Aug 18, 2022
कथामालिका

आनंदी भाग ३

Read Later
आनंदी भाग ३
मागील भागाचा सारांश: अपर्णाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण आनंदीने तिच्या कडून जाणून घेतले तसेच अपर्णा कडून तिची माहिती काढून घेतली. अपर्णानेही आनंदीला तिच्या आयुष्याबद्दल सर्व काही माहिती दिली. आनंदीच्या भूतकाळा बद्दल निर्मलाला ऐकायचे असल्याने आनंदीने तिला बोलावून घेतले.
आता बघूया पुढे....
सीमा ताई स्वयंपाक करुन आपल्या घरी निघून गेल्या. अपर्णा, आनंदी व निर्मला या तिघीजणी हॉलमध्ये बसल्या. आनंदी अपर्णाकडे बघून म्हणाली," राईटर मॅडम चला आपले प्रश्न सुरु करा, मुलाखतीला बराच वेळ लागेल, बरं मध्येच जर तुमच्या दोघींपैकी कोणाला जर भूक लागली तर सांगा."
अपर्णा म्हणाली," ताई मी प्रोफेशनल राईटर नाहीये, तु पहिली व्यक्ती आहेस जीची मी मुलाखत घेणार आहे तेव्हा मला सांभाळून घ्या."
निर्मला म्हणाली," तु काही काळजी करु नकोस, मी आहे ना, मी तुझी मदत करेल. तुझ्यामुळे आपल्या आनंदी मॅडम मुलाखत द्यायला तर तयार झाल्या."
आनंदी म्हणाली," मी सर्व स्टोरी सांगायला सुरु करु की तु पहिले काही प्रश्न विचारणार आहेस?"
अपर्णा म्हणाली," माझा पहिला प्रश्न असा आहे की आजपर्यंत तु एकाही पत्रकाराला तुझी मुलाखत का दिली नाही? तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाला काहीच माहिती का नाही? आणि सोशल मीडियावर सुद्धा तुझी काहीच माहिती भेटत नाही, अस का? तु तुझं वैयक्तिक आयुष्य सर्वांपासून लपवून का ठेवते? अस त्यात काय दडलंय की तु ते सर्वांसमोर आणू इच्छित नाही."
आनंदी हसून म्हणाली," तुझ्या प्रश्नांवरुन वाटत नाही की तु पहिल्यांदा मुलाखत घेत असशील. तुझ्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय द्यावं हेच मला कळत नाहीये कारण मलाही अचूक कारण माहीत नाही, पण माझ्या मनात जे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. पहिलं कारण म्हणजे माझं आयुष्य सर्वांसमोर मांडून मला सहानुभूती मिळवायची नाहीये आणि दुसरं कारण म्हणजे मनाच्या एका कोपऱ्यात साठून ठेवलेला भुतकाळ समोर आणण्याची मलाच भीती वाटत असावी, ते अस असतं ना की आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात अस काही ना काही घडलेलं असतं त्याला आपण सामोरे जावू इच्छित नसतो, माझंही तसंच असेल."
अपर्णा म्हणाली," ताई याच उत्तर तुला काही वेळात आपोआप मिळेल. तु जेव्हा आम्हाला सर्व काही सांगशील तेव्हा तुझं मन मोकळं होईल आणि तुला तुझ्या व माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. ताई तुझ्या बालपणा बद्दल काही सांगशील का?"
आनंदी म्हणाली," मी तुला असं वेगवेगळया पार्ट्स बद्दल सांगण्यापेक्षा सरसकट सर्व सांगते, म्हणजे अगदी जस माझ्या आयुष्यात घडलं तसंच सांगते त्यानंतर तु तुझ्या पद्धतीने लिहून घे. 
एक खेडेगाव होत,डोंगर दऱ्या, झाडा झुडपांनी नटलेलं. दरवर्षी पाणी पाऊस भरपूर पडायचा त्यामुळे शेतीत बऱ्यापैकी पिकं यायचे. गावातील लोक बहुतांश शेतकरी होते, त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून होता. शेतीसोबतच सर्वांकडे गाई म्हशी रहायच्या, सर्वांच्या घरात दूध, दही,लोणी,तूप मुबलक प्रमाणात रहायचे. गावातील लोकांमध्ये एकजूट होती, सर्वांचा शेतीतील माल एकत्रित रित्या विकत असे त्यामुळे त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत असे, थोडक्यात काय तर गावातील सर्व लोक सधन शेतकरी होते. एवढं सगळं व्यवस्थित असून सुद्धा गावातील लोकं मागासलेल्या विचारांचे होते जसे की वंशाला दिवा म्हणून मुलगा व्हायलाच पाहिजे, मुलाला शिकवायचे,मुलीला शाळेत पाठवायचे नाही. स्त्रीने मूल व चूल एवढेच बघावे त्याबाहेरील चौकटीत तिने कधीच पडू नये. शाळेतील शिक्षक दारोदार फिरुन मुलींना शाळेत पाठवण्या बद्दल जनजागृती करत असे परंतु गावातील लोकांची एकजूट असल्याने सर्वजण मिळून जो निर्णय घेतील तोच शेवटचा निर्णय असायचा. अश्या या गावात एक पाटील घराणे होते, पूर्ण गावात त्यांच्याकडे सर्वांत जास्त शेती होता, गावाच्या मधोमध त्यांचा एक भव्यदिव्य वाडा होता. गावातील सर्व जण त्या घरातील पाटलांचा शब्द पाळत असे, पाटील गावाच्या भल्यासाठी भरपूर करायचे त्यामुळे सहजासहजी त्यांचा शब्द कोणीच ओलांडत नसे. पाटील घराण्याचा दरारा काहीतरी वेगळाच होता.
पाटील घराण्यातील आत्ताच्या पिढीत तात्यासाहेब होते, त्यांचा मुलगा दादासाहेब. दादासाहेब शहरात शिकायला होते, गावातील शेतीचे तंत्रज्ञान अधिक विकसित व्हावे म्हणून तात्यासाहेबांनी आपल्या मुलाला म्हणजेच दादासाहेबाला शेतीविषयक विषयात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी शहरात पाठवले होते. दादासाहेबांच्या वर्गात एक सरला नावाची मुलगी होती, दोघांची गाव जवळजवळ असल्याने सरलाला पाटील घराण्याची ख्याती माहीत होती. दादासाहेबांचा रुबाब बघून सरला त्यांच्या प्रेमात पडली होती, दादासाहेबांना सुद्धा सरला आवडत असे पण आपल्या घरी प्रेमविवाह केलेला चालणार नाही याची कल्पना असल्याने ते सरला पासून दोन हात दूर रहायचे. एकदा दादासाहेबांना भेटण्यासाठी तात्यासाहेब शहरातील कॉलेजमध्ये आले असता त्यांची भेट सरलाच्या वडिलांसोबत होते तेव्हा कोण जाणे तात्यासाहेबांच्या डोक्यात काय आले आणि त्यांनी दादासाहेबांसाठी सरलाला मागणी घेतली, त्यांना सरलाच्या वडिलांनी सांगितले की मी विचार करुन उत्तर देईल. सरलाच्या वडिलांनी याबद्दल सरलाला सांगितल्यावर सरलाने लग्नाला लगेच होकार दिला. सरलाच्या वडिलांनी विचार केला की पाटील घराण्यात आपली मुलगी जाईल या सारखे आपले सौभाग्य कुठले, एवढे चांगले स्थळ स्वतःहून आले आहे तर आपण होकार देऊन टाकूयात. सरलाच्या वडिलांनी तात्यासाहेबांना आपला होकार कळविला आणि काही महिन्यांतच दादासाहेबांचा व सरलाचा विवाह थाटामाटात पार पडला. 
सरलाला पाटील घराण्याच्या रूढी परंपरा वरवर माहीत होत्या, त्यांच्या मागासलेल्या विचारांबद्दल सरलाला काहीच कल्पना नव्हती. दादासाहेब शहरात शिकलेले असले तरी त्यांचे मूळ विचार काही बदललेले नव्हते. सरलाला लग्न झाल्यावर याची कल्पना नव्हती पण हळूहळू तिला पाटील घराण्याची मानसिकता समजायला लागली, ज्या दादासाहेबांना ती कॉलेजमध्ये ओळखत होती ते गावाकडे येऊन बरेच बदलेले होते. पण आता सरला काय करु शकणार होती, लग्न तर झाले होते,आता ते निभवायलाच लागणार होते. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात सरलाला कन्यारत्न झाले, सरला खुश होती पण दादासाहेब व बाकी घरातील मंडळी नाराज होती कारण त्यांना वंशाला दिवा पाहिजे होता. दादासाहेब त्या लहान बाळासोबत कधीच आपुलकीने बोलले नाही की तिचा लाड केला नाही की तिला कधी उचलून सुद्धा घेतले नाही. सरलाला त्यांच्या या विचारांची कीव येत होती.
पहिली मुलगी दोन वर्षांची झाल्यावर सरला गरोदर राहिली होती, दादासाहेबांचा आग्रह होता की यावेळी काही झालं तरी मुलगाच झाला पाहिजे,त्यासाठी सरलाच्या सासूबाईंनी बाबा बुवा बघितले,गंढे दोरे हातात घातले, देवाला नवस केलेत, सरलाला उपवास करायला सांगितले. सरलाला हे सगळं पटत नव्हतं पण तिचं कोणापुढे काहीच चालत नव्हतं, घरात उगाच वादविवाद नको म्हणून तिने शांत राहण्याचा मार्ग पकडला होता.एवढं सगळं करुन सुद्धा सरलाला दुसरी मुलगीच झाली, यावेळी तर दादासाहेबांनी जवळपास दोन महिने त्या लहान बाळाचं तोंड सुद्धा बघितलं नाही तर सरला सॊबत सुद्धा ते पुढील कितीतरी महिने बोलत नव्हते. दोन मुलींनंतर अजून अपत्य होऊ द्यायचं नाही असा सरलाचा विचार होता पण तिच्या विचाराला कोण महत्त्व देणार होतं. पुढील दोन वर्षांनी सरला पुन्हा गरोदर राहिली, यावेळी बाबा बुवा करत बसण्या पेक्षा दादासाहेबांनी सरळ ठरवले की शहरात नेऊन गर्भ तपासणी करुन आपण मुलगा आहे की मुलगी आहे हे तपासून घेऊ, जर मुलीचा गर्भ असेल तर आपण लगेच काढून टाकू, हे सरलाच्या मनाला मान्य नव्हते,हे सर्व तिच्या विचारांच्या पलीकडचे होते. सरलाने यासाठी भरपूर विरोध केला पण जेव्हा तिची आई येऊन तिला समजावू लागली तेव्हा तिचा विरोध गळून पडला होता. आपले आई वडीलच आपल्या बाजूने नाहीयेत हे बघून तिने माघार घेतली.
दादासाहेब शहरात जाऊन आधीच सर्व चौकशी करुन आले होते. एके दिवशी दादासाहेब सरलाला सोबत घेऊन शहरात जाण्यासाठी निघाले, ते सोबत स्वतःच्या व सरलाच्या आईला घेऊन गेले. सरला व घरातील सर्व प्रथम सोनोग्राफी सेंटर मध्ये गर्भ तपासणीसाठी घेऊन गेले, सरला देवाकडे प्रार्थना करत होती की हे देवा प्लिज तपासणी मध्ये मुलाचा गर्भ निघू देत, मुलीचा गर्भ आढळला तर हे निर्दयी लोकं त्या एवढ्याशा जीवाला मारुन टाकतील. सरलाची गर्भ तपासणी करण्यात आली आणि शेवटी हे व्हायला नको होतं तेच झालं मुलीचा गर्भ आढळून आला. दादासाहेबांनी गर्भ काढून टाकण्याचा निर्णय घेतला. सरला खूप रडत होती पण तिचं कोणीच ऐकायला तयार नव्हतं. दादासाहेब सरलाला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेले. दादासाहेब डॉक्टर सोबत बोलण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेले होते तेव्हा सरला वेटिंग रुममध्ये बसलेली असताना तिची नजर एका पोस्टरवर पडली त्या पोस्टरवर मजकूर असा लिहिलेला होता की "काटेरी विश्वात फुलायच आहे,
कर्तृत्वाच्या मार्गावर चालायचं आहे!
गर्भात आमचा गळा नका घोटू,
आम्हालाही जग पहायचं आहे!"
ते पोस्टर बघून सरलाला जास्त रडायला यायला लागले, ती स्वतःला सांगत होती की तु एक आई आहेस, आपल्या मुलाचा बळी कसा जाऊ देशील, तुलाच काहीतरी करायला हवे. सरलाला तिच्या मुलीला वाढवायचे होते पण तिला या सर्वांचा सामना कसा करावा हेच कळत नव्हते, तिला कुठे पळूनही जाता येत नव्हते कारण तिची आई व सासू तिच्या आजूबाजूला बसलेल्या होत्या. सरला हा सर्व विचार करता करता बेशुद्ध झाली. सरलाला शुद्ध आली तेव्हा ती एका रुममध्ये होती, तिच्या आईच्या डोळयात पाणी होते तर सासूबाई रागाने सरलाकडे बघत होत्या तर दादासाहेब रागात येरझाऱ्या मारत होते. सरलाला शुद्धीत आलेलं बघून दादासाहेब तिला म्हणाले," सरला मी तुझ्या सोबत लग्न करुन खूप मोठी चूक केली आहे, तु माझ्या वंशाला दिवा देऊ शकत नाही, आधी दोन पोरींना जन्माला घातलंस आणि आता ही तिसरी मुलगीच, गर्भपात करावा म्हटलं तर डॉक्टर म्हणाले की गर्भपात करण्यासाठी खूप उशीर झाला आहे, आता यावेळी गर्भपात केला तर तुझ्या गर्भाशयाला इजा होऊ शकते आणि तु पुन्हा कधीच आई होणार नाही म्हणजे माझ्या वंशाला दिवा मिळण्याची आशाही मावळेल आणि शिवाय मी दुसरं लग्न करु शकत नाही कारण जर तसं केलं तर गावात आमच्या पाटील घरण्याबद्दल चुकीची चर्चा होईल पण मला अस झालेलं चालणार नाही.तसंही तुला या बाळाला जन्म द्यायचाच होता ना तर तु या मुलीला जन्म दे पण त्या तुझ्या मुलीला माझ्या घरी जन्माला घालायचं नाही, त्या मुलीचा जन्म होईपर्यंत तु तुझ्या माहेरी राहायचं आणि त्यानंतरही त्या मुलीला माझ्या घरी आणायचं नाही."
सरलाला कळत नव्हतं की आपण देवाचे आभार मानावे की नाही, एक चांगलं झालं की आपल्याच बाळाचा जीव घेण्याचे पाप आपल्या नशिबी आले नाही त्यातच धन्यता मानायची. दादासाहेबांनी हॉस्पिटल मधून सरलाला थेट तिच्या माहेरी सोडले. सरलाच्या वहिनीला तिचे माहेरी येणे पटलेले नव्हते, ती तिच्या वागण्यातून, बोलण्यातून सतत हे भासवून देत असे. सरलाला माहेरी राहणे जड झाले होते. सरलाला प्रश्न पडला होता की आपण हे असं आयुष्य का जगतो आहे? आणि ह्याच जगात आपण आपल्या मुलींना वाढवणार आहोत म्हणजे जे आपलं झालं तेच आपल्या मुलींसोबत होणार. लग्न होईपर्यंत माहेरच्या घरावर आपला अधिकार असतो, लग्न झाल्यावर आपलेच घर परके होते. सासरी आपल्याला मानपान मिळतं नाही, आपल्या मनासारखं वागता येत नाही आणि माहेरी निघून यावं तर आपलेच आई वडील आपली साथ देत नाहीत. अश्या या जगात जन्म घेऊन तरी काय उपयोग? मी माझ्या मुलींना या जगात कसं वाढवू शकेल काय माहीत? मला शिक्षण घेऊन नोकरी करायची होती, आपल्या पायावर उभे रहायचे होते पण ते या पुरुष प्रधान समाजाला मान्य नव्हते, घरातील स्त्रीने नोकरी केली तर यांच्या पुरुषी अहंकाराला ठेच लागते.
सरलाच्या आयुष्यात अजून काय घडणार आहे? हे बघूया पुढील भागात...
©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now