आनंदाची वाट

स्वत्व जपण्यासाठी नवी सुरूवात

नणंदेचा फोन ठेवला आणि मेघा विचारात पडली . खरंच जमेल का मला शालूताईंना मदत करायला ? इतकी.. म्हणजे तब्बल सत्तवीस वर्षे घर एके घर सांभाळायची सवय .

आता अचानकच दिवसभर बाहेर राहायचं म्हणजे ..

पण मनाने पुढच्या क्षणी कौल दिला . मेघा एवढी वर्षे इतरांसाठी जगलीस . आता स्वतःसाठी , स्वतःच्या आनंदासाठी तुला हे करायलाच हवं . रात्री जेवण झाल्यावर मेघाने सगळ्यांना हॉलमध्ये थांबायला सांगितलं . 

अनायासे तिची लेक युक्तासुद्धा माहेरपणाला (?) आली होती . लग्नाला सहाच महिने झालेत पण आठवड्याला एक मुक्काम माहेरीच . 


"आई अगं खरंच काही काम आहे का ? मला शर्विला फोन करायचाय . तिचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे ."

मिहिरनं मेघाच्या लेकानं हाक मारली . 


मेघा किचन ओटा आवरून बाहेर आली . सासूबाई तिरकस नजरेने बघतच होत्या .

"काय गं मेघा , काय बोलायचंय लवकर बोल . मी जाम दमलोय आज ."

 नवरोबा नेहमीसारखेच कंटाळलेले .


" मिलिंद मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीय ."


" आई तुझ्या कोणत्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न ठरलं का ?"

युक्ताला उत्सुकता .

"भिशी लागली का तुला ?"

मोबाईलमध्ये बघत मिहिर .


" तुम्ही जरा फोन बाजूला ठेवाल का ? शालूताईंचा फोन आला होता आज पुन्हा ."


"आज पुन्हा म्हणजे रोज येतो की काय शालूचा फोन तुला , त्या दारुड्या नवऱ्याचे प्रताप सांगायला ."

 मिलिंद वैतागला .

" हो सारखा येतो मला त्यांचा फोन कारण माझ्याजवळ मन मोकळं करतात त्या .

भावाला वेळ नाही ना ."


"सांग आता पटकन काय सांगायचंय ते."

" मी नोकरी करायचं ठरवलंय ."

 दोन्ही मुलं आणि नवरा एकाच वेळी बोलले ," काय ?"


" हो आणि बाहेर कुठे नाही शालूताईंनी सुरू केलेल्या संस्थेत मदतनीस आणि समुपदेशक म्हणून ."


" शालूनं सुरू केलेल्या संस्थेत ? आणि आता नोकरीची काय गरज तुला ?"

 मिलिंदचं बोलणं अर्धवट थांबवत मेघा म्हणाली ,

" आधी माझं पूर्ण बोलणं ऐकून घ्या . शालूताईंना सासरी गावाकडं वाटणीत बरीच जमीन आणि गावाकडचं घर असं काही काही मिळालंय . म्हणून त्यांनी वेदांतला इंजीनियरिंगला हॉस्टेललाच ठेवायचं ठरवलंय आणि प्रभाकरभावोजींना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलंय ."


" हे एवढं सगळं झालं आणि शालूनं मला काहीच सांगितलं नाही ."

मेघाच्या सासूबाई बोलल्या .

" तुम्हाला आणि यांना वेळ असतो का त्यांचं ऐकायला ? तुम्हीच मागे त्यांना म्हणालात ना घरचं रडगाणं गात जाऊ नकोस इथं . किती दुखावल्या त्या . मग कशा सांगणार त्या तुम्हांला ?" 


" पण हे तुझं नोकरीचं काय मध्येच ?"


" शालूताई गरजू स्त्रियांसाठी एक संस्था सुरू करताहेत . स्वयंरोजगाराचं शिक्षण , समुपदेशन असं बरंच काही आहे . सगळी तयारी झालीय . पुढच्या आठवड्यात उद्घाटन आहे . तिथेच नोकरी करणारे मी . आता युक्ताच्या जबाबदारीतून मोकळी झालीये मी . दोन महिन्यांत मिहिरची बायको शर्वीसुद्धा येईलच .

 तुम्हांला तुमच्या बिझनेसमधून वेळ नसतोच आणि सासूबाईंना अजूनही स्वयंपाकाची भरपूर आवड आणि गोडी आहे . मला कुठे त्यांच्यासारखं काही जमतं ?"


" आई अगं पण.."

" युक्ता मिहीर , तुमच्या शाळा अभ्यास ,हे घर सगळं सांभाळलं विनातक्रार , ती जबाबदारी च होती माझी .त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहिये . पण कॉलेजला गेलात तसे पंख फुटले .आई फक्त कामापुरती राहिली . काही काम असेल तर बाबांना सांगण्यासाठी मला मध्यस्थ केलंत .हो ना ?

आणि मिलिंद , वाढदिवसांना महागडी गिफ्ट साड्या देत राहिलात पण तुमचा वेळ .. तो दिलात का थोडा तरी कधी माझ्यासाठी ? तुम्हाला सगळ्यांना आताही हेच वाटत असेल ना काय ही रडगाणं घेऊन बसलीय पण ही घुसमट होती माझी आणि आता तीसुद्धा संपली .

 तुम्हांला कोणाला मुद्दाम कुठलाच दोष द्यायचा नाहीये मला पण घडतच तसं गेलं सगळं ..असो .

 आता मला माझ्या आनंदाची वाट सापडलीय .मला अडवू नका .

©® कांचन सातपुते हिरण्या

फोटो क्रेडिट गुगल

वरील कथा लेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास हरकत नाही. धन्यवाद.