आधुनिक गृहिणीची कैफियत

आपण सर्व गृहिणी आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी राबराब राबत असतो, पण कुठेतरी आपलाही छंद जोपासावा असे प्रत्येकीला वाटते. पण त्यासाठी बरेचदा आपल्याकडे वेळ नसतो. कारण आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक लहान सहान गरजा पूर्ण करण्यासाठी आपण आपली उपलब्धता सतत दाखवतो. पण आता वेळ आली आहे आपलेही मन जपण्याची. म्हणूनच रोज थोडा वेळ का होईना स्वतःचा स्पेस शोधून आपल्याला आवडते ते काम करावे , जेणेकरून प्रत्येक जण आपल्याला दरवेळी गृहीत धरणार नाही हेच मला ह्या कथेतून सांगायचे आहे.


आधुनिक गृहिणीची कैफियत

ही कैफियतेची कथा आहे श्रुतिकाची. श्रुतिका ही उच्चशिक्षित आधुनिक विचारसरणी असलेली मुलगी. तिचे लग्न झाले एका उच्चशिक्षित मुलाशी म्हणजेच देवशी . तर बघूया तीची कैफीयत तिच्याच शब्दांत! बघूया आपल्यातील कित्येक गृहिणी श्रुतिकाच तर नाहीत ना?
"खरं तर देवशी लग्न करतांना मी त्याला, मी किती महत्त्वाकांक्षी मुलगी आहे हे पटवून दिलं होतं. त्यानुसार लग्नानंतर काही दिवस मी मला हवा असणारा जॉबही केला. पण आमची मुलं वेदु आणि वृक्षा यांच्या जन्मानंतर देवने मला माझा जॉब तात्काळ सोडायला लावला. मी तर त्याच्याकडे थक्क होऊन बघू लागले!त्यावर देव म्हणाला," माझे आई-वडील आता म्हातारे झालेत. त्यामुळे आपली मुले तुलाच सांभाळावी लागतील .त्यांचा ऑनलाईन क्लास ,ऍक्टिव्हिटीज हे सार आई-बाबांना कुठे जमणार आहे? शिवाय मुलांमागे सतत धावायला माझे आई-वडील सक्षम नाहीत .त्यामुळे मला वाटतं, तू घरी राहून जॉब सोडून त्यांचा योग्य सांभाळ करशील ,तसेच माझ्या आई-वडिलांची देखील काळजी घेशील!"
म्हणजे खरंच देवला त्याची अशी भूमिका मांडताना जरा तरी खंत का वाटली नाही ? त्याने एका क्षणासाठीही माझा विचार का केला नसावा? मुले झाली म्हणजे त्यांची जबाबदारी घरातील आजी आजोबा, नवरा-बायको यांनी सर्वांनी घ्यायची असते हे तो विसरला आहे का? माझ्या आत्मविश्वासाचा, महत्त्वाकांक्षेचा त्याने असं बोलून फज्जा तर उडवलाच आणि माझ्या मनाला जोरदार ठेचही पोहोचवली. कारण आता मला समजलं, त्याला शिकलेली बायको ही मुलांना रेडिमेड शिक्षिका म्हणून हवी होती. मग घरी त्यांचा सांभाळ एकटीनेच करण्यात तिने तिच्या इच्छांचा गळा आवळला तरी चालेल, जेणेकरून तो स्वतः मात्र पार्टीज, तसेच इतर उपक्रम मित्रांसोबत मस्तपैकी एन्जॉय करू शकेल. कारण मागील चार पाच महिन्यांपासून तो फॅमिली टाईम तर विसरलाच आहे !घर म्हणजे केवळ बाईची जबाबदारी अशा बुरसटलेल्या विचारांच्या मुलाशी माझं लग्न होईल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. बरं त्याच्या आई-वडिलांची काळजीही मीच घ्यायची,त्यानेही त्याचे आई-वडील बघायला नको ? ही जबाबदारी दोघांची ही हवीच ना!!
खरंतर देव मला आता खऱ्या अर्थाने आता हळूहळू समजायला लागलाय. कारण त्याला, दर महिन्याला मला पॉकेटमनी देत जा असे म्हणायला गेले तेव्हा "हे बघ संसार काटकसरीने करायला हवा. तुला कशाला हवेत वेगळे पैसे ?आपल्या मागे दोन मुले ,आई-वडील आहेत. त्यांचे पालन पोषण, दुखणे खुपने ,सर्वच आपल्याला बघायचे आहे. त्यामुळे आवश्यक तेव्हाच कृपया पैसे खर्च कर!"
मी पैसे मागितल्यावर त्याला काटकसर आठवणार आणि स्वतः मात्र त्याचे मित्र रोज जरी आले तरी त्यांच्या सोबत बाहेर नाष्टा ,हॉटेलचे जेवण, ड्रिंक्स साठी पैसे उडवणार! आणि मी जेव्हा आजारी पडले तेव्हा तर कहरच झाला. सासूबाईंनी साधा चहा सुद्धा मला करून दिला नाही. उलट मीच तशीच उठून सर्व स्वयंपाक व इतर कामे स्वतः केली व गोळ्या औषधे घेतली .चार मैत्रीणींसोबत केवळ तीन तास ट्रेकिंगसाठी जाते म्हटल्यावर तर देवने माझ्यासोबत जोरदार भांडण केले व मुलांना कोण सांभाळेल, असा प्रश्न उपस्थित केला .त्यामुळे मुलांच्या काळजी पोटी आमचा ठरलेला प्लॅन मी त्वरित कॅन्सल केला.
ऍक्च्युली मला ना आता खरा प्रॉब्लेम लक्षात आलाय .खरी चूक या सर्वांची नाहीच आहे मुळी !!चूक माझीच आहे !! मी सर्वांना कायम आपली उपलब्धता दाखवत गेले ,तेही प्रत्येक लहानसहान गोष्टींसाठी !त्यामुळे मुलांनाही तीच सवय लागली. एक आधुनिक गृहिणी असूनही जर मला स्वतःचा स्पेस जगता येत नसेल ,तर असे आयुष्य जगून काय उपयोग ? म्हणजे आपली स्वतःची माणसे ,कुटुंब मला तोडायचे आहे असे मी म्हणत नाही, किंवा मला त्यांची काळजी घ्यायची नाही असेही मी म्हणत नाही. पण मला दरवेळी गृहीत धरणे हे तुम्ही सर्वजण प्लीज बंद करा! मी ही माणूस आहे, मला ही मन आहे.एक आई, गृहिणी म्हणून अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत ,करियरला मागे टाकून मी आज संसार सांभाळते आहे. त्यामुळे बास पुरे आता !! मला आता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. माझा छंद मला जोपासायचा आहे .जरा मोकळीक हवी आहे . तेही केवळ थोड्यावेळासाठी! त्यामुळे माझे काही गोष्टींना नाही म्हणणे हे तुम्ही चुकीचे ठरवून गैरसमज करून घेऊ नका. मला फक्त थोडा वेळ मोकळा श्वास घेऊ द्या .आवडते काम करू द्या. का कोण जाणे तुमची आधुनिक गृहिणी ,आई , सून एके दिवशी एक यशस्वी उद्योजिका ही बनू शकेन किंवा प्रथितयश लेखिका ही बनवू शकेन!
त्यामुळे आपल्याच घराच्या भल्यासाठी झटणाऱ्या माझ्या सारख्या आधुनिक गृहिणीने स्वतःच संसाराच्या रहाटगाडग्यातून थोडा वेळ तरी यशस्वीपणे मार्ग काढून स्वतःचा स्पेस शोधावा व स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग करावा व कुटुंबाबरोबर स्वतःचाही विकास करावा एवढीच माफक अपेक्षा मी सर्व महिलांकडून करत आहे, जेणेकरून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा सामान्य गृहिनींनाही मिळेल यात शंका नाही!