आम्ही लग्नाळू भाग 6

राघव आणि शालुचे प्रेम फुलेल का?

आम्ही लग्नाळू भाग 6

मागील भागात आपण पाहिले की राघव आणि शालू दोघांना आलेली स्थळे पाहून दोघेही वैतागले आणि रागावून बाहेर निघून गेले. आता ही कथा पुढे कशी रंगणार पाहूया.


राघव रागात चालत निघाला. पार्थ मागून हाक मारत होता,", रघ्या,थांब. अरे एक पोरगी नाही म्हणाली म्हणून काय झाले?"

राघव डोळ्यांनी आग ओकत म्हणाला,"अरे ती नाही म्हणाली याचा राग नाही आला. तिला गावाकडची माणसे म्हणजे काय वाटली तिला. स्वतः ला काय समजते?"

पार्थ हसला,"असली मुलगी तुला नाही म्हणाली त्याबद्दल उलट आभार मान. जर लग्न झाल्यावर अशी कटकट केली तर आयुष्य वैराण."


राघव चालत राहिला. घाईने चालत असताना अचानक तो धडकला आणि त्या पाठोपाठ,"भेंडी,कोणाचं डोळ फुटल रे. का सक्काळी सक्काळी टाकली का काय?"

हा आवाज ऐकूनच राघव चिडला,"नको तीच माणसे कशी काय आदळतात काय माहित?"

राघव असे म्हणताच शालू चिडली,"अय शहरी बाबू,तुमच् ग्यान तिकड ठीव. मला शानपणा शिकवू नग."

तेवढ्यात शालूचा पाय घसरला आणि ती राघवच्या अंगावर आदळली.

राघव म्हणाला,"गावाकड रहात नसलो तरी मूळ याच मातीतले आहे."

तेवढ्यात गडबडीत परत चालताना शालुचा पाय घसरला आणि नेमके राघवने तिला पकडले.

तशी शालू ओरडली,"ओ पावन उगा चांस नगा मारू. पोरगी दिसली की झालं सुरू."

राघव शालूच्या डोळ्यात हरवत असताना तिचा आवाज कानावर आला आणि त्याने तसेच तिला सोडून दिले आणि ओरडला,"काही लोकांचे कसे असते ना पडले तरी नाक वर."


तेवढ्यात सुमन हसून म्हणाली,"शालू तू आता तीन वेळा नेमकी त्याच्या मिठीत कशी काय पडलीस ग?"

ते ऐकताच शालू भडकली,"सुमे आदीच डोक्याचं दही झालय हा. आन त्यो गोलू नेमका मला धडकत आसतोय."

पार्थ आणि राघव पुढे निघाले. तेवढ्यात रखमाने त्यांना पाहिले आणि आवाज दिला,"कोण राघू व्हय? कवा आलास?"

तेवढ्यात शालुची आई बाहेर आली,"रखमा कुणाशी बोलत व्हती?"

रखमा म्हणाली,"आव सुला वन्स हायेत ना! त्यांचा पोरगा. राघू आर ये की घरात वाईच दूध घे."


राघव आणि पार्थ घरात आले. गुबगुबीत,गोरा गोमटा राघव पाहून शालुची आई म्हणाली,"कुठ शिकायला असतोस पोरा?"


तसे पार्थ हसून म्हणाला,"पोरा! बार उडवला असता तर पप्पा झाला असता. मावशी हा राघव तिकडे पुण्याला कामाला आहे."


तशी रखमा म्हणाली,"त्याच सांगतोय आन तू काय करतोस र?"

तेवढ्यात रखमा म्हणाली,"राघू,पारू मामीला म्हणावं म्या येते. संगीतान बोलावल हाय."


इकडे सुमन आणि शालू पुढे चालत निघाल्या. तेवढ्यात सुमन ओरडली,"अय्या,थांब. तिकडे बघ ती चुलीवर भाकऱ्या करतेय."

तशी शालू म्हणाली,"अय,हित सगळी असाच सैपाक करत्यात."

तेवढ्यात तिचे ओरडणे ऐकून पारू म्हणाली,"ये पोरीनो हिकड या. कुणाकडं आलाय?"

सुमन म्हणाली,"शालूच्या मावशीकडे आलोय आम्ही."

तेवढ्यात सुला आक्का आणि सुदामराव आले. पारू शालुला म्हणाली,"तुझी मावशी?"


तसे शालू म्हणाली,"रखमा पानसरे माझी मावशी."

पारू हसली,"आगो बया. मंजी माझ्या मैत्रिणीची भाची हायेस तू."


मग थोड्या गप्पा मारून त्या दोघी निघून गेल्या. सुला आक्का म्हणाली,"पारे कोण व्हत्या ह्या पोरी?"

पारू म्हणाली,"आव रखमाची भाची हाय."

तशी सुला म्हणाली,"पारे आग मंग ही पोरगी पण छान हाय की."


त्याबरोबर दोघींचे डोळे चमकले.


राघव आणि पार्थ चालत असताना राघव म्हणाला,"उद्या मस्त गावातून फिरून येवू आणि मग परवा सकाळी निघू."

पार्थ म्हणाला,"हो,सुमन पण तेव्हाच निघणार आहे."

राघव चमकून म्हणाला,"कोण सुमन? तिला कुठे जायचे आहे?"

पार्थ हसत म्हणाला,"चल,तुला नाही कळायचे."

पारू मामी दोघांची वाट पाहत होती. त्यांना येताना पाहून पारू म्हणाली,"राघू,आक्का आल्यात. तुमि उद्या जाणार ना म्हणून."

तेवढ्यात रखमा आली आणि पारुला म्हणाली,"रखमा,आवरल का?"

पारूने आवाज दिला,"सुला वन्स आल्यात. ये की घरात."

रखमा आणि शालुची आई घरात आल्या. तेवढ्यात सुदामराव आणि सुला बाहेर आले.

रखमा म्हणाली,"कवा आलासा वन्स? समद ठीक हाये ना?"

झाले असे म्हणायचा अवकाश लगेच सुला आक्का सुरू झाली,"काय सांगू रखमे,सगळ बेस हाय. पण आता एकादा नातू झाला पायजे."


ते ऐकून राघवला ठसका लागला.

तेवढ्यात पारू म्हणाली,"आक्का,चला जरा संगीताकड जाऊ."

सर्जा आत येताना हे ऐकून म्हणाला,"तिकड संगी बर गप्पा हानीत बसू नका. हित जेवायला पावण हायेत आज."

ते ऐकायला पारू थांबलीच नव्हती. परंतु बाहेर जाताना शालुची आई राघवकडे निरखून पहात गोड हसली.


राघव मात्र अजूनही शालूच्या काळ्याभोर डोळ्यात हरवला होता. तिला सावरताना झालेला तिचा स्पर्श आणि वाऱ्यावर रुळणारे केस त्याला राहून राहून आठवत होते.


इकडे शालू सुद्धा राघवचे गोबरे गाल,त्यावर पडणारी खळी. राग आल्यावर फुलणारे नाक आठवून हसत होती. दोघांच्याही मनात काही अनामिक हुरहूर दाटून येत होती.


काय होईल पुढे आपल्या हिरोचे?
शालुची आई का हसली असेल?
वाचत रहा.
आम्ही लग्नाळू.
©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all