आमच्याकडे असं नाही करत.. अंतिम भाग

कथा सासूसूनेची
आमच्याकडे असं नाही करत.. भाग ३

मागील भागात आपण पाहिले की वर्षा मीराला स्वतःची बाजू मांडायला सांगते. आता बघू पुढे काय होते ते.


" हे काय गं.. हे काय करते आहेस? पुरणात खवा कशाला?" कुसुमताई स्वयंपाकघरात येत म्हणाल्या. "पुरण म्हणजे फक्त डाळीचं असावं. त्यात वेलची आणि जायफळीचा फक्त स्वाद असावा. हे खवा वगैरे म्हणजे पुरण बिघडलेलं सुद्धा समजणार नाही. आमच्याकडे असं नाही करत. माझी आई तर अशी पुरणपोळी करायची की खाल्ल्या खाल्ल्या ती तोंडात विरघळून जायची."

" हो का? मग तुम्हीच करा पुरणपोळ्या. मी पण खाईन म्हणते तोंडात विरघळलेल्या पुरणपोळ्या. " मीरा गॅस बंद करत म्हणाली.

" अग पण हे तू केलेलं पुरण वाया जाईल ना?"

" वाया का जाईल? मी फ्रिजर मध्ये ठेवते ना. ते नंतर पण खाता येईल. आज आपण तुम्ही केलेल्या पोळ्या खाऊ."

" नको.. त्या शिळ्या पुरणाला वास लागतो. त्यापेक्षा आज तू कर. मी पुढच्या वेळेस करते." लगबगीने कुसुमताई बाहेर जाऊ लागल्या. जाताना त्यांची नजर उकडलेल्या बटाट्याशेजारी ठेवलेल्या उडदाच्या डाळीवर पडली.

" हे काय? बटाट्याच्या भाजीत तू डाळ टाकणार? जयेशला आवडत नाही माहिती आहे ना? आमच्याकडे अशी भाजी होत नाही."

" आई, मी लग्न करून या घरात आले, त्याच्या दुसर्‍या दिवशी तुम्ही हिच भाजी केली होती. आठवते का?" मीराने शांतपणे विचारले.

" छे बाई.. एवढ्या जुन्या गोष्टी कोणाला आठवणार?"

" तुम्हाला नसेल आठवत पण मला आठवतं. कारण या आधी मी बटाट्याची अशी भाजी खाल्ली नव्हती. माझ्या माहेरी आई यात कांदा टाकून करायची. तुम्ही करायचा तेव्हा मी बघितली आणि तशीच केली. त्यात पहिल्यांदा चुकून मीठ जास्त पडले म्हणून जयेश चिडला होता पण नंतर तो ती भाजी प्रेमाने खाऊ लागला होता. नंतर अचानक तुम्हाला ती भाजी आवडेनाशी झाली. म्हणून मग ती भाजी करणंही बंद झाले पण तुम्ही कारण दिलेत ते जयेशचे. तुम्हाला वाईट वाटेल म्हणून बोलले नाही की तुम्ही नसताना मी अशीच भाजी करते आणि जयेश आवडीने खातो. मग ही भाजी तुमच्याकडे कशी होत नाही?"

" ते.. माझी करायची पद्धत वेगळी होती." कुसुमताई म्हणाल्या.

" हो.. पण मग कधी ती पद्धत सांगितलीत का? तुमच्या पद्धतीचा स्वयंपाक करताना मी मला आवडतो तो स्वयंपाक करायचाच काय पण खायचा सुद्धा विसरले आहे. पण तुम्ही कधी म्हणालात, आज तुझ्या आईच्या पद्धतीने कर भाजी?"

" ते आमच्या जिभेला वेगळ्या चवीची सवय नाही. इतके वर्ष तेच जेवण जेवून तसंच आवडतं माणसाला."

" मग जशी तुमच्या जिभेची इतक्या वर्षांची सवय जात नाही तशी माझी जाईल असं कसं वाटतं तुम्हाला? मलाही कधीतरी मी लहानपणापासून जे खाल्लं आहे ते खावंसं वाटत असेलच ना? पण तुम्ही कधी तो विचार केलात?
खरंतर इतक्या वर्षांनंतर सुद्धा मी तुम्हाला या घरातली वाटत नाही किंवा तुम्हाला मला या घरात सामावून घ्यायचे नाही हेच खरे असावे.. नाहीतर सतत आमच्याकडे हा शब्द वापरला नसता तुम्ही."

" ती बोलायची पद्धत असते."

" ही अशी? समोरच्याला परकं करणारी?"

" मीरा, थोडा चहा मिळेल का?" आरोळी ठोकत जयेश आत आला. दोघींचा उतरलेला चेहरा बघून तो शांत झाला.

" काही झाले आहे का?"

" काही नाही रे.. मी फक्त तिला आमच्या." बोलता बोलता कुसुमताई थांबल्या. "आपल्या पद्धतीची भाजी कशी करायची ते सांगत होते."

" एवढंच ना? तुमचे चेहरे बघून असं वाटतं आहे की त्सुनामी आली आहे. बरं आवरा लवकर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे आधीच भूक लागते. तेवढा चहा मिळाला तर?" जयेश सांगून बाहेर गेला.


" माझं ना लग्न होऊन मी सासरी आले ना तेव्हा उणीपुरी वीस वर्षांची होते. एकत्र कुटुंब. घरातला सारा कारभार सासूबाईंकडे असायचा. मोठी कर्तृत्ववान बाई. त्यांच्याकडे बघितलं की वाटायचं माणसाने असंच असावं.. त्यांच्या तोंडात नेहमीच वाक्य असायचं आमच्याकडे हे असं असतं. त्यांच्यासारखंच वागण्या बोलण्याचा मी प्रयत्न केला पण मला जमला नाही. त्या गेल्या आणि तू आलीस.
माझा प्रयत्न काही संपला नव्हता. मी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत होते. पण बहुतेक पाऊल खुजं होतं माझं. त्यांनी कधी मला समजून घेतलं नाही त्यामुळेच मी ही तुझ्या बाजूने विचार केला नाही. पण यापुढे मी करीन हो.." कुसुमताई मीराला खांद्यावर थोपटत म्हणाल्या. मीराचेही डोळे पाणावले. पण यावेळेस आनंदाश्रूंनी. तिला वर्षाचा सल्ला आठवला जोपर्यंत बोलत नाहीस तोपर्यंत हेच होत राहणार.



आमच्याकडे असं नसतं किंवा असतं. सासूसुनेचा नेहमीचा वादाचा विषय.. खरतर आमच्या किंवा माझ्या या शब्दापेक्षा आपला हा शब्द जास्त जवळचा वाटतो. पण हे समजत नाही आणि कुटुंबात धुसफूस होते. ते दाखवण्याचा माझा एक प्रयत्न. कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all