काशी एक सुंदर आणि समृद्ध नगरी. पुष्प पताकांनी ती नटली होती. सर्वत्र उत्साह सळसळत होता. काशी नरेशाने त्याच्या तीन कन्यांच्या स्वयंवराचं आयोजन केलेलं होतं. त्याकरता एक भव्य विवाह मंडप उभारला गेला होता. महामार्ग सुशोभीत झाला होता. मखमली झूलींनी डोलणारे हत्ती, पंच अश्वांचे सोनेरी रथ, वाजणारे नगारे आणि देशोदेशीचे येणारे पराक्रमी राजे. रथी-महारथी, सुवर्णसिंह सिंहासनावर येऊन स्थानापन्न होत होते. काशिनरेशाच्या तीन राजकन्या अंबा, अंबिका, अंबालिका अनुपम सौंदर्यवती होत्या. हाती वरमाला घेऊन त्यांनी विवाह मंडपात प्रवेश केला. अंबा-काशी नरेशाची ज्येष्ठ कन्या, स्वप्नगंधा-आनंदमय ती त्या विवाह मंडपात शोध घेत होती शाल्वाचा. शाल्व तिच्या स्वप्नातला राजकुमार. त्या क्षणी त्या दोघांची नजरा नजर झाली. तिच्या हातातली वरमाला अधिकच अधीर झाली. पण तेवढ्यात हे काय झालं?
तिथे आले भीष्म! सुसाट वाऱ्यासारखे! मुसळधार धारांसारखे! अनावर प्रपातच आणि त्यांनी दिलं आव्हान उपस्थित राजांना आणि उधळून टाकला समस्त विवाह मंडप. तलवारी लखलखल्या, रणभरी वाजू लागल्या आणि पडला सर्वत्र रक्ताचा सडा. त्या क्षणात अंबेची सारी स्वप्न भस्मसात झाली. महाभारतात उद्योगपर्वात अंबोपाख्यान पर्व आले आहे.
काशिनरेशच्या तीन राजकन्या अंबा, अंबिका आणि अंबिका पैकी आंबा ज्येष्ठ तिचं शाल व देशाचा पराक्रमी राजा शाल्वावर प्रेम होतं. मनातल्या मनात तिने त्याला आपला पती मानला होता. तोही तिच्यावर अनुरक्त होता. दोघांनीही स्वयंवराच्या आधीच एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. मात्र स्वयंवरात अंबा शाल्वाच्या गळ्यात वरमाला घालणार होती, तेवढ्यात विवाह मंडपात महापराक्रमी भीष्म आले आणि त्यांनी शाल्वा सहित सर्वांचा पराभव करून, तीनही कन्यांच हरण केलं.
राजा शांतनू व सत्यवती यांच्या विवाहप्रसंगी भिष्मानी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञांनी केली होती, त्यामुळे सत्यवतीच्या चित्रांगद पुत्राच्या निधनानंतर, तिचाच दुसरा पुत्र विचित्रवीर्य हस्तिनापुराच्या सिंहासनावर अभिषेक्त झाला होता. आणि त्याच्या विवाहासाठी भीष्माने राजकन्यांच हरण केलं होतं.
मात्र हस्तिनापूर मध्ये आल्यावर अंबाने भीष्माजवळ शाल्वाबद्दलचा आपला अनुराग व्यक्त केला आणि भीष्माने तीला संरक्षण दिलं. शाल्वाकडे सन्मानने पाठवलं परंतु शाल्वाला तो त्याचा अपमान वाटला. तो अंबेला म्हणाला…
शल्व-"तुला भीष्माचा म्हणजे परपुरुषाचा स्पर्श झाला आहे म्हणून मी तुझ्या प्रेमाचा अव्हेर करतो. मी तुझा माझी पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही कारण परंपरेप्रमाणे जो इतर सर्व राजांचा पराभव करून एखाद्या राजकन्येचे हरण करतो ती राजकन्या त्या वीर पुरुषाची होते. तू भीष्माकडे परत जा."
सहजिकच आपल्या प्रेमभंगास भीष्माला कारणीभूत ठरवून अंबा सुडाग्निने पेटून उठली. ती परत भीष्माकडे आली आणि तिने भीष्मालाच माझं पाणीग्रहण करा अशी याचना केली.
आंबा -"महाराज आपण स्वयंवरातून मला आणि माझ्या भगिनींना हरण करून आणल आहे त्यामुळे आपणच माझं पाणी ग्रहण करावे."
भीष्म -"राजकन्ये भलेही मी तुला आणि तुझ्या भगिनींना स्वयंवर मंडपातून हरण करून आणलं असेल, परंतु मी तुझं पाणी ग्रहण करू शकत नाही. कारण मी आजन्म ब्रह्मचर्य व्रत पाळण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, त्यामुळे तू विचित्रवीर्यसह विवाह करून हस्तिनापूरची महाराणी हो."
अंबा -"महाराज आपण फार मोठे शुर आहात. आपल्यासारखा वीर योद्धा समस्त भारत वर्षात नाही! परंतु मला सांगा स्वयंवर मंडपात आपण जर माझं हरण केलं तर? मी आपणाला सोडून दुसऱ्या कोणाचं पाणी ग्रहण कसं करू? एक तर माझं ज्याच्यावर प्रेम होतं त्यांनी मला अव्हेरल आहे आणि आता तुम्हीही मला दुसऱ्याच व्यक्तीसह आयुष्य घालविण्याचे उपदेश देत आहात. सांगा हे कुठल्या धर्मात आणि कुठल्या ग्रंथात लिहिलेल आहे?"
भीष्म -"राजकन्ये तुझा गैरसमज झालेला आहे. मी जरी विवाह मंडपातून तुम्हा तिघी बहिणींचा हरण केलं असेल तरीही स्वतःसाठी नाही तर माझ्या बंधूंसाठी, त्यामुळे मी तुझं पाणीग्रहण करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तू एक तर शाल्वाकडे परत जा किंवा आपल्या मातापितांकडे."
भीष्मांचे हे कठोर शब्द अंबेच्या कानात शिश्याच्या रसाप्रमाणे ओतल्या गेले आणि ती सुडाने पेटून उठली. तिने आपले मातामह होत्रवाहन यांच्याकडून परशुरामांकडे आपली कैफियत सांगितली. परशुरामाने भीष्मांना द्वंदयुद्धाचे आव्हान दिले. त्यात भीष्म जिंकले त्यामुळे अंबा अधिकच चिडली आणि तिने अग्नी काष्ठ भक्षण केले.
©® राखी भावसार भांडेकर.