आनंदी भाग ९

Story Of A Girl

मागील भागाचा सारांश: स्मिता आनंदीला व सुजयला गार्डनमध्ये खेळण्यासाठी घेऊन गेली असता आनंदीकडे लक्ष देण्याच्या नादात सुजयकडे तिचे दुर्लक्ष होते आणि नेमकं त्याच वेळी सुजय पडतो व त्याच्या डोक्याला तीन टाके पडतात. सुजयच्या डोक्याला झालेली जखम बघून सुजय प्रचंड चिडतो व तो स्मिताला सांगतो की आनंदी मुळेच आपल्या सुजयला दुखापत झाली आहे, आनंदीला तिच्या आईकडे सोडून ये. संदीप अस का बोलला? हे स्मिताला कळत नव्हते.संदीपचा राग कमी झाल्यावर स्मिताने संदीपला अशी प्रतिक्रिया देण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की त्यांच्या गुरुंनी आनंदीची पत्रिका बघून सांगितले आहे की ती आपल्या घरात राहिली तर आपल्यावर कायम संकट येत राहतील. स्मिताला हे कळून चुकले होते की आपण समजा हट्ट करुन आनंदीला या घरात ठेवले तर घरात घडणाऱ्या कुठल्याही वाईट घटनेला आनंदीला जबाबदार धरतील, अस तिला व्हायला नको होते म्हणून तिने निर्णय घेतला की आनंदीला आपण बाहेर कुठे तरी ठेऊया. स्मिताने याबद्दल शांता मावशींसोबत चर्चा केली तेव्हा शांता मावशींनी आनंदीला पाचगणीच्या जवळ एका ठिकाणी ठेवता येईल असं सांगितलं आणि त्या आनंदी सोबत तिकडेही जायला तयार होत्या.

आता बघूया पुढे....

स्मिताला त्या रात्री नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी शांता मावशी कडून स्मिताने विद्या ताईंचा फोन नंबर घेतला व त्यांना फोन करुन शहानिशा करुन घेतली. विद्या ताई पाळणाघर चालवत होत्या पण त्या कोणत्याच बाळाला आपल्याकडे रात्री ठेवत नसे त्यामुळे त्या सुरवातीला नाही म्हटल्या मग स्मिताने ठरवले की आपण प्रत्यक्ष जाऊन स्मिता ताईंची भेट घेऊयात आणि मग त्यांना सविस्तर कथा वर्णन करुयात.

ठरल्या प्रमाणे स्मिता मला व शांता मावशींना सोबत घेऊन पाचगणीला जायला निघाली, तिने मनाशी निर्धार केला होता की समजा विद्या ताई नाही म्हटल्या तर आपण आनंदीला पुन्हा आपल्या घरी घेऊन येऊ आणि दुसरीकडे काही तरी बघूयात. पाचगणीला पोहोचल्यावर स्मिताची व विद्या ताईंची भेट झाली, स्मिताने त्यांना माझ्या बद्दल आता पर्यंत घडलेल्या घटनांची कल्पना दिली. सर्व ऐकून झाल्यावर विद्या ताई म्हणाल्या," स्मिता ताई जगात अजूनही असे लोक आहेत जे मुलीला स्विकारायला तयार होत नाहीत, अशी मानसिकता काय कामाची? मला हे सर्व ऐकून मोठा धक्काच बसला आहे. आपण फक्त म्हणतो की आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत, आपली प्रगती होत चालली आहे पण जेव्हा अश्या विचित्र घटना कानावर पडतात ना त्यावेळी वाटत आपण काहीच प्रगती केली नाहीये. अरे मुली सांभाळण्याची ऐपत जर यांच्यात नव्हती तर तिला जन्म का दिला? आपल्या सारख्या परक्या व्यक्तीने आनंदीला कितीही प्रेम दिले तरी तिच्या आईने जेवढे प्रेम दिले असते त्यापुढे आपण कमीच पडू की नाही? माफ करा स्मिता ताई पण मला तुमच्या मैत्रीने घेतलेला स्टॅन्ड अजिबात पटलेला नाहीये. आपल्या हक्कासाठी आपल्यालाच आवाज उठवला लागतो, तुम्ही हाक दिली तर कोणीतरी मदत करायला जाईल ना, तुम्ही जर अश्या गप्प राहून सहन करत राहिल्या तर तुमचे काहीच होणार नाही. आता तुमच्याच घरचं दृश्य बघाना, सुशिक्षित घर असतानाही गुरुंवर एवढा विश्वास याला अंधविश्वासच म्हणावं लागेल की नाही."

स्मिता मान खाली घालून म्हणाली," विद्या ताई तुम्हाला या सर्वाची चीड येणं स्वाभाविकच आहे. सरलाने मोठ्या विश्वासाने आनंदीची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी तिला माझ्या घरी ठेवलेही असते पण पुढे जाऊन घरात ज्या काही वाईट घटना घडतील त्यासाठी आनंदीला जबाबदार धरण्यात येईल आणि मला तसे व्हायला नको आहे. विद्या ताई आपण प्रगती पथावर आहोत किंवा आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत हे म्हणणं तुमचं बरोबर आहे पण आपली संस्कृती पहिल्या पासून पुरुष प्रधान आहे ती बदलली आहे का? मुलीला लग्नानंतर मुलाच्या घरी राहायला जावे लागते हे बदलले आहे का? आपल्या नवजात बालकाला दुसऱ्याच्या हातावर देताना त्या आईच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना आपण करु शकत नाही, हे सर्व का घडले? त्या पुरुष प्रधान संस्कृती मुळेच ना? समज सरलाने आपल्या मुलींना घेऊन घर सोडले असते तर तिच्याकडे लोकांनी कुठल्या दृष्टीकोनाने बघितले असते. सरलाला कोणी सहानुभूती दाखवली असती का? विद्या ताई स्त्री कमजोर नाहीये पण आई आपल्या मुलांपुढे कमजोर होते, आपल्या मुली संरक्षित राहाव्यात एवढीच सरलाची इच्छा होती. आनंदीला आपण सोबत नाही ठेऊ शकत ही कल्पना सुद्धा मला सहन होत नाहीये पण माझ्या नवऱ्याला हे आवडत नाही म्हणून मी आनंदीला त्याच्या घरात ठेऊ शकत नाही. ताई परिस्थिती पुढे आपल्या सगळयांना झुकावे लागते. समाज परिवर्तन इतक्यात होईल असे तरी मला वाटत नाही, आपण त्यासाठी नक्कीच प्रयत्न करुयात. पण मला आता एक सांगा शांता मावशी व आनंदीला तुमच्या कडे ठेऊन घेता की नाही?"

विद्या ताई हसून म्हणाल्या," स्मिता ताई मला या विषयावर तुमच्याशी गप्पा मारायला नक्कीच आवडेल आणि हे शक्य तेव्हाच होईल जेव्हा आनंदीला आम्ही ठेऊन घेऊ. तुमच्या सारखी पडखर बोलणारी व्यक्ती मला मनापासून आवडते. सरलाने काय केले? किंवा तुम्ही काय केले? यावर चर्चा करत बसण्यापेक्षा मी काय करु शकते याकडे मी लक्ष देते. आनंदी इथे राहू शकते, सोबत शांता मावशी असतील त्यामुळे काहीच अडचण येणार नाही. आमच्याकडे दहावी पर्यंत शाळा आहे त्यामुळे तिचं पुढील शिक्षणही इथे होईलच, शाळेची फी माफ होण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्यात आनंदी उत्तीर्ण झाली तर तुम्हाला शाळेची फी भरावी लागणार नाही. याबद्दल आत्ता बोलायला आनंदी लहान आहे पण तुम्हाला माहिती असावी म्हणून मी सांगितलं. आनंदी इथे सुखरुप राहील,तुम्ही तिची काळजी करु नका. तुम्हाला जर आनंदीला भेटावंस वाटलं तर फोन करुन येत चला."

विद्या ताईंनी होकार दिल्यामुळे स्मिताला आनंद झाला होता. स्मिताला तेथील वातावरण खूप आवडले होते, तिला खात्री होती की आपली आनंदी येथे सुखरुप राहील. स्मिता मला व शांता मावशींना तिथे सोडून पुण्याला निघून गेली. सुरवातीच्या काळात स्मिता दोन तीन महिन्यांतून एकदा मला भेटायला येत असे. स्मिताने माझा पहिला वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. शांता मावशी माझा सांभाळ करत असल्याने माझी चिंता करण्याचे काही कामच नव्हते. मी दोन वर्षांची होईपर्यंत स्मिता नेहमी मला भेटायला यायची पण त्यानंतर तिचे भेटायला येणे हळूहळू कमी झाले. शांता मावशी मला झाशीच्या राणीची गोष्ट सांगायची. शांता मावशी अडाणी असली तरी तिने माझ्यावर संस्कार खूप छान केले होते. विद्या ताईंना सुद्धा माझा लळा लागला होता त्याही माझ्या सोबत खेळायच्या, मला गोष्टी सांगायच्या. 

शाळेच्या होस्टेलला राहणारे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सर्वच जण माझे कुटुंब बनले होते. मी तीन वर्षाची झाल्यावर मला शाळेतील वर्गात बसण्याची परवानगी मिळाली. मी लहानाची मोठी त्याच वातावरणात झाली असल्याने मला अभ्यासाची आवड होती. स्मिता मला भेटायला वर्षातून एकदा यायची, सोबत येताना माझ्या साठी कपडे, खेळण्या घेऊन यायची. शांता मावशी तिला स्मिता ताई म्हणायच्या तर मीही तिला स्मिता ताईचं म्हणू लागले होते पण तिने मला सांगितले की मला स्मिता मावशी म्हणत जा, त्यानंतर मी तिला स्मिता मावशी म्हणू लागले. मी पाच वर्षांची असतानाचा किस्सा आहे, स्मिता मावशी मला भेटायला येणार असल्याचे शांता मावशी कडून समजले होते, मी वर्गात माझ्या मैत्रिणींना सांगत सुटले की मला भेटायला स्मिता मावशी येणार आहे म्हणून यावर माझ्या एका मैत्रिणीने मला विचारले की आनंदी तु ज्यांच्या सोबत राहते त्यांना तु शांता मावशी म्हणतेस, जी तुला भेटायला येणार आहे ती स्मिता मावशी आहे मग तुझी आई कुठे आहे? ती तुला भेटायला का येत नाही?

तोपर्यंत या प्रश्नावर मी कधीच इतका विचार केला नव्हता. एकदा कधीतरी मी शांता मावशीला माझी आई कुठे आहे? हा प्रश्न विचारला होता तर तिने सांगितले होते की ह्या प्रश्नाचं उत्तर स्मिता मावशी देईल. स्मिता मावशी आल्यावर मी तिला विचारले," स्मिता मावशी माझी आई कोण आहे? ती कुठे राहते? ती मला भेटायला का येत नाही?"

स्मिता मावशीने मला आपल्या कुशीत घेतले, तिच्या डोळ्यात पाणी आले होते, ती म्हणाली, "आनंदी बाळा तुझी आई खुप लांब राहते, ती कामात खूप व्यस्त असते म्हणून ती तुला भेटायला येऊ शकत नाही."

यावर मी लगेच म्हणाले," स्मिता मावशी तु पण लांब राहते ना? तुलाही भरपूर कामे असतात, तरीही तु मला भेटायला येतेस की नाही?"

स्मिता मावशी म्हणाली," अग बाळा तुझी आई माझ्या पेक्षाही लांब राहते."

"स्मिता मावशी म्हणजे माझी आई देवाघरी राहते का? माझ्या एका मैत्रिणीची आजी देवाघरी गेलीय, तेव्हा ती म्हणत होती की आजी आम्हाला भेटणार नाही." मी विचारले

माझ्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हे स्मिता मावशीला कळत नव्हते, आमच्यातील संभाषण विद्या ताई ऐकत होत्या. माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला त्या पुढे येऊन म्हणाल्या, "आनंदी बाळा तुझी आई कुठे आहे? कोण आहे? हे आत्ता आम्ही तुला सांगू शकत नाही. पण मला सांग, आई काय करते? आपल्या बाळाचा लाड करते, आपल्या बाळाला जेऊखाऊ घालते, आपल्या बाळाला झोपी लावते. आता मला सांग तुझी ही सर्व कामे शांता मावशी करता की नाही? स्मिता मावशी तुझ्या साठी कपडे, खेळण्या आणि खाऊ घेऊन येते की नाही? तुझ्या इतर मैत्रिणींना कोणी एवढे कपडे, खेळण्या कोणी देत का? नाही देत ना? मग हे सगळं कोणाला भेटतं तर आपल्या आनंदी बाळाला भेटतं. आई तर सर्वांकडे असते पण इतकं प्रेम करणारी मावशी कोणाला भेटते का? नाही भेटतं. स्मिता मावशी आपल्या आनंदी बाळाकडेच आहे की नाही कारण आपलं बाळ खास आहे. यापुढे कधीही तुला वाटलं की आपल्याला आई का नाही? तर आपणच आपल्याला सांगायचं की आपल्याकडे आई सारख प्रेम करणारी मावशी आहे, समजलं?"

बघायला गेलं तर मी त्यावेळी खूप लहान होते पण विद्या ताईंनी ज्या पद्धतीने मला समजावलं की तेव्हापासून मी आईबद्दल कोणालाच काहीच विचारले नाही की याबद्दल वाईट वाटून घेतले नाही.

एकेक वर्ष पुढे जात होतं, मी मोठी होत होते. शांता मावशी म्हातारी होत चालली होती. स्मिता मावशी कामात खूप बिजी झाली असल्याने मला भेटायला न येता माझ्या साठी कपडे, खाऊ कुरिअरने पाठवायची. मी स्मिता मावशीला मिस करायचे मग विद्या ताईंकडून तिला फोन लावून घ्यायचे. 

मला अभ्यासाची गोडी होती, विद्या ताईंनी माझ्यात वाचनाची आवड लहानपणापासून निर्माण केली होती. अवांतर वाचन केल्याने माझ्या ज्ञानात भर पडत होती. दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या मैत्रिणी त्यांच्या घरी जायच्या पण मी मात्र तिथेच राहायचे तेव्हा मी पुस्तकांना माझा मित्र बनवू लागले, माळी काकांना बागकामात मदत करायचे. मी पाचवीला असताना शांता मावशी आजारी पडली आणि त्या आजारात ती आम्हाला सोडून गेली तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा आपल्या जवळची व्यक्ती गमावण्याचे दुःख काय असते ते जाणवले. शांता मावशी गेल्याने मी एकटी पडले होते. स्मिता मावशी त्यावेळी काही दिवसांसाठी माझ्या सोबत येऊन राहिली होती. स्मिता मावशी निघून गेल्यावर मला खूप बोअर व्हायचं, गप्पा मारायला कोणीच राहील नव्हतं. शांता मावशी शिवाय करमत नसायचं म्हणून मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासात माझं मन रमवू लागले, वेगवेगळी पुस्तके वाचू लागले.

आनंदीच्या आयुष्यात पुढे काय घडलं असेल हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all