आम्हाला टॅक्सी मिळेल का टॅक्सी (भाग 1)

तिघांसाठी टॅक्सी हवी आहे.. तुम्ही देऊ शकता का?

*आम्हाला टॅक्सी मिळेल का.. टॅक्सी???*

*ह्या कथेतील स्थळकाळ, पात्र, संदर्भ अन् घटना काल्पनिक असतीलच असं नाही. त्यामुळे ह्या कथेचं कशाशीही साधर्म्य आढळून आल्यास तो योगायोगच असेल असंही समजू नये.*

"हॅलो, आयकर विभागातून मी राजन सबनीस बोलतोय. मला उद्यासाठी टॅक्सी हवीय.. मलकापूरला जायचंय.. ऑफिसचा टूर आहे.. जमेल का यायला??" रात्री आठ वाजता सुरेशला फोन आला.

"किती वाजता जायचंय साहेब?" सुरेशनं चौकशी केली.

"मलकापूर इथून 200 किलोमीटर दूर आहे. रहदारीचा रस्ता आहे. जायला पाच तास सहजच लागतील अन् यायला पाच तास! शिवाय दोन मॅडम आहेत सोबत! रात्री लवकर परत यावं लागेल! त्यामुळे सकाळी सहाला निघू!" सबनीस साहेबांनी सुचवलं.

"तुम्ही काळजी करू नका, साहेब. मी चार तासांत पोहोचवतो मलकापूरला!" सुरेश म्हणाला.. "आपली विस्टा गाडी आहे अन् एसी चा रेट 15 रुपये किलोमीटर पडेल, साहेब!" सुरेशनं व्यवहाराची गोष्ट सगळ्यात आधी पक्की केली अन् पाच वाजताचा गजर लावून झोपी गेला.

सुरेश \"राहुल ट्रॅव्हल एजन्सी\"त कामाला होता. त्याला स्वतःलादेखील ड्रायव्हिंग येत होतं. पण तो शक्यतोवर ऑफिसातलं काम सांभाळे. ट्रॅव्हल एजन्सीत ड्रायव्हर्सची चमू वेगळी होती. त्यामुळे सुरेशला इच्छा असूनही ड्रायव्हिंगचं काम मिळत नव्हतं.

राहुल ट्रॅव्हल्स हे सरकारी आणि खाजगी कार्यालयांना दौरे करण्यासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार गाड्या उपलब्ध करून देत असे. 

खरं तर ह्या गाड्यांतून प्रवास करणारे सगळे उच्च अधिकारी होते अन् त्यांच्याजवळ स्वतःच्या गाड्या देखील होत्या. पण लांबवरचे दौरे असले की ते राहुल ट्रॅव्हल्सच्या गाड्यांना पसंती देत. कारण स्वतः इतक्या दूर गाडी चालवणं.. शिवाय ऑफिसचं काम.. खूपच त्रासदायक होई.

राहुल ट्रॅव्हल्सच्या गाड्या उत्तम प्रकारच्या असत आणि ड्रायव्हर्स देखील प्रोफेशनल असत. त्यामुळे शहरातील मोठ्या कार्यालयांची राहुल ट्रॅव्हल्स ही पहिली पसंती होती.

गेल्या महिन्यात अशाच एका दौऱ्यावर गेलेल्या टॅक्सीच्या अपघातात राहुल ट्रॅव्हल्सचा एक ड्रायव्हर राजेश मृत्यूमुखी पडला अन् सुरेशनं त्याच्या जागेवर स्वतःची वर्णी लावून घेतली.

खरं तर ड्रायव्हरचं काम सोपं नव्हतंच! सकाळी लवकर उठा.. दिवसभर ड्रायव्हिंग करा.. अन पोटभर जेवता यायचं नाही कारण खूप जेवलं तर झोप यायची भीती! पण तरीही सुरेशला ड्रायव्हिंग करायचं होतं. एक तर त्याला गाडी चालवणं मनापासून आवडायचं. शिवाय ड्रायव्हरला मिळणाऱ्या दैनिक भत्त्याचं देखील त्याला आकर्षण होतं. त्याची मुलगी नुकतीच शाळेत जाऊ लागली होती. त्याने चांगल्या महागड्या शाळेत प्रवेश मिळविण्याकरिता कर्ज काढून दहा हजार रुपये उभारले होते. जर ड्रायव्हरचं काम मिळालं तर त्यासाठी मिळणाऱ्या भत्त्यातून तो लवकर कर्जफेड करू शकला असता.

राजन सबनीस व त्यांची चमू उद्या सकाळी प्रवासाला निघणार आहेत. कसा होईल त्यांचा प्रवास ? काही संकटे तर येणार नाहीत ना? वाचू या पुढील भागात!

🎭 Series Post

View all