आनंदी भाग १०

Story Of A Girl

मागील भागाचा सारांश: आनंदी व शांता मावशीला स्मिता विद्या ताईंच्या शाळेत सोडून आली. विद्या ताईंना स्मिताला शब्द दिला होता की आमच्याकडे आनंदी सुखरुप राहील. स्मिता आनंदीला अधून मधून भेटायला जात असे, आनंदीला कपडे, खेळण्या व खाऊ भरपूर घेऊन जात असे. शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्या ताई हेच आनंदीचे कुटुंबीय झाले होते. आपली आई कोण आहे? हा प्रश्न जेव्हा आनंदीला पडला तेव्हा विद्या ताईंनी तिच्या सोबत खोटं न बोलता तिला या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले. आनंदी पाचवीत असताना शांता मावशी आजारी पडली व त्यातच ती देवाघरी गेली. आनंदी आता एकटी पडली होती म्हणून तिने पुस्तकांना आपले मित्र, सोबती बनविले.

आता बघूया पुढे.....

शांता मावशी नंतर माझी जवळची एकमेव व्यक्ती म्हणजे स्मिता मावशी आणि तीही माझ्या पासून दूर रहायची. विद्या ताई माझी विशेष काळजी घ्यायच्या पण त्या त्यांच्या कामात बिजी असायच्या. माझ्या सगळ्या मैत्रिणींना त्यांचे त्यांचे कुटुंब होते, त्यातील फक्त मी एकटीच अशी होते की मला कोणीच नव्हतं. माझ्याकडे वेळच वेळ असायचा म्हणून मी अभ्यासात वेळ घालवू लागले. शाळेच्या लायब्ररीत बसून पुस्तके वाचू लागले.

मी किरण बेदींच्या आयुष्यावरील एक पुस्तक वाचलं होतं तेव्हा असं वाटलं होतं की आपणही त्यांच्या प्रमाणे आई पी एस व्हावं. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमच्या शाळेत एक कलेक्टर मॅडम झेंडा वंदना साठी आल्या होत्या, मला आता त्यांचं नाव आठवत नाही, त्यांनी भाषण खूप छान केले होते, म्हणजे त्यांचं भाषण संपूच नये असं वाटत होतं, त्यांच्या भाषणातून, प्रत्येक वाक्यातून आत्मविश्वास दिसून येत होता, त्यांची लाल दिव्याची गाडी, तो रुबाब बघून वाटलं की आपण कलेक्टर होऊया. मी कलेक्टर की आई पी एस याच दोन्हींपैकी एकाची निवड करण्याचे ठरवले होते. फक्त सहावीच्या वर्गात असताना सुद्धा मी कलेक्टर, आई पी एस होण्याचे स्वप्न पाहू लागले होते. आता हे स्वप्न पूर्ण करायचे म्हटल्यावर त्यासाठी अभ्यास खूप करावा लागणार होता,कोणाचे तरी मार्गदर्शन घ्यावे लागणार होते. माझ्या स्वप्नांबद्दल मी विद्या ताईंसोबत बोलले होते तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की अजून तु खूप लहान आहेस, दहावी नंतर आपण यावर विचार करु.

मला आता माझ्या स्वप्नांबद्दल स्मिता मावशीची चर्चा करायची होती,म्हणून मी तिला एक दोनदा फोन लावला पण स्मिता मावशीने माझा फोनच घेतला नाही. स्मिता मावशी कधीच अस करत नसायची. समजा ती कामात बिजी असली तरी नंतर फोन करायची. स्मिता मावशी आपला फोन का घेत नाही? म्हणून मला तिची काळजी वाटू लागली होती. त्यावेळी मी सातवीत होते. एका रविवारी स्मिता मावशी मला भेटायला आली होती. स्मिता मावशी अशी मधेच कधी यायची नाही. यावेळी कशी काय आली म्हणून मला प्रश्न पडला होता. स्मिता मावशीने आधी विद्या ताईंची भेट घेतली, त्यांच्यात बऱ्याच वेळा काहीतरी गहन विषयावर चर्चा चालू होती एवढंच मला समजलं होतं. 

स्मिता मावशी विद्या ताईंच्या केबिनच्या बाहेर लवकर येत नसल्याने मी रागाने माझ्या रुममध्ये येऊन बसले. काही वेळाने स्मिता मावशी माझ्या रुममध्ये आली, तिच्या सोबत कोणीतरी एक बाईही होती. मला राग आल्याने मी स्मिता मावशीकडे बघितलं सुद्धा नाही. स्मिता मावशी तिच्या सोबत असणाऱ्या बाईला म्हणाली," कल्पना एका मुलीला खूप राग आला आहे वाटतं, माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. एक काम कर तु ह्या पिशव्या इथेच ठेव आणि तु बाहेर जाऊन बस. आम्हाला दोघींना थोडं प्रायव्हेट गप्पा मारायच्या आहेत."

यावर कल्पना म्हणाली," पण मॅडम तुम्हाला चक्कर तर येणार नाही ना?"

ती अस बोलल्यावर मी मागे वळून स्मिता मावशीकडे बघितलं. स्मिता मावशीची तब्येत खूप खराब झालेली होती, चेहरा सुकलेला होता, ती अशक्त दिसत होती, तिचा आवाज सुद्धा बदललेला होता. मी स्मिता मावशी जवळ जाऊन आश्चर्याने विचारलं, "स्मिता मावशी तुला काय झालं आहे? तु आजारी आहेस का?"

स्मिता मावशी कल्पनाला म्हणाली," कल्पना तु बाहेर जा, मला काही होणार नाही आणि झालंच तर इथे आनंदी आहे माझ्याकडे लक्ष द्यायला."

कल्पना रुम मधून निघून गेल्यावर स्मिता मावशी म्हणाली," आनंदी बाळा जरा माझ्या जवळ येऊन बस. मी तुला माझ्या बद्दल सर्व सांगते, तेच सांगायला तर इथे आले आहे. पण त्याआधी तु तुझं काय चालू आहे? ते सांग. तु मला फोन का करत होतीस? मला काही सांगायचे आहे का?"

" स्मिता मावशी मला ना कलेक्टर किंवा आई पी एस व्हायचे आहे पण त्यासाठी काय करायचे हेच मला माहीत नाहीये.मी याबद्दल विद्या ताईंना विचारले होते पण त्या म्हणाल्या की दहावी नंतर आपण या सगळ्याचा विचार करु." मी उत्तर दिले

स्मिता मावशी हसून म्हणाली," अच्छा तर आमच्या आनंदी बाळाला कलेक्टर किंवा आई पी एस व्हायचे आहे तर. बाळा तुला ह्या वयात एवढं सगळं वाटतं आहे तर तु नक्कीच एक दिवस यातील काहीतरी करशील. तुला काय करायचे हे तुला माहीत आहेच पण विद्याताई खर बोलत आहेत. तुला बारावीनंतर कमीत कमी तीन वर्षे graduation करावे लागेल आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात मग तुला कलेक्टर किंवा आई पी एस होता येईल. दहावी झाली की मग त्या दिशेने आपली वाटचाल सुरु करायची. स्पर्धा परीक्षा कठीण असतात, त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. दहावी नंतर हळूहळू अभ्यास सुरु करायचा."

" स्मिता मावशी इथली शाळा तर बारावी पर्यंत आहे, पुढील शिक्षणासाठी मी कुठे जायचे?" त्यावेळी माझ्या मनात जो प्रश्न आला तो मी स्मिता मावशीला विचारला.

स्मिता मावशी म्हणाली," आनंदी बारावी झाली की तु पुण्यात यायचं, तिथे पुढील शिक्षणही घ्यायचं आणि स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावायचे."

"मावशी तु मला मदत करशील ना?" मी अगदी सहजच विचारलं

पण माझ्या प्रश्नाने स्मिता मावशीच्या डोळ्यात पाणी तरळले. स्मिता मावशी डोळे पुसत म्हणाली," आनंदी मी तुझी मदत आनंदाने केली असती पण माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये."

मला मावशीच्या बोलण्याचा अर्थ न कळल्याने मी म्हणाले," मावशी तुझं बोलणं मला समजलं नाही."

स्मिता मावशी म्हणाली," आनंदी आता मी जे काही तुला सांगणार आहे ते सगळं शांततेत ऐक. काही गोष्टी तुला आत्ता कळणार नाही पण कालांतराने तुझ्या सर्व लक्षात येईल. आनंदी आपण यानंतर भेटू की नाही हे मला सांगता येणार नाही, कदाचित ही आपली शेवटची भेट असू शकेल. बाळा तुला नक्कीच एकटं वाटू शकेल पण त्याचा आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नाही. नेहमी हे लक्षात ठेवायचं की या जगात आपल्या पेक्षाही दुःखी लोक आहेत, सर्वच जण पूर्णपणे सुखी नसतात, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही दुःख हे असतंच. आयुष्यात पुढे जाऊन तुझ्यापुढे बरीच संकटे येतील पण त्यांना सामोरे जायचे, धीराने लढायचे. स्वतःला कमकुवत समजायचे नाही. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करायचे. स्वतःच्या पायावर उभे रहायचे. एक महत्त्वाची गोष्ट कुठल्याही मोहाला बळी पडायचे नाही, चुकीच्या पुरुषाच्या प्रेमात पडायचे नाही. आता तु विचार करत असशील की स्मिता मावशी हे मला का सांगत आहे? तर बाळा आम्ही आयुष्याच्या या टप्प्यांवरुन गेलो आहे, हे माझे अनुभवाचे बोल आहे. नंतर जेव्हा तुला या सगळ्याची गरज असेल तेव्हा मी तुझ्या सोबत नसेल म्हणून आत्ताच सर्व सांगत आहे.

तुला आठवत असेल की नाही याची मला कल्पना नाही,तु लहान असताना मला तुझ्या आईबद्दल विचारलं होत तेव्हा मी तुला सांगितलं होतं की वेळ आल्यावर तुला मी सगळं सांगेन. ( सरलाने दिलेली वही स्मिताने आनंदीच्या हातात टेकवली) ह्या वहीत तुझ्या आईने तिच्या आयुष्याचा प्रवास लिहिलेला आहे, ही वही तिनेच मला तुला देण्यासाठी दिलेली होती. तु एवढी समंजस झाली आहे की तुला तुझ्या आईच्या भावना, तिची परिस्थिती समजेल म्हणून मी आत्ता ही वही तुला देत नाही. मी गेल्यावर ही वही वाचली तरी चालेल. तुझी आई माझी मैत्रीण होती, तुझ्या आईला तु कुठे आहे याबद्दल काहीच माहीत नाहीये. तुमच्या नशिबात जर तुमची भेट होणं लिहिलेलं असेल तर तुमच्या दोघींची कधीना कधी भेट होईलच.

आता तुझ्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर, मी तुझा फोन घेऊ शकले नाही कारण मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, माझ्यात बोलण्याची शक्तीच नव्हती. आत्ता कुठे दोन तीन दिवसांपासून मला उभं राहता येत आहे, नाहीतर मी आधारा शिवाय काहीच करु शकत नव्हते. सतत चक्कर यायची. कल्पना माझ्या सोबत त्यामुळेच असते, मी कधीही चक्कर येऊन पडते. मला थोडं बरं वाटायला लागलं म्हणून मी तुला भेटायला आले आहे. माझे दिवस भरत आलेले आहे. मी अजून किती दिवस जगेल हे मीच सांगू शकत नाहीये. मी विद्या ताईंसोबत सविस्तर बोलले आहे. मी जरी या जगात नसले तरी तुझं शिक्षण थांबणार नाही याची मी काळजी घेतली आहे. विद्या ताईंच्या मदतीने एका बँकेत अकाऊंट उघडून घे, त्यात मी काही पैसे देईल ते टाकून ठेव, तुला जेव्हाही कधी या पैश्यांची गरज पडेल तेव्हा तु हे वापरु शकतेस. तु वायफळ खर्च करणार नाही याची मला खात्री आहे. तु पुण्यात आल्यावर तुला जर काही अडचण आली तर या वहीच्या शेवटी मी माझ्या घराचा व ऑफिसचा पत्ता लिहून ठेवला आहे. संदीप व सुजय तुझी नक्कीच मदत करतील, त्यांची भेट घेशील. बाकी काही लागलं तर विद्या ताई आहेच."

स्मिता मावशीला दम लागल्याने ती बोलता बोलता थांबली, तिला धाप लागली होती, तिच्या जवळच्या बाटली मधील पाणी तिने घटघट प्यायले.

"स्मिता मावशी नेमकं तुला काय झालं आहे? तु जगणार का नाहीस?" मी विचारले

स्मिता मावशी म्हणाली," मला ब्रेन ट्युमर म्हणजेच मेंदूचा कॅन्सर झाला आहे. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत आहेत पण माझं मन मला सांगतंय की मी जास्त दिवस काही टिकणार नाही. मी अचानक गेले तर तुला भेटायचे राहून गेले असते आणि तुझ्या आईची वही माझ्याकडेच राहून गेली असती म्हणून एवढ्या घाईत मी तुला भेटायला आले. मला तुझी साथ शेवट पर्यंत द्यायची होती व देवाच्या ते मनातच नाही तर आपण तरी काय करु शकतो."

माझ्या डोळ्यात पाणी आलेले बघून स्मिता मावशीने मला तिच्या कुशीत घेतले व ती म्हणाली," आनंदी तु शहाणी आहेस की नाही, अस रडायचं नाही ग. रडणं हे कमकुवत लोकांचं लक्ष असतं. आपल्या समोर येईल त्या संकटाचा सामना आपल्याला करावाच लागतो."

मी डोळे पुसत म्हणाले," स्मिता मावशी पण तुही देवाघरी गेलीस तर मला कोणीच राहणार नाही, मला कोणी भेटायला येणार नाही. मी अनाथ होऊन जाईल."

माझ्या या बोलण्यावर मावशीला खूप रडायला आले, तिने स्वतःला कसेबसे शांत केले. तेवढ्यात कल्पना येऊन म्हणाली," मॅडम तुम्ही रडून स्वतःला त्रास करुन घेऊ नका आणि आपल्याला आता निघावं लागेल नाहीतर घरी पोहचायला उशीर होईल आणि साहेब मलाच ओरडत बसतील."

स्मिता मावशी शांत झाली, तिने मला मिठी मारली. ती पुढे म्हणाली," आनंदी बाळा माझी निघायची वेळ झाली आहे, मी सांगितलेलं सर्व लक्षात ठेव आणि खूप मोठी हो."

मावशी अस बोलल्यावर का कुणास ठाऊक पण मला मावशीचा पाया पडून आशिर्वाद घ्यावा वाटला. स्मिता मावशीने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला व ओल्या डोळ्यांनी ती निघून गेली. स्मिता मावशीची व माझी ती शेवटची भेट होती. स्मिता मावशी निघून गेल्यावर माझी नजर तिने दिलेल्या वहीकडे गेली. वहीतील मजकूर वाचल्यावर मी मनाशी पक्का निर्धार केला की आनंदी काही झालं, कितीही कष्ट करावे लागले, कितीही अडथळे आले तरी काहीतरी करुन दाखवायचे. असं काहीतरी करुन दाखवायचे की ज्या वडीलांनी मला नाकारले होते ना त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप वाटला पाहिजे.

©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all