Login

अनामिका....1

कथेतील कथेची कथा...

"कोण आहे तुमचा एडिटर? आज काहीही करून मला त्यांना भेटायचेच आहे.."

तथाकथित blogink.com या वेबसाईटच्या कंपनीत काजल गोंधळ घालत होती. तिथला स्टाफ पुन्हा आपापसात कुजबुजू लागला..

"आली का ही बाई परत..मला एक कळत नाही, सना मॅडम ऑफिसमध्येच असूच तिला भेटत का नाही? ही बाई दरवेळी त्यांना भेटण्यासाठी गोंधळ घालते आणि सना मॅडम दरवेळी मी ऑफिसमध्ये नाही सांगत बाहेर काढायला लावतात.."

"मोठी लोकं.. मोठे कांड... जाऊद्या ना, आपल्याला काय.."

स्टाफचं बोलणं सुरू होतं आणि तिकडे काजल पोटतिडकीने सना मॅडमला भेटण्यासाठी आकांडतांडव करत होती.. तिचे डोळे लालबुंद झालेले, डोळ्यात संताप आणि हृदयात कालवाकालव. ऑफिसमधून तिला परत एकदा बाहेर काढण्यात आलं.

"सना मॅडम नाहीयेत इथे, आल्या की तुम्हाला कॉल करतो.."

"गेले कित्येक महिने हेच बोलताय तुम्ही...का भेटू देत नाहीये तुम्ही मला? मला त्यांना विचारायचं आहे...कोण ही अनामिका... तिचं खरं नाव काय...आणि माझ्या नवऱ्याबद्दल कसं सगळं जाणते ती? तिच्या कथामालिकेतून कसं सगळं माझ्या नवऱ्याबद्दलच लिहिलंय तिने???"

तिच्या या प्रश्नांची उत्तरं सिक्युरिटीकडेही नव्हती, त्याला दया यायची तिची, पण सना मॅडमने सक्त ताकीद दिलेली, काजल आणि मला कधीच समोरासमोर आणायचं नाही...

का काजल इतकी उतावीळ होती सना मॅडमला भेटायला??

(फ्लॅशबॅक)

सकाळी उठून तिने लवकर आवरलं. तसं लवकर आवरायची गरज नव्हतीच खरं, कारण इतर बायका नवऱ्याचे डबे, मुलांचे डबे, सासू सासऱ्यांची चहा नाष्टा यात गुंतलेल्या असायच्या. पण ती? तिला अजून मूल नव्हतं, त्यात नवरा नेव्हीमध्ये. सहा सहा महिने जहाजावर. सासू सासरे दुसरीकडे राहायला. तिचा दिवस अवघड जायचा, पण यात तिला एक सोबत मिळाली होती. सहज फेसबुक चाळत असताना तिला एक कथा blogink.com नावाच्या वेबसाईटवर वाचायला मिळाली. तिला वाचनाची आवड होतीच, पण यावरच्या कथा फारच सुंदर होत्या, ती त्यात गुंतत गेली. कथामालिका वाचताना पुढील भागांची वाट पहायची, अगदीच उशीर झाला तर साईटला विचारायची.. नवनवीन कथा वाचायची..अनेक लेखक तिला परिचित झाले होते. तिच्या एकटेपणाला सोबत म्हणून या वेबसाईटवरच्या कथा तिला सोबतीला आल्या होत्या.

त्यातच एक नवीन कथामालिका सुरू झाली होती,

तिने सुरवात केली,

"समुद्र आणि माझं एक खास नातं आहे...
तो माझ्यापर्यंत येऊ शकत नाही,
आणि मी त्याच्याजवळ जाऊ शकत नाही.."

तिला सुरवातच खूप आवडली,

पुढे लिहिलं होतं..

"समुद्र अथांग... अमर्याद.. त्याच्या तळाचा थांगपत्ता लागणं कठीण. समजा तळ गाठलाच, तर कल्पना आणि वास्तव यातली तफावत बघून ह्रदयभंग व्हायचा. म्हणूनच लांबूनच त्याच्या भव्यतेवर प्रेम करायचे.."

काजल पुढचं एकेक वाचत होती, स्वतःला त्या कथेशी जुळवू पाहत होती..कारण तिचं आयुष्यही तसंच होतं.. समुद्र, जहाज...या तिच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी...

पण लेखिकेला यातून काहीतरी सांगायचं होतं.. हा समुद्र, हे जहाज..या निर्जीव गोष्टींमागे असलेला तिचा सजीव भाव एका माणसाशी जुळला गेला होता..हे तिने तिच्या कथेत पुढे उलगडलं आणि त्यातूनच काजलच्या जीवनात वादळ उठलं होतं...

कोण होती ती लेखिका?
तिच्या आणि काजलच्या जीवनात का साम्य होतं?
दोघींच्या भावना समुद्राशी का जोडल्या होत्या?
काजल शोधू शकेल का या अनामिका ला?

वाचत रहा....

प्रतिसाद दिला ते हुरूप येतो...
2 सेकंद फक्त...वेळ काढा आणि प्रतिसाद द्या...


0

🎭 Series Post

View all