Login

आमची पाठ सोडा भाग 1

अति तिथे माती
आमची पाठ सोडा भाग 1

©️®️शिल्पा सुतार

जलद कथा लेखन

अनघा, आकाशच नविन लग्न झालं होतं. आकाश समजूतदार चांगला मुलगा होता. घरी काही का होतं नाही त्या दोघांचं छान सुरु होतं. एकाच गावात सासर, माहेर होतं. छान शिकलेली अनघा नोकरी करत होती.

तिने बघितलं सहा वाजले. चला निघायला हवं. घरी ही खूप काम असतं. नुसत आमचं नाही तर नेहाताईंच्या घरच ही काम मलाच कराव लागतं. त्या इकडून दळण, भाज्या, तयार पदार्थ नेतात. परत त्यांचे पाहुणे इकडेच असतात. काय करू नणंद बाईंना काही म्हणता ही येत नाही. नेहा जवळ रहायला होती. तिचे सासू सासरे गावी होते.

काहीतरी करायला हवं. आता हे सहनशीलतेच्या पलीकडे झालं आहे. तिने लॅपटॉप बंद केला. बॅग भरली. ती घरी निघाली. तिचा फोन वाजत होता. आई... ती खुश होती.

" काय ग गाडीवर आहेस का?" आईने विचारलं.

" नाही आई, आता घरी निघणार होते. बोल ना."

" काही नाही सहज फोन केला होता."

" अग आता हल्ली नुसतं थकायला होतं. घर ऑफिस अजिबात उसंत नाही." अनघा सांगत होती.

" मी कधीची म्हणते आहे एवढी धावपळ करत जावू नकोस."

" काय करणार? कोणी समजून घेत नाही. आई ही नेहा जरा दूर रहायला हवी होती. तिच्यामुळे गडबड होते. नाहीतर आमच्या चौघांच विशेष काम नसतं."

"आता काय झालं? "

" अग जेव्हा बघावं ती आमच्याकडे असते. आली की जेवल्याशिवाय जात नाही. मला काम करून करून थकायला होतं. इकडून सगळं नेते. पर्वा तिच्यासाठी लाडू केले. आज काय काम असेल सांगता येत नाही. आमचं ही नवीन लग्न झालं आहे. आम्हाला एकमेकांसाठी वेळ मिळत नाही. खर्च किती होतो." अनघा चिडली होती.

" तुझ्या सासुबाईंना ते समजत नाही का?"

" तेच ना. त्यांना मुलीचा, जावयाचा पुळका. नेहाला हे करून दे ते करून दे. मला ना खूप कंटाळा आला आहे. माझ्या नणंदेला ही समजत नाही का. एखाद्याचा किती गैरफायदा घ्यायचा."

" समजत असेल. होत तो पर्यंत फायदा घेत रहातात. " आई म्हणाली.

" मी काय करू अस झालं आहे. "

"थोडी अलिप्त हो. पण तुला ते जमणार नाही. तू अगदी साधी आणि चांगली आहेस." आई म्हणाली.

" हो ना माझी चुकी झाली. सुरवातीला त्यांच करायला नकार द्यायला हवा होता. चल मी घरी जायला निघते. "

" काळजी घे ग." तिने फोन ठेवला.

अनघा ऑफिसहून आली. चपला काढल्या. पाणी घेतलं.

"अनघा, नेहाचा फोन आला होता. तिचे मोठे दीर जाऊबाई आलेले आहेत. ती पाहुण्यांना घेवून इकडे येते आहे. काय करतेस? आधी चहा पाणी कर. मग स्वयंपाकाला लाग." रमाताई सांगत होत्या.

अनघाने तोंड वाकड केल. मी दिवसभर ऑफिसमधे थकते. घरी आलं की हे असं. त्यांचे पाहुणे कश्याला सारखे पाहुणचारासाठी इकडे हवेत. त्यांना त्यांच करता येत नाही का? वैताग आला आहे.

आज ठरवलं होतं मस्त थोड्या वेळ आराम करू पण नाही मला दोन मिनिट ही हे लोक उसंत मिळू देत नाही. तिने कांदे कापायला घेतले. पोहे शोधून ठेवले. चहा, पोहे करते. जेवायचं नको. एवढा घाट कोण घालेल. परत कोणाची मदत नाही.

अनघा आली. पाहुणे पुढे बोलत बसले. अनघा पोहे करत होती. ती डिश घेवून पुढे गेली. नेहाच्या चेहर्‍यावर नाराजी होती.

"अग नेहा, चहा पोहे झाले की अनघा स्वयंपाक करणार आहे." रमाताई म्हणाल्या .

"नाही मावशी आम्हाला अजून एका ठिकाणी जायचं आहे. तिकडून नेहाकडे जावू. नेहा नुसताच मसाले भात कर. चालेल पण आज घरी जेवू." प्रिया तिची जाऊबाई म्हणाली. त्यामुळे नेहाच्या चेहर्‍यावर नाराजी होती. तिला वाटल मस्त पैकी अनघा काम करेल मला आराम होईल.

"अनघा अग चहा आण. हिला ना सगळं सांगाव लागत." रमाताई बाहेरून आवाज देत होत्या.

"हो आई." तिने पोहे खाली ठेवले. पटकन चहा गाळला.

🎭 Series Post

View all