आनंदीकेशव.. भाग ४

कथा कोण्या एका आनंदी आणि केशवाची
आनंदीकेशव.. भाग ४

मागील भागात आपण पाहिले की आनंदी ही सासरी गेली आहे. सुमीच्या मंगळागौरीच्या निमित्ताने पुण्याला शिकायला गेलेला केशव घरी येतो. आता बघू पुढे काय होते ते.


" मुलींनो जरा पत्री, फुले आणा बघू." राधाबाईंनी आवाज दिला.

" हो काकू." म्हणत काही मुली बाहेर आल्या. केशवला बघताच गलका झाला.

" काकू, केशवदादा आला." मुली ओरडू लागल्या. त्यांचे बघून आजूबाजूची मंडळीही गोळा झाली. सगळ्यांच्या डोळ्यात त्याच्याबद्दल अभिमान दिसून येत होता. मॅट्रिक शिकलेला गावातला तो पहिलाच मुलगा होता. राधाबाईंनी त्याला दरवाजात उभे करून त्याच्यावरून मीठमोहरी उतरवली. बाकीच्या सवाष्णींनी त्याचे औक्षण केले. 

" आता तरी येऊ का घरात?" हसत केशवने विचारले.

" विचारायचे काय त्यात? ये हो. कधीची वाट बघते आहे तुझी." थरथरत्या हाताने केशवच्या तोंडावरून हात फिरवत राधाबाई म्हणाल्या. केशव त्यांना नमस्कार करायला वाकणार तोच त्यांनी त्याला अडवले.

" आधी देवाला, मग घरातल्या वडिलधार्‍यांना आणि सगळ्यात शेवटी मला." आईच्या बोलण्याचा मान राखत केशव आत गेला. आत सुमीच्या सगळ्या मैत्रिणींचा, त्यांच्या बहिणींचा धिंगाणा सुरू होता. सगळ्या माहेरवाशीणी मनसोक्त बोलून घेत होत्या. या सगळ्यात त्याची नजर त्याच्या नकळत आनंदीला शोधत होती. ती दिसत नव्हती. पण कोणाला विचारायची त्याची टाप नव्हती. ताजातवाना झाल्यावर तो त्याच्या माडीवरच्या खोलीत गेला. खाली कोणाशी लगेचच बोलायची त्याची इच्छाच होत नव्हती. त्याने पिशवीतले पुस्तक काढून वाचायला सुरूवात केली असेल नसेल तोच सुमीचा रागीट आवाज आला.

" मला न भेटताच वरती आलास ना?" तिने नाक उडवत विचारले. तिचा तो आविर्भाव बघून त्याला हसू आले.

" तू बसली होतीस तुझ्या साळकाया माळकायांमध्ये. मग तुला कसा त्रास देणार?" केशव प्रेमाने सुमीकडे बघत होता. तिच्याकडे गोड बातमी असल्याचे त्याला समजले होते. याआधी ही एकदोनदा तिचा अकाली गर्भपात झालेला त्याला समजले होते. यावेळेस मात्र गर्भ राहिला होता. म्हणूनच मंगळागौर आणि डोहाळजेवणाचा दुहेरी घाट राधाबाईंनी घातला होता.

  " तू कशाला एवढी वर चढून आलीस? कोणासोबत तरी निरोप पाठवायचा होतास. आलो असतो की खाली."

" पण खाली मोकळेपणाने बोलता आले नसते. म्हणून चढवत नसताना सुद्धा आले." सुमी पदराने घाम टिपत म्हणाली. केशव बघतच राहिला. या मुली किती पटापट मोठ्या होतात. काल परवापर्यंत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणारी सुमी आज चक्क समजूतदार झाली होती.

" सुमे.. बरी आहेस ना? म्हणजे तुमची स्वारी कशी आहे?" केशवने विचारले.

" कशी असणार? जशी असायची तशीच आहे. घरचा व्यवसाय बघणार आहेत म्हणे. तुझ्यासारखी हुशारी नाही बरं अंगात. मामंजी आहेत म्हणून निभावून जाते आहे."

" तू सुखी आहेस ना संसारात... झाले मग." 

" दादा, तुला आनंदीबद्दल समजले?" विषय काढू की नको असा विचार करत असलेल्या सुमीने शेवटी बोलूनच टाकले.
अशुभाची चाहूल केशवाला जाणवू लागली.

" ती बरी आहे ना?" केशवने विचारले. सुमी काहीच बोलत नाही हे बघून तो धास्तावला. "ती जिवंत तरी आहे ना?" त्याचा आवाज किंचित चढला होता.

" मेली असती तर परवडले असते." सुमा कशीबशी बोलली.

" काय झाले ते सविस्तर तरी सांग." केशवच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते.

" दादा, गतसाली आनंदीचे यजमान निर्वतले." सुमीने बोलायला सुरुवात केली. "पाण्यात पोहायला म्हणून गेले होते. सूर मारायला गेले आणि वर आले ते त्यांचे शवच." केशव सुन्नपणे ऐकत होता.

" दादा.." सुमीने त्याला हाक मारली.

" आनंदीचे काय झाले?" त्याच्या आवाजातल्या बदलाने सुमी घाबरली. पण तिला कधीपासूनच त्याला हे सांगायचे होते.

" त्या चांडाळांनी तिचे केशवपन केले रे." सुमी रडू लागली. "तिला आलवण नेसवून सोवळी केले." सुमीला रडू आवरत नव्हते. केशव तिच्या जवळ गेला. ती त्याच्या कुशीत रडू लागली. केशव निशब्दपणे तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला.

" तिला फार सासुरवास होतो आहे रे. रामप्रहरी तिचा दिवस सुरू होतो ते रात्री उशिरापर्यंत ती फक्त कामाचा घाणा उपसत असते. यांची आतेबहिण तिच्याच गावी असते. ती सांगत होती रे. जीव तुटतो माझा तिच्यासाठी." सुमी बोलत होती. केशवच्या डोळ्यासमोर मात्र त्याची हसरी आनंदी येत होती. किरमिजी लुगड्यातली, हात भर चुडा ल्यालेली. लांबसडक केसांचा खोपा बांधलेली. तिचे केशवपन केले. त्याच्या हाताच्या मुठी वळल्या.



सोवळ्यात असलेल्या आनंदीला वाचवू शकेल का केशव? की रूढीपरंपरांच्या चक्रात जाईल अजून एक बळी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई

🎭 Series Post

View all