Aug 18, 2022
कथामालिका

आनंदी भाग ४

Read Later
आनंदी भाग ४

मागील भागाचा सारांश: आनंदीने तिची आयुष्याची कथा अपर्णा व निर्मला या दोघींना सांगायला सुरुवात केली होती. आनंदीने एका पाटील घराण्याची कथा सांगायला सुरुवात केली त्यात दादासाहेबांचे लग्न सरला या मुलीसोबत होते. दादासाहेब शिकलेले असले तरी त्यांचे विचार मागासलेले होते, त्यांना वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा होता. सरलाला दादासाहेबांचे हे विचार अजिबात पटत नव्हते. सरलाला पहिली मुलगी होते, सरला दुसऱ्या वेळेस गरोदर असताना तिची सासूबाई मुलगा होण्यासाठी बाबा बुवा करते पण तरीही दुसऱ्या वेळी सुद्धा मुलगाच होतो. तिसऱ्या वेळेस दादासाहेब सरलाला गर्भ तपासणी करता शहरात घेऊन गेले, गर्भ तपासणी तून मुलीचा गर्भ असल्याचे निष्पन्न झाले. दादासाहेबांनी गर्भ पात करण्याचा निर्णय घेतला पण गर्भपात करण्यासाठी उशीर झाला आहे असं सांगितल्यावर दादासाहेबांनी सरलाला सांगितले की तु तुझ्या माहेरी राहून ह्या मुलीला जन्म घे आणि ह्या मुलीला घेऊन माझ्या घरी येऊ नको.

आता बघूया पुढे....

एके दिवशी सरलाचे आई वडील घराबाहेर गेलेले होते. घरात सरला व तिची वहिनी अश्या दोघीच होत्या. तेव्हा सरलाची वहिनी तिला म्हणाली," ताई दादासाहेबांनी बजावून सांगितलं आहे की ह्या मुलीला त्यांच्या घरी घेऊन जायचं नाहीये मग तुम्ही काय करायचं ठरवलं आहे?"

यावर सरला म्हणाली," वहिनी मी त्याबद्दल अजून तरी विचार केलेला नाहीये, माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी अश्या घडत आहेत की मी कधीच या गोष्टींचा विचार केला नसेल. दुःख याच गोष्टीच आहे की माझ्या या प्रवासात मी एकटीच आहे, माझ्या सोबत माझे आई वडील सुद्धा नाही, माझ्या आईने सुद्धा माझी साथ दिली नाही."

सरलाची वहिनी म्हणाली," हे बघा ताई मला तुमची रडकथा ऐकण्यात अजिबात रस नाहीये, मी तुम्हाला एक गोष्ट जरा स्पष्टच सांगते, आम्ही तुमची मुलगी सांभाळणार नाही, मला आधीच तीन मुलं आहेत त्यांचं करता करता मी थकून जाते. तुमच्या आई थकल्या आहेत, त्यांना त्यांचा जीव जड झाला आहे, त्यांच्याने काही काम होत नाही तेव्हा तुम्ही आमच्या भरवशावर राहू नका, तुम्ही काहीतरी वेगळा मार्ग शोधा."

सरलाला आपल्या वहिनीचे बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं म्हणून ती पुढे वहिनीला काहीच बोलली नाही. सरलाची आई घरी आली तेव्हा तिने आईला वहिनी काय बोलली ते सांगितले तेव्हा आई सरलाला म्हणाली,"सरला ती काहीच चुकीचे बोलले नाही, आमच्या दोघांचं आता वय झालं आहे, मला काही काम होत नाही, आता सर्व व्यवहार तुझ्या भावाच्या हातात आहे, आमच्या हातात काहीच नाही, तुझे भाऊ वहिनी जे ठरवतील तेच करावे लागेल. तुझ्या दोघी बहिणींना दोन दोन मुलंच आहेत त्यांना मुलगी नाही, त्यांना विचारुन बघ, त्या तुझ्या मुलीला सांभाळायला तयार होतील."

सरला म्हणाली," आई माझ्या घरचे माझ्या मुलीला स्विकारायला तयार नाही तर त्या दोघींच्या सासरचे माझ्या मुलीला कसे स्विकारतील? आई मला वाटलं होतं की तु तरी माझी परिस्थिती समजून घेशील."

आई म्हणाली," सरला आपण पुरुषप्रधान समाजात राहतो, इथे आपल्या विचारांना काहीच किंमत नाहीये, माझा जीव तुझ्या साठी कितीही तुटत असला तरी मी तुझ्या साठी काहीच करु शकत नाही. शेवटी तुझं नशीब आणि तु, माझ्या हातात काहीच नाहीये."

सरलाला तर कळतच नव्हते की आता पुढे काय करावे. काही दिवसांनी सरलाच्या बहिणी एका लग्नाच्या निमित्ताने माहेरी आल्या होत्या. रात्रीच्या वेळी सरला व दोघी बहिणी गप्पा मारत एका खोलीत बसलेल्या होत्या. सरलाची मोठी बहीण म्हणजेच लता तिला म्हणाली, "सरला तुझं लग्न दादासाहेबांसोबत झालं तेव्हा आम्हाला सगळयांनाच वाटलं होतं की सरला किती नशीबवान आहे की तिला पाटील घराण्यासारखं घर भेटलं आहे, आम्हाला वाटलं होतं की तुझं नशीब फळफळलं आहे. दादासाहेबांसारखा रुबाबदार नवरा तुला भेटला, दादासाहेब शिकलेले असून सुद्धा त्यांचे विचार इतक्या खालच्या पातळीचे असतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता जन्माला येईल त्या मुलीचा या सगळयात दोष काय असेल?"

लताच्या बोलण्याला दुजोरा तिची दोन नंबरची बहीण ललिता म्हणाली," हो ना आक्का ( लता घरात सर्वांत मोठी असल्याने तिला सर्वजण आक्का म्हणत असे) म्हणते ते अगदी खरं आहे, मलाही तसंच वाटतंय. एवढं मोठं घराणं आहे, गावात त्यांचा दबदबा आहे, गावातील सर्वजण त्यांना मानपान देतात आणि बघा ह्यांचे विचार कसे आहेत? किती खालच्या पातळीचे विचार आहेत. आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे, 'बडा घर पोकळ वासा' ती काही खोटी नाही. या मोठ्या लोकांपेक्षा गरीब लोक बरे, माझी एक मावस नणंद आहे, त्यांना शेती जेमतेम आहे, त्यांना चार मुलींनंतर मुलगा झाला आहे तरी सर्वजण आनंदात राहतात, मुलींचा अजिबात रागराग करत नाहीत. आता आपली वहिनी कशी आहे हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आपल्या आईचं आता या घरात काही चालत नाही. सरला मुलीच्या जन्मानंतर तु करायचे ठरवले आहेस? "

आता बोलण्याची हीच अचूक वेळ आहे हे साधून सरला म्हणाली," लता आक्का, ललिता ताई मला तुमच्याशी या विषयावर बोलायचंच होतं, बरं झालं तुम्हीच हा विषय काढला. तुम्हा दोघींनाही मुलगी नाही तर तुमच्या पैकी एकीने जर माझी मुलगी सांभाळली तर माझ्यावर तुमचे खूप मोठे उपकार होतील. तुम्हाला तर माझी सर्व परिस्थिती माहीतच आहे, वहिनीने तर मला डायरेक्ट सांगून टाकलंय की ते माझी मुलगी सांभाळणार नाही. आता तुमच्या सोडून माझं कोण आहे की ज्यांच्याकडे मी विश्वासाने माझी मुलगी सोडून देऊ. माझंच नशीब फुटकं आहे त्यात त्या बिचाऱ्या निष्पाप जीवाचा काय दोष आहे?"

सरला अस बोलल्यावर दोघी बहिणींनी एकमेकींकडे बघितलं, काही वेळ त्या काहीच बोलल्या नाही. सरला त्यांच्याकडे आशेने बघत होती. काही वेळाने लता म्हणाली," हे बघ सरला, त्या निष्पाप जिवासाठी माझाही जीव तुटतो आहे, मला तुझ्या मनाची व्यथा कळते आहे पण तुझे दाजी हे कधीच मान्य करणार नाही. अस दुसऱ्याचं लेकरु आपल्या घरी वाढवणे त्यांना अजिबात चालणार नाही."

ललिता लगेच म्हणाली," सरला आम्हाला या सगळयात अडकवू नको. मला तुझी मदत करायची इच्छा आहे पण आपल्या बहिणीची मुलगी काही दिवसांसाठी सांभाळण्यात आणि आयुष्यभर सांभाळण्यात खूप मोठा फरक आहे, हे माझ्या कडून होणार नाही. मी एक मदत तुला नक्कीच करु शकते, मी यांना सांगून एखादे चांगले अनाथ आश्रम शोधून देऊ शकते, आपण त्या आश्रमात तुझ्या मुलीला ठेवू. तु तिला हवं तेव्हा भेटायला जाऊ शकते."

दोघींचं बोलणं ऐकून सरलाच्या डोळयात पाणी आलं, ती डोळ्यातील पाणी पुसत, आवंढा गिळत म्हणाली," आक्का ती मुलगी दुसऱ्या कुणाची नसणार आहे,ती तुझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी असणार आहे. ललिता ताई अनाथ आश्रमात जी मुले राहतात त्यांना आई वडील नसतात, ती मुले अनाथ असतात.माझी मुलगी अनाथ नसेल तिची आई अजून जिवंत आहे. तुमच्या दोघींकडून मला हीच अपेक्षा होती. मला कल्पना होती की तुमच्या पैकी कोणीच माझी मुलगी सांभाळायला तयार होणार नाही पण आपलं मन वेड असतं त्याच समाधान करण्यासाठी मी तुम्हाला विचारलं होतं. माझी व माझ्या मुलीची तुम्हाला काळजी असल्या सारख नाटक करु नका. तुम्ही काही करु शकत नाही तर माझ्या नवऱ्याला व त्यांच्या घरच्यांना नाव ठेवण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये."

सरलाचं हे बोलणं ऐकल्यावर लता व ललिताने एकमेकींकडे बघून नाक मुरडलं व त्या सरलाच्या खोलीतून निघून गेल्या, त्या गेल्यानंतर सरला खूप रडली. सरलाला असे वाटत होते की आपण आता एकटे पडलेलो आहोत, आपलं या जगात कोणीच नाही, आपल्याला कोणीच समजून घेत नाहीये, आपल्या मनाचं दुःख कुणालाच समजत नाहीये. सरलाच्या डोक्यात आत्महत्या करण्याचा विचार देखील येऊन गेला पण आपल्या पोटात एक जीव आहे आणि दोन मुलींची जबाबदारी आपल्यावर आहे हा विचार करुन ती मागे हटली.

सरलाला आठवा महिना लागला होता, ह्या आठ महिन्यांत दादासाहेब एकदाही सरलाला भेटायला किंवा बघण्यासाठी आले नव्हते. जसेजसे दिवस भरत चालले होते तसतशी तिची चिंता वाढत चालली होती. सरला घरातील कोणाशीच फारसं काही बोलत नसायची, तिला कोणाशी बोलावसं वाटतंच नव्हतं. सरलाची अशी मनस्थिती असताना एके दिवशी सरलाची बाल मैत्रीण स्मिता तिला भेटण्यासाठी तिच्या घरी येते. स्मिता ही सरलाच्या मास्तरांची मुलगी होती. मास्तरांची बदली दुसऱ्या गावी झाल्यावर स्मिताही त्या गावातून निघून गेली होती त्यामुळे सरला व स्मिताची गाठभेट गेल्या कित्येक वर्षांत झालेली नव्हती. स्मिता काहीतरी कामाच्या निमित्ताने सरलाच्या गावी आली, गावात आल्यावर तिला सरलाची आठवण झाली म्हणून ती सरलाच घर शोधत शोधत तिच्या घरी गेली. स्मिता घराच्या दारात गेली तेव्हा सरलाची वहिनी तिथे काहीतरी काम करत होती.

"सरला घरात आहे का?" स्मिताने हसून विचारले

सरलाची वहिनी स्मिताला दारात बघून शॉक झाली, ती स्मिताला बघून ह्या विचारात पडली की ही पंजाबी ड्रेस घातलेली बाई कोण असेल? आणि हीच सरलाकडे काय काम असेल? म्हणून ती स्मिताला म्हणाली, " तुम्ही कोण आहात? आणि आमच्या सरला ताईंकडे तुमचं काय काम आहे?"

"माझं नाव स्मिता आहे, मी सरलाची बाल मैत्रीण आहे, आम्ही शाळेत एकाच वर्गात होतो, ती घरी आहे का?" स्मिताने विचारले

स्मिता बोलत असतानाच सरलाची आई तिथे आली. सरलाच्या आईला बघून स्मिता त्यांच्या पाया पडून म्हणाली, "काकू मला ओळखलं का? मी मास्तरांची स्मिता, सरलाच्या वर्गात होते."

सरलाची आई आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली," तु मास्तरांची स्मिता आहे होय, मास्तरांची बदली झाली आणि नंतर तुम्ही कोणीच गावी आलं नाही. अग किती वेगळी दिसत आहेस, मी तर तुला ओळखलेच नाही आणि तु अशी दारात का उभी आहेस? आता ये ना"

सरलाच्या आईने आत बोलावल्यावर स्मिता घरात गेली, सरलाच्या वहिनीने तिला पाणी दिले. सरलाची आई म्हणाली," स्मिता चहा घेशील ना?"

स्मिता म्हणाली," काकू चहा चालेल पण मला हे सांगा की सरला कुठे आहे? तीच सध्या काय चालू आहे? मी तिला कधी एकदा भेटते अस झालं आहे."

सरलाची आई म्हणाली," तिला आठवा महिना असल्याने ती इथेच तिच्या खोलीत आराम करत आहे."

स्मिता हसून म्हणाली," अरे वा मस्तच की काकू माझा चहा सरलाच्या खोलीतच पाठवता का? मी चहा पिता पिता सरला सोबत गप्पा मारते. आम्हाला गप्पा मारायला बराच वेळ लागणार आहे, बऱ्याच वर्षांच्या गप्पा बाकी आहेत."

यावर सरलाची आई म्हणाली," ठीक आहे, तु सरला सोबत हवा तितका वेळ गप्पा मार, आणि मी तुला आज जेवण केल्या शिवाय जाऊ देणार नाही."

स्मिता सरलाच्या खोलीच्या दिशेने जात म्हणाली, "काकू मी तुमच्या घरी आले आणि जेवण न करता गेले असं कधी झालंय का?"

यावर सरलाची आई हसून म्हणाली," तुला लहानपणीच बरंच आठवत आहे."

स्मिता सरलाच्या खोलीत गेली तेव्हा सरला खिडकीतून बाहेर शून्यात बघत असल्या सारखी बघत होती. स्मिता तिच्या खोलीत गेली तरी तिचे त्याकडे लक्ष नव्हते.हवं बघून स्मिता म्हणाली," काय मॅडम एवढा कसला विचार करत आहात की आपल्या खोलीत कोणी आलं आहे याचं भान सुद्धा तुम्हाला राहील नाही."

सरलाने दचकून स्मिताकडे बघितलं व ती म्हणाली," आपण कोण आहात? आणि माझ्या खोलीत काय करत आहात?

सरला स्मिताला तिच्या आयुष्याबद्दल सर्व खरं सांगेल का? हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now