बहिणी.. भाग १

कथा दोन बहिणींची


बहिणी..


"आई , मी वाटू का ग हि चटणी?" काव्याने आईला विचारले..
" नको.. तू अभ्यासाला बस.. ती ताई बघ कशी अभ्यास करते आहे.. तिचा कसा नेहमी वर्गात पहिला नंबर येतो.. तसाच तुझाही आला पाहिजे.." उमाताई समीराकडे बोट दाखवत म्हणाल्या..
" पण आई , ताईसारखे माझे डोके अभ्यासात नाही लागत ग.. आणि मला जेवढा हवा तेवढा अभ्यास मी केला आहे. मला सांग मी कधी नापास झाले आहे का?" काव्याने आपला हट्ट सोडला नाही..
" तू काय ऐकणार आहेस.. कर तुला जसा हवा आहे तसा कर हो स्वयंपाक.."
" थॅंक यू आई.. माझी चांगली आई.."
काव्याने मग फक्त चटणीच नाही तर अख्खा स्वयंपाक हा हा करता करून टाकला..
सगळे जेवायला बसले.. तोंडात घास घेताच बाबांनी अशोकरावांनी ओळखले..
" आज स्वयंपाक कोणी केला?"
" मी केला बाबा? आवडला?"
" तुला किती वेळा सांगितले आहे कि अभ्यासाकडे लक्ष दे.. पण नाही.. तुझे आपले तेच. रांधा वाढा उष्टी काढा. ती समीरा बघ.. कशी अभ्यास करते, बाहेर स्पर्धेत भाग घेते. बक्षिसे मिळविते आणि तू? बाकीच्या घरी मुलींना शिकायला मिळत नाही म्हणून मुली रडतात.. आणि आपल्याकडे तर सगळे उलटेच आहे.. वडिल शिकवायला तयार आहेत.. पण मुलीची तयारी नाही.. वाढा.. आमटी वाढा.. चांगली झाली आहे.."
" आई, बाबा का मला ओरडतात?" काव्याने आईला रडत विचारले..
" कारण तू अभ्यास न करता या घरकामात गुंतायला बघते आहेस.." आईऐवजी समीराने उत्तर दिले.
"पण सगळेजण सारखे कसे असतील? मला नाही आवडत अभ्यास करायला ताई.." काव्या डोळे पुसत बोलली..
" मग भोग आपल्या कर्माची फळे.." समीरा नाक उडवत म्हणाली..
" आई ग.." काव्या आईच्या कुशीत शिरली..
"बाळा तुझे मन मला कळते.. पण बाबाही तुझ्या भल्याचेच सांगतात ना? तू शिकलीस तर तुलाच फायदा होणार. नाहीतर घर आणि मुल सगळेच करतात ग.. त्यांच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्या दोघींकडून.. यांनी पैसा खूप कमावला पण शिक्षण नसल्यामुळे लोकांनी खूप अपमान केला.. म्हणून शिकवायचे आहे तुम्हाला.."
" पण ताई करते आहे ना त्यांची इच्छा पूर्ण. मग मला करूदे ना माझ्या मनासारखे.. मला ना गावी जाऊन आपली शेती सांभाळायची आहे.. तिथे नवीन प्रयोग करायचे आहेत.."
" तू जरा डोक्यावर पडली आहेस का ग?" आईचे आणि काव्याचे बोलणे बाहेरून ऐकणारी समीरा न राहवून बोलली.. "बाबा आपल्याला परदेशी शिक्षणासाठी पाठवत आहेत आणि तू गावाला जायचे म्हणत आहेस.."
" हो.. कारण मला तुझ्यासारखे फाडफाड इंग्लिश नाही बोलता येत.. मला खूप भिती वाटते बोलायची.. पण मला झाडांमध्ये आणि या स्वयंपाकघरात रमायला आवडते.. आणि तसेही मी पदवी घेते आहेच ना?"
" हो पण आजच्या काळात ते पुरेसे आहे का? मी इथे इंजिनिअरिंग करून अजून पुढे काय शिकता येईल ते शोधते आहे.. आणि तू? शपथ लाज आणतेस हा.."
" ताई.. माझी लाज वाटते तुला?"
" बस करा ग मुलींनो.. हात जोडते तुमच्या समोर.. नका भांडू.. एवढ्या मोठ्या झाला आहात तरी.. जा झोपायला जा.."

दिवस जात होते. काव्याला पदवी मिळाल्यानंतर तिचे वडिल तिला पुढचे शिक्षण घेण्याचा आग्रह करत होते.. पण तिने नकार दिला आणि गावी जाऊन राहण्याचा आग्रह धरला.. काव्याचे विचार माहित असल्यामुळेच तिच्या मामाने तिच्यासाठी एक स्थळ आणले.. मुलगा गावातलाच होता. शिकलेला , चांगला सधन शेतकरी होता.. स्थळ नाकारण्यासारखे नव्हते.
पण बाबांच्या मनाला पटत नव्हते.. काव्याला मुलगा पसंत पडल्यावर आईने थोडा आग्रह केला.. नाईलाजाने बाबांनी लग्नाला होकार दिला.. समीराला परदेशी नोकरी लागली होती. त्यामुळे ती तिथे जायच्या आधी काव्याचे लग्न करायचे ठरले. जुन्या वळणाची माणसे आहेत. त्यांच्या काही अपेक्षा असतील. सगळे रीतीप्रमाणे व्हावे म्हणून अशोकराव मुलाच्या रोहितच्या घरी गेले. जुजबी बोलणी झाल्यावर त्यांनी विषयाला हात घातला.
" मानपानाचे कसे काय करायचे?"
" तो तर एक फार मोठा प्रश्न आहे बघा. आता बघा रोहित आमचा एकुलता एक मुलगा.. एवढी शेती आहे आमची. आमच्यापण अपेक्षा असणारच ना?"
"तेच तर.. तुम्ही सांगा तसे करू.."
" तुमच्या घरातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट हवी आहे आम्हाला.." आता हे काय मागणार, याचे टेन्शन आले अशोकरावांना..
" अहो साक्षात लक्ष्मी आणि नारळ द्या फक्त.."
" म्हणजे?"
" तुम्ही इथे यायच्या आधीच तुमच्या लेकीचे आमच्या लेकाशी बोलणे झाले.. लग्नाची छानछौकी टाळून साध्या पद्धतीने लग्न करू.. आणि तो पैसा अनाथाश्रमाला दान करू.. आधी आम्ही पण तयार नव्हतो..पण आमच्या लेकाने पटवून दिले आम्हाला.. देवदयेने इतके आहे कि हुंडा, वरदक्षिणा काही नको.. हे सगळे सांभाळू शकणारी गृहलक्ष्मी तुम्ही देताय हिच खूप मोठी गोष्ट आहे."
अशोकरावांचा विश्वास बसत नव्हता.. अगदी जवळच्या लोकांना बोलावून साध्या पद्धतीने लग्न झाले.. मोठीचे झाल्याशिवाय धाकटीचे लग्न केले म्हणून काही लोकांनी नाके मुरडली पण त्यांनी दुर्लक्ष केले.. काव्याचे लग्न झाले आणि दुसरीकडे लगेचच समीरा परदेशी निघून गेली..

दोघी होतील का सुखी आपापल्या आयुष्यात. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all