आम्ही लग्नाळू

लग्नाला उत्सुक असणाऱ्या मुलाची कथा


आम्ही लग्नाळू..


" मुलीच्या मामाने मुलीला घेऊन मंडपात येणे.." गुरूजींनी घोषणा केली. तशी सम्यकच्या ह्रदयाची धाकधूक वाढायला लागली. त्याने आंतरपाटाच्या पलीकडे बघायचा प्रयत्न केला. तिच्या मामासोबत ती येत होती. अंजिरी रंगाचा शालू. त्यावर घेतलेला तो जांभळा शेला. शेला आणि पदर सांभाळत हळूवारपणे चालणारी ती. मान खाली घातल्यामुळे तिचे सजलेले रूप मात्र त्याला दिसत नव्हता. तो हताश झाला. तिच्या पाठी करवल्यांचा किलबिलाट सुरू होता. शेवटी एकदाची ती मंगलाष्टके संपली.
" आता तुम्ही एकमेकांना हार घाला." गुरूजींनी सांगितले. आंतरपाट दूर होणार, तिचे रूप दिसणार..


" मेल्या, कधीचा लोळतो आहेस.. उठायचे नसते तर रोज तो गजर कशाला लावून ठेवायचा. झोपमोड नुसती ती." शोभाताई करवादल्या.

" घाला, फक्त शिव्या घाला मला. माझं चांगलं लग्न होत होतं. मी तिला हार घालणार इतक्यात उठवलं.. अरे खऱ्या आयुष्यात नाही किमान स्वप्नात तरी लग्न होऊ द्या माझे." सम्यक वैतागला होता.

" आता, मला काय माहीत तुला काय स्वप्न पडते ते. तुला झोपायचे असते ना? नाही तुला स्वप्न बघायची असतात की नाही मग तू एक काम कर. नोकरी सोड, हे गजर लावणं सोड आणि फक्त झोपाच काढत बस." शोभाताई सम्यकला चापट मारत बोलल्या.

" तुम्हाला ना माझी पर्वाच नाही. एका साध्यासरळ मुलाचे लग्नही लावून देऊ नका.. दुष्ट नुसते."

" लग्न लावून द्यायला आम्ही तयार आहोत. नाटकं तुझीच असतात. पोहे हिनेच केले असतील ना? ही थोडी थोराड नाही का वाटत? तिच्या कानावर तीळच दिसतो, तिची नखंच लहान.. बापरे." शोभाताईंनी बोलून दम लागला.

" आई, तू सुद्धा?" सम्यक आईच्या कुशीत शिरत बोलला.

" मी सुद्धा काय? आता मी अजिबात मुली बघणार नाही तुझ्यासाठी. मलाच लाजल्यासारखं होते. मुली म्हणजे काय भाजीपाला आहे का? नकोच ते मुली बघणे आणि नुसते पोहे खाणे. इतके पोहे खाऊन खाऊन मला त्या पोह्यांचा वीट आला. पण तुला काही मुलगी पसंत पडेना. तुला ज्या मुलीशी लग्न करायचे तिच्याशी कर. मी तिला सून मानायला तयार आहे." शोभाताईंनी निर्वाणीचे सांगितले. सम्यक उठून आवरायला गेला. रविवार सकाळ म्हणजे सगळ्या मित्रांनी सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये एकत्र घालवायचा वेळ. घरी नाही तर तिथे तरी थोडा टाईमपास होईल म्हणून तो खाली गेला. रोज दहापंधरा जणांनी गजबजलेला सोसायटीचा कट्टा आज रविवार असूनही शांत होता. तिथे फक्त एकदोन चेहरेच दिसत होते. सम्यकने मल्हारच्या पाठीवर थाप मारत विचारले ," काय रे आज कोणीच नाही दिसत? रविवार असून एवढी शांतता?"

" बघ ना? लग्न झाल्यापासून बिघडलेत नुसते. नाहीतर सकाळी सात वाजल्यापासून क्रिकेट खेळायला उठून बसायचे. आता यांना या रे, असे सतत फोन करावे लागतात."

" मग काय.. आपणच रिकामटेकडे.." सम्यकच्या बोलण्यात निराशा, असूया सगळेच होते. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारेपर्यंत एकेक मित्र उगवायला लागला..

" अरे यार, सॉरी हा.. जरा उठायला उशीर झाला." आल्या आल्या आकाश बोलला.

" का रे? ऑफिसचे काम?" मल्हारने विचारले.

" ऑफिसचे काम परवडते रे.. घरचे नाही. काल आमच्या गृहमंत्र्यांसोबत खरेदीचा कार्यक्रम होता. अरे फिरून फिरून पायाचे तुकडे पडले. घ्यायची होती फक्त एक साडी.. वांगी कलर म्हणे.. अरे त्या शेड्स बघून माझं भरीत व्हायची वेळ आली. घेणार काय तर एक साडी पण फिरणार दहा दुकाने. वैतागलो बाबा मी तर." आकाश सांगत होता.


" लाज वाटत नाही हे बोलायला?" सम्यक चिडून बोलला..



नक्की का चिडला असेल सम्यक? बघू पुढील भागात तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all