असेल तर." केशवने पुस्ती जोडली. तोवर एका छोट्या मुलीने येऊन समोर गूळपाणी आणून ठेवले.

" ऐकलत का? धाकट्या बाईंचे भाऊ आलेत म्हणे त्यांना घेऊन जायला. काय करायचे?" माजघराच्या दिशेने बघत ते म्हणाले.

" तिच्या आईची तब्येत बरी नाही तर पाठवावे असेच वाटते." आतून एक किणकिणता आवाज आला.

" असं म्हणताय? मग सांगा त्यांना निघायची तयारी करायला. " सुपारीचे दोन तुकडे करत ते म्हणाले.


केशव आनंदीला घेऊन यायला गेला तर आहे. पण आनंदीचा परतीचा प्रवास सोपा असेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//