Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

अन तिच्यात दुर्गा अवतरली

Read Later
अन तिच्यात दुर्गा अवतरली
कथेचे शिर्षक: अन तिच्यात दुर्गा अवतरली
विषय: एक दुर्गा अशीही
स्पर्धा: गोष्ट छोटी डोंगराएवढी

नवरात्र असल्याने शारदा संध्याकाळी देवीच्या दर्शनाला चालली होती. शारदा दररोज संध्याकाळी देवीच्या दर्शनाला जायची. आरती होईपर्यंत ती देवीच्या मंदिरात बसून अष्टक, श्लोक यांचे पठण करायची. आज मात्र सगळ्या बायका तिच्याकडे बघून आश्चर्य व्यक्त करुन कुजबुजत होत्या. शारदाला कळत नव्हते की, या बायका आपल्याकडे अशा का बघत आहेत? म्हणून.

शारदा त्या बायकांकडे दुर्लक्ष करुन मंदिरात गेली. शारदाची मैत्रीण लक्ष्मी तिच्याकडे आ वासून बघत होती. शारदा गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेऊन आली. शारदा लक्ष्मी जवळ बसत म्हणाली,

"माझ्याकडे सर्वजण असे का बघत आहेत? तू सुद्धा आ वासून बघत आहे. मी साडी तर व्यवस्थित घातली आहे."

लक्ष्मी आपल्या जागेवरुन उठत म्हणाली,
"माझ्यासोबत चल, मग सांगते." 

शारदा लक्ष्मी सोबत मंदिराबाहेर गेली. 
"सीमाच्या कर्तृत्वाची बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे, म्हणून सगळेजण तुझ्याकडे असे बघत आहेत."

"सीमाने काय केलंय? तू काय बोलत आहेस? मला तर काहीच कळत नाहीये." शारदाने विचारले.

लक्ष्मी डोक्याला हात मारत म्हणाली,
"शारदा तुला कळत कसं नाहीये. अग तुझी पोरगी कोणाबरोबर तरी तोंड काळं करुन निघून गेली ना?"

"तुला कोणी सांगितलं?" शारदाने अतिशय शांतपणे विचारले.

लक्ष्मी म्हणाली,
"गावात सकाळपासून चर्चा सुरु आहे. तुमच्या वाड्यातील नानांनी सगळ्यांना सांगितलं. तो मुलगा त्यांच्या नात्यातील आहे म्हणे."

"तू तर सीमाला लहानपणापासून बघत आली आहे ना? तरी तुला हे खरं वाटलं. तुला माझ्या संस्कारांवर विश्वास नाहीये का?" शारदाच्या बोलण्यातून राग जाणवत होता.

यावर लक्ष्मी म्हणाली,
"शारदा तुझे संस्कार तुझ्या मुलीनेच जपले नाहीत. मी काय त्याबद्दल बोलणार. सीमा बऱ्याच दिवसापासून बाहेर राहत आहे, तर ती काही करु शकते. तिला बाहेरचं वार लागलं असेल."

शारदाचे डोळे रागाने लाल झाले होते. तिने लक्ष्मीकडे जळजळीत कटाक्ष टाकला. शारदाकडे सगळेजण बघत होते. शारदाने पायरीवर उभे राहून देवीला हात जोडले व ती निघून गेली. शारदा अशी पटकन निघून गेल्यावर सर्व लोकांना वाटले की, सीमा खरंच कोणासोबत तरी पळून गेली असेल.

घरी जाऊन शारदाने सीमाला फोन करुन दुसऱ्या दिवशी घरी निघून यायला सांगितले. आईने असं अचानक का घरी बोलावले असेल? हा प्रश्न सीमाला पडला होता. सीमाचे वडील घरी नसल्याने त्यांना या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. 

"आई तू ताईला उद्या लगेच का बोलावून घेतले? आणि तुझ्या डोळयात पाणी का?" शारदाच्या लहान मुलीने शितलने विचारले.

शारदा म्हणाली,
"काही नाही असंच. मला तिची खूप आठवण येत होती आणि तू उद्याच्या दिवस शाळेत जाऊ नकोस. आता प्लिज याचे कारण विचारु नको. उद्या संध्याकाळी तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील."

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सीमा घरी पोहोचली. तिच्या पाठोपाठ तिचे वडील सुद्धा घरी परतले होते. सीमाला अचानक आलेलं बघून तिचे वडील म्हणाले,

"सीमा तू आज अचानक कशी आलीस? तुझी तब्येत बरी नाहीये का?"

सीमा म्हणाली,
"पप्पा काल रात्री आईने फोन करुन सांगितले की, उद्या संध्याकाळ पर्यंत घरी ये. कारण पण सांगितलं नाही. मी किती घाबरले होते."

"शारदा हे काय आहे? तू सीमाला का बोलावून घेतले?" सीमाच्या वडिलांनी विचारले.

शारदा म्हणाली,
"आपण सगळे आता देवीच्या मंदिरात जाऊयात. तुम्हाला सगळं काही तिकडे कळेलचं."

शारदा एवढं बोलून देवीच्या मंदिराच्या दिशेने निघाली, तिच्या पाठोपाठ सीमा, शीतल व त्यांचे वडील चालले होते. रस्त्यात दिसणाऱ्या बायकांना बघून शारदा म्हणाली,
"तुम्ही पण आमच्या सोबत मंदिरात चला. तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील ना?"

आजूबाजूच्या बायका सुद्धा शारदाच्या मागे मंदिरापर्यंत चालत गेल्या. आरतीची वेळ झाली असल्याने गावातील बरेच लोकं मंदिराच्या इथे जमलेले होते. आरती सुरु होणार इतक्यात शारदाने माईक एका माणसाच्या हातून हिसकावून घेतला. शारदाच्या नवऱ्याला तर ही अशी काय करत आहे? हेच कळत नव्हते. आजूबाजूचे सर्वजण कुजबूज करु लागले होते.

शारदाने बोलायला सुरुवात केली,
"नाना हातातील आरतीचं ताट बाजूला ठेवा. देवीची आरती करण्याची तुमची लायकी नाहीये. नवरात्र चालू आहे, देवीची पुजा करतात आणि एका मुलीच्या अब्रूचे गावात धिंडवडे काढताना तुम्हाला लाज वाटली नाही का?

तुम्ही आमच्या घरातले म्हणून सगळ्यांनी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी माईकवर याचसाठी बोलत आहे की, सगळ्या गावाला तुमचं काळं कृत्य समजावं. अहो माझी मुलगी तिकडे शहरात शिक्षण घेऊन आपल्या गावाचे नाव मोठे करत आहे. आपल्या गावातील एकजण सुद्धा त्या कॉलेजची पायरी चढला नसेल, त्या कॉलेजमध्ये माझी मुलगी शिकत आहे. तिचे वडील तिच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी दिवसरात्र राबत आहे. 

तुम्ही काय म्हणाले होते, माझी सीमा तुमच्या नात्यातील मुलासोबत पळून गेली ना? हे बघा माझी मुलगी तुमच्या समोर उभी आहे. आता त्या मुलाला बोलावून घ्या. मला तरी बघुद्यात की, कोण मुलगा आहे? ज्याच्या बरोबर माझी सीमा पळून गेली होती. काल जे लोक माझ्याकडे बघून बोलत होते, त्या सर्वांनी नानांना त्या मुलाबद्दल विचारा. पण त्यांना कोणीच विचारणार नाही, कारण ते या गावचे पंच आहेत, म्हणून ना.

हे पंच आहेत, म्हणून ह्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे का? आमच्या लेकीबाळींची इज्जत रस्त्यावर पडली आहे का? ज्या वयात नातू होणार होता, त्या वयात ह्या माणसाने दुसरं लग्न केलं, तेव्हा याला कोणी जाब विचारला नाही, की त्याच्या बद्दल कुजबुज केली नाही. 

नाना एकच सांगते, तुम्ही जे केलं ते लई वाईट केलं. तुम्हाला काय वाटलं, शारदा आणि तिचा नवरा गरीब आहे, ते काही उलट विचारणार नाहीत. पण नाना एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या देवीची पुजा करतात ना, ती देवी सगळ्या बायकांमध्ये असते. जेव्हा तुम्ही बाईच्या लेकराबद्दल काही वाईट करायला जातात ना, मग तिच्यातील देवी जागी होतेच. तुम्ही बाईच्या जातीला कमकुवत समजू नका. जी बाई असंख्य वेदना सहन करुन आपल्या बाळाला जन्म देते, त्या प्रत्येक आईमध्ये एक असंख्य सामर्थ्य असते. 

 आम्ही कोणाच्या अध्यात मध्यात नसतो, कारण आम्हाला आमची बरीच काम असतात. तुम्ही जर आत्ता या क्षणी सगळ्यांसमोर माझ्या मुलीची माफी मागितली नाही, तर उद्या गावात तुमच्या तोंडाला काळ फासून गाढवावरुन धिंड नाही काढली, तर नावाची शारदा नाही." 

शारदाच्या डोळ्यातील राग बघून सगळ्यांनाच भीती वाटत होती. नानांनी हात जोडून माफी मागितली व ते तिथून निघून गेले. सीमाने आईला जाऊन मिठी मारली. सीमा व शारदा या दोघींच्या डोळयात पाणी होते.  

एरवी शांत असणारी शारदा, जेव्हा तिच्या मुलीच्या बाबतीत कोणी चुकीचं बोललं, तेव्हा ती सगळ्यांसमोर धीटपणे उभी राहून बोलली. एखादी आई असती, तर तिने सीमाला कॉलेज सोडायला लावले असते, तिचे घाईघाईने लग्न लावून दिले असते, पण शारदाने असं केलं नाही, ती आपल्या मुलीच्या सोबत उभी राहिली. तिच्या बाजूने ती लढली. एका मोठ्या माणसाला आपल्या मुलीची माफी मागायला भाग पाडलं 

©®Dr Supriya Dighe


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//