आम्हाला टॅक्सी मिळेल का टॅक्सी (भाग 2)

पुढच्या प्रवासात काही अघटीत तर घडणार नाही ना ?
सकाळी पाचचा गजर झाल्याझाल्या सुरेश उठला अन् सकाळची आन्हिकं आटोपून बरोब्बर सहा वाजता तो गाडी घेऊन दिलेल्या पत्त्यावर उभा राहिला.

पांढरा शर्ट, काळी पँट अन् लाल रंगाचा टाय लावलेले रूबाबदार सबनीस ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर स्थानापन्न झाले.

"पुलाच्या पलीकडच्या कॉलनीत घ्या. आपल्याला दोन मॅडमना घ्यायचंय.. अन् मग पुढे मलकापूर!" सबनीसांनी सांगितलं अन् सुरेशनं सांगितलेल्या दिशेनं गाडी वळवली.

कॉलनीच्या प्रवेशद्वाराशी दोन मध्यमवयीन महिला गाडीत मागल्या सीटवर बसल्या. त्यातल्या एकीने पिवळ्या रंगाची साडी अन् दुसरीने केशरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता हे सुरेशच्या नजरेनं टिपून घेतलं.. अन् गाडी मलकापूरच्या दिशेने वेगाने धावू लागली.

बडनेऱ्याच्या पुढच्या पेट्रोलपंपावर गाडी वळवताच सबनीसांनी गाडीत 2000 रुपयांचं डिझेल भरून घेतलं अन् सुरेशनं आठवणीनं त्याची पावती घेऊन पुढच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिली. त्याचा मालक पावत्यांच्या बाबतीत फारच आग्रही होता.

आता थेट मलकापूर! गाडी सुसाट धावू लागली. गाडीत बसल्यापासून तिघांच्या गप्पा सुरू झाल्या.. कधी ऑफिसचा विषय.. तर कधी घरगुती.. कधी एकमेकांच्या मुलाबाळांची चौकशी असं करत मजेत प्रवास सुरू होता.. अधूनमधून ते सुरेशशी संवाद साधत अन् त्यालाही गप्पांत सामील करून घेत.

मलकापूर आलं.. अन् तिघे खाली उतरून एका इमारतीच्या दिशेने चालू लागले. तेवढ्यात सबनीस मागे वळले अन् त्यांनी शंभरची नोट सुरेशच्या हातात ठेवत त्याला सांगितलं.. "तू जेवून घे! आम्हाला उशीर होईल!"

सुरेशनं एकवार त्या नोटेकडे बघितलं.. शंभरची नोट!! त्याला मुलीच्या शाळाप्रवेशासाठी काढलेलं कर्ज अन् त्याची परतफेड आठवली अन् त्यानी ती नोट शर्टच्या खिशात जपून ठेवली.

दिवसभर सावलीत वेळ काढल्यावर सुरेश जवळच्या एका दुकानात गेला अन् एक हल्दीराम नमकीनचं दहा रुपयांचं पाकीट घेऊन आला. त्याला खरं तर खूप भूक लागली होती. पण मिळालेले पैसे शिल्लक टाकावे म्हणून त्याने एक कट चहा घेतला अन् नमकीन मधले दोन घास खाऊन बाकी चिवडा मुलीसाठी बांधून एसी जवळच्या खोबणीत ठेवून दिला.

सहा वाजून गेले तरी सबनीस अन् त्यांच्या महिला सहकाऱ्यांचा पत्ता नव्हता. "एकदा फोन लावून बघतो!" सुरेशच्या‌ मनात आलं.. पण त्याने तो विचार मनाआड केला.

मात्र साडेसहा वाजायला आले तसा सुरेशचा धीर सुटू लागला.. त्याने सबनीसांना फोन लावला.. तर फक्त रिंग जात होती.. फोन उचलला जात नव्हता.

बरोब्बर सात वाजता सबनीस अन् त्यांच्या महिला सहकारी गाडीजवळ येताना दिसले अन् सुरेशचा जीव भांड्यात पडला.

"आज फारच उशीर झाला!" सबनीस म्हणाले.."मिटींग खूपच लांबली अन् फोन सायलेंट होता.. तुझा फोन आल्याचं कळलंच नाही. फार वाट पाहायला लागली का?"

"नाही असं काही नाही!" सुरेश संकोचानं म्हणाला.

"तुला शंभर रुपये एक्स्ट्रा देतो.. उशीर झाला आहे खूप!" पिवळ्या साडीतल्या मॅडम बोलल्या अन् इतर दोघांनी होकारार्थी मान डोलावली.

गाडी पुन्हा अमरावतीच्या दिशेनं पळू लागली. एकतर पौर्णिमेची रात्र.. त्यात थंडगार हवा.. अन् काळ्याभोर नागासारखा वेटोळे घेत जाणारा लांबच लांब मोकळा रस्ता!

गाडीच्या खिडक्यांच्या सर्व काचा सर्वानुमते खाली झाल्या अन् थंडगार हवेच्या झुळकीने मागे बसलेल्या दोन्ही मॅडमचे डोळे मिटू लागले.

राजन सबनीस आणि चमूचा परतीचा प्रवास सुरू झालाय.. काय घडेल पुढे? वाचू या पुढील भागात!

🎭 Series Post

View all