आम्ही लग्नाळू भाग 5

राघव आणि शालू दोघांना स्थळे पसंद पडणार का?



आम्ही लग्नाळू भाग 5
मागील भागात आपण पाहिले शालू आणि राघव दोघेही गावात आले. इकडे शालूच्या मावशीने आणि तिकडे राघवच्या मामाने त्यांना भावनिक कात्रीत पकडुन स्थळ पहायला तयार केले. आता पाहूया पुढे.


सकाळी कोंबडे आरवू लागले,मस्त पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आणि सुमन उठून बसली. केस बांधून ती बाहेर आली तर रखमा चूल पेटवत होती.


सुमन म्हणाली,"किती छान वाटतं ना मावशी सकाळी."

रखमा म्हणाली,"व्हय,पाखर गाणी गायला लागली की लई बेस वाटत. जा जरा फिरून ये."

इकडे पार्थची स्वारी लवकर उठून पाय मोकळे करायला बाहेर पडली होतीच.

समोरून सुमन येताना दिसताच त्याने हाक मारली,"सुमन,इकडे बघा इकडे."

सुमन डावीकडे वळली आणि पार्थला पाहून गोड हसली. मग दोघे गप्पा मारू लागले.

सुमन बँकेत काम करते ते पाहून पार्थ म्हणाला,"कमाल आहे,तुमची शालू सारख्या अडाणी मुलीशी मैत्री कशी काय झाली?"


सुमन हसली,"हळू बोला,व्यवस्थापन शास्त्र पदवीची सुवर्णपदक विजेती आहे शालू."


पार्थ आता बुकचकळ्यात पडला तशी हसत सुमन म्हणाली,"ते भाषा होय,गावी येताना अशीच बोलते ती. आवडते तिला गावाकडची भाषा."


तेवढ्यात पार्थ म्हणाला,"चला आज दुपारी गावात फिरायला याल का?"

दोघांनी नंबर घेतले आणि घरी निघाले. तोवर सूर्य उगवला होता.


रखमा अंघोळ करून आली. तेवढ्यात शालुची आई ओरडायला लागली,"बया , शाले अग उठ लवकर. पार उजाडलं तरी घोरत पडली. कसं व्हईल ह्या पोरीच?"


रखमा म्हणाली,"आक्का आज सुट्टी हाय तिला. झोपू दे की वाईच."


तशी आई भडकली,"तीच लगीन झाल्यावर तू जा तिच्या सासरी शिव्या खायला."


ही बडबड ऐकून शालू उठून बसली,"भेंडी,काय झालं माय सकाळी सकाळी. आग लागली का काय?"


आई बोलणार एवढ्यात मावशी म्हणाली,"शालू बाय जा तयारीला लाग. पावण येणार हायत ना."

शालू काही न बोलता उठून आवरायला गेली. तोवर सुमन फिरून आली.


इकडे सर्जा म्हशीच्या धारा काढून आला आणि राघव झोपलेला पाहून ओरडायला लागला,"आस कुंभकर्णावाणी पसरून आसतो म्हणून नुसता जाड व्हत चालला हाय. आसल गाठूड कोणती पोरगी पसंद करील तवा."


तेवढ्यात पारू बाहेर आली आणि सर्जा गप्प बसला.


पारूने आवाज दिला,"राघू,आव उठा लवकर. आवरून घ्या. त्यासनी कंपनीत काम अस्त्यात म्हणल."


सर्जाला पाहून नाक मुरडत पारू आत गेली आणि राघव आवरायला गेला.


थोड्याच वेळात शालू आवरून आली. मस्त अबोली रंगाचा सूट घातला होता आणि केस पुसत असतानाच तिच्याकडे पाहून आई भडकली,"हे काय घातलय. दंड समदे उघडेच. एखादी साडी नाय व्हय."


असे आई म्हणायला आणि सुमन छान गुलाबी साडी घालून यायला एकच वेळ झाली.


तशी शालू म्हणाली,"च्यायला मला डाऊट येतो सुमे, तुझी आन माझी आदला बदल झाली नसल ना."


तेवढ्यात आईने एक धपाटा घातला आणि गरजली,"साडी नेसायची म्हंजी नेसायची."


शालू पाय आपटत तयार व्हायला गेली.


राघव मस्त फॉर्मल पँट शर्ट घालून बाहेर आला. त्याला पाहून पार्थ आणि सर्जा फिसकरून हसले.


सर्जा म्हणाला,"केवढा पोटाचा नगारा दिसतोय,जरा सैल कापड घाल."


राघव चिडला,"माझ्यावर मनाने प्रेम करणारी पोरगी मला हवीय.शरीरावर प्रेम करणारी नको."

तसा सर्जा भसकन बोलून गेला,"आर पर आधी तुझ शरीराचं दिसणार नव्ह तिला."


पारू चिडली,"आव जिभला काय हाडबिड हाय का? पोरांसमोर काय बी काय बोलताय?"


तसा सर्जा म्हणाला,"पारे,ह्या पैलवानाची पिळदार मिशी आन भरदार छाती डोळ्यात भरली व्हती का नाय?"


पारू लाजून आत निघून गेली.



एकदाची शालू साडी नेसून तयार झाली. काकांनी निरोप दिला,"पावणे येतील आता."


आई शालुला म्हणाली,"शाले,जास्त आगाव गत बोलायचं नाय. आदीच सांगून ठीवते."


तेवढ्यात गाडी वाजली. सोमनाथ दिसायला छान असला तरी चेहऱ्यावर असणारा मग्रूर भाव पाहून शालुला अचानक शांत गोलुमोलू राघव आठवला आणि तिला खुदकन हसू आले.

तसा सोमनाथच्या बरोबर आलेला एक मित्र म्हणाला,"आमच्याकडं पोरीनी आस मोठ्यांनी हसल्याल नाय चालत."


तशी शालू म्हणाली,"पोरिनी जेवल्याल चालतंय नव्हं?"


ते उत्तर ऐकून त्या मित्राला ठसका लागला. थोडे प्रश्न उत्तरे झाल्यावर काका म्हणाले,"शालू,जा यांना जरा मागच्या शेताकड ने."


शालू आणि सोमनाथ बाहेर पडल्यावर शालू जरा मोकळी झाली. तिने पदर डोक्यावरून खाली खोचला.

तसे सोमनाथ म्हणाला,"साडीची सवय नाही का?"

शालू म्हणाली,"नेहमी ड्रेस घालते मी."

त्यावर सोमनाथ म्हणाला,"पण आमच्याकडे नाही चालणार."

शालू म्हणाली,"मी परवानगी विचारणार नाहीच. काय घालायचे मी ठरवणार. तुमच्या आणखी काही अपेक्षा?"


सोमनाथ म्हणाला,"बायकोने घरी राहून घर सांभाळावे. मला छान जेऊ घालावे. माझी काळजी घ्यावी. गावाकडे आल्यावर सगळे कुलाचार करावेत. तुम्हाला चालेल ना?"


शालू फक्त हसून म्हणाली," चला जाऊया परत."


सर्जाकडे मुलिकडचे आले. त्यांनी राघवला नेहमीचे प्रश्न विचारले आणि मग दोघांना बोलायला पाठवले.

तशी ती मुलगी म्हणाली,"हे बघा मी काही गावात राहणार नाही. शिवाय तुम्हाला बारीक व्हावे लागेल. मला नेहमी सगळे ब्रँडेड लागते."

ती बोलत असताना राघवला शालुचा गावरान ठसका आठवत होता.

तो म्हणाला,"पण माझे आई वडील आहेत. ते येणारच. शिवाय प्रयत्न करूनही मी बारीक झालो नाही तर?"

ती मुलगी म्हणाली,"तुमचे पाहुणे,तुम्ही पहायचे. आणि स्पष्ट सांगू का? मला जाड नवरा नकोय."

दोघेही परत आले.


दोन्हीकडे पाहुणे गेल्यावर शांतता होती.


आई म्हणाली,"शाले कसा वाटला पोरगा?"

बस एवढे विचारताच शालू कडाडली,"त्याला बायको नकोय बाहुली पायजे मिरवायला."


सर्जा राघवला म्हणाला,"पोरगी झ्याक हाय ना दिसायला."

तसा राघव खिन्न होत म्हणाला,"तिला फक्त दिखावा पाहिजे मामा."


राघव आणि शालू दोघेही जरा रागावून आणि जरा खिन्न मनाने बाहेर पडले. पाठोपाठ पार्थ आणि सुमन होतेच.


काय होईल पुढे? राघव आणि शालू काय निर्णय घेतील.
वाचत रहा.
आम्ही लग्नाळू.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all