Mar 04, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

आनंदीकेशव.. भाग २

Read Later
आनंदीकेशव.. भाग २

आनंदीकेशव.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की न्हाण न आल्याने आनंदीची सासरी पाठवणी झालेली नाही. तसेच चिंतामणरावांच्या सुधारकी विचारांमुळे केशवचे लग्न अजूनही ठरवलेले नाही. आता बघू पुढे काय होते ते."मजा आहे एका माणसाची आता." आनंदी सुमीला चिडवत होती.


" चिडवतेस काय मला अशी? मी काय लगेच सासरी जाणार नाही म्हटलं." ठसक्यात सुमी म्हणाली.


" पण मी चाललो आहे लगेच पुण्यास." दुःखी चेहर्‍याने केशव म्हणाला.


" खरं?" तोंडावर हात ठेवत आनंदी म्हणाली.


" हो.. बाबांनी तिथे त्यांच्या एका मित्राकडे रहायची सोय केली आहे. आता मला तुम्हां कोणालाच भेटता येणार नाही." केशव रडवेला झाला होता.


"ए दादा, रडतोस काय मुलींसारखा? आईने बघितले ना तर रट्टा मिळेल पाठीत. आणि तसेही तू अध्येमध्ये येत राहशीलच ना?" 


" काय माहित? तिकडे गेल्याशिवाय मला कसे समजणार?" केशव अजूनही उदासच होता. "तुम्ही सगळे एकत्र असणार. मी मात्र तिथे एकटाच. "


" केशवा, असे बोलू नकोस ना. मी ना तुला पत्र लिहित जाईन. मग तुला एकटे वाटणार नाही." आनंदी केशवची समजूत काढत होती.


" तू लिहिशील मला पत्र? आणि सुमे तू?" केशवने उत्साहाने विचारले.


" मी?? आनंदीने पत्र लिहिले की त्यात माझ्या खुशालीच्या दोन ओळी लिहिन. झाले समाधान?" 


" तू पण ना आळशी आहेस सुमे.." 


" मला आळशी बोलायचे नाही, सांगून ठेवते."


" ती तर तू आहेसच.. लिहायचा कंटाळा, वाचायचा कंटाळा. फक्त दिवसभर एकाजागी बसून खेळायला सांगा. आळशी घोडा नुसता." केशव सुमीला चिडवत म्हणाला.


" थांब.. आईलाच नाव सांगते तुझे आता." म्हणत सुमी घरात पळाली. केशव आणि आनंदी दोघे तिच्याकडे बघून हसत राहिले.


" चल.. मी ही निघते. नाहीतर आई ओरडेल मला." आनंदी तिथून निघू लागली.


" आनंदी.. नक्की लिहिशील ना मला पत्र? मी वाट बघेन." केशवचा आवाज बदलला होता. 


"हो. तू तिथे काळजी घे. वेळेवर खा पी. खूप अभ्यास कर. मोठा हो. मला तुझा अभिमान वाटेल इतका मोठा हो." आनंदी बोलत होती आणि केशव फक्त तिच्याकडे बघत होता.    लवकरच सुमीचं लग्न लागलं. सुमीचे लग्न होताच केशवही शिक्षणासाठी पुण्याला गेला. घरापासून पहिल्यांदाच दूर राहिलेल्या त्याला फार एकटं एकटं वाटायचं. त्या एकटेपणात त्याला आधार वाटायचा आनंदीच्या पत्रांचा. कबूल केल्याप्रमाणे तिने सुरूवातीचे काही आठवडे न चुकता पत्र लिहिले. त्यानंतर मात्र तिची पत्र येणं बंद झाले. तोवर केशवचीही इथे ओळख झाली होती. नवीन मित्र मिळाले होते. अभ्यास वाढला होता. या सगळ्यात गाव, आनंदी आणि घर नाही म्हटलं तरी पाठी पडलं होतं. तसं घरून बाबांचं अधूनमधून पत्र यायचे खुशालीचं. तो ही पाठवायचा. पण त्यात आनंदीची चौकशी करणे त्याला योग्य वाटत नव्हतं. आणि सुमीही एवढी आळशी की खरंच तिने त्याला बोटभरही चिठ्ठी लिहिली नव्हती. त्यामुळेच आनंदी हा विषय सध्यातरी त्याने ह्रदयाच्या फडताळात बंद करून ठेवला होता. तसेही तिचे लग्न झाले होते. आज ना उद्या त्याचेही लग्न होणार होतेच. पण तरिही ह्रदयातली तिच्यासाठी असणारी भावना तशीच राहणार होती. लगेचच गावाला जाता येणार नाही म्हणणार्‍या त्याला वर्षअखेरीस मात्र गावी जावेच लागले. सुमीला न्हाण आले होते. तिची पाठवणी करायची होती. तसेही इतके दिवस घरापासून दूर राहून केशवलाही घरची आठवण येऊ लागली होती. शाळेची परवानगी घेऊन केशव घरी जायला निघाला. 


     घर जसेजसे जवळ येऊ लागले तसतश्या त्याच्या जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या. मित्रांसोबत खेळलेले खेळ, पाडलेल्या कैर्‍या आणि आनंदीसोबत खेळलेली भातुकली. सगळं काही नुकतंच घडून गेल्यासारखं वाटत होतं. घरी गेल्या गेल्या पत्र का लिहित नाहीस, असा आनंदीला जाब विचारायचा केशवने ठरवले होते. केशव घरी पोहोचला. आधी तर त्याला स्वतःचे घर ओळखूच आले नाही. फुलांच्या माळांनी घर सजवले होते. दारात मांडव पडला होता. पाहुण्यांनी घर भरले होते. आडावर हातपाय धुवून केशव आत गेला. आत चौथ्या दिवशी होणाऱ्या होमहवनाची तयारी सुरू होती. आई त्याच कामात होती. केशवला बघून राधाबाईंना आनंद झाला. 


" केशवा, हडकलास रे.. तिथे काही खातपित होतास की नाही?" त्यांनी मायेने विचारले.


" जेवण असतं ग. पण तुझ्या हातची चव नाही कशालाच." केशव लाडात येत म्हणाला.


" चल.. लाडीगोडी नको लावूस. स्वयंपाकघरात चल. ताजे बेसनाचे लाडू केले आहेत तुला आवडतात म्हणून. देते ते. काकूंनी केलेला चिवडासुदीक आहे."


" आई, काकू आणि आनंदी दिसत नाहीत ते." भोळा चेहरा करून केशवने विचारले.


" दिसतील हो.. आत्ताच गेल्या आहेत त्या घरी. येतीलच संध्याकाळी परत. केशवा.." बोलता बोलता राधाबाई थांबल्या.
इतक्या दिवसानंतर भेटेल का केशवला आनंदी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//