कलेक्टर पदाचा कार्यभार स्विकारून आनंदीला जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आले होते,या एका वर्षात आनंदीच्या प्रामाणिकपणामुळे दोनदा बदल्या झाल्या होत्या.पहिले सहा महिने एका जिल्ह्यात तर नंतर सहा महिने दुसऱ्या जिल्ह्यात. आनंदीची काम करण्याची पद्धतच वेगळी होती. कुठल्याही कलेक्टरने एवढी विकासाची कामे एका वर्षात केली नसतील एवढी कामे आनंदीने करून दाखवली.सामान्यातल्या सामान्य माणसाची भेट आनंदीसोबत होत होती, आनंदीने कधीही कोणाला अडवले नाही. छोट्यातली छोटी जनतेची तक्रार आनंदी अगदी शांतपणे ऐकून घेत होती. आनंदीच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे व तिच्या स्वभावामुळे तिची ख्याती सर्वदूर पसरली होती. आनंदी स्वतःही लाच घेत नव्हती व आपल्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनीही लाच घेतलेली तिला सहन होत नव्हती.
गेल्या एक वर्षात आनंदीची पोस्टींग ज्या जिल्ह्यात झाली त्या जिल्ह्यातील जवळजवळ सर्व गावे व खेड्यांना तिने भेटी दिल्या, प्रत्येक गावात जाऊन तेथील लोकांच्या समस्यांचा आढावा तिने घेतला, तिने स्वतः जातीने लक्ष देऊन रखडलेली कामे पूर्ण केली. आनंदीची मुलाखत घेण्यासाठी आजपर्यंत अनेक पत्रकार आले होते पण आनंदीने मुलाखत द्यायला नकार दिला होता. आनंदीचे आई वडील कोण आहेत? ते काय करतात? ते कुठे असतात? किंवा आनंदी मूळ कुठली आहे हे कोणालाच माहीत नव्हते. आनंदीला तिच्या वैयक्तिक आयुष्या बद्दल कोणाला काहीच सांगायला आवडत नसे.
एके दिवशी आनंदी आपल्या केबिनमध्ये काम करत बसलेली होती तोच शिपाई राजू आनंदीची परवानगी घेऊन केबिनच्या आत आला व त्याने बोलायला सुरुवात केली, "मॅडम तुम्हाला भेटण्यासाठी एक पत्रकार मॅडम आल्या आहेत, त्यांना तुमची मुलाखत घ्यायची आहे."
आनंदी राजूकडे न बघताच म्हणाली," राजू तुला माहीत आहे ना की मी कामाच्या वेळेत अपॉइंटमेंट शिवाय कोणाला भेटत नाही आणि मी कोणालाच माझी मुलाखत देत नाही."
राजू म्हणाला," मॅडम मी ह्या सर्वाची कल्पना त्या पत्रकार मॅडमला दिली पण त्या म्हणाल्या की त्या खूप लांबून आल्या आहेत, तुम्ही मुलाखत नाही दिली तरी चालेल पण पाच मिनिटांसाठी का होईना त्यांना तुम्हाला भेटायचे आहे."
आनंदी थोडा विचार करत म्हणाली," ठीक आहे, त्यांना आत पाठवून दे"
राजू गेल्यानंतर एक मुलगी आनंदीची परवानगी घेऊन केबिनमध्ये आली, साधारणतः पंचवीस ते तीसच्या दरम्यान तिचे वय असेल, तिच्या गळयात एक पर्स होती, इतर पत्रकारांप्रमाणे तिच्याकडे कॅमेरा, रेकॉर्डर काही नव्हते, तिच्या राहणीमानावरुन ती एखाद्या शहरात राहणारी मॉडर्न मुलगी वाटत होती.
आनंदीने आपल्या समोरील खुर्चीत त्या मुलीला बसायला सांगितले. खुर्चीत बसल्यावर ती मुलगी म्हणाली," आज तुम्ही मला भेटण्याची परवानगी दिलीत त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. मॅडम मी तुमच्याबद्दल खूप ऐकले होते, मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती, तुमच्या कामाची ख्याती सगळीकडे पोहोचलेली आहे."
आनंदी त्या मुलीचे वाक्य तोडत म्हणाली, "excuse me मॅडम तुम्ही मला माझीच माहिती का देत आहात? तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? तुम्ही स्वतःचा परिचय दिला नाहीत आणि बोलायला सुरुवात केली. एक तर तुम्ही अपॉइंटमेंट न घेता आला आहात आणि मूळ मुद्द्यावर न बोलता बाकीचच बोलत बसला आहात"
ती मुलगी म्हणाली," सॉरी मॅडम, माझे नाव अपर्णा आहे, मी पुण्यात राहते.तुम्ही मला माझ्या नावाने हाक मारु शकता, मला तुम्ही आदर द्यावा इतपत मी मोठी नाहीये. मला तुमच्या बद्दल जाणून घ्यायचे आहे, तुमच्या आयुष्याचा प्रवास खूप खडतर होता असं मी ऐकलं आहे, तुम्ही जिद्दीने आणि धैर्याने या सगळयाला सामोरे गेले आहात. कदाचित तुमचा हा प्रवास कोणासाठी तरी प्रेरणादायक ठरु शकतो, अंधारात प्रकाशाचा एक किरणही पुरेसा असतो, अगदी त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्याचा खडतर प्रवास एखाद्याच्या दिशाहीन आयुष्यात मार्ग दाखवण्याचे काम करेल."
आनंदीने अपर्णाचे बोलणे अगदी शांततेत ऐकून घेतले व ती म्हणाली," अपर्णा तु मला भेटण्यासाठी इतक्या लांबून आली आहेस, माझ्या आयुष्याचा प्रवास खडतर होता हेही तुला ठाऊक आहे, मग तुला हेही ठाऊक असेल की आजपर्यंत मी माझी मुलाखत कुठल्याही पत्रकाराला दिलेली नाही. तुझ्या राहणीमानावरुन तु एखाद्या न्युज चॅनल साठी काम करत असावी असे मला वाटतेय."
अपर्णा पुढे म्हणाली," मॅडम मी पत्रकार नाहीये,मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. तुम्हाला आशाताई गोडबोले माहीत असतीलच ती माझी मावशी आहे, तिने मला तुमच्याबद्दल काही माहिती दिली आहे. Actually मावशीलाही तुमच्या बद्दल सर्व माहिती नाहीये, तिने माझ्याकडे तुमच्यासाठी एक पत्र दिले आहे. मावशीनेच मला तुम्हाला येऊन भेटायला सांगितले आहे."
आनंदी म्हणाली," तु आशाताईंची भाची आहेस होय, मी आशाताईंना कशी विसरेन. बरं त्यांनी दिलेलं पत्र दे. मी तुझ्यासाठी चहा मागवते, माझं पत्र वाचून होईपर्यंत तु आमच्या इथल्या चहाचा आस्वाद घे."
आनंदीने राजूला आवाज देऊन अपर्णा साठी चहा आणायला सांगितला. अपर्णाने आपल्या पर्स मधून एक पत्र काढून आनंदीच्या हातात टेकवले. राजूने अपर्णाला चहा आणून दिला. आनंदीने पत्र वाचायला सुरुवात केली,
"प्रिय आनंदी,
तु कशी आहेस? कलेक्टर झालीस पण या आशाताईला विसरुन गेलीस वाटतं. माझी आठवण येते की नाही. तुझा वर्तमानपत्रातील फोटो बघून, तुझे कौतुक वाचून अभिमानाने छाती फुलून येते. आनंदी तु खूप छान काम करत आहेस. पण तु ज्या क्षेत्रात काम करत आहेस तिथे प्रामाणिकपणे काम करणाऱ्याचे शत्रूही बरेच असतात, तेवढं सांभाळून रहा. आजकालच्या जगात कोणी येऊन काय करेल याचा काही नेम नाही.
अपर्णा ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. शाळा, कॉलेजमध्ये खूप हुशार होती. अभ्यासाची आवड अगदी लहानपणापासून होती. जिद्दी, ध्येयवादी मुलगी आहे, जे पाहिजे ते मिळवणारच. ध्येय प्राप्त होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असते. गेल्या दोन वर्षांपासून ती एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत जॉब करते, ती कंपनी मार्फत काही महिन्यांसाठी परदेशात सुद्धा जाऊन आली आहे. अपर्णाला वाचनाचा छंद आहे, तिला कविता करण्याचा देखील छंद आहे. अपर्णाला एखादे पुस्तक तरी लिहायचे आहे. कामाच्या प्रेशरमुळे की आणखी काही कारणामुळे ती तीन महिन्यांपासून डिप्रेशन मध्ये आहे, एकाएकी तिला काय झालं? हे कुणालाच ठाऊक नाही. मागच्या आठवड्यात तर अपर्णाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, वेळीच लक्षात आले म्हणून ती वाचली नाहीतर काय झाले असते याची कल्पना सुद्धा करवत नाहीये. आम्ही तिला मानसोपचार तज्ञाकडे नेणार होतो पण अपर्णा मनाने इतकीही काही कमकुवत नाही. आम्हाला काय करावे हेच कळत नव्हते.
मी तिला समजवायला गेले तेव्हा तिच्याकडून मला असे कळले की तिला आयुष्यात काही ध्येयच राहिले नाहीये, ती रस्ता चुकल्यासारखे वाटत आहे. मग मी तिच्या लक्षात आणून दिले की तुला पुस्तक लिहायचे आहे ना तर यावर तिचे म्हणणे होते की मी कोणत्या विषयावर पुस्तक लिहू म्हणून मी तिला तुझं नाव सुचवलं. अपर्णाने तुझ्याबद्दल सोशल मीडियावर माहिती शोधायचा प्रयत्न केला पण तिला जास्त काही सापडलं नाही. तुझ्याबद्दल मी तिला काही गोष्टी सांगितल्यापासून तिला तुला भेटायची इच्छा होती, अपर्णाला तिच्या आयुष्यात काहीतरी ध्येय सापडल्या सारखे वाटत आहे, त्या दिवसापासून ती जरा नॉर्मल वागत आहे. एवढं ऐकल्यावर तु नक्कीच तिची मदत करशील. प्लिज माझ्यासाठी अपर्णाला तुझ्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्याची परवानगी दे आणि शक्य झालं तर तिच्या डोक्यात जे आत्महत्येचे खूळ बसले आहे ते काढून टाकायला मदत कर. अपर्णाला स्वतःची लहान बहीण समजून मदत करशील ना?
तुझीच,
आशाताई
पत्र वाचून झाल्यावर आनंदीने आपल्या हातातील पत्र खाली ठेवले, अपर्णा मोठ्या आशेने आनंदीकडे बघत होती. आनंदीने राजूला आवाज दिला, राजू आनंदीच्या केबिनमध्ये आला व म्हणाला," काय मॅडम"
आनंदी अपर्णाकडे बघून म्हणाली," राजू ही अपर्णा आहे, हिला माझ्या क्वार्टर पर्यंत सोडून ये." मग आनंदी अपर्णाला म्हणाली, "अपर्णा क्वार्टरला जाऊन जरा फ्रेश हो आणि आराम कर, तु बऱ्याच लांबचा प्रवास करुन आली आहेस, तुला आरामाची गरज आहे. तुला जर भूक लागली असेल तर तिथे एक सीमाताई आहेत त्यांना सांग,राजू तुझी व त्यांची ओळख करुन देईलच. माझं काम संपल्यावर मी घरी येते मग आपण बोलू."
अपर्णा म्हणाली," थँक्स मॅडम"
आनंदी म्हणाली," अपर्णा तु माझ्या लहान बहिणी सारखी आहेस, तु मला ताई म्हटलं तरी चालेल, मॅडम म्हणण्याची गरज नाहीये."
अपर्णाने हसऱ्या चेहऱ्याने मान हलवून होकार दिला व ती राजूसोबत निघून गेली. अपर्णा निघून गेल्यावर आनंदी विचार करु लागली की ह्या आजकालच्या मुली नेमका काय विचार करुन आत्महत्येपर्यंत पोहोचतात काय माहीत? आता हिच्या सोबत बोलायचे म्हटल्यावर जरा जपूनच बोलावे लागेल. आनंदी अपर्णाचा विचार करण्यात मग्न असतानाच निर्मला दरवाजावर नॉक करुन 'आत येऊ का?' म्हणून विचारते.
आनंदी निर्मलाच्या आवाजाने विचारांच्या तंद्रीतून जरा बाहेर येते आणि निर्मलाला आत येण्यास सांगते.निर्मला एक समाजसेविका असते, कामांच्या निमित्ताने तिची व आनंदीची नेहमी भेट होत असे, निर्मला व आनंदी एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या होत्या, त्या दोघींचे विचार बऱ्यापैकी जुळत होते. निर्मला आत येऊन आनंदी समोरील खुर्चीत बसते व तिला विचारते, "मॅडम एवढा कसला विचार करत आहात?"
आनंदी म्हणाली," ह्या मुली परिस्थितीचा काही विचार न करता आत्महत्या करण्यापर्यंत मजल कशी गाठतात? हेच मला कळत नाहीये."
यावर निर्मला म्हणाली," परिस्थितीचे चटके बसलेले नसतात म्हणून दुःख आयुष्यात सहन करु शकत नाहीत. मी चुकीची नसेल तर आत्ता राजू सोबत जी मुलगी गेली तिच्या बद्दल तुम्ही बोलत आहात ना?"
आनंदी म्हणाली," हो बरोबर, तीच नाव अपर्णा आहे, ती एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, घरची परिस्थिती चांगली आहे, तरी पण आत्महत्येचा प्रयत्न? प्रॉब्लेम्स कोणाच्या आयुष्यात येत नाहीत?"
निर्मला म्हणाली," मॅडम तुमची कळकळ मला कळते आहे, आम्ही यावर बऱ्याचदा कार्यशाळा आयोजित करतो, न शिकलेल्या किंवा अशिक्षित घरातील मुलीचं आपण समजू शकतो पण शिकलेल्या मुली जेव्हा हे पाऊल उचलतात तेव्हा आश्चर्य नक्कीच वाटतं, आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायला आहेत हेच यांना कळत नाही, आयुष्याला एका चौकटीत त्या बांधून ठेवतात, त्या चौकटी बाहेर गेलं की मग यांना जगायचं नसतं. या विषयावर बोलू तितकं आहे. ही मुलगी तुमची कोण आहे? आणि ही तुमच्या कडे का आली आहे?"
" अपर्णा आशाताईंची भाची आहे, माझ्या पडत्या काळात आशाताईंनी माझी बरीच मदत केली आहे, त्यांची इच्छा आहे की मी अपर्णाला माझी जीवनगाथा सांगावी, अपर्णाला माझ्यावर पुस्तक लिहायचे, त्या निमित्ताने तिच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळेल."
निर्मला आश्चर्याने म्हणाली," तुम्ही तर तुमच्या आयुष्याबद्दल कोणालाच फारसं काही सांगितलेलं नाही म्हणजे अगदी मी सुद्धा तुम्हाला याबद्दल कित्येकदा विचारणा केली असेल पण तुम्ही नेहमी बोलणं टाळत आलात, जर तुम्ही अपर्णाला सर्व सांगण्याचा निर्णय घेणार असाल तर मलाही सर्व काही ऐकायला आवडेल."
आनंदी म्हणाली," हम्मम ठीक आहे, मी जेव्हा अपर्णाला माझ्या आयुष्याबद्दल सांगेल तेव्हा तुला आठवणीने बोलवेल.ते जाऊदेत तु इकडे कशी आलीस? माझ्याकडे काही काम होत का?"
" नाही तुमच्या ऑफिस समोरुन चालले होते, थोडा मोकळा वेळही होता म्हणून म्हटलं चला मॅडमला भेटून जाऊयात" निर्मलाने उत्तर दिले
आनंदी म्हणाली," चल माझे इथले काम संपलेच आहे,अपर्णाला राजू माझ्या घरी सोडून आला असेल, तिच्याशी बोलून तिचा अंदाज घ्यावा लागेल. आजच्या आज काही मी तिला माझी मुलाखत देणार नाही. उद्या रविवार असल्याने सुट्टी आहे तेव्हाच मी तिच्या सोबत बोलेल. मला तिच्याकडून तिचे आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण जाणून घ्यायचे आहे तेव्हा मलाही घरी जावे लागेल."
अपर्णाचे आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे कारण काय असेल? हे बघूया पुढील भागात....
©®Dr Supriya Dighe