मागील भागाचा सारांश: आई वडिलांच्या अनुपस्थितीत सरलाच्या वहिनीने तिला सांगितले की आम्ही तुमची मुलगी सांभाळू शकत नाही,तुम्ही आमच्यावर अवलंबून राहू नका. सरला या विषयावर तिच्या आईसोबत बोलली असता तिच्या आईनेही वहिनीच्या बोलण्याला दुजोरा दिला. सरलाला काय निर्णय घ्यावा हे कळत नसल्याने तिने याबद्दल तिच्या बहिणींसोबत बोलायचे ठरवले. सरलाच्या बहिणी माहेरी आल्यावर तिने त्यांच्याकडे हा विषय काढला व तिने त्यांना तिची मुलगी सांभाळण्याबद्दल विनंती केली पण दोघीही बहिणींनी वेगवेगळी कारणं देऊन तिच्या मुलीला सांभाळायला नकार दिला. सरलाला आता कोणाचाच आधार राहिलेला नव्हता, तिला कोणीच समजून घेत नव्हते. अशातच सरलाची बाल मैत्रीण स्मिता तिला भेटायला तिच्या माहेरी येते.
आता बघूया पुढे....
सरलाच्या प्रश्नावर स्मिता हसून म्हणाली, "सरला तु किती बदलली आहेस,आपल्या बाल मैत्रिणीला सुद्धा ओळखत नाहीस. इतक्यात मला विसरलीस पण"
सरला गोंधळून म्हणाली," बाल मैत्रीण आणि माझी? मी खरंच तुम्हाला ओळखलं नाही"
स्मिता म्हणाली,"तुझ्या सोबत शाळेत स्मिता नावाची मुलगी होती का? की जीचे वडील तुमच्या शाळेत मास्तर होते. मी तीच स्मिता आहे"
सरला स्मिताकडे हसत बघून म्हणाली," अग स्मिता तु आहेस होय, मी तुला ओळखलच नाही आणि तु इकडे अशी अचानक कशी आलीस? किती वर्ष झालीत आपली भेट नाही की काही संपर्क नाही."
स्मिता म्हणाली," चला म्हणजे तुझ्या लक्षात मी आहे म्हणायचं. अग इकडे गावात जरा एक काम होतं त्याच निमित्ताने येणं झालं, मग मी विचार केला की आता इकडे आलोच आहोत तर सरलाची चौकशी तरी करुन जावी पण योगायोग बघ तुझी नी माझी भेट झाली."
सरला म्हणाली," बरं केलं मला भेटायला आलीस"
सरला स्मिता सॊबत बोलत असतानाच सरलाची वहिनी एक कप चहा घेऊन आली, वहिनीला बघून तिची ओळख स्मिता सोबत करुन देण्यासाठी सरला म्हणाली, " स्मिता ही माझी वहिनी आहे."
स्मिता म्हणाली," अग माझी त्यांच्या सोबत आल्या आल्याचं ओळख झाली, वहिनी आणि हे काय तुम्ही एकच कप चहा आणला? सरला साठी चहा नाही आणला?"
आपल्या वहिनीची बाजू सावरण्यासाठी सरला म्हणाली," अग स्मिता मी जास्त चहा घेत नाही, उष्णतेचे त्रास सुरु होतात ग लगेच."
सरलाची वहिनी चहाचा कप स्मिताच्या हातात टेकवून निघून गेली. स्मिताला सरलाच्या वहिनीच वागणं खटकल्यासारखं वाटलं हे तिच्या चेहऱ्यावरून सरलाला समजले होते म्हणून ती विषय बदलण्यासाठी स्मिताला म्हणाली," स्मिता गुरुजी कसे आहेत? आणि ते सध्या कुठे असतात?"
"बाबा रिटायर झाले आहेत, आमचं मूळ गाव रत्नागिरी जवळ आहे तर बाबा गावाच्या जवळ म्हणून रत्नागिरीला राहतात. बाबांचं म्हणणं आहे की इतक्या दिवस नोकरीच्या निमित्ताने गावापासून व आपल्या माणसांपासून आपण दूर राहिलो, आता राहिलेले दिवस त्यांच्या सानिध्यात घालवायची त्यांची इच्छा आहे." स्मिताने उत्तर दिले
यावर सरला म्हणाली," अरे वा छानच आहे की मग, बाकी तु कुठे राहतेस? काय करतेस? लग्न कधी व कोणाशी केलं?"
स्मिता म्हणाली," अग एकदम किती प्रश्न विचारशील, थांब तुला सगळं सांगते म्हणजे तुझ्या सर्व शंकांचं निरसन होईल. मी बारावी नंतर बी कॉम केलं, एम कॉम करता करता एका कंपनीत Accountant म्हणून पार्ट टाईम नोकरी करायला लागले आणि त्याच कंपनीत माझी व संदीपची भेट झाली. संदीप CA आहे, त्यांचं स्वतःच फर्म आहे, संदीपचे वडील पण CA असल्याने सर्व सेट होतं. संदीपला मी पहिल्या नजरेतच आवडले होते त्याने मला डायरेक्ट प्रपोज केलं त्यावर मी त्याला सांगितले की माझ्या घरी येऊन बाबांशी बोल, ते जो निर्णय घेतील तो अंतिम असेल मग काय साहेब माझ्या घरी त्यांच्या आई वडिलांना घेऊन आले. बाबांना एकंदरीत सर्व आवडलं आणि त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला, काही दिवसांतच आमचं लग्न झालं. स्वप्नात विचार केला नव्हता अश्या घरात माझं लग्न झालं होतं. पुण्यात त्यांचा खूप मोठा बंगला आहे, सर्व कामांसाठी नोकर चाकर आहेत. मला घरात एकही काम करावं लागतं नाही. लग्नानंतर दोन वर्षांनी एक मुलगा झाला, संदीपला मुलगी व्हावी असं वाटतं होतं पण त्याची इच्छा अपूर्णच राहिली कारण मुलगा झाल्यानंतर दोन वर्षांनी आमचा अपघात झाला आणि त्यात माझ्या गर्भाशयाला दुखापत झाल्याने मी पुन्हा आई होऊ शकणार नव्हते. तेव्हा खूप वाईट वाटलं होतं पण देवाची जर ही इच्छा असेल तर आपण तरी काय करु शकतो. जी परिस्थिती समोर आली ती स्विकारली आणि आयुष्यात पुढे चालत आहोत. आता ही झाली माझी कथा, तु तुझ्या बद्दल सांग."
सरला म्हणाली," स्मिता तुझं तर एकदम मस्त आहे, तुझ्या आयुष्यात इतके मोठे संकट येऊन सुद्धा तु त्याला सामोरे जाऊन पुढे चालली आहे कारण तुझ्या सोबत तुझा नवरा संदीप आहे. तु नशीबवान आहेस, तुला संदीप सारखा नवरा भेटला. नवऱ्याची साथ लाभायला नशीब लागतं. मी बारावी नंतर ऍग्रीत डिग्री घेण्याची ठरवली होती, त्यासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन सुद्धा घेतले होते. त्याच कॉलेजमध्ये आमचे हे म्हणजे दादासाहेब शिकायला होते, त्यांचं आणि आमचं गाव जवळ असल्याने मी त्यांना व त्यांच्या घरच्यांना ओळखत होते, ते पाटील घराण्यातील असल्याने सर्वच जण त्यांना ओळखायचे. दादासाहेब दिसायला रुबाबदार होते, मी त्यांना बघितलं तेव्हा ते पहिल्या नजरेतच मला आवडले होते पण आमच्या घरांमध्ये प्रेमविवाह चालत नसल्याने मी त्यापासून लांबच रहायचे ठरवले पण म्हणतात ना की नशिबात असतं तेच घडतं. एकदा कॉलेजमध्ये माझ्या बाबांची व दादासाहेबांच्या वडिलांची भेट झाली तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांकडे लग्नाचा विषय काढला, त्यांना मी सून म्हणून पसंत होते. माझ्या वडिलांना वाटलं की पाटील घराण्यात आपला संबंध होतो आहे हे चांगलंच आहे असा विचार करुन त्यांनी लग्नाला होकार दिला. मलाही खूप आनंद झाला होता कारण आपल्याला जो मुलगा आवडला त्याच्याच सोबत आपले लग्न होत आहे. दादासाहेबांचा गावात मध्यभागी टोलेजंग वाडा आहे, कशाचीच कमी नाहीये पण त्यांचे विचार खूप बुरसटलेले आहेत, घरातील स्त्रीने चूल आणि मुलंच बघावे अशी त्यांची समजूत आहे म्हणून मला लग्नानंतर काहीच करता आले नाही. वंशाला दिवा म्हणून मुलगाच व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे( सरलाने स्मिताला आजपर्यंत घडलेली सर्व हकीकत सांगितली)"
स्मिताला आपल्या आयुष्याची रडकथा सांगता सांगता खूप रडायला येत होते. सरलाच बोलण झाल्यावर स्मिता तिला आधार देण्यासाठी तिच्याजवळ गेली व तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी सरला स्मिताच्या गळयात पडून हमसून रडू लागली. स्मिताने जरावेळ तिला रडूच दिले, तीच मन मोकळं होऊ दिलं. थोड्या वेळात सरला शांत झाल्यावर स्मिता तिला म्हणाली,"सरला तु खूप काही सहन केलं आहेत, तु एवढं बळ कुठून आणलंस? माझ्या आयुष्यात एक प्रसंग आला होता तर त्यातून बाहेर पडायला मला किती वेळ लागला काय सांगू. तु खरंच खूप खंबीर आहेस पण हे ऐकून जास्त वाईट वाटतंय की तुझी आई, बहिणी तुझ्या सोबत नाहीत. तुझ्या मोठ्या दोन मुली कुठे आहेत?"
" माझ्या मुली माझ्या सासरी आहेत, माझ्या सासूबाईंचं असं म्हणणं आहे की त्यांना इकडे येऊन चुकीच वळण लागायला नको म्हणून त्या त्यांना त्यांच्या नजरेसमोरच ठेवतात आणि तसही इकडे आणल्यावर माझ्या वहिनीला ते सहन होत नाही, त्यांचा खूप रागराग करते. माझ्या डोळयांनी मला हे बघवत नाही. डोळ्याआड त्यांचे हाल झाले तरी एवढं काही वाटतं नाही." सरलाने उत्तर दिले.
स्मिता चिडून म्हणाली," या लोकांची काय mentality आहे यार. तुझ्या वहिनीच्या बोलण्यावरुन मला तिचा अंदाज आलाच होता पण तुझे आई वडील हे सर्व कसं सहन करतात, त्यांनी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. अश्या माणसासोबत, त्या घरात तु आयुष्य कसं काढू शकणार आहे? तु त्याला घटस्फोट का देत नाही?"
सरला म्हणाली," ते खूप मोठे लोकं आहेत, त्यांची नाचक्की व्हायला नको म्हणून ते घटस्फोट होऊ देणार नाहीत आणि जरी मी लढायचा जरी विचार केला तरी माझ्या सोबत कोणीच उभं राहणार नाही आणि या मुलींना घेऊन मी कुठे जाणार? मी कशीही जगेल पण त्यांना कशी सांभाळू? लग्नानंतर सासर माहेर सोडलं तर मी कुठेच गेलेले नाही, बाहेरच्या जगाशी माझा काहीच संबंध राहिलेला नाहीये. आता तुच सांग मी काय करायला हवे?"
स्मिता म्हणाली," सरला हे सर्व खूप भयंकर आहे, हे ऐकून तर माझं डोकं सुन्न झालं आहे. मला तर काहीच सुचत नाहीये. शहरात अश्या बऱ्याच संस्था आहेत की ज्या तुझ्या सारख्या स्त्रियांना या सर्वांतून बाहेर काढतात पण तुझ्या सासरच्यांचे जर कॉन्टॅक्ट वरपर्यंत असतील तर आपण त्यांची मदत सुद्धा घेऊ शकत नाही. सरला आता मला फक्त हेच सांग की तुला सध्या सर्वांत जास्त काळजी कसली आहे म्हणजे आपण आपलं लक्ष पहिले त्यावर केंद्रित करु म्हणजे मला काहीतरी सुचेल."
सरला म्हणाली," स्मिता आता माझे दिवस भरत आले आहे, कधीही डिलिव्हरी होऊ शकते. आता ही मुलगी जेव्हा या जगात येईल तेव्हा मी तीच काय करु? तिला कुठे ठेऊ? कारण हे मला माझ्या बाळाला घेऊन घरात प्रवेश देणार नाहीत. माझी बिचारी मुलगी जन्माला यायच्या आधीच तिच्या नशिबी संघर्ष आला आहे, पुढे जाऊन बिचारीच्या आयुष्यात काय होईल? काय माहीत?"
स्मिता म्हणाली," तुला फक्त तुझ्या होणाऱ्या मुलीचीच काळजी आहे ना तर मग ही तुझी काळजी मी दूर करु शकते."
"कशी काय?" सरलाने विचारले
स्मिता म्हणाली," तुझ्या मुलीला मी माझ्या सोबत घरी घेऊन जाईल आणि तिला मी माझ्या मुली प्रमाणे वाढवेल"
सरला पुढे म्हणाली,"अग पण हे तुझ्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना चालेल का? तु त्यांची परवानगी न घेता असा निर्णय कसा घेऊ शकशील?"
स्मिता हसून म्हणाली," अग मी तुला मघाशीच बोलले नाही का? की संदीपला मुलगी हवी होती, त्याला लहान मुली खूप आवडतात. संदीप मला मागे एकदा बोलला होता की आपण एखादी मुलगी दत्तक घेऊया का? म्हणून तर त्यावेळी मी नकार दिला होता. त्यामुळे संदीप लगेच तयार होईल आणि माझे सासू सासरे काहीच बोलणार नाही याची मला खात्री आहे. आणि तसही आमच्या घरात प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे."
सरला म्हणाली," खरंच अस होऊ शकेल, तुझ्याकडे माझी मुलगी असेल तर मला तिची अजिबात चिंता राहणार नाही."
स्मिता म्हणाली," हो तुझी इच्छा असेल तर नक्कीच असं होऊ शकेल."
सरला आनंदीत होऊन म्हणाली," अग माझी इच्छा का नसेल? मी तर खुशीत माझी मुलगी तुझ्याकडे सोपवेल"
स्मिता म्हणाली," तुझी डिलिव्हरी झाल्या बरोबर तु मला फोन कर मी तुझ्या मुलीला घेऊन जाईल, चालेल ना?"
सरला म्हणाली," हो चालेल की, स्मिता तु तर माझ्या आयुष्यात देवदूत बनून आली अस म्हणावं लागेल, मला मार्गच सापडत नव्हता पण तुझ्या येण्याने पुढची दिशा सापडली आहे. बरं ऐक ना माझी इच्छा आहे की याबद्दल कोणालाही काहीही कळता कामा नये, आत्ताही नाही आणि डिलिव्हरी नंतर सुद्धा नाही,मला माझ्या घरातील कोणालाच कळू द्यायचे नाहीये की माझी मुलगी तुझ्या सोबत राहणार आहे."
सरलाची आई स्मिताला जेवणासाठी बोलवायला आल्याने दोघींचं बोलणं मध्येच थांबलं.
सरलाच्या मुलीला स्मिता घेऊन जाऊ शकेल का? हे बघूया पुढील भागात...
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा