आनंदी भाग १४

Story Of A Girl
मागील भागाचा सारांश: आनंदीची एका मुलाने छेड काढण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तिने त्याच्या कानामागे वाजवली होती हा किस्सा आनंदीने निर्मला व अपर्णाला सांगितला. आनंदीने कलेक्टर पदाचा कार्यभार उचलल्यावर तिच्या अस लक्षात आलं की सगळीकडे भरपूर भ्रष्टाचार चालू आहे, कोणीच आपले काम प्रामाणिकपणे करत नाहीयेत, गोरगरीबांपर्यंत शासनाच्या योजना व निधी पोहचत नाही. आनंदीला हे सर्व बदलून टाकायचे होते, तिला आपल्या कामाची सिस्टीम बदलायची होती पण कसे हे तिला कळत नसल्याने तिचे मदतनीस कदम साहेबांनी तिला सुचवले की एक दादासाहेब पाटील नावाचे गृहस्थआहेत त्यांचं पूर्ण गाव ऐकत, ते गावासाठी भरपूर योजना राबवतात, त्यांनी त्यांचं समृद्ध बनवले आहे.तुम्ही त्यांच्या कडून काम करण्याची पद्धत शिकून घ्या.
आता बघूया पुढे....
कदम साहेब एवढं ज्या माणसाच्या कामाच्या पध्दती बद्दल भरभरून बोलत होते तर म्हटलं चला एकदा ह्या व्यक्तीने गावासाठी काय केलं आहे? हे तरी बघून घेऊया. त्या गावाच्या आसपास एक दोन गाव होती जिथे शासनाच्या अंतर्गत विकास कामे चालू होती तिकडेही भेटी देता येतील या हिशोबाने मी कदम साहेबांना दादासाहेब पाटील या व्यक्तीची भेट घ्यायला जाऊया अस सांगितलं. कदम साहेबांच्या सांगण्यावर पूर्णपणे विश्वास न ठेवता मी त्यांच्या गावाची फाईल शोधून काढली तर आश्चर्य म्हणजे त्या जिल्ह्यातील हे एकमेव गाव होती जिथं विकासाची सर्व कामे पूर्ण झालेली होती, मी त्या गावाचा पूर्ण अभ्यास केला. माझी सवयच होती की आपल्या ज्या गावाला भेटी द्यायच्या आहेत तिथला आराखडा आपल्याला पूर्ण माहीत असायला हवा, म्हणजे कोणी काही अचानक प्रश्न विचारल्यावर आपली बोबडी वळायला नको.
दुसऱ्या दिवशी आम्हाला दौऱ्यावर निघायचे असल्याने मी माझ्या कपड्यांची बॅग भरत होते तेव्हा मला कपाटात माझ्या आईने दिलेली वही दिसली आणि मला पटकन आठवले की कदम साहेब आपल्याला ज्या दादासाहेब पाटलांबद्दल सांगत आहेत हे तेच असतील का ज्यांचा उल्लेख माझे वडील म्हणून माझ्या आईने या वहीत केलेला आहे. मी यावर बराच विचार केला, मग मनाशी ठरवले की ते जरी आपले वडील असले तरी आपल्याला त्यांची कामाची पद्धत शिकायची आहे, त्यांच्यात जे वाईट गुण असतील ते त्यांच्या जवळ असुदेत, जर समजा ते माझे वडील निघालेच तर माझी व माझ्या आईची भेट तरी होईल हा विचार करत मी ती वही माझ्या बॅगमध्ये टाकली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच मी व कदम साहेब दौऱ्यावर निघालो. माझा तो पहिला दौरा होता. लाल दिव्याच्या गाडीत बसून जाण्यात एक वेगळीच ऐट होती. आजूबाजूचे लोक आपल्या गाडीकडे पाहतच राहायचे. वाटेत येणाऱ्या गावांची कदम साहेब मला ओळख करुन देत होते, आम्ही एक दोन ठिकाणी थांबून त्या त्या गावांना धावती भेटही दिली होती, पण आमचे मुख्य लक्ष होते ते दादासाहेब पाटील यांची भेट घेणे व त्यांचे गाव पाहणे. आम्ही त्यांच्या गावाला जाणार आहोत हे आधीच कदम साहेबांनी दादासाहेब पाटील यांना सांगितलेले होते.
आमच्या गाडीने त्या गावात प्रवेश केला, गावाच्या हद्द जिथून सुरुवात होते तिथे एक मोठे प्रवेशद्वार होते, मोठी कमान उभारण्यात आली होती, कमानीच्या आजूबाजूला झाडेच झाडे होती, गावात पोहोचेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडे होती. गावात प्रवेश करतानाच हे गाव वेगळंच काहीतरी आहे याची जाणीव होत होती. त्या गावात एक गेस्ट हाऊस होते, आम्ही सर्वप्रथम तिथे गेलो. दादासाहेबांनी सगळी व्यवस्था करुन ठेवलेली होती. गेस्ट हाऊस वर जाऊन आम्ही फ्रेश झालो, दुपारची वेळ असल्याने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. गेस्ट हाऊस वरुन आम्ही गावातील शाळेच्या दिशेने गेलो. मी गाडीतून उतरत असतानाच एक व्यक्ती आमच्या दिशेने येताना दिसले, कदम साहेबांनी मला खुणावून सांगितले की हेच दादासाहेब पाटील आहेत. दादासाहेब पाटील म्हणजे रुबाबदार व्यक्तिमत्त्व, माझ्या आईने तिच्या वहीत उल्लेख केला अगदी तसेच ते होते. सफेद शर्ट आणि सफेद पायजमा, डोळ्याला चष्मा, पिळदार मिशा, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा थाट होता, ते माझ्या जवळ येईपर्यंत मी त्यांच्या कडे बघतच होते. दादासाहेब पाटलांनी पुष्पगुच्छ देऊन हसतमुखाने माझे स्वागत केले.
आम्ही गावाला भेट देणार असल्याने शाळेत त्यांनी काहीतरी कार्यक्रम आयोजित केला होता. मी व कदम साहेब स्टेजवर जाऊन बसलो, आमच्या सोबत दादासाहेब पाटील व शाळेचे मुख्याध्यापक बसलेले होते. आमच्या समोर मैदानात शाळेचे विद्यार्थी बसलेले होते तेव्हा मी एक नजर विद्यार्थ्यांकडे टाकली तेव्हा माझ्या एक लक्षात आले की शाळेत मुलांची संख्या जास्त आहे तर त्याप्रमाणात मुलींची संख्या खूपच कमी होती. दादासाहेब माझ्याशी जास्त काही बोलले नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. शाळेत एकही महिला शिक्षिका नव्हती. स्टेजवर माझ्या शिवाय एकही स्त्री नव्हती. त्याचवेळी मला अंदाज आला होता की हे तेच दादासाहेब पाटील आहेत आणि हेच आपले जन्मदाते असावेत. एक स्त्री कलेक्टर असणं हे दादासाहेबांच्या बुद्धीला पटलेले नसावे म्हणून ते माझ्या पासून जरा लांबच होते. माझ्या हस्ते बक्षिस वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्यातील विजेत्यांना माझ्या हस्ते बक्षीस देण्यात आली, विशेष म्हणजे त्या विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये एकही मुलगी नव्हती. मला मनापासून खूप चिड आलेली होती पण काय करणार उघड उघड काहीच बोलता येणार नव्हते. म्हणून मी माझं डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाल्यावर दादासाहेबांनी माईक हातात घेऊन बोलायला सुरुवात केली, " मुलांनो आजच्या कार्यक्रमा करता आपल्याला ज्या प्रमुख पाहुण्या लाभल्या आहेत त्या कलेक्टर आहेत, आपल्या गावातून अजून कोणीच कलेक्टर झालेलं नाहीये तर आता आपण आनंदी मॅडम कडून कलेक्टर पदासाठी कुठपर्यंत शिक्षण घ्यावे लागते व त्याकरता काय करावे लागते ही माहिती घेऊया. माझी तुमच्या सर्वांकडून एक अपेक्षा आहे की पुढील काही वर्षांत तुमच्या पैकी एक तरी मुलगा कलेक्टर होऊन आपल्या या गावाचे नाव रोशन करतील. आनंदी मॅडम आपण आमच्या विद्यार्थ्यांना याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती "
मी माझ्या जागेवरुन उठले व माईक हातात घेऊन बोलू लागले," मला ही संधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल दादासाहेब मी तुमची आभारी आहे, मला आवडेल की जर माझ्या मार्गदर्शनाने तुमच्या गावातील एक जरी मुलगा किंवा मुलगी उद्या कलेक्टर झाली तर. मी मुलीचे नाव घेतल्यावर दादासाहेबांचे डोळे चमकले. मी तुम्हाला स्पर्धा परिक्षा काय असतात? त्या कधी द्यायच्या असतात? हे सर्व मार्गदर्शन करेल परंतु त्याआधी मला इथे बसलेल्या विद्यार्थिनींना काही प्रश्न विचारायचे आहेत. आता जे बक्षिस वितरण झाले त्यात फक्त विद्यार्थीच होते, तुम्ही मुली यात मागे का? एकतरी बक्षिस तुम्हाला मिळायला हवे होते अशी माझी अपेक्षा होती.( मी शाळेच्या मुख्यध्यापकांकडे बघितले व म्हणाले) सर तुमच्या शाळेत मुलं व मुली असा भेदभाव केला जातो का?( सरांनी आपल्या जागेवरुनच मान हलवून नकार दिला, त्यांना घाम फुटला होता कारण एकीकडे दादासाहेब होते तर दुसरीकडे मी होते, त्यानंतर मी एक दोन मुलींना बोलावून काही प्रश्न विचारलेत तर त्यांनी प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत म्हणून मी त्या दोन मुलींना माझ्या तर्फे बक्षिस म्हणून प्रत्येकी पन्नास रुपये दिले, त्यावेळी दादासाहेबांचा चेहरा बघण्या सारखा होता) मी ह्या शाळेत पुन्हा येईल त्यावेळी बाकीच्या मुलींनीही बक्षिसे मिळवावी अशी माझी इच्छा आहे. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. तुम्हाला जर कलेक्टर व्हायचे असेल तर UPSC ची परीक्षा द्यावी लागते, ही परीक्षा कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर देऊ शकतात. तुम्ही बाकीच्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. पण त्यात यश मिळवण्यासाठी अभ्यासातील सातत्य गरजेचे असते. तुम्ही जर तुमच्या शरीराला अभ्यास करण्याची आत्ता पासून सवय लावली तरच तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त होऊ शकते. मी तुमच्या सारखीच विद्यार्थी होते, मी काही अतिहुशार वेगळी अशी काही नव्हते, सर्वसाधारण विद्यार्थी होते, पण मी अभ्यासातील सातत्य कधीच सोडले नाही आणि माझ्या ध्येयावरील लक्ष हटवले नाही. भगवद्गीतेतील एक वाक्य लक्षात ठेवा, 'कर्म करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे' याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर कामच केले नाही तर तुम्हाला त्याचा मोबदला मिळणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जर अभ्यासच केला नाही तर तुम्ही यशस्वी कसे व्हाल.
अभ्यास करा, स्वप्न पहा, ती पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात आहे, तुम्हाला काही मदत लागली तर मी असेलच. ( मी दादासाहेबांकडे बघून म्हणाले) दादासाहेब तुमच्या गावातील कोणत्याही विद्यार्थ्याला माझ्या मार्गदर्शनाची गरज लागली तर बिनधास्त माझ्या कडे या, मी माझ्या परीने मदत करेल."
एवढं बोलून मी माझं भाषण संपवलं. कार्यक्रम झाल्यावर मला मुख्यध्यापकांसोबत काही चर्चा करायची असल्याने मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले, तिथे आम्ही दोघेच होतो. मी त्यांना म्हणाले," सर आपल्या शाळेत एकही स्त्री शिक्षिका नाही, मुलींची संख्या कमी अस का?"
मुख्याध्यापक खाली मान घालून म्हणाले, "मॅडम तुमचा बोलण्याचा रोष मला कळत आहे पण या गावातील लोक मुलींना जास्त शिकवत नाहीत, मुलींना शिक्षण देणे हे कोणालाच पटत नाही. शाळेत स्त्री शिक्षिका नको याबाबत दादासाहेब आग्रही होते, गावातील लोक दादासाहेबांचा शब्द ओलांडत नाहीत."
मी म्हणाले,"बरं दादासाहेबांच्या घरातील मुली शिकलेल्या आहेत की नाही?"
मुख्याध्यापक म्हणाले," नाही त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे, मुलाला इंजिनिअर केले आहे, मुली अभ्यासात हुशार होत्या पण जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण घेऊन त्यांची लग्न लावून देण्यात आली आहेत, बाकी मला जास्त काही माहीती नाही. पूर्ण गावाचा कारभार त्यांच्या हातात असल्याने मी काहीच बोलू शकत नाही."
मी म्हणाले," ठीक आहे पुढे काय करायचं ते मी बघते, पुढच्या महिन्यात मी परत शाळेत भेट द्यायला येईल तेव्हा मला गावातील सगळ्या मुली शाळेत दिसल्या पाहिजेत, आता तुम्हाला काय करायचे हे तुम्ही ठरवायचे, माझ्या आदेशाचे उल्लंघन केल्यावर काय होईल? याची कल्पना तुम्हाला आहेच. मी इतर अधिकाऱ्यांप्रमाणे भ्रष्ट नाहीये हे तुम्ही लक्षात ठेवा."
कदम साहेब बाहेर माझी वाट बघत होते. मला बघितल्यावर ते म्हणाले," मॅडम दादासाहेब तुमच्यावर रागावले आहेत."
यावर मी म्हणाले," मला जे योग्य वाटलं ते मी केलं, मी त्यांच्या मनाप्रमाणे वागायला त्यांच्या गावातील अडाणी मुलगी नाहीये, जे मला पटलं नाही ते बोलून दाखवलं. तुम्ही तर दादासाहेबांच्या नावाचा जप करत होतात तेव्हा तर त्यांच्या या विचारांबद्दल मला सांगितलं नाहीत. असो मला त्यांची भेट घ्यायची आहे, ते कुठे भेटतील? शक्यतो मला त्यांना एकट्यालाच भेटायचे आहे, गावातील लोक त्यांच्या सोबत नकोय."
कदम साहेब म्हणाले, "दादासाहेब आत्ता त्यांच्या घरी असतील, गावातील लोक त्यांच्या बरोबर नसतील,आपल्याला त्यांच्या घरी जावे लागेल. मॅडम दादासाहेबांसोबत जरा जपून बोलावे लागेल, त्यांचा राग तुम्हाला ठाऊक नाही."
मी हसून म्हणाले," कदम साहेब आपल्याला त्यांच्या घरी मुक्कामाला जायचे नाहीये, त्यांच्या रागाला तुम्ही घाबरत असाल, मी नाही. तुम्हाला माझा राग माहीत नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला पगार दादासाहेब देत नाहीत. पुढच्या महिन्यात या शाळेत मुलींची संख्या वाढली पाहिजे आणि निदान दोन तरी स्त्री शिक्षकांची या गावात बदली करा त्या संदर्भात कोणाशी चर्चा करायची असेल ती करुन घ्या, कोणी अडवलेच तर मी आहेच."
दादासाहेब व आनंदीत काय बोलणं होईल? हे बघूया पुढील भागात...
©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all