"आमचे अण्णा"

This is a short memorial story about my uncle ....

    गावची यात्रा म्हटलं की, सणासुदीपेक्षाही जास्त उत्सुकता वाटायची. दिवाळी सणाला जेवढी मजा येत नाही, तेवढी यात्रेत मजा येते असंच मला नेहमी वाटायचं.
   पण आताशा ती पहिली मजा कुठेतरी लोप पावली की काय असंच वाटत राहतं. मनाच्या गाभाऱ्यात त्या जुन्या आठवणी अजून तशाच ताज्यातवान्या आहेत.
    यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री गावी पोचलो की सकाळी सकाळी आमच्या कुंभार गल्लीतून माझा एक फेरफटका ठरलेला असायचा. शक्यतो वर्षातून  एकदा-दोनदाच गावी जाणं असल्यामुळे मला सगळ्या काका काकूंच्या घरी जाऊन चहा घ्यावाच लागायचा. नको म्हटलं तर त्यांचं वाक्य ठरलेलं असायचं,"तुम्ही काय बाबा, पुण्याची माणसं, तुम्हाला आमच्यातला चहा चालतूय व्हय....??" मग बळंच चहा प्यावा लागायचा. एक-दोन नाही चांगले आठ-दहा कप चहा होणार हे ठरलेलं असायचं...
    पण घरातून बाहेर पडून गल्लीत प्रवेश केला की पहिले कुणी व्यक्ती मला भेटत असतील तर ते गुंडा अण्णा... अण्णा म्हणजे पण माझे चुलतेच. पण आम्ही सगळे त्यांना अण्णा म्हणायचो. माझं लग्न झाल्यानंतर ज्या ज्या वेळी मी तिथं गेलो त्यावेळी अण्णांचा पहिला प्रश्न असायचा," काय खुशखबर हाय का???" मी "नाही" म्हणालो की पहिल्या चार-पाच शिव्या हासडून ते मोकळे व्हायचे आणि म्हणायचे,"ह्यात्तिच्या... काय उपयोग नाही तुमचा... आता दे जरा तंबाखू.." लग्न झाल्यावर चौथ्या वर्षी मला मुलगा झाला तेव्हापासून अण्णांनी तो प्रश्न मला पुन्हा विचारला नाही.
    तसं बघायला गेलं तर माझे सगळे चुलते वेगवेगळ्या प्रकारचे नमुनेच होते असं म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा... कुणी प्रेमळ, कुणी रागीट, कुणी प्रेमातून राग व्यक्त करणारं तर कोणी रागातून प्रेम व्यक्त करणारं... पण अण्णांचा स्वभाव त्यातल्या त्यात थोडासा वेगळाच होता.
    कोणतीही चांगली वाईट-गोष्ट त्यांनी शिवी न देता कधीही सांगितले नाही. पण त्यांच्या शिव्या पेक्षा त्यांचं माझ्यावरचं प्रेम मात्र खूप होतं. त्यांच्याविषयीच्या आठवणींचा खच माझ्या मनात साठलेला आहे, त्या सगळ्या सांगायच्या म्हटलं तर अख्खी कादंबरी तयार होईल... खरं तर माझं बालपण माझ्या सगळ्या चुलत्यांच्या देखरेखीखाली गेलं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे.
    अण्णा वारले ही गोष्ट जेव्हा कानावर आली तेव्हा मात्र मनाचे धागे तट् तट् तुटल्यासारखे वाटले. ही बातमी यायच्या महिनाभर आधी मी त्यांची भेट घेऊन आलो होतो. त्यांना गुडघेदुखीचा त्रास असल्यामुळे आताशा चालता येणं बंद झालं होतं.आकाशाला गवसणी घालणारा पक्षी जसा पंख तुटल्यावर एकाकी,निराधार होतो तसंच काहीतरी त्यांच्या बाबतीत घडलं होतं. त्यांना घराबाहेर पडता येणं अशक्यप्राय होतं. काकूंनी मात्र त्यांची खूप सेवा केली. पण मृत्यूपुढे माणूस हतबल असतो... माणूस कितीही पराक्रमी असू द्या एक ना एक दिवस त्याला मृत्यू पुढे शरणागती पत्करावीच लागते...
    आमचे अण्णा कुणी क्षत्रिय नव्हते, वीर नव्हते कुणी संत-महात्मेही नव्हते पण जे काही होते त्यांच्यासारखे दुसरे कोणीच असू शकत नाही...
    मनुष्याचा पृथ्वीवरचा प्रवास संपला की तो अनंताच्या प्रवासाला निघून जातो परंतु त्याने या धरतीवर सोडलेल्या आठवणी मात्र कधीच न मिटण्यासारख्या असतात.
    अजूनही दरवर्षी मी यात्रेला जातो... पण घरातून बाहेर पडून गल्लीत प्रवेश करतानाच पहिल्यांदा भेटणारा व्यक्ती आता मला भेटत नाही.....

                लेखक: मंगेश कुंभार