Login

अन् हास्य परतले ओठी भाग १

एक कथा
अन् हास्य परतले ओठी भाग १

रात्र खूप झाली होती. थंड गार वाऱ्याची झुळूक अंगावर झेलत, सागर पार्कमधल्या बाकावर शांतपणे बसला होता. चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते, डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती. जी त्याच्या मनावर असलेल्या ताणाची कल्पना देत होते. कपाळावर थकव्याने आठ्यांची नक्षी बेमालूम पणे कोरली होती.
आयुष्याने त्याच्यावर एवढं ओझं टाकलं होतं की आता हसणं हे सागरच्या शब्दकोषातूनच गायब झालं होतं.
तेवढ्यात, समोरून एक मुलगी चालत आली. चालता चालता तिने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं, आणि हलकीशी हसली. तो क्षणभर चकित झाला. ही कोण? इतक्या रात्री इथे काय करतेय? आपण हिला ओळखत नाही मग आपल्याकडे बघून का हसली. तो आपल्याच विचारांत होता, पण तोवर ती पुढे निघून गेली होती.
दुसऱ्या दिवशीही तीच मुलगी तिथून गेली. यावेळी ती थोडा वेळ थांबली आणि मंद हसत म्हणाली, “कसे आहात तुम्ही?”
तो काहीच बोलू शकला नाही. तो तिच्या प्रश्नाने एकदम गोंधळून गेला. त्याने मान खाली झुकवली. पण त्या अपरिचित हास्याने त्याच्या आतल्या जखमा हलकेच कुरवाळल्या होत्या.
****
दुसऱ्या दिवशीही तीच मुलगी सागर ज्या बाकावर बसला होता तिथून गेली. यावेळी पण ती थोडा वेळ थांबली आणि मंद हसत म्हणाली, “कसे आहात तुम्ही?”
तो आजही काहीच बोलू शकला नाही.
ती तिथून निघून गेली. तिला पाठमोरी बघताना सागर स्वत:शीच बोलला.
“उद्या आपण हिच्याशी बोलायचं. “
पण.. ती उद्या येईल नं? सागर प्रश्नांच्या वेटोळ्या अडकला.
त्या दिवसानंतर, तो रोज संध्याकाळी त्या बाकावर बसू लागला. त्याला आता त्या हसऱ्या चेहऱ्याची सवय झाली होती. ती रोज यायची, मंद हसायची आणि न बोलता निघून जायची. पण तिच्या त्या हसण्यात अशी काही जादू होती की, आयुष्याच्या काळोख्या अंधारात एक आशेचा किरण त्याला दिसू लागला होता.
काही दिवसांनी त्याला स्वतःलाच जाणवू लागलं की तो त्या एका क्षणाच्या हसण्याची वाट पाहतोय. एरवी न बोलणारा तो, आता तिची चाहूल घेत नकळत बाकावर थोडा सरळ बसू लागला होता, नजर तिच्या वाटेकडे लागलेली असायची.
आजकाल पूर्वी सारखी उदास छाया त्याला त्रास देत नसे. त्यामागचं कारण म्हणजे तिचं आनंदी हास्य आहे हे सागरच्या लक्षात ह आलं.
पण ती उद्या खरच पुन्हा येईल?
--------------------------------


🎭 Series Post

View all