आम्ही चालवू हा पुढे वारसा..

कथा गुरूशिष्याच्या नात्याची

आम्ही चालवू हा पुढे वारसा


"गुरू ब्रम्हा गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा.. गुरू साक्षात परब्रह्म.. तस्मै श्रीगुरूवे नमः.." नेहमीप्रमाणे प्रार्थना झाली.. सगळी मुले शिक्षकांना नमस्कार करून आपापल्या वर्गात जायला निघाली..

" सम्यक, जरा थांब.." सुधाकरसरांची हाक आली.. सम्यकची कॉलर टाईट झाली.. त्याला सरांकडे जाताना बघून रूपेशचा चेहरा पडला.. 

"सम्यक माझे एक काम कर.. हे डस्टर आणि खडू वर्गात घेऊन जा.. मी आलोच.." सरांनी आपल्याला काम सांगितल्यावर सम्यकला खूप भारी वाटले.. तो ते घेऊन वर्गात गेला.. रूपेश त्याच्याकडे रागाने बघत होता. सम्यकचे त्याच्याकडे लक्ष नव्हते.. अथर्वने सम्यकला ते दाखवले..

" तो रूपेश खूप चिडतो आजकाल तुझ्यावर.."

" चिडू दे.. मी सरांचा लाडका आहे.. सर मला कामे सांगतात हे त्याला आवडत नाही.. " सम्यक म्हणाला..

" खरे सांगू सम्यक.. मला अजिबात वाटत नाही सरांचा तू लाडका आहेस ते.. ते तुला कामे सांगतात फक्त एवढेच.."

" जे काही असेल ते.. पण मला आवडते सरांची कामे करायला.. माझे आवडते सर आहेत ते.." सम्यक असे बोलल्यावर अथर्व गप्प बसला.. तोच सर आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केली.. 

     "दहावी अ" चा वर्ग हा सगळ्यात हुशार वर्ग होता.. शाळेत याच वर्गाची मुले पहिली येणार पण कोण ते माहित नव्हते. यावर्षी सम्यक आणि रूपेशमध्ये चुरस होती.. आणि हे अख्ख्या शाळेला माहित होते.. त्यात गणिताचे सुधाकरसर फक्त सम्यकला कामे सांगतात, त्याला जवळ करतात हे त्याला खटकायचे.. आणि तो त्याचा राग राग करायचा.. त्यात सम्यकला गणितात चांगले मार्क मिळायचे त्यामुळे रूपेशला असे वाटायचे कि हा सरांच्या पुढेपुढे करतो म्हणून तो पुढे जातो.. तो सर घेत असलेल्या खाजगी शिकवणीला जायचा.. त्यामुळे सरांनी आपल्याला महत्व द्यावे असे त्याला वाटायचे.. पण सरांसमोर हे असे बोलायची सोय नव्हती.. त्यामुळे तिथे तो शांत होता.. पण काही करून सम्यकची खोड मोडायची हे मात्र त्याने स्वतःशी पक्के ठरवले होते.. तशी त्याला संधीही मिळाली.. सर्व मुले मैदानावर खोखो खेळत होते.. खेळताना एका बेसावध क्षणी रूपेशने सम्यकला जोरात ढकलले.. सम्यक बाजूच्या खांबावर जोरात आपटला.. त्याच्या डोक्याला खोक पडली, रक्त वहायला लागले.. सगळेजण सम्यक भोवती जमा झाले. पीटीचे सर सम्यकचे रक्त थांबत नव्हते म्हणून त्याला घेऊन आतमध्ये गेले. तोवर सुधाकरसर खाली आले.. त्यांनी मुलांना काय झाले ते विचारले.. रूपेशच्या धाकाने कोणी बोलायला तयार नव्हते.. अथर्व पुढे झाला..

" सर रूपेशने धक्का मारला सम्यकला.." 

" अथर्व आणि रूपेश माझ्यासोबत चला.." सरांनी सांगितले..

दोघे सरांच्या पाठोपाठ एका

रिकाम्या वर्गात गेले.. बाजूच्या रूममध्ये दुसरे शिक्षक सम्यकला औषधपाणी करत होते..

" रूपेश, अथर्व जे सांगतो आहे ते खरे आहे?" सरांनी विचारले..

" ते सर.." रूपेशचे ततपप झाले..

" का केलेस असं तू?" सरांनी चिडून विचारले..

" सर मला माहित आहे.. तुम्ही सम्यकला कामे सांगता ते रूपेशला आवडत नाही.."

" अक्कल आहे का तुला? मी त्याला काम सांगतो म्हणून त्याला ढकलायचे?माझ्यासाठी तो एक साधा विद्यार्थी आहे फक्त.. लाडका वगैरे काही नाही.. तुझ्या बाबांना तुला जास्त मार्क मिळायला हवे आहेत म्हणून मी तुझ्यासाठी काय काय करतो आणि तू हे असे वागतोस?" रागाने सरांच्या तोंडून शब्द निघून गेले.. ते बाजूच्या वर्गात असलेल्या सम्यकने ऐकले.. त्याला खूप धक्का बसला.. त्याचे ते फक्त आवडते सर नव्हते त्याच्यासाठी त्याहून जास्त होते. मागच्या वर्षी त्याचे वडील एका अपघातात गेले होते. सरांना पाहिले कि नकळत त्याला त्याचे वडिल आठवायचे.. त्यांना कुठेतरी तो सरांमध्ये बघायचा.. तेच सर आपल्याला फक्त एक विद्यार्थी म्हणून बघतात हे त्याच्या मनाला खूप लागले. त्याचा चेहरा पडला.. वरील संभाषण दुसर्‍या शिक्षकांनीही ऐकले होते.. आचार्यबाई सम्यकला पाचवीपासून ओळखत होत्या.. त्याचे वडील गेल्याचेही त्यांना माहीत होते.. तो सरांच्या किती पुढेपुढे करतो हे त्यांनी पाहिले होते.. त्यामुळे त्याच्या मनाचा त्यांनी अंदाज लावला..

" सम्यक, मी जर चुकत नसेन तर घरी तुम्ही दोघे भाऊ आहात बरोबर?"

बाईंना काय बोलायचे आहे हे न कळलेल्या सम्यकने मान हलवली..

" मला सांग.. तुला असे कधी वाटते आई तुझ्यावर नाही तुझ्या भावावर जास्त प्रेम करते?"

" हो. आमची दोघांचीही त्यावरून जास्त भांडणे होतात.." बाईंच्या बोलण्याचा अजूनही अंदाज न आलेला सम्यक उत्तरला..

" पण आई दोघांवरही प्रेम करते बरोबर? पण कसे असते एखादा जर अडचणीत असेल, दुःखात असेल तर आईचा जीव त्या मुलात गुंततो?"

" हो बाई.."

" तसेच ना शिक्षकांचेही असते.. त्यांच्यासाठी सगळे विद्यार्थी समान असतात.. पण एखादा कमी असेल तर त्याच्याकडे ते थोडे जास्त लक्ष देतात.. याचा अर्थ एखादा लाडका किंवा एखादा दोडका असा होतो का?" सम्यकच्या डोक्यात हळूहळू जात होते.. खरेतर सरांनी त्याचा उपयोग करून घेतला होता.. पण त्यांच्याविषयी काही अढी राहू नये म्हणून बाईंनी किती छान शब्दात समजावले होते..

" बाई मलाना इतके दिवस पुढे जाऊन काय करायचे ते सुचत नव्हते.. पण आता मी ठरवले आहे कि मी मोठा होऊन शिक्षकच होणार.. ते हि तुमच्यासारखाच.."

त्या दिवसानंतर सम्यकने बाकीच्या गोष्टींपेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.. आणि शाळेतून तो पहिला आला.. ते बघून रूपेश आणि सुधाकरसरांचा चेहरा थोडा पडला होता.. पण आचार्यबाई मनापासून खुश झाल्या होत्या.  

     शाळा सोडल्यानंतरही दरवर्षी न चुकता सम्यक गुरुपौर्णिमेच्या दिवशी न चुकता शाळेत जायचा.. आणि सगळ्या शिक्षकांचा आशीर्वाद घ्यायचा. त्याचे शिक्षण पूर्ण झाले.. त्याला एका शाळेत नोकरीही मिळाली.. त्यावर्षी त्याने सगळ्या शिक्षकांसाठी भेटवस्तू घेतल्या.. त्यातल्या दोन अगदी खास होत्या.. सगळ्यात आधी तो सुधाकरसरांकडे गेला.. ते महागातले पेन बघून त्यांना थोडे लाजल्यासारखे झाले..

" सम्यक हे मला?"

" हो सर.. माझ्या आयुष्याला दोन व्यक्तींमुळे कलाटणी मिळाली.. त्यापैकी एक तुम्ही आहात.. तुमच्यामुळेच मला कळले कि कोणत्याही व्यक्तीकडून अपेक्षा ठेवू नये.. तुम्हाला माहीत नसेल सर पण तेव्हा तुमच्यामध्ये मी माझ्या मृत वडीलांना बघत होतो.. पण तुमच्या एका संभाषणाने ते सगळे संपून गेले.. पण मला आता त्याचे काही वाटत नाही.." सरांचा बदललेला चेहरा बघून सम्यकने वाक्य पूर्ण केले.. " पण एक सुचवतो सर.. मान्य आहे तुमच्याकडे खूप मुले असतात.. पण त्यांच्याकडे खूप कमी शिक्षक असतात.. त्यामुळेच ते त्यांच्याकडे वेगवेगळ्या भावनेने बघत असतात.. त्यांच्या भावना जाणून घेतल्या नाहीत तरी चालेल. पण त्यांना दुखावू तरी नका. कोवळे भावविश्व असते ते.. कोमेजून जाऊ शकते.." सम्यक पटकन तिथून निघून आचार्यबाईंकडे आला.. त्यांच्या हातात त्याने एक छानशी साडी ठेवली..

" बाई त्या दिवशी जर तुम्ही नसता तर कदाचित माझ्या मनात सरांविषयी अढी राहिली असती.. मी पुढे कसा वागलो असतो माहित नाही.. पण त्यांच्याविषयी किल्मिष येऊ न देता तुम्ही मला बाहेर काढलेत त्याची आठवण आहे हि.."

" मी काहि विशेष नाही रे केले.. माझ्या गुरूंनी जे माझ्यासाठी केले तेच मी तुझ्यासाठी केले.. हाच वारसा तू पुढे चालू ठेव म्हणजे झाले.." बाई डोळ्यातले पाणी पुसत म्हणाल्या..

" तुझ्याकडे जी तळमळ आहे मुलांना घडविण्याची त्याचा उपयोग एका शाळेपुरते स्तिमित न करता जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल असा शिक्षणाधिकारी बन.."

आणि खरेच सम्यकने स्पर्धा परिक्षा देऊन ते पद मिळवून आपल्या गुरूंची गुरूदक्षिणा पूर्ण केली..