आनंद

This blog defines the role of happiness in our life

आनंद!

हा आनंद म्हणजे कोणी 'आनंद ' नावाचा मुलगा नाही बरं का!
आनंद म्हणजे तो जो चेहऱ्यावर दिसतो! कधी तेजाच्या रूपाने, कधी गुलाबी गालांनी, कधी हसण्याचा हावभावांनी तर कधी गाणं गुणगुणणाऱ्या मिश्किल शब्दांनी!

हा आनंद म्हणजे कोणी आपला शेजारी नाही की नातेवाईक नाही, तो जो कोणी आहे तो फक्त आपला (स्वतःचा) आहे ...हक्काचा!

आनंद ही सगळ्यात सकारात्मक भावना! प्रत्येक दिवस,प्रत्येक क्षण आपले मन हे कोणत्या ना कोणत्या भावनेत, विचारात गुंतलेलं असतेच. कधी व्ययसायिक जबाबदारी म्हणून त्या रूपाने तर कधी सांसारिक विचार या रूपाने तर कोणाच्या भावनिक गुंतवणुकीने.

माझ्या सगळ्या कार्याचा केंद्रबिंदू हे मन असल्यामुळे  माझे विचार, माझे मत, माझी सजेशन्स सगळे  फिरते ते माणसाच्या मन या विषयाभोवतीच. 
मन हे फक्त माणसालाच नाही तर प्रत्येक सजीवाला असते पण जे व्यक्त होते किंवा ज्याला किंमत दिली जाते ते फक्त मनुष्याच्या.

तर मी म्हणत होतो की मन आणि आनंद हे सख्खे सोबती.
कोणतीही परिस्थिती आपल्या मनाजोगी असेल तर व्यक्त होते ती भावना म्हणजे आनंद! 
कोणतीही व्यक्ती जी आपल्याला प्रिय आहे तिची सोबत असेल तर होतो तो आनंद! 
कोणतीही इच्छा पूर्ण झाली की मिळतो आनंद! 
म्हणजे सगळ्यात सुखावह असे ह्या आयुष्यात आहे ते म्हणजे आपला आनंद!

जर मन आनंदात असेल तर मनाचेच काय तर शरीराचे पण विकार दूर पळतात. विकार दूर पळाले की मिळते ते सुदृढ आयुष्य, निरोगी शरीर आणि सशक्त विचार. 

आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो अथवा अलोपॅथी सगळ्यात कॉमन आहे ते औषध म्हणजे आनंद जे बिना पैशाचे बिना प्रिसक्रिपशन चे आणि कोणत्याही वेळी मिळू शकते. 

कोणाचा आनंद वस्तूत आहे तर कोणाचा वास्तूत आहे.

  कोणाचा फिरण्यात, कोणाचा खाण्यात तर कोणाचा गाण्यात आहे आणि कोणाचा एखाद्या  व्यक्तीत सुद्धा आहे. 
ज्याचा त्याचा स्वतंत्र असा एक क्रायटेरिया असतो, पण मी म्हणेन की तो त्याने जपणे महत्वाचे असते...

मन, शरीर,आप्त, समाज,किंवा सबंधी सगळे खुश असतील आनंदात असतील तर जगात कोणतेच प्रश्न किंवा प्रॉब्लेम राहणार नाहीत..

आता वैयत्तिक म्हणाल तर हा आनंद व्यक्त करायची पद्धत पण खूप छान असते. कोणी पोट धरून धरून मोठ्याने हसते, तर कोणी किंचित (कंजूष सारखे) स्माईल देतात. 
कोणी गाणी गुणगुणायला लागतात् आणि मग ओठावर विलसते ते मधुर हास्य!

कोणी लगेच गाडी काढून फिरायला निघतात तर कोणाचा पटकन चेहरा खुलून तेजस्वी दिसतो आणि गोड गुलाबी गाल दिसायला लागतात.

असो, कोणाची काहीही तऱ्हा काहीही असू देत पण महत्वाचे हे की आयुष्याचा अंगीभूत आनंद खूप महत्त्वाचा आहे. 
त्याला जपा,स्वतःजवळ घट्ट धरून ठेवा. 
त्याला सख्खामित्र, सोबती आपला जवळचा शेजारी बनवा म्हणजे शाररिक असो मानसिक विकार हे दूर पळून जातील आणि मिळेल ते सुखी, समृद्धी आणि निरोगी आयुष्य. 

हे निरोगी मन आणि सशक्त आयुष्य हीच खरी आयुष्याची संपत्ती आहे जी कायम सोबत असते आणि आपले नाव जिवंत ठेवते.
हा देह जो नश्वर आहे तो विलीन झाला तरी कायम राहते ते नाव.

चला तर मग आनंदी राहून, स्वतःचे नाव कायमस्वरूपी चिरंतन करूयात आणि या आयुष्याचा खरा अर्थ उमगूयात!

पटतंय ना!

©®अमित मेढेकर