Login

आनंदी भाग २

Story of a girl

मागील भागाचा सारांश: आनंदी एक प्रामाणिक कलेक्टर असते,ती तिचे काम अगदी चोखपणे पार पाडत असते. आजपर्यंत आनंदीने कुठल्याही पत्रकाराला आपली मुलाखत दिलेली नसते. आनंदीला तिचं खासगी आयुष्य सर्वांसमोर आणायची बिलकुल इच्छा नव्हती. एक दिवस अपर्णा तिची मुलाखत घेण्यासाठी येते, अपर्णा अशाताईंची भाची असल्याने तसेच तिने याआधी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे आनंदी तिला आपली मुलाखत दयायला तयार होते. अपर्णाच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे कारण आनंदीला जाणून घ्यायचे असते, याबद्दल तिचे बोलणे निर्मला सोबत सुद्धा होते. निर्मला ही एक समाजसेविका असते.

आता बघूया पुढे....

निर्मलाचा निरोप घेऊन आणि आपले काम संपवून आनंदी घरी जाते. अपर्णा मोबाईलवर काहीतरी करत असते. आनंदी तिला म्हणते, "अपर्णा काही खाल्लंस का? की आल्यापासून अशीच बसली आहे."

अपर्णा म्हणाली," सीमा ताईंनी चहा बिस्कीट दिली होती, त्या मला विचारत होत्या की अजून काही पाहिजे का म्हणून पण मीच नाही म्हटलं."

आनंदी म्हणाली," अग मग जरावेळ आराम करायचा होतास ना? मी त्याच साठी तुला इकडे पाठवलं होत."

यावर अपर्णा म्हणाली,"ताई मी ठीक आहे, माझ्यामुळे तुम्ही तुमचं रुटीन बिघडवू नका. मला काही लागलं तर मी स्वतः मागून घेईल."

"बरं मी फ्रेश होऊन येते, मग आपण बोलू" आनंदी हे बोलून रुममध्ये निघून गेली.

थोड्या वेळात आनंदी फ्रेश होऊन बाहेर आली, सीमा ताईंना बोलावून रात्री स्वयंपाक काय करायचा याची कल्पना दिली. आनंदी अपर्णा जवळ येऊन बसल्यावर, अपर्णाने आपल्या हातातील मोबाईल बाजूला ठेवला व ती आनंदीला म्हणाली," ताई तुझं काम खूप हेक्टिक असेल ना?"

आनंदी म्हणाली," हो हेक्टिक तर असतंच, ऑफिसमध्येच काम असेल तर जास्त थकवा जाणवत नाही पण कुठे दुसरीकडे जायचे असेल तर जास्त थकवा येतो पण ठीक आहे आता ह्या सगळ्याची मला सवय झाली आहे."

" ताई मला तुझ्यावर एक पुस्तक लिहायचे आहे, मावशी म्हटली की तुझ्या जीवनाचा प्रवास प्रेरणादायक आहे तर तु मला तुझी मुलाखत देशील का?" अपर्णाने विचारले

आनंदी स्मित हास्य देऊन म्हणाली," हो म्हणूनच मी तुला माझ्याकडे थांबायला सांगितलं पण त्याआधी मला काही प्रश्नांची उत्तरे तुझ्या कडून अपेक्षित आहे"

"माझ्या बद्दल तुला काय प्रश्न पडले आहेत?" अपर्णाने विचारले.

"तु एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेस मग पुस्तक लिहिण्याकडे तुझा कल कसा काय? म्हणजे कस आहे की बऱ्याच जणांचा वाचन, लेखन असा एखादा छंद असतोच पण तुझ्या पुढे तुझं अजून एवढं मोठं करिअर बाकी आहे म्हणून मला हा प्रश्न पडला आहे." आनंदीने सांगितले

यावर अपर्णा म्हणाली," ताई लहानपणापासून मला वाचनाचा छंद होता, माझं शालेय शिक्षण इंग्लिश मिडीयम मध्ये झालं होतं, माझ्या आजीकडे भरपूर मराठी पुस्तके होती, तिला वाचनाची खूप आवड होती, तिच्यामुळेच मला वाचनाची आवड लागली होती. माझी आजी कविता सुद्धा करायची, तिच्याकडून मी कविता करण्याचे शिकले होते,मला लिखाणाची आवड लागली होती. बारावी नंतर मला साहित्या संदर्भात शिक्षण घ्यायचे होते, मी त्या कोर्सेसची माहिती सुद्धा जमा केली होती. पण माझ्या आई बाबांचे म्हणणे होते की इंजिनिअर किंवा डॉक्टर हो त्यानंतर तु तुझे लिखाण चालूच ठेऊ शकतेच. साहित्यात करिअर करायला एवढा काही स्कोप नाहीये, त्यांचं म्हणणं मलाही पटलं आणि मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी कॅम्पस मध्ये माझं सिलेक्शन एका चांगल्या कंपनीत झाले, नोकरी चांगली आहे, पॅकेज सुद्धा चांगले आहे, मी कंपनीच्या मार्फत परदेशात सुद्धा जाऊन आले पण कुठेतरी माझ्या मनात आपला लिखाणाचा छंद राहून गेला असे वाटत होते तेव्हा आशा मावशीने मला तुझे नाव सुचविले."

आनंदी म्हणाली," म्हणजे तुला तुझ्या फिल्ड मध्ये अजिबात इंटरेस्ट वाटत नाही का?"

" अस काही नाहीये ताई, मी माझे काम अत्यंत आवडीने करते, त्याबाबतीत मला काहीच अडचण नाहीये, आई बाबांनी मला फक्त सुचविले होते, मी माझ्या आवडीनेच इंजिनिअरिंग निवडले होते." अपर्णाने उत्तर दिले

आनंदी म्हणाली," आता सध्या तु जॉब करते की नाही?"

"जॉब आहे पण सध्या काही दिवसांसाठी मी सुट्टी घेतली आहे." अपर्णाने उत्तर दिले

आनंदी म्हणाली," तु विचार करत असशील की ही आपल्याला किती प्रश्न विचारत आहे पण आता एक शेवटचा प्रश्न आणि ह्या प्रश्नाचं मला खरं उत्तर पाहिजे आहे.आशाताईंनी लिहिलेल्या पत्रात तु आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आहे, तर मला हे सांग की तु आत्महत्येचा प्रयत्न का केलास? नेमकं एवढं काय घडलं आहे?"

अपर्णा खाली मान घालून म्हणाली," ताई माझी मानसिक स्थिती बरोबर नसल्याने मी तो निर्णय घेतला होता, मला मान्य आहे की माझी ती सर्वांत मोठी चूक होती. ताई बारावी झाल्यापासून कॉलेजमध्ये सतत अभ्यास, सर्वांत पुढे जाण्यासाठी प्रयत्न, ती स्पर्धा हे नकोसं आलं होतं, कॉलेज संपल्यावर थोडा तरी ब्रेक घ्यावा असं वाटतं होतं पण कॅम्पस मध्ये सिलेक्शन झालं आणि कॉलेज झाल्यावर लगेच नोकरी सुरू झाली, तिथे सुद्धा काही वेगळं नव्हतं, कामांचे टार्गेट्स, नवनवीन प्रोजेक्ट्स, सहकाऱ्यांसोबतची स्पर्धा ह्या सगळ्यांतून शांतता घ्यावी असं वाटतं होतं. कंपनीत खूप पॉलिटिक्स चालत असायचं, मला सतत सर्वांच्या पुढेपुढे करायला आवडत नव्हतं. मला एका ब्रेकची गरज होती म्हणून मी बाबांना म्हटलं होतं की मी काही दिवस नोकरी सोडते पण बाबा म्हणाले की ही नोकरी सोडलीस तर पुन्हा दुसरी चांगली नोकरी मिळणार नाही. ह्या सगळ्याचा माझ्या मनावर परिणाम होत चालला होता आणि अशातच मला वाटायला लागलं की हेच जर आयुष्य जगायचं असेल तर मला जगायचंच नाहीये म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मला माहित आहे की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. आशा मावशीने मला पुस्तक लिहिण्याच्या स्वप्नाची आठवण करुन दिली आणि मला जगण्यासाठी काही तरी कारण सापडले."

आनंदी म्हणाली," अपर्णा माझा तुला बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये म्हणून मी जास्त काही बोलू शकत नाही फक्त एकच सांगते, तुझ्या आई वडिलांनी तुझं आयुष्य सुखकारक व्हावं म्हणून त्यांनी तुला इंजिनिअर केले, तुझ्या बाबांचे म्हणणे बरोबर होते की तु जर ही चालू नोकरी सोडली तर तुला दुसरी नोकरी भेटेल की नाही हे माहीत नाही कारण तुझ्या बाबांनी तुझ्या पेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले आहेत. तुझा विचार करण्यासाठी तुझ्या आयुष्यात आई बाबा तरी आहेत, माझ्या सारख्या मुलींच्या आयुष्यात तर ते सुद्धा नाही, मग आम्ही काय करायला पाहिजे होतं. आणि तु जी स्पर्धा म्हणत आहे ती प्रत्येक क्षेत्रात आहे, तुला माहीत नसेल म्हणून सांगते माझी मुलाखत घेण्यासाठी आजवर अनेक पत्रकार येऊन गेलेत, त्यांचीही एकमेकांसोबत स्पर्धाच होती ना? एक दोन लेखक स्वतः येऊन गेले होते. अस कुठलंही क्षेत्र राहिलं नाही की जिथे स्पर्धा नाही आणि हे बघ जर स्पर्धाच नसेल तर कामाची गुणवत्ता कशी सुधारेल? आपली प्रगती कशी होईल? आशाताईंनी बरं केलं की तुला माझ्याकडे पाठवलं, मी तुला माझी मुलाखत तर देणारच आहे पण आजूबाजूच्या लोकांचे राहणीमान दाखवणार आहे, त्यांच्याकडे बघितल्यावर तुझ्या मनात आत्महत्त्येचा विचार कधीच येणार नाही."

अपर्णा म्हणाली," ताई तुला आई बाबा नाहीयेत का?"

आनंदी म्हणाली," उद्या तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."

" ताई थोडीफार माहिती आत्ता देऊ शकत नाही का?" अपर्णाने विचारले

" नाही, माझी एक निर्मला नावाची मैत्रीण आहे, ती एक समाजसेविका आहे, तिलाही माझ्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे, उद्या तिला आणि तुला दोघींना एकत्रच सर्व काही सांगेल." आनंदीने उत्तर दिले

आनंदी व अपर्णा या दोघींनी सोबत जेवण केले, आनंदीने अपर्णाला गेस्ट रुममध्ये राहण्यास सांगितले आणि ती आपल्या रुममध्ये निघून गेली. अपर्णा खुश होती कारण आनंदी तिला मुलाखत द्यायला तयार झाली होती, आनंदीला काय काय प्रश्न विचारायचे याची तिने यादी केली होती. अपर्णा आनंदीच्या आयुष्यावर पुस्तक लिहू शकणार होती, या विचारात तिला कधी झोप लागली हे तिला कळाले सुद्धा नाही. तर दुसरीकडे आनंदीला काही केल्या झोप येत नव्हती. आनंदी विचारात पडली की जो भूतकाळ आपण कुठे तरी मागे सोडून आलो आहोत तो आता पुन्हा आपल्या पुढे उभा राहणार आहे, ज्या आठवणी नकोश्या होत्या त्याच परत आठवाव्या लागणार आहेत. एक मन म्हणतंय की आपला भूतकाळ जो एका पेटीत बंद आहे तो तसाच राहूदेत आणि दुसरं मन सांगतंय की आपली कथा ऐकून जर कोणाला प्रेरणा भेटेल तर चांगलेच होईल. अपर्णा सारख्या मुलीला आयुष्य जगण्याची दिशा मिळेल, तिच्या सारख्या अश्या अनेक अपर्णा असतील ज्यांना माझ्या आयुष्याच्या कथेमुळे जगण्याची दिशा मिळू शकते. आपल्या भूतकाळातील आठवणींचा पिटारा उद्या आपल्याला निर्मला व अपर्णा पुढे खोलायचा आहे. हा सगळा विचार करत पहाटे पहाटे आनंदीला कधी झोप लागली हे कळाले नाही.

अपर्णा उत्साहाच्या भरात सकाळी लवकर उठून आवरुन बसली. सीमाताईं कडून तिने चहा मागवून घेतला. आनंदीची वाट बघत अपर्णा आवरुन हॉल मध्ये बसली होती. काही वेळाने आनंदी झोपेतून उठून आली, सीमाताई घराची साफ सफाई करत होत्या, त्या आनंदीला बघून म्हणाल्या," हे काय आनंदी ताई, आज तुम्ही उशिरा उठल्यात, तुमची तब्येत बरी नाहीये का?"

"नाही मी बरी आहे, रात्री उशिरा झोप लागल्याने सकाळी उठायला उशीर झाला." आनंदीने सांगितले

अपर्णा आनंदीला बघून म्हणाली," गुड मॉर्निंग ताई"

आनंदी अपर्णा कडे बघून म्हणाली," गुड मॉर्निंग अपर्णा, तु लवकर उठली वाटतं, रात्री झोप व्यवस्थित लागली ना? नवीन जागा असली की झोपेचा प्रॉब्लेम होतो ना?"

अपर्णा म्हणाली," नाही ताई मला व्यवस्थित झोप लागली"

त्यानंतर आनंदी सीमा ताईंकडे बघून म्हणाली, "सीमाताई आज सकाळीच दुपारचे जेवण बनवून ठेवा, माझी अजून एक मैत्रीण जेवायला येणार आहे, तुम्ही जेवण तयार करुन गेलात तरी चालेल."

सीमा ताईंनी मान हलवून होकार दिला व त्या आपल्या कामाला लागल्या. आनंदी आपलं आवरुन चहा पिण्यासाठी हॉल मध्ये येऊन बसली, चहा पिता पिता तिने निर्मलाला फोन करुन घरी येण्यास सांगितले. आनंदी व अपर्णा नाश्ता करत असतानाच निर्मला तिथे येऊन म्हणाली," मला बोलावून घेतले आणि तुम्ही दोघी एकट्याच नाश्ता करत बसल्या आहेत."

आनंदी म्हणाली," तु इतक्या लवकर येशील असं मला वाटलं नव्हतं, ये ना तु पण नाश्ता कर."

निर्मला म्हणाली," तुझी आयुष्याची कथा ऐकण्याची इतकी उत्सुकता निर्माण झाली आहे की तुझा फोन आल्या बरोबर मी निघाले. मी नाश्ता करुन आले आहे तुमचं चालूदेत."

पुढे आनंदी म्हणाली," अपर्णा ही निर्मला एक समाजसेविका आहे, माझी व तिची कामानिमित्ताने ओळख झाली होती, आमच्यात आता चांगल्या पैकी मैत्री आहे. आम्ही दोघी जेव्हा ऑफिसमध्ये भेटतो तेव्हा ती मला मॅडम म्हणते पण जेव्हा घरी भेटतो तेव्हा मात्र ती मला फक्त आनंदी म्हणते. आमच्या मैत्रीची तेवढी हद्द आम्ही राखून ठेवली आहे आणि निर्मला ही अपर्णा, ही माझ्यावर पुस्तक लिहिणार आहे, तुम्ही पहिल्या दोघी असणार आहेत ज्यांना मी माझ्या आयुष्या बद्दल सर्व काही सांगणार आहे. निर्मला सीमाताई स्वयंपाक करुन गेल्या की आपण आपल्या मूळ मुद्द्यावर गप्पा मारुयात."

आनंदीचा भूतकाळ काय असेल हे बघूया पुढील भागात...

©®Dr Supriya Dighe