Jan 26, 2022
नारीवादी

अम्मा

Read Later
अम्मा


माझ्या सासरी घरकाम करण्यासाठी एक बाई आहे तिला आम्ही "अम्मा" म्हणतो.माझ्या लग्नाअगोदरपासून ती आमच्या कडे काम करीत आहे. तिची राहणी अगदी साधी पण नीटनेटकी. खुप घरी कामे करते पण सर्वांकडे अगदी स्वतःच्या घरासारखेचं काम करते. स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटके आणि एवढे काम करते पण न थकता, न कंटाळता आणि ते ही पटापट.मी विचार करते,आपण आपल्या स्वतःच्या घरातील कामे करुन थकतो आणि अम्मा एवढी सारी कामे कसे करते ?

रोज तिच्या बरोबर बोलण्यातून तिची सुखदुःख समजायला लागली.

अम्मा मुळची आंध्रप्रदेशातील छोट्याशा गावातून कामासाठी महाराष्ट्रात आलेली.माहेरी खाऊन पिऊन सुखी होती.पहिल्या नवऱ्याबरोबर  संसार जमला नाही म्हणून दुसरे लग्न केले.दुसरा नवरा ही व्यसनी,संशयी होता.तिला मारायचा,छळायचा.अनेकदा तिला आत्महत्या करावीशी वाटली पण पोटी 3 मुले होती आणि नवरा असा बेजबाबदार म्हणून मुलांसाठी तिने जगायचे ठरविले. नवऱ्याच्या कमाईत घरसंसार चालत नसे म्हणून अम्माने घर सांभाळून मोलमजुरी करण्यास सुरुवात केली आणि मुलांची काळजी घेऊ लागली.

पैसा कमविण्यासाठी तिचा नवरा बाहेरच्या देशात मजूरी करण्यासाठी गेला.जाण्यासाठी  पैसा हवा म्हणून नातेवाईकांकडून सोने घेतले कर्ज रूपात.पण तिकडेही त्याला काही जमले नाही. गावी परत आला.फायदा तर काही झाला नाही उलट लोकांचे कर्ज झाले. लोकांनी पैशासाठी तगादा लावला म्हणून गाव सोडून मुंबईत येऊन संसार थाटला.संसार म्हणजे तरी काय ?झोपडीवजा घर ! फक्त झोपण्यापुरता आसरा .दिवसभर कामासाठी बाहेर. पडेल ते,जमेल ते काम करू लागले.हळूहळू परिस्थिती बरी होत होती.दोन्ही मुलींचे लग्न लवकर करून दिले.मुलाचे शिक्षण सुरू ठेवले.लोकांना सोन्याच्या बदलीत सोने देणे महागात पडले.कारण अगोदरच्या किंमती पेक्षा नंतर सोन्याची किंमत वाढलेली होती.तरीही अम्माने पोटाला चिमटा देवून लोकांची देणी देवून गावात  जाण्या येण्यास जागा ठेवली.मुलाचे शिक्षण,गावाकडे घर,मुलाचे लग्न, मुलींचे माहेरपण ,नातेवाईकांच्या जबाबदाऱ्या सर्व काही व्यवस्थित पार पाडल्या.हे सर्व करत असताना स्वतः च्या सुखाचा विचार केला नाही. नवऱ्यापेक्षा जास्त कष्ट केले, त्याच्या पेक्षा जास्त पैसे कमविले पण एवढे करुनही नवऱ्याने तिला सुखाचा शब्द दिला नाही. कायम तिरस्कार करत राहिला .लोकांनी अम्माला चांगले म्हटलेले त्याला आवडत नसे.अम्माचे जीवन कष्टदायी होते,जबाबदाऱ्यांचे टेंशन होते.याउलट तिचा नवरा बिनधास्त राहत असे.थोडेफार काम करायचे ,आलेल्या पैशातून व्यसन पूर्ण करायचे आणि मस्त enjoy करायचे.ना संसाराची चिंता न मुलांची काळजी !

असेचं दोघांचे आयुष्य सुरु होते आणि अम्माचा नवरा हार्ट अटॅक ने वारला.अम्मा खुप रडत होती,तिला वाईट वाटत होते.ज्या नवऱ्याने तिला आयुष्यात कधी सुख दिले नाही, प्रेमाने बोलला नाही कायम भांडण करत राहिला ,त्या नवऱ्यासाठी ती रडत होती.ज्याच्यामुळे तिला आयुष्यात सुखाऐवजी दुःख मिळाले त्याच्या साठी तिला वाईट वाटत होते.

दुःखातून सावरून ती परत काम करण्यासाठी तयार झाली. कारण मुलाच्या संसाराला हातभार लागावा आणि आपल्या कडून जोपर्यंत काम होईल तोपर्यंत करत  रहावे म्हणून ती परत काम करू लागली.

 माझ्या मनात विचार येतो,कोठून येते एवढी शक्ती? एवढी हिंमत ?

अम्माचे जीवन पाहून लिहावेसे वाटते की,समाजात अम्मासारख्या अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या सर्व प्रकारचा त्रास सहन करून जीवन जगत आहे,नुसते स्वतः चे जीवन जगत नाही तर मुलांसाठी, कुटुंबासाठी आधार बनत आहेत.अम्मा शिकलेली नाही पण शिकलेली स्त्री सुद्धा करु शकणार नाही एवढे कष्ट करून आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून मुलांसाठी आई ही आणि वडील ही झाली.

सध्या आपण बघतो,स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहेत.प्रसारमाध्यमाद्वारे जगाला त्यांचे कर्तृत्व समजत आहे.अम्मा सारख्या अशा अनेक स्रिया आहेत ,ज्यांना जगात काय सुरू आहे हे माहित नसते आणि या स्रियांनी काय केले हे जगाला माहित नसते.

अशा स्त्रियांना जवळुन पाहिले, त्यांचा जीवनप्रवास पाहिला की वाटते,जो आदर मला राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा,इंदिरा गांधी इ.अशा महान स्रियांबद्दल वाटतो तसाचं या स्त्रियांबद्दल सुद्धा वाटतो आणि आपल्या ला खुप प्रेरणा मिळते यांच्या कडून ....


शेवटी एवढेचं लिहावेसे वाटते

"स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री  म्हणजे मांगल्य,

स्त्री म्हणजे मातृत्व,स्त्री म्हणजे कर्तृत्व !"
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now