Dec 01, 2023
Readers choice

अंबाला To वाघा बॉर्डर Vai अमृतसर

Read Later
अंबाला To वाघा बॉर्डर Vai अमृतसर
अंबाला to वाघा बॉर्डर vai अमृतसर
एका हिंदी फिल्मच्या शूटिंगसाठी मी हरियाणातील अंबाला सिटी येथे राहायला होतो. तीस दिवसांच्या शूटिंग नंतर निर्मात्यांनी दहा दिवसाचा ब्रेक घेतला. काही दिल्लीची व चंदीगडची लोकं कामासाठी होती ती आपआपल्या घरी निघून गेली. सुट्टीचे सुरुवातीचे दोन-तीन दिवस अगदी सहज निघून गेले. पुढच्या दिवाशीमात्र काय करावे काहीच सुचत नव्हतं. दिवसभर मोबाईल चिवडत बसायचो. पाचव्या दिवाशीमात्र खूप बोअर व्हायला लागलं. मग आम्ही अमृतसरला जायचं ठरवलं. \"म्हटलं चला सुवर्णमंदिर तरी पाहून येऊ.\" कारण अमृतसरला जाण्यासाठी तिथून रेल्वे उपलब्ध होत्या. आम्ही सकाळी दहाच्या रेल्वेने जायचं ठरवलं. मी माझा सहकारी प्रवीण याला जाण्यासाठी विचारलं तर तो बोलला, "तुम्ही जाऊन या मी नाही येत, रेल्वेच्या प्रवासात खूप हाल होतील यार". मग दुसऱ्यादिवशी मी व माझे हरियाणातील मित्र पारस व साहिल असे तिघेजण अंबाला रेल्वे स्टेशनला आलो. दिल्ली-अमृतसर गाडीने आम्ही अमृतसरला निघालो. दुपारी चार वाजता आम्ही अमृतसर रेल्वे स्टेशनला पोहोचलो. रेल्वेतून उतरल्यावर मला आपल्या मुंबईच ईस्ट-वेस्ट आठवलं. मी विचार करू लागलो मंदिर कोणत्या बाजूला असेल? मग लोकांना विचारत-विचारत आम्ही ई-रिक्षाने मंदिराकडे आलो.
रिक्षातून खाली उतारल्याबरोबर पारस बोलला, आपण आगोदर जालियनवाला बाग बघुयात. नंतर एकदा मंदिरामध्ये प्रवेश केला की तिकडेच फिरू. आम्ही दोघे त्याच्या मताशी सहमत झालो. लोकांच्या गर्दीतून वाट काढत, तेथील इमारती न्याहाळत आम्ही जालियनवाला बागकडे निघालो. चालताना मी तेथील इमारतीचे व मार्केटचे फोटो काढत होतो. सुवर्ण मंदिराच्या शेजारील परिसर ऐतिहासिक बनवला आहे. तेथील इमारतींची रचना, त्यांचे रंग, रस्ते,पथदिवे आपल्याला नवीन जगात नेतात. मी जेव्हा तिघांचा सेल्फी फोटो घेऊ लागलो तेव्हा साहिल बोलला, "अगर हम रात को यहा आए ना, तो हमे लगेगा कि फॉरेन में आए है." आम्ही पुढे जात असताना एक माणूस \"चलो वाघा बॉर्डर - वाघा बॉर्डर\" असं म्हणत आमच्याजवळ आला व विचारू लागला, "साहब, चलो वाघा बॉर्डर. आपको वाघा बॉर्डर आना है तो चलो गाडी निकल रही है.." तो काय बोलतोय हे मला काहीच समजलं नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. साहिलमात्र त्याच्याशी बोलू लागला. तेवड्यात माझं लक्ष दुसरीकडे गेलं कारण तिकडे आणखी तीन -चार माणसं "चलो वाघा बॉर्डर-वाघा बॉर्डर" असं ओरडत होते. मग मी साहिलकडे वळलो तोपर्यंत साहिलने वाघा बॉर्डरला जायचा प्लॅन केला होता. तो लगेच मला बोलला, "चलो भाई चलते है, परेड देखने को मिलेगी." मी थोडा विचार करू लागलो तेवड्यात तो माणूस बोलला, "हा साहब आपको परेड देखनेको मिलेगी साडे छे बजे शुरु होती है". मी जरा गोंधळलो , कारण हा अचानक ठरलेला प्लॅन होता. आमच्या कोणाच्या मनी-ध्यानी नव्हतं. मी बोललो, "हा चलो ठीक है." असं बोलत असतानाच त्या माणसाने एक चिठ्ठी बनवली आणि बोलला "आप तीन लोगोंके आणे जाणे के तिन सौ रुपये होते है, अभी सौ देदो बाकिके बाद में दे देना. आप अपना मोबाईल नंबर बोलो". साहिलने त्याचा नंबर सांगितला. त्याने लगेच त्या चिट्टीवर लिहिला आणि अर्धी चिठ्ठी फाडून साहिलकडे दिली जिच्यावर त्याचं नाव व नंबर लिहिला होता. त्याचं नाव होत मनदीप. साहिलने त्याला शंभर रुपये दिले. पैसे घेत तो बोलला, "आप थोडी देर जालियनवाला बाग के गेट पे रुको. मै और दो-तीन लोग ढुंडता हुं." आम्ही तिघे एकमेकांकडे पाहू लागलो. साहिल त्याला बोलला. "अरे वो सौ रुपये हम जाते वक्त देंगे, अभी वापस देदो. आप कही निकल गये तो." मनदीप बोलला, "भाईसाहब, मै कही नही जा रहा, बस और दो-तीन लोग ढुंडता हुं ताकी गाडी फुल हो जाये. आपको कुछ ऐसा लगा तो मुझे कॉल कर लेना, ये हमारा रोज का है मुझपे विश्वास रखो." पारस बोलला , "चलो ठीक है, हम वही रुकते है आप जल्दी आ जावो. अभी चार बजके पचास मिनटं हो चुके है, लेट हुये तो परेड देखने को नही मिलेगी." ओके म्हणून तो निघून गेला मला मात्र चिंता वाटू लागली म्हटलं गेले शंभर रुपये. आम्ही जालियनवाला बागेच्या गेटजवळ आलो. थोडावेळ पाहणी केली, फोटो काढले. मनदीपचा काही कॉल आला नाही. मी साहिलला बोललो, "भाई कॉल कर उसको पाच बज चुके है." कॉल केल्यावर समजलं की आणखी पाच मिनिटे थांबा बोलला तो.
आम्ही त्याची वाट पाहत उभा होतो तेवड्यात तिथे आणखी एक वाघा बॉर्डर वाला आला आणि बोलू लागला, "चलो साहब, वाघा बॉर्डर जाना है? गड्डी निकल रही है". आम्ही बोललो, जाना है, मगर हमारी मनदीप से बात हो चुकी है. आणि त्याला ती चिठ्ठी दाखवली. तो बोलला, "कहा है मॅण्डि? अभि आपको निकलना पडेगा वरणा परेड नही मिलेगी." असं बोलून तो तिथून निघून गेला. साहिलने त्याला कॉल केला त्याने उचलला नाही. मला जास्तच डाऊट यायला लागला की आपल्याला त्याने नक्की फसवलंय म्हणून. आम्ही त्याला शोधण्यासाठी थोडं पुढे गेलो. तिथे एक मुलगा वाघा बॉर्डर-वाघा बॉर्डर म्हणून ओरडत होता. त्याला साहिलने विचारले, "भाई आपने मनदीप को देखा क्या?" तो बोलला, "आपको वाघा बॉर्डर जाना है?" साहिल बोलला, "हा." तो आमच्या तिघांकडे बघून म्हणाला, "अरे मॅण्डिने मुझे कहा है आप तिनोको ले जाने के लिए. चलो गड्डी निकल रही है." आम्ही तिघंही गोंधळलो. त्याच्या पाठीमागे चालू लागलो. साहिल त्याला बोलला , "हमने उसको पैसे दिये है." तो बोलला, "अरे जितने बाकी है उतने दे देना मुझे." आणि पुढे चालू लागला. तेवड्यात पाठीमागून मनदीपचा आवाज आला, "अरे भाईसाहब रुक जावो, कहा जा रहे हो." आम्ही थांबलो. मात्र तो मुलगा पटापट पुढे निघून गेला. मनदीप आमच्या जवळ आला. पारस बोलला, कहा थे आप? फोन भी नही उठाते. मनदीप बोलला, "सॉरी, पॅसेंजर ढुंड रहा था. ये तीन लेकर आया हूं जालियनवाला बाग के अंदर से." आम्ही पाठीमागे पाहिले एक मुलगा व दोन मुली येत होत्या. मनदीप बोलला, "आप उसके साथ कहा जा रहे थे?" साहिल बोलला, "उसनेही कहा मॅण्डिने बोला है चलो मेरे साथ". मनदीप बोलला, " नही भाई वो पॅसेंजर भगा रहा था. ये साले ऐसे ही करते है दुसरोंके पॅसेंजर ले जाते है. चलो अब मेरे साथ." आम्ही त्याच्या मागे चालू लागलो. पारस त्याला बोलला, अभि पाच बजके दस मिनटं हो गये है, हमे परेड देखणे मिलेगी ना? तो बोलला, "अरे कोई टेन्शन नही मिलेगी." थोडं पुढे चालत गेल्यावर मनदीप बोलला, "आप यही रुक जावो मै गड्डी लेकर आता हु." आम्ही थांबलो. तो समोरील एका गल्लीत गेला. आम्ही सहाजण त्याची वाट बघत उभे राहिलो. पाच मिनिटे झाले तरी तो काही आलाच नाही. मी बोललो, " अरे क्या लाने गया है वो? गाडी लाने में इतना टाइम थोडी लागता है." पारस बोलला, "कुछ पता नही चल रहा, लेकीन गाडी कोनसी होगी यार?" आम्ही थोडा विचार करू लागलो. तेवड्यात गल्लीतून मनदीप रिक्षा घेऊन येताना दिसला. आम्ही सहाही जण एकमेकांकडे पाहून हसू लागलो. पाच वाजून पंधरा मिनिट झाले होते त्यामुळे आम्ही काहीही न बोलता पटापट रिक्षात बसलो. मधल्या सीटवर चार जण मनदीपच्या उजवीकडे एक व डावीकडे एक. मी उजवीकडे होतो. रिक्षा सुरु झाली.
रस्त्याने जात असताना मी मनदीपला विचारलं, "वहा पाहुचने कितना टाइम लगेगा हमे?" तो बोलला, "अगर ट्राफिक रहेगा तो एक घंटा लगेगा, नही तो पैतलीस मिनटं में पाहुचेंगे." आम्ही सर्वजण शांत होतो. मनदीप रिक्षा पळवत होता मधेच घड्याळ पाहत होता. माझ्या मनाला हूर-हूर लागली होती की तिथलं वातावरण कसं असेल. आपण व्हिडीओ मध्ये किंवा फिल्म मध्ये परेड पाहिली आहे आज मात्र प्रत्यक्ष पाहणार. आणि काळजी पण वाटत होती की, वेळेवर पोहोचू कि नाही याची. मधेच मनदीप बोलला कि, "आपको टाईमपर लेके जाउंगा और आगेवाले गेट तक छोडुंगा." त्याला कोणीतरी विचारलं होत. मधेच त्याने रिक्षा पेट्रोल भरण्यासाठी वळवली. आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं आणि हसलो. पण कोणीही काहीही बोललं नाही. पेट्रोल भरल्यानंतर मनदीपने रिक्षाचा वेग वाढवला. मधे-मधे तो घड्यालही पाहत होता. रिक्षा बोर्डरपासून दोन-तीन किलोमीटर दूर असेल तेव्हा त्याने एक कॉल केला व समोरील व्यक्तीला गेटच्या बाहेर यायला सांगितलं आणि आम्हाला बोलला, आप सभी अपने मोबाईल और पर्स अपने पास रखो बाकी सब सामान बॅगमे डालो, हम बॅग्स गेटपे जमा करेंगे.
आम्ही गेटजवळ पोहोचलो तसा तो माणूस धावत आला त्याच्यासोबत आणखी दोन-तीन जण आले. तो बॅग्स जमा करू लागला आणि दुसरे आमच्या हातावर, गालावर रंगाने तिरंगा काडू लागले. सुरुवातीला आम्हाला मस्त वाटलं आणि तिरंगा काडून झाल्यानंतर वीस-वीस रुपये मागू लागले. मग मात्र आम्ही आवाक झालो. पण उशीर झाल्यामुळे आम्ही गपचूप पैसे दिले. शिवाय बॅग्स ठेवण्याचे पण त्यांनी एका बॅग प्रमाणे चाळीस-चाळीस रुपये घेतले. मी मनात म्हटलं, यार यांचा रोजचा धंदाय हा.
आमची रिक्षा आतल्या गेटकडे निघाली. मी आजूबाजूला पाहात होतो रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी भारतीय आर्मीचे जवान उभे होते त्यांना पाहून अभिमान वाटू लागला. त्यांच्या हातातील बंदुका, त्यांचा युनिफॉर्म, त्यांचा तो रुबाब खूपच अप्रतिम. मनदीपने आम्हाला आतल्या गेटपर्यंत सोडलं. आम्ही पटापट खाली उतरलो आणि भरा-भरा आतमध्ये निघालो. आत जात असताना एक हलकीशी सूचना कानावर येऊन आदळू लागली ती म्हणजे, " अंदर का स्टेडियम फुल होने के कारण हम आपको एन्ट्री नही दे सकते, आपसे अनुरोध है कि आप कृपया पिछे चले जावो."
त्याक्षणी आम्ही सहाही जण स्तब्ध उभे राहिलो एकदम निराश आणि हताश. समोरून प्रवेश न मिळालेली माणसं येत होती. आम्ही पुढे जाऊ लागलो आता ती सूचना जोरजोरात कानावर येऊन आदळत होती. तरीही आम्ही एन्ट्री गेटपर्यंत गेलो तिथे लोकांची खूप गर्दी दिसत होती आणि बाजूलाच टुरिस्टच्या गाड्यांची गर्दी दिसत होती. पुढे जाऊन चौकशी केली असता आम्हाला कळलं की, एरवी एवढी गर्दी कधीच होत नाही परंतु आज रविवार असल्यामुळे झाली असेल कदाचित. जेवढे आतमध्ये लोक होते तेवढेच बाहेरही असतील.
आम्ही बाहेरील स्क्रीनवर परेड पहिली आणि खुश होऊन परतीला निघालो.

शाम मोहन भोसले

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sham M Bhosle

Writer, Director

साहित्यप्रेमी, माणूस, एक प्रवाशी.....

//